पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे नसून गुरुवारी या हिंसाचारामुळे एका वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. बसिरहाट येथे ६५ वर्षीय वृद्धाचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. गुरुवारी दुपारी वृद्धाच्या मृत्यूचे वृत्त येताच परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. नॉर्थ परगणा जिल्ह्यात आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे तणाव निर्माण झाला होता.

बसिरहाटमधील भिबला येथे राहणारे कार्तिक घोष हे बुधवारी दुपारी बाजारातून खरेदी करुन घरी परतत असताना त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला. यात जखमी झालेल्या कार्तिक घोष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. नॉर्थ परगणा येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या दंगलीत मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.

रविवारी ११ वीत शिकणाऱ्या एका मुलाने फेसबुकवर धार्मिक स्थळाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकले होते. यावरुन उत्तर परगणा जिल्ह्यात हिंसाचार सुरु झाला. दोन्ही गटांकडून घरावर, दुकानांवर हल्ले करण्यात आले होते. बुधवारी रात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आल्याने सुरक्षा यंत्रणांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र गुरुवारी घोष यांच्या मृत्यूचे वृत्त येताच जमाव पुन्हा रस्त्यावर उतरला. बुधवारी धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जमावाच्या मनात असंतोष खदखदत होता. दुकान आणि घरांमध्ये तोडफोड करण्यात आली असून पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धूराच्या नळकांड्या फोडल्या. या दंगलीवरुन राजकारण सुरु असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपला जबाबदार ठरवले आहे.

Story img Loader