गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात चर्चेत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून, वेगवेगळ्या भाकीतांना धक्का देत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाईट हाऊस’वरील आपला दावा बुधवारी पक्का केला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले. विविध अंदाजांमध्ये हिलरी क्लिंटन या निवडणूक जिंकण्याची शक्यता अधिक असल्याचे वर्तविण्यात आले होते. पण बुधवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून पारडे ट्रम्प यांच्या बाजूनेच फिरले आणि अखेर त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेला २७० मतदार मंडलांचा (इलेक्टोरल कॉलेजेस) पाठिंबा प्राप्त केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना निवडणुकीच्या रिंगणात उतरून विजय प्राप्त करून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात इतिहास घडवला.

जगातील सर्वाधिक बलाढ्य राष्ट्र आणि सर्वात जुनी लोकशाही म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे बघितले जाते. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन या दोघांमध्येच यंदाचा अमेरिकेतील निवडणुकीचा सामना रंगणार हे स्पष्ट झाल्यापासूनच अमेरिकेसह संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार जगातील बलाढ्य देशाचे नेतृत्त्व करण्यास कसा योग्य आहे, याचे दाखले देऊ लागला. तर विरोधक त्याच्या दाव्यातील हवाच काढून घेण्याकडे वळले. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन ही दोन्ही नावे गेली काही दिवस संपूर्ण जगभरात ट्रेंडिंगमध्ये राहिली.
डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक डोनाल्ड ट्रम्प यांना बालबुद्धीचे म्हणून हिणवत होते. तर रिपब्लिकन पक्षाचे पाठिराखे हिलरी क्लिंटन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते. एकमेकांवरील आरोपांची पातळी घसरल्यामुळे यंदाची अध्यक्षीय निवडणूक वेगळ्याच अर्थानेही ऐतिहासिक ठरली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चारित्र्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले तर हिलरी क्लिंटन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक अधिकच गाजली.
भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यावरच डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आघाडी घेतली. जी राज्ये रिपब्लिकन पक्षाची पाठिराखी म्हणून परिचित आहेत. त्या राज्यांमध्ये त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. पण त्याचबरोबर कोणत्याही एका पक्षाशी एकनिष्ठ नसलेली आणि ऐनवेळी कोणाला मत देतील, याबद्दल संदिग्धता असलेल्या राज्यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पारड्यात आपले मत टाकले. त्यामुळे निवडणुकीच्या विजयासाठी महत्त्वाची असलेली फ्लोरिडा आणि ओहायो या दोन्ही स्विंग स्टेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचाच विजय झाला. या दोन्ही राज्यांकडून हिलरी क्लिंटन यांना खूप अपेक्षा होत्या. पण तेथील सर्वाधिक मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच विश्वास दाखवला.
निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार हे जसजसे स्पष्ट होऊ लागले तसतसा त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांवरही झाला. आशियाई शेअर बाजारांचे निर्देशांक बाजार उघडताच कोसळले. डॉलरचे भावही आंतरराष्ट्रीय बाजारात घसरले. यावरूनही त्यांच्या विजयामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला असल्याचे दिसून येते आहे.

Story img Loader