दादरी येथील प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करीत उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघाला(युनो) पत्र लिहून भारतातील अल्पसंख्याकांच्या दुर्दशेवर लक्ष घालण्याची विनंती केली आहे. युनोचे सरचिटणीस बान की मून यांना लिहीलेल्या पत्रात आझम खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर(आरएसएस) ताशेरे ओढले आहेत. संघाकडून धर्मनिरपेक्ष आणि विविधतेने नटलेल्या भारताला बहुसंख्याकांची राजवट असलेले हिंदूराष्ट्र बनविण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप आझम खान यांनी या पत्रात केला आहे. नव्या सरकारच्या धोरणांमुळे देशात मुस्लिमांची दुर्दशा झाल्याचा उल्लेख करीत देशात मुस्लिमांविरोधी भावना निर्माण करण्याची मोहिम संघाने सुरू केली असून दादरी येथे घडलेले प्रकरण त्याचे उदाहरण आहे, असे आझम खान यांनी नमूद केले आहे.
उत्तर प्रदेशातील दादरी येथे राहणाऱया महंमद अखलाख या मुस्लिम व्यक्तीची घरात गोमांसाचा साठा ठेवल्याच्या अफवेतून हत्या करण्यात आली. या घटनेमागे केंद्र सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच कारणीभूत असून हा कट योजनापूवर्करित्या घडविण्यात आल्याचाही खळबळजनक आरोप खान यांनी केला आहे. नव्या सरकारने भारताच्या संविधानानुसार शपथ घेतली खरी पण या सरकारचे प्रेरणास्थान आणि निर्णयांची अंमलबजावणी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उद्दीष्टांनुसार चालते. सरकारमध्ये निवडून आलेले बहुतेक नेते हे या संघाचेच सदस्य आहेत. त्यामुळे संघाच्या नियमांचे आणि विचारधारेचे आज्ञाधारकपणे पालन करण्याला हे मंत्री प्राधान्य देतात. मंत्र्यांच्या या वृत्तीमुळे देशात जातीय तेढ निर्माण होण्यास खतपाणी घातले जात असून देशात अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असेही खान यांनी युनोला लिहीलेल्या पत्रात नमूद केले आहे. आझम खान यांच्या या पत्रव्यवहारामुळे मोठा वाद उद्भविण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader