पाकिस्तान सीमेजवळील पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्य़ात सैनिकांच्या वेषात आलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे दीनानगर पोलीस ठाण्यासह एका बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह आठ जणांचा मृत्यू झाला. सुमारे १२ तासांच्या या थरारक मोहिमेत सुरक्षा दलांनी प्रतिहल्ला चढवून तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले. स्वातंत्र्य दिन जवळ आलेला असताना झालेल्या या हल्ल्यानंतर विशेषत: पंजाब व जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
या हल्ल्याची कार्यपद्धती (मोडस ऑपरेंडी) अलीकडेच जम्मूमध्ये झालेल्या हल्ल्यांसारखीच असल्यामुळे संशयाची सुई पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा (एलईटी) किंवा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या संघटनांकडे वळली आहे. अमृतसर- पठाणकोट रेल्वेमार्गावर पाच जिवंत बॉम्ब सापडल्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले.
दहशतवादी हल्लेखोरांच्या ओळखीबाबत अद्याप अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आलेले नाही. तथापि, ते जम्मू व पठाणकोट किंवा जम्मू जिल्ह्य़ातील चाक हिरा दरम्यानच्या कुंपणरहित सीमेवरून भारतात शिरले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांनी तीन नागरिक, तसेच पंजाब प्रांतीय सेवेचे अधिकारी असलेले पोलीस अधीक्षक बलजितसिंग, दोन गृहरक्षक आणि दोन पोलिसांना ठार मारले. हल्ल्यात १५ लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी काही गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
पहाटे पाच वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी एका छोटय़ा उपाहारगृहाला लक्ष्य केले आणि मारुती-८०० मोटारीत बसून जाताना दीनानगरजवळील एका विक्रेत्याला गोळी घालून ठार मारले.
प्रवाशांवरही गोळीबार..
दहशतवाद्यांनी रस्त्यावरून जात असलेल्या पंजाब राज्य वाहतुकीच्या बसमधील प्रवाशांवर गोळीबार केला आणि दीनानगर ठाण्याशेजारील सामुदायिक आरोग्य केंद्राला लक्ष्य बनवले. यानंतर हे बंदूकधारी दहशतवादी दीनानगर पोलीस ठाण्यात घुसले आणि तेथे अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
पाकिस्तानच्या सीमेपासून जवळ असलेले दीनानगर शहर पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्य़ात आहे. एका बाजूला गुरुदासपूर आणि दुसऱ्या बाजूला पठाणकोट यामध्ये वसलेले हे शहर राजधानी चंदिगडपासून २६० किलोमीटर अंतरावर आहे.
दहशतवादी कोठून आले?
हल्लेखोर जम्मू व पठाणकोट किंवा जम्मू जिल्ह्य़ातील चाक हिरा या दरम्यानच्या कुंपण नसलेल्या सीमेवरून पाकिस्तानातून भारतात शिरले असल्याचा संशय आहे. गुप्तचर संस्थांना या संभाव्य भीषण हल्ल्याबाबत पूर्वसूचना मिळाली होती. हे दहशतवादी (ज्यांच्या संघटनेचे नाव अद्याप कळलेले नाही) रविवार-सोमवारच्या मध्यरात्री भारताच्या हद्दीत घुसले असावेत आणि पहाडपूर मार्गाने महामार्गावर आले असावेत.
बलजित सिंग यांचे वडीलही दहशतवादी हल्ल्याचे बळी
कपुरथळा : दिनापूर येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलेले बलजित सिंग यांचे वडीलही १९८४ मध्ये पंजाबी अतिरेक्यांच्या हिंसाचारात मरण पावले होते. सोमवारी झालेल्या हल्ल्यात पोलिस अधीक्षक बलजित सिंग, चार नागरिक व दोन पोलिस मरण पावले,
बलजित सिंग हे १९८५ मध्ये पोलिस दलात आले. त्यांचे वडील अच्छार सिंग हे अतिरेक्यांनी १९८४ मध्ये घडवून आणलेल्या रस्ते अपघातात मरण पावले होते. फगवारा येथे ते पोलिस अधिकारी होते नंतर सातव्या आयआरबी बटालियनमध्ये त्यांनी मानसा येथे टेहळणी विभागात पद स्वीकारले होते. बलजित सिंग यांच्या वीरमरणानंतर त्यांच्या संतपुरा येथील वस्तीत दु:खाचे वातावरण होते. बलजित सिंग यांची पत्नी कुलवंत कौर ही हृदयरुग्ण असून तिला बलजित यांच्या मृत्यूची खबर सांगू नका, असे विशेष पोलिस अधीक्षक आशिष चौधरी यांना बलजित यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. बलजित यांच्या पश्चात मुलगा महिंदर सिंग (२४) मुली परमींदर कौर (२२) व रवींदर कौर (२०) असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी येथे आणले जाणार आहे.