महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळाच्या झळा सोसत असताना आसाराम बापूंनी सोमवारी होळीच्या नावाखाली हजारो लिटर पाणी वाया घालवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेचा वर्षाव सुरू झालाय. 
नागपूरमधील कस्तुरचंद पार्क मैदानावर आसाराम बापूंनी तिथे जमलेल्या त्यांच्या भक्तांवर पाण्याचे फवारे उडवून होळी साजरी केली. नागपूर महापालिकेने त्यासाठी पाण्याचे टॅंकर पुरविले होते. मैदानाच्या मध्यभागी उभारलेल्या मंडपामध्ये आसाराम बापू आले, त्यांनी सुरुवातीला होळीनिमित्त काही वेळ नृत्य करून नंतर तिथे ठेवलेल्या फवाऱयांमधून भक्तांवर पाण्याचा फवारा करण्यास सुरुवात केली. आसाराम बापूंच्या होळीत सहभागी होण्यासाठी हजारो भक्त तिथे जमलेले होते. पिण्याच्या पाण्याचा होळीसाठी व्यावसायिक वापर केल्याबद्दल नागपूरमधील या कार्यक्रमाच्या आयोजकांवर महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयोजकांकडून दंडही आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, आसाराम बापूंच्या या कृत्याचा सोमवारी विधिमंडळात एकमताने निषेध करण्यात आला. आसाराम बापूंना रोखण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल. मात्र, महाराष्ट्रात अशी थिल्लरगिरी चालू देणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. लाखो लिटर पाणी वाया घालवून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम आसाराम बापूंना केलंय, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी केली.
महाराष्ट्रातील संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. पाण्यासाठी अनेक लोकांना घरंदारं सोडून शहरांमध्ये विस्थापित व्हावे लागले आहे. गुरांना जगविण्यासाठी अनेक ठिकाणी चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. सरकारी उपाय तोकडे पडत असताना आता सामान्यांनीही पाण्याचा अपव्यय टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आसाराम बापूंनी प्रथेप्रमाणे पाण्याची नासाडी करून होळी साजरी केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आलीये.

Story img Loader