गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. हिंसक घटनांमुळे जखमी झालेल्या तीन नागरिकांचा बुधवारी मृत्यू झाला. राजधानी अहमदाबादमध्येही हिंसेचे लोण पसरले असून, शहरातील नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बापूनगर भागात बुधवारी सकाळी जमावाने पोलीसांवर दगडफेक केली. त्याचबरोबर जाळपोळही करण्यात आली. राज्यात निमलष्करी दलाचे पाच हजार जवान तैनात करण्यात आले असून, जमावबंदीचे आदेशही काही ठिकाणी लागू करण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्यांमुळे सूरत, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाना, पोरबंदर या जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयांना बुधवारी सुटी देण्यात आली आहे. पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे संपूर्ण गुजरात राज्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पटेल समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तरूण नेता हार्दिक पटेल याच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी अहमदाबादमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या सभेनंतर हार्दिक पटेल याला मंगळवारी रात्री पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्याची बातमी पसरताच आंदोलनाला हिंसक वळण लागले. हार्दिक पटेलला पोलीसांनी सोडून दिल्यावरही दंगेखोर ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी ‘गुजरात बंद’ची हाक देण्यात आली आहे.
आंदोलकांनी राज्य महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करीत त्या पेटवून देण्यास मंगळवारी रात्री सुरुवात केली. काही ठिकाणी दुकानांवरही दगडफेक करण्यात आली. सूरतमध्ये हिंसाचाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे तेथील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. निमलष्करी दलाचे जवान शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
दुसरीकडे पोरबंदर जिल्ह्यात आंदोलनामुळे राज्य महामंडळाची बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जमावबंदी आदेशही लागू करण्यात आले आहेत. मेहसाना जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. केंद्राकडून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. आनंदीबेन पटेल यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
अहमदाबादमध्ये हिंसाचारात तिघांचा मृत्यू, संपूर्ण गुजरातमध्ये चिंतेचे वातावरण
गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
First published on: 26-08-2015 at 11:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence was reported from across gujarat on patel community agitation