बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी विधवांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमधील विधवा स्त्रियांनी उत्तरप्रदेशातील वृंदावन शहरात येऊन गर्दी करू नये असे वक्तव्य हेमा मालिनी यांनी केले.
मथुरा लोकसभा मतदार संघातील वृंदावन शहरात हेमा मालिनी दौऱयासाठी आल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, “बंगाल आणि बिहारमध्ये सुद्धा अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यामुळे त्या(विधवा) जर इथल्या नसतील तर, त्यांनी इथे येण्याची काही गरज नाही. वृंदावनमध्ये आधीच ४० हजार विधवांनी आश्रय घेतला आहे. यापेक्षा अधिकांना आश्रय देण्याची क्षमता वृदांवनमध्ये राहिलेली नाही आणि सध्या पश्चिम बंगालमधून सर्वाधिक विधवा स्त्रिया वृंदावनमध्ये आश्रयाला येत आहेत हे योग्य नाही. त्या बंगालमध्येच का आश्रय घेत नाहीत?” असा सवालही हेमा मालिनी यांनी उपस्थित केला.
राज्यातील विधवांच्या आश्रयाची जबाबदारीही संबंधित राज्यांची आहे आणि ती त्यांनी घ्यावी असेही हेमा मालिनी म्हणाल्या. सदर प्रश्नासंबंधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, हेमा मालिनी यांच्या वक्तव्या विपर्यास करण्यात आला असून त्या फक्त वृंदावन येथील विधवांच्या आश्रयस्थानाला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी विधवांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि याकडे त्यांचे विशेष लक्ष देखील आहे. यामुळे त्या असे विधान करणे शक्य नाही. असे हेमा मालिनी यांच्या निकटवर्तीयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटले आहे.   
दुसरीकडे, हेमा मालिनी यांच्या वक्तव्यावर तीव्र पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत हेमा मालिनी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गुरूवारी हेमा मालिनी यांच्या मुंबईतील निवासस्थानावर मोर्चाचे आयोजन केले आहे.