कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गाडीत एअरबॅग्ज असायलाच हव्यात, असा आदेश अलीकडेच केंद्र सरकारने काढला आहे. तत्पूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत आपली मारुती सुझुकीची स्विफ्ट आणि निस्सानची डॅटसन गो नापास ठरली. काही महिन्यांपूर्वी अशाच एका परीक्षेत अल्टो, ह्य़ुंडाई आय-१०, फोर्ड फिगो, फोक्सवॅगन पोलो व टाटा नॅनो या गाडय़ाही सपशेल नापास ठरल्या होत्या. खरंच गरज आहे का सुरक्षिततेची, की नुसताच बागुलबुवा उभा केला जातोय, याचा हा लेखाजोखा..

काही गोष्टी जशा दिसतात त्या पलीकडे जाऊन पाहायच्या असतात. जरी उघडय़ा डोळ्यांकडून टिपल्या जाणे अवघड असल्या, तरी त्या चाचपून पाहायलाच हव्यात. ग्राहक म्हणून अत्यावश्यक असलेला हा परिपाठ मात्र कायम विसरला जातो. चोखोबा खूप पूर्वी म्हणून गेले असले तरी वरच्या रंगावरून भुलण्याचे प्रयोग तुम्हा-आम्हा ग्राहकांकडून होतच असतात. चोखोबांच्याच अभंगाला ताजा संदर्भ द्यायचा तर म्हणावे लागेल – कार डोंगी अन् त्यातून प्रवासही डोंगा.. भारतातील दोन लोकप्रिय कारमधून प्रवास करणे अलीकडेच धोक्याचे ठरविले गेले आहे. युरोपातील एका खासगी संस्थेद्वारे आयोजित न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (ग्लोबल एनकॅप) नावाच्या चाचण्यांमध्ये भारतातील सर्वाधिक खपाची मारुती सुझुकी स्विफ्ट आणि निस्सान मोटरची डॅटसन गो या कार पूर्णपणे नापास ठरल्या. याच संस्थेने काही महिन्यांपूर्वी अशाच चाचण्या घेऊन भारतातील रस्त्यावर धावणाऱ्या मारुती अल्टो ८००, हय़ुंडाई आय-१०, फोर्ड फिगो, फोक्सवॅगन पोलो आणि टाटा नॅनो या अन्य पाच कार असुरक्षित ठरविल्या होत्या. मात्र, यावर कुठेही फारशी चर्चा झाली नाही.
सुरक्षिततेचा पलू हा कारच काय कोणत्याही चीज-वस्तू, उपकरणांच्या खरेदीत भारतीय ग्राहकांच्या विषय पटलावर एक तर कधी नसतो आणि असलाच तर शेवटचाच असतो. शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याची सक्ती करावी लागते; कारच्या चालकाने तरी निदान सेफ्टी बेल्टचा वापर करावा नाही तर दंड भरावा लागेल, असा धाक निर्माण करावा लागतो. या मंडळींना या स्व-सुरक्षेसाठी आवश्यक बाबी न भासता जाचच वाटत असतो. मद्यपान करून अथवा मोबाइलवरून संभाषण करणारे पकडले जाणाऱ्या कारचालकांची संख्या अनेक मोहिमांनंतरही कमी होताना दिसत नाही. जर कार अपघातात सापडून जिवावर बेतणाऱ्यांचे प्रमाण हे शंभरात एकच असेल, तर त्या शंभरांपकी आपणच असू असे समजण्याचे कारण काय? जेथे स्वत:च्याच जिवाबद्दल इतकी बेपर्वाई तर आपली जोखीमगिरी ही रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पापाच्या जिवावर बेतू शकते, त्याचा हकनाक बळी जाऊ शकतो, हा विचार तर दूरचाच ठरतो.

वाहननिर्मात्यांचे तर्कट
पण अपघातविषयक या तपशिलाकडे आणखी बारकाईने पाहा, असे कार निर्मात्या कंपन्यांचे म्हणणे आहे. कारची सुरक्षितता वाढली पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण तेच केवळ समस्येवर समाधान ठरणार नाही, असेच त्यांना सूचित करावयाचे आहे. कारण अपघातांतर्गत जीवितहानीची संख्या प्रचंड दिसत असली, तरी त्यातील कारअंतर्गत जीवितहानी झाल्याचे प्रमाण भारतात अवघे १६ टक्के आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे अपघात  होतात ते प्रामुख्याने अप्रशिक्षित व बेपर्वा चालक, खराब रस्ते, वाहतुकीच्या नियमांकडे चालक आणि पादचारी दोहोंकडून होणारा कानाडोळा यामुळे आणि त्यातून मरणाऱ्यांचे प्रमाण हे कारचालक व कारमधील प्रवाशांपेक्षा रस्त्यावरील पादचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कारचा बाह्य़ ढाचा व बांधणी अधिक मजबूत केला, एअर बॅग्ज, डिस्क ब्रेक, अँटि-लॉक ब्रेकिंग, पॉवर स्टिअिरग वगरे साधनांची सक्ती केली तरी अपघात होतीलच. फार तर कारअंतर्गत होणारी हानी घटेल, पण रस्त्यावरील जीवितहानी रोखली जाईल, याची खात्री काय, असा कार निर्मात्यांचा सवाल आहे.
भारतात रस्ते अपघातातील जीवितहानी आणि कारची सुरक्षितता यांचा थेट संबंध नसून, दोन गोष्टी अत्यंत वेगवेगळ्या आहेत, असे मत खुद्द मारुती सुझुकी लिमिटेडचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांचे आहे. उलट कारमध्ये अधिक सुरक्षा वैशिष्टय़ांचा अंतर्भाव करणे म्हणजे रस्ते सुरक्षिततेलाच धोक्यात आणणारे ठरेल, असा भार्गव यांचा इशारा आहे. कारण या सुरक्षा वैशिष्टय़ांमुळे कारच्या किमती वाढतील आणि ज्यातून स्व-मालकीचे चारचाकी वाहन घेण्याचे स्वप्न बाळगणारा ग्राहक दुचाकीकडे वळेल, जे अधिकाधिक असुरक्षिततेला निमंत्रणच ठरेल, असा भार्गव यांचा दावा आहे.

रस्ता अपघातांचे वास्तव
सुरक्षिततेविषयक एकूणच बेपर्वाई, त्यातच खराब रस्ते यामुळे भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण हे जगाच्या तुलनेत खूप अधिक आहे, ही वस्तुस्थितीच आहे. रस्त्यावरील अपघातात जगभरात मृत्यू होणाऱ्यांमध्ये प्रत्येक १० जणांमध्ये एक भारतीय असतो, असे या चाचण्या करणाऱ्या संस्थेचाच अहवाल सांगतो. गेल्या दशकभरात १२ लाख भारतीयांनी कार अपघातात प्राण गमावले. प्रत्येक चार मिनिटाला एकाचा बळी गेला आहे. त्याच वेळी दहा वर्षांत घडलेल्या या अपघातांमध्ये गंभीर जखमी अथवा कायमचे जायबंदी झालेल्यांची संख्या ५५ लाख इतकी प्रचंड आहे.

वाहतूक कायद्याला नवे रूप
दावे-प्रतिदावे कितीही केले जात असले तरी, भारत सरकारने ताज्या घटनाक्रमाची दखल घेतलेली मात्र दिसते. ग्लोबल एनकॅपच्या धर्तीवर ‘भारत न्यू व्हेइकल सेफ्टी असेसमेंट प्रोग्राम’ राबविण्याचे सूतोवाच केले गेले आहे. बाजारात कोणत्याही नव्याने दाखल होणारया वाहनांना या सुरक्षा मूल्यांकन चाचण्या बंधनकारक केल्या जातील आणि त्यायोगे तारांकित मानांकन देण्याचे घाटत आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रथमच महामार्ग वाहतूक कायद्याला नवे रूप देण्याचा मानसही अलीकडेच मोदी सरकारने व्यक्त केला आहे.
ताज्या कार चाचण्या आणि स्वयंघोषित अहवालबाजी यामागे, कार सुरक्षा तंत्रज्ञान व उत्पादन निर्मात्यांचा म्हणजे बहुतांश बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वाणिज्य हेतू असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भारत ही प्रचंड मोठी बाजारपेठ आहे आणि दरसाल भारतात विकल्या जाणाऱ्या प्रवासी कारचे प्रमाण जवळपास २० लाखांच्या घरात जाणारे आहे, तर शेजारचे देश आणि आफ्रिकेतील निर्यातही आणखी १०-१२ लाखांची आहे.

अतिरिक्त कार सुरक्षा आणि किंमत वाढ
मारुती अल्टो ८००     रु. २.४० लाख या प्रारंभिक
    किमतीतील अंदाजे भर
१. कारच्या बाह्य़ बांधणीतील बदल    रु. ५० ते ६० हजार
२. पुढच्या आसनांवर दोन एअरबॅग्ज     रु. ३० हजा
३. अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीम्स *    रु. १० हजार
(* ब्रेक दाबल्यानंतरही विशेषत: पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर गाडी घसरून जाणारे अंतर कमी करण्यासाठी)
स्रोत : मारुती सुझुकीच्या तंत्रज्ञाने दिलेल्या माहितीच्या आधारे

रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्याचे आपले उद्दिष्ट जरूर असायला हवे. त्यासाठी कुणा जागतिक संस्थेने मांडलेल्या निष्कर्षांनुसार काही पावले टाकली जाण्यापेक्षा, आपल्या समस्येवर उत्तर देशांतर्गत परिस्थिती लक्षात घेऊनच शोधले पाहिजे. कार सुरक्षिततेत भर घालून आपण अपघातातील जीवितहानीचे प्रमाण अवघ्या तीन-चार टक्क्यांनीच कमी करू शकू. पण परिणामी अन्य बाजूने नुकसानीचा पलू बळावलेला मात्र दिसेल. अधिक सुरक्षित कारसाठी किंमतही अधिक मोजावी लागणार असल्याने, मध्यमवर्गीय ग्राहक कारकडून दुचाकी खरेदीकडे वळेल. दुचाकीस्वारांशी संलग्न जोखीम घटक हा जुनाट फियाट कारचालकांच्या तुलनेत किती तरी पट अधिक निश्चितच आहे.
आर सी भार्गव, अध्यक्ष, मारुती सुझुकी लिमिटेड

विकसित देशांमधील परिस्थितीचे निकष लावून ग्लोबल एनकॅपने जे करायचे ते केले आहे. आपण मात्र स्वत:साठी आखलेल्या सुरक्षा पथावर मार्गक्रमण सुरूच ठेवले पाहिजे आणि ते सुरूही आहे. भारतात शहरी रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांचा सरासरी वेग हा ग्लोबल एनकॅप चाचण्यांमध्ये जो गृहीत धरला आहे, त्यापेक्षा कैक पटींनी कमी आहे. खराब रस्ते आणि प्रचंड रहदारीचा घटक लक्षात घेतलेलाच दिसत नाही आणि कारअंतर्गत सुरक्षा उपायांचा नाहक बागुलबुबा केला गेला आहे.
– विष्णू माथूर, महासंचालक, सिआम (भारतीय वाहन निर्मात्यांची संघटना)

Story img Loader