उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी वादग्रस्त विधान करत नवा वाद निर्माण केला आहे. गोहत्या करणाऱ्यांचे हात पाय तोडायला लावेन अशी धमकीच भाजप आमदार विक्रम सैनी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशमधील राज्यमंत्री सुरेश राणा यांच्या सत्कार समारंभातच विक्रम सैनी यांनी हे चिथावणीखोर विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उत्तरप्रदेशमध्ये बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपने मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथांना संधी दिली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात सुरेश राणा यांनाही स्थान देण्यात आले आहे. राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यावर सुरेश राणा शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये आले होते. राणा यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार विक्रम सैनी यांची जीभ घसरली. गोहत्येवर भाष्य करत असताना विक्रम सैनी म्हणाले, जी लोक गाईला मानत नाही आणि तिची हत्या करतात, अशा लोकांचे मी हात -पाय तोडायला लावेन अशी धमकीच त्यांनी दिली. तसेच जो वंदे मातरम म्हणत नाही किंवा भारत माता की जय म्हणताना ज्याला अभिमान वाटत नाही त्यांचेही हात- पाय तोडायला लावणार असे ते म्हणालेत.

माझ्याकडे तरुणांची टीम आहे. ही टीम अशी आहे जी युद्धप्रसंगी चीन आणि पाकिस्तानविरोधात सीमा रेषेवर वेतन न घेताही लढू शकते असा दावाही त्यांनी केला. अतिउत्साहाच्या भरात ते बोलतच होते. पण शेवटी उपस्थितांनी त्यांना भाषण आवरते घ्यायला लावले. सैनी यांच्या विधानाने आता वाद निर्माण झाला असून योगी आदित्यनाथांची या विधानामुळे विरोधकांकडून कोंडी होण्याची शक्यता आहे. आमदारांनी वादग्रस्त विधान करु नये असे आदित्यनाथांनी निर्देश दिले होते. आता बेताल विधान करणाऱ्या विक्रम सैनी यांच्यावर योगी आदित्यनाथ कारवाई करणार का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित होत आहे.