पुराचे चित्रण ‘फक्त आमच्याच वाहिनीवर’ कसे वेगळे आणि सर्वप्रथम आहे, हे सांगण्याच्या उत्साहात तेथील परिस्थिती सांगताना वाहिनीचे पत्रकार तेथील लोकांच्या खांद्यावरदेखील आरूढ होऊन पूरग्रस्तांच्या हालातच भर घालत आहेत.
उत्तराखंडमधील नैसर्गिक प्रकोपानंतर अडकलेले हजारो पर्यटक आणि उद्ध्वस्त झालेले लाखो नागरिक यांच्या वेदना कॅमेऱ्याने टिपत, टिपेच्या स्वरात वार्ताकन करीत आपल्या वाहिनीचा ‘टीआरपी’ वाढविण्याच्या नादात दूरचित्रवाहिन्यांचा तोल सुटल्याचे स्पष्ट होत आहे.
पुराचे चित्रण ‘फक्त आमच्याच वाहिनीवर’ कसे वेगळे आणि सर्वप्रथम आहे, हे सांगण्याच्या उत्साहात तेथील परिस्थिती सांगताना वाहिनीचे पत्रकार तेथील लोकांच्या खांद्यावरदेखील आरूढ होऊन पूरग्रस्तांच्या हालातच भर घालत आहेत. पूरग्रस्ताच्या खांद्यावरून बातमी देणाऱ्या ‘न्यूज एक्स्प्रेस’ या हिंदी वाहिनीच्या पत्रकाराला वाहिनीने बुधवारी निलंबित केले आहे.
नदीला कसा पूर आला आहे, हे लोकांना दाखविण्यासाठी या वाहिनीचा पत्रकार नारायण पारगैन हा तेथील एका पूरग्रस्ताच्या खांद्यावरच बसला होता. एका नागरिकाने हा ‘आयजीच्या जिवावर बायजी सवार’ प्रकार चित्रित केला आणि तो ‘यू टय़ूब’वरून झळकावल्यानंतर बातमीसाठी काय काय केले जाते, याचे दर्शन नेटकरांना झाले. त्यानंतर या वाहिनीने या पत्रकाराला तडकाफडकी निलंबित केले आणि ही कृती नुसती अमानवीच नव्हे तर आमच्या संस्थेच्या संस्कृतीला छेद देणारीही होती, असा पवित्रा घेतला आहे. त्यावर ‘मी स्वत: नदी पार करणार होतो पण डेहराडूनमधील बिंदाल भागातील ज्या लोकांची स्थिती मी चित्रित करीत होतो त्यांनीच मला त्यांच्या खांद्यावरून नदी पार करण्याचा आग्रह केला’, असा दावा या पत्रकाराने केला असला तरी तो वाहिनीने फेटाळला आहे.
माझ्या मित्राने माझी कारकिर्द संपुष्टात आणण्यासाठी मला दगा देऊन हा प्रकार चित्रित केला आहे, असा आरोपही नारायणने केला आहे. तेथे लोकांची अन्नपाण्यावाचून कशी दुर्दशा होत आहे, हे मी कित्येक तास फिरून चित्रित केले आहे, खांद्यावर मी काही मिनिटेच बसलो असेन, असेही त्याने म्हटले आहे. अर्थात त्याचा सर्व युक्तिवाद फेटाळून वाहिनीने त्याला कामावरून काढले आहे.