कवी वसंत गुर्जर यांच्या ‘गांधी मला भेटला होता’ या कवितेच्या प्रकाशनावरून निर्माण झालेल्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. १९९४ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रकाशित होत असलेल्या मासिकात ही कविता प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, कलात्मक स्वातंत्र्य म्हणजे महात्मा गांधींचा अनादर करणे नव्हे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे.
‘गांधी मला भेटला होता’ ही कविता बँक ऑफ महाराष्ट्रच्या मासिकात प्रकाशित केल्याच्या मुद्दय़ावरून मासिकाचे संपादक व बँककर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. भारतीय दंडविधानाच्या कलम २९२ अंतर्गत (अश्लील पुस्तकांचे प्रकाशन व विक्री) तुळजापूरकरांवर ठपका ठेवण्यात आला. याअंतर्गत दोन हजार रुपये दंड व दोन वर्षांचा कारावास अशा शिक्षेची तरतूद आहे. तुळजापूरकर यांनी आपल्यावरील हा ठपका रद्दबातल ठरवण्यात यावा, अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा व न्यायमूर्ती प्रफुल्ल पंत यांच्या खंडपीठाने यावरील निर्णय राखून ठेवला. महात्मा गांधी यांच्या तोंडी अश्लाघ्य शब्द घालून कविता रचणे हे घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे का, या मुद्दय़ाअंतर्गत हा खटला येतो का, हे पाहावे लागेल असे खंडपीठाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालय म्हणाले..
* महात्मा गांधींचा आदर करणे ही देशाची सार्वत्रिक जबाबदारी नाही का? तुम्हाला आदर्शवाद देणाऱ्या व्यक्तीचा तुमच्या कलात्मक स्वातंत्र्याचा वापर करून अपमानही तुम्ही करू शकत नाही
* कल्पनास्वातंत्र्य आणि शब्दस्वातंत्र्य यांच्यातील भेद समजायलाच हवा.
तुळजापूरकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद
* असहमती सहन करणे हे लोकशाहीचे द्योतक आहे. संपूर्ण स्वातंत्र्य असे काही नाही, परंतु शब्दांच्या माध्यमातूनच कल्पनास्वातंत्र्याचा आनंद उपभोगता येतो