दौरा म्हणजे प्रवास- आणि प्रवास म्हटलं की सामान आलंच. त्यात नाटकाचा परदेशी प्रवास म्हणजे नाटकाचं सामान आणि सोबत ३५ कलाकार.. त्यामुळे त्यांचं सामान. हा होता विमानाचा प्रवास; तोही बहुतेकांचा पहिलाच. एक बरं झालं होतं की सगळ्यांचे पासपोर्ट काढून तयार होते. ते तेव्हा मुंबईहून यायचे. कलाकारांपैकी बहुतेक सगळे नोकरदार. त्यांना पासपोर्टसाठी त्यांच्या वरिष्ठांची अनुमती लागे. त्यासाठी प्रत्येकाच्या साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून ‘घाशीराम’चा प्रयोग दाखवणं, अंक पडल्यावर त्यांना आत बोलावून त्यांचं चहापाणी करून त्यांना परदेश दौऱ्याचं महत्त्व सांगणं- अशा जनसंपर्काच्या धडय़ात काही ‘ब्राह्मण’ तरबेज झाले होते. नाटकाचा जो काही सेट होता- म्हणजे लाकडी कमान वगैरे- तो फोिल्डग करून कमी आकारमानात कसा बसवायचा याचे अभ्यासवर्ग सुरू झाले. पात्रांचे पोशाख, वाद्यं, नाटकाची अन्य प्रॉपर्टी ठेवण्यासाठी एकूण दहा ट्रंका लागतील असा अंदाज अण्णा राजगुरू, सुरेश बसाळे आणि अरविंद ठकार यांना आला. मोठय़ा ट्रंका वगैरे पुण्यात मंडईजवळ मिळतात. सुरेशची मंडईत विशेष वट. कारण त्याच्या कुटुंबीयांचे मंडईतील हेरिटेज इमारतीच्या मुख्य टॉवरखाली किराणा सामानाचं पिढीजात दुकान. त्याच्या व्यापाऱ्यांशी ओळखी चिकार. ‘घाशीराम’च्या वेशभूषेची देखभाल करणाऱ्या ‘जाधव नाटय़संसार’च्या जाधवांचं दुकान तर थेट दाणेआळीत. म्हणजे नाटकात जो बावन्नखणीचा उल्लेख आहे त्याच भागात. जाधवांचा मूळ धंदा तंबाखूचा. या परिसरात तंबाखूचा अडत धंदा असल्यानं सर्वत्र तंबाखूचा वास दरवळत असे. त्यांच्या दुकानाच्या इमारतीचा एक भाग तंबाखूच्या पोत्यांनी भरलेला. तळमजल्यावर नायकिणी आणि त्यांच्या मुलींचा व्यवसाय. त्यामधून वर जाणाऱ्या जिन्यानं वर गेलं की जाधवांचं वेशभूषेचं मोठ्ठं दुकान. त्यावेळी तरी पुण्यातलं एकमेव! कुणालाही नाटक करायचं झालं तर वेशभूषेसाठी या दुकानात यावंच लागे. सुरेशचं घरही याच भागात होतं. त्यांच्या मालकीची एक मोठी चाळच होती. एकूणच त्याची वट असे. त्याला कोणताही जिन्नस- विशेषत: किराणा मालाचा- कुठून घ्यायचा, याचं अचूक ज्ञान. तो आमच्या संस्थेच्या संसारी कलाकारांत विशेष प्रिय. या कलाकारांच्या बायकांना घाऊक तांदूळ कोठून घ्यावा, चांगला गहू कुठे आलाय, डाळी स्वस्त कुठे मिळतील, याची अचूक माहिती तो पुरवत असे. तसंच त्यांनी खरेदी करून आणलेल्या मालाचा तो नीरक्षीरविवेक करीत असे. तांदळाचेही महोत्सव आयोजित करण्याचे दिवस अजून यायचे होते. त्यामुळे तो कुणाच्या घरी गेला की त्याचं जंगी स्वागत होई आणि स्वयंपाकघरात त्याच्या मंडईगप्पा रंगत. संस्थेचा तो कित्येक र्वष खजिनदार होता. कारण घरीच वाण्याचं दुकान असल्यानं एका हौशी नाटय़- संस्थेचे हिशेब ठेवणं हे त्याला सोपं काम होतं. असा हा सुरेश. त्यानं परदेश दौऱ्यासाठी सामान न्यायला दहा ट्रंका (त्यातल्या त्यात सुबक!) करून घेतल्या. त्यांचा आकार आधी एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नाटय़प्रेमी विद्या जोशी यांना विचारून घेतला होता. परदेश दौरा म्हणून नवीन वेशभूषा शिवण्यासाठी चोळखण आळीतून नवी कापडखरेदी चालली होती. पगडय़ा करून घेणं हे कसबी काम. नाटकात २५-३० विविध पद्धतीच्या पगडय़ा लागत. डोक्याच्या साच्यानुसार चांगली पगडी बांधणारे कसबी कामगार खूप कमी. करवतकाठी धोतरं, उपरणी. त्यांचा तांबडय़ा काठांचा रंग जाऊ नये म्हणू धोतरं, उपरणी आधी मिठाच्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवून मग धुऊन इस्त्री! मंडईजवळच्या पटवेकरांकडे पेशवाई थाटाचे खोटे दागिने करायला दिलेले. तर नानांच्या सातव्या लग्नाच्या सीनसाठी खोटय़ा फुलांचा पोशाख तुळशीबागेतून जिलब्या मारुतीकडे जाणाऱ्या बोळातल्या दुकानात करायला दिलेला. जर्मनीत खऱ्या फुलांचा लग्नाचा पोशाख कुठून आणणार? व्हिसासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचं विश्लेषण युद्धपातळीवर चाललं होतं. काही देशांसाठी ग्रुप व्हिसा मिळण्याची त्यावेळी तरतूद होती. असं सगळं वेगे चालू होतं. पण या आमच्या दौरातयारीच्या वेगाचा फुगा ‘घाशीराम’ दौऱ्याविरुद्ध येणाऱ्या बातम्यांनी सारखा फुटून सगळ्यांचा विरस होत होता. घालमेल वाढत होती. अशा दोलायमान स्थितीत असलेल्या नियोजित दौऱ्यावर एका हौशी नाटय़संस्थेनं किती खर्च करायचा? ३५ जणांच्या परदेश प्रवास खर्चापैकी केंद्राच्या कउउफ मार्फत ३० जणांची सोय झालेली होती. तसेच महाराष्ट्र बँकेत ‘घाशीराम’चे तीन कलाकार कामाला होते- चंद्रकांत काळे, आनंद मोडक आणि अनिल जोगळेकर. म्हणून त्यावेळचे बँकेचे चेअरमन वसंतराव पटवर्धन यांनी काही अर्थसाहाय्य मिळवून दिलं होतं. तशात एकेक प्रयोग नक्की झाल्याच्या बातम्या तारेनं येऊन धडकत होत्या. जर्मनीत पश्चिम बर्लिननंतर ग्योटींगेन, मग फ्रान्समध्ये तीन, हॉलंडमध्ये चार, तर लंडनला ‘घाशीराम’चे सलग नऊ आणि एक ‘महानिर्वाण’चा- असे एकूण २२ प्रयोग पश्चिम युरोपच्या विविध नाटय़गृहांतून नक्की झालेले होते. इटलीमध्ये रोम आणि मिलान इथले प्रयोग ठरत होते. म्हणजे २५ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर १९८० असा आमचा दीड महिन्याचा कार्यक्रम पक्का झालेला होता. काही प्रयोगांची तर तिकीट विक्रीदेखील सुरू झाली होती.
अखेर वादातून वाद वाढत ऐन दौऱ्याच्या तोंडावर ‘घाशीराम’ प्रकरण शेवटी कोर्टाची पायरी चढलंच. आमची एअर इंडियाची मुंबई-फ्रँकफर्ट फ्लाइट २४ सप्टेंबरला रात्री बुक झालेली आणि १५ सप्टेंबरला तेंडुलकरांना हायकोर्टाची नोटीस आली. झालं असं होतं की, ‘घाशीराम’विरोधात शिवसेनेचे नेते प्रमोद नवलकर (१९३५-२००७) व प्रभाकर पणशीकर (१९३१-२०११) यांचे बंधू दाजी पणशीकर यांनी हायकोर्टात रिट दाखल केला होता आणि मुद्दा मांडला होता की, तेंडुलकरलिखित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या सरकारी मदतीने होत असलेल्या नियोजित परदेश दौऱ्यामुळे पेशव्यांचे प्रधान नाना फडणवीस यांची जगभर नाचक्की होईल. जगापुढे पेशव्यांचा खोटा इतिहास जाईल. कारण ज्या प्रकारे या नाटकात नानांची व्यक्तिरेखा दाखवली आहे त्यास इतिहासाचा आधार नाही. सबब हा दौरा रद्द करावा आणि पासपोर्ट ताब्यात घ्यावेत, इत्यादी. त्यांचीच री ओढत केंद्रात इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असलेल्या, मराठी भाषा व इतिहास यांची उत्तम जाण असलेल्या विद्वान पी. व्ही. नरसिंह राव (१९२१-२००४) यांनी ‘घाशीराम’विरोधात जाहीर मत व्यक्त केलं आणि परदेश दौऱ्याबद्दल नापसंती व्यक्त केली. आधी वसंत साठे आणि आता नरसिंह राव- म्हणजे सत्ताधारी काँग्रेसचे दोन केंद्रीय मंत्री ‘घाशीराम’विरोधात. पुण्याचे ‘घाशीराम’प्रेमी काँग्रेस खासदार विठ्ठलराव गाडगीळ यांचे एक माजी विद्यार्थी प्रमोद नवलकर तर कोर्टातच गेलेले. तर दुसरे ‘घाशीराम’प्रेमी नेते शरद पवार हे विरोधी- म्हणजे समाजवादी काँग्रेस पक्षात.. असा सीन होता.
तेंडुलकरांना हायकोर्टाच्या आलेल्या समन्सची तातडीने दखल घेणे क्रमप्राप्त होते. त्यांना समन्स आलेलं कळताच त्यांच्याभोवती ‘घाशीराम’प्रेमींचं जे भक्कम कडं तयार झालं त्याची सूत्रं हलण्याचे काही अड्डे आपोआप निर्माण झाले होते. एक म्हणजे नरिमन पॉइंटमधील नुकताच उभा राहत असलेला एनसीपीए परिसर, दुसरा अड्डा म्हणजे साहित्यिक जयवंत दळवी यांचं दादरमधलं घर- ‘१३ विकास, भवानी शंकर मार्ग’; आणि तिसरा अड्डा म्हणजे विरोधी पक्षनेते शरद पवार यांचं मलबार हिलवरचं सरकारी निवासस्थान. समन्स आल्यावर एनसीपीएच्या उपसंचालिका डॉ. कुमुद मेहता ज्या पोटतिडकीने कामाला लागल्या त्याला तोड नाही. त्यांच्या ओळखीमुळे ‘घाशीराम’प्रेमी कायदेतज्ज्ञांनी हायकोर्टात तेंडुलकरांचं वकीलपत्र घेऊन मदत केली. त्यात प्रमुख अतुल सेटलवाड आणि चित्रा पालेकरचे मेहुणे रवी कुलकर्णी हे दोन वकील. तेंडुलकरांबरोबर सत्यदेव दुबे आणि पुष्पा भावे या तर असायच्याच. सोबत बाकीचे प्रायोगिक नाटकवाले होतेच. दुसरी गोष्ट कुमुदताईंनी आणि शांता गोखले यांनी केली, ती म्हणजे भारतभरच्या कलाकारांना ट्रंककॉल्स आणि तारा करून त्यांना ‘घाशीराम’च्या परदेश दौऱ्याच्या विरोधाच्या गांभीर्याची जाणीव करून दिली. त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नावे दौऱ्याला पाठिंबा देणाऱ्या तारा पाठविण्याचे आवाहन केलं. सर्वात जास्त पाठिंबा मिळाला तो कोलकात्यातील कलाकारांचा. कारण आमचा ‘घाशीराम’, ‘तीन पैशांचा तमाशा’ आणि ‘महानिर्वाण’ या तीन नाटकांचा ७८ सालचा गाजलेला दौरा! हा दौरा गाजला दोन कारणांनी.. एक म्हणजे आमच्या तिन्ही नाटकांच्या उत्तम व्यावसायिक सफाईच्या सादरीकरणाने. हे प्रयोग बघायला सत्यजित राय, उत्पल दत्त, मृणाल सेन, शंभू मित्र, तृप्ती मित्र, शमिक बंडोपाध्याय, रुद्रप्रसाद सेनगुप्ता, श्यामानंद जालान अशी मांदियाळी हजेरी लावून गेलेली. या सगळ्या कलाकारांच्या तारा दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात जाऊन थडकायला लागल्यावर प्रकरणाचं महत्त्व सर्वात अगोदर जाणवलं ते पंतप्रधान कार्यालयाचे त्यावेळचे मुख्य माहिती सल्लागार शारदा प्रसाद (१९२४- २००८) यांना. त्यांना ‘घाशीराम’-प्रकरणी पीएमओ ऑफिससाठी अधिकृत टिपण तयार करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यासाठी त्यांनी दोन व्यक्तींशी संपर्क साधला. एक म्हणजे ज्या गावचे हे नाटक आहे तिथले खासदार विठ्ठलराव गाडगीळ आणि दुसरे एनसीपीएचे संचालक, प्रसिद्ध संगीत, नृत्य, चित्र समीक्षक डॉ. नारायण मेनन (१९११-१९९७) या दोघांकडून त्यांनी टिपणासाठी मुद्दे मागविले. देशाच्या पंतप्रधान कार्यालयाला माहिती द्यायची ती बिनचूकच हवी. डॉ. मेनन यांनी त्यांच्या सहकारी कुमुद मेहता यांना हे काम दिले. कारण त्या नाटकाच्या लिखाणापासून संबंधित होत्या. तर विठ्ठलराव गाडगीळांना या प्रकरणाची १९७२ पासूनची सविस्तर माहिती मोहन आगाशे व मी शनवारपेठेतील गाडगीळ वाडय़ातल्या फोनवरूनच दिली. कारण त्यावेळी एसटीडी फोन सुविधा नुकतीच सुरू झालेली; आणि खासदारांना त्यांच्या घरी ही सुविधा चकटफू! तेवढीच कलेला शासकीय सबसिडी!
७८ मध्ये कोलकात्याचा आमचा दौरा गाजण्याचं दुसरं कारण म्हणजे दौरा संपून परतीच्या प्रवासासाठी हावडा स्टेशनवर आमचे तीन नाटकांचे मिळून पन्नास कलाकार निघाले असताना ढगफुटी झाली आणि एका रात्रीत बारा तासांत ‘न भूतो न भविष्यति’ असा १७ इंच पाऊस पडला. कोलकात्याचं पूर्ण जलमय पानशेत झालं. आम्ही सारी रात्र स्टेशनवर जागून काढली. उजाडल्यावर एका उघडय़ा ट्रकने परत फिरून हाजरा रोडवरच्या महाराष्ट्र निवासात सहा-सात दिवस अडकलो. कारण सगळे रेल्वे ट्रॅक वाहून गेलेले. नंतर श्यामानंद जालान यांच्यामार्फत आर्थिक उचल काढून नागपूपर्यंत विमान, मग ट्रेनने मुंबईजवळ कल्याण, आणि पुढे पॅसेंजरने पुणे असा अभूतपूर्व प्रवास घडला. त्यावेळी मुख्यमंत्री होते शरद पवार. त्यांच्या सूचनेमुळे कोलकात्याला आमची विचारपूस करायला प. बंगालचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रोज येत असत. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन आणि अनेक वर्षे कोलकात्यात असलेल्या मराठीभाषिक नाटय़रसिक तारा पंडित यांची घरं महाराष्ट्र निवासाजवळच होती. या दोन्ही घरांत सहा-सात दिवस आमची सरबराई झाली.
‘घाशीराम’ परदेश दौराविरोधी बातम्या शिगेला पोचल्या होत्या. कोर्टातलं प्रकरण अद्याप चालू होतं. या घालमेलीत जब्बार, मोहन आणि मी यांच्या मुंबई-पुणे चकरा सुरू होत्या. सप्टेंबरचा दुसरा आठवडा असावा. आम्ही तिघे मुंबईत ‘१३ विकास, भवानी शंकर मार्ग’वर. सकाळीच मुंबईत जयवंत दळवींच्या घरी तेंडुलकरही आलेले. ते कोर्टाच्या प्रकरणाचा अपडेट देत होते. दळवी त्या दिवशी त्यांना मिळालेल्या ताज्या माशांचं वर्णन करून ‘आता जेवून जायचं!’ असा त्यांचा आणि दळवीवहिनींचा प्रेमळ आग्रह चालू होता. त्यांनी तेव्हा नुकतीच मुंबईतल्या अमेरिकी दूतावासाच्या अमेरिकन सेंटरमधील वरिष्ठ अधिकारी-पदावरून पूर्णवेळ लिखाण करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली. त्यांचं घर हे तेव्हा आमचा विसावा होता. विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं. विधिमंडळ त्यावेळी जुन्या कौन्सिल हॉलमध्ये भरत असे. पुढे आम्हा तिघांना कौन्सिल हॉलवर जाऊन विरोधी पक्षनेते शरद पवार यांच्याबरोबर मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांना भेटायचं होतं. हेतू.. त्यावेळी केंद्राच्या कउउफ मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परदेशी जाणाऱ्या संस्थेला नव्याने वेशभूषा आणि नेपथ्य करण्यासाठी शासन थोडी आर्थिक मदत देत असे.
आम्ही कौन्सिल हॉलवर पोचलो. शरदराव आम्हाला घेऊन अंतुले यांच्याकडे गेले. त्यांनी नाटक पाहिलेलं होतं. ‘घाशीराम’चं कौतुक करून रक्कम मंजूर करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. नंतर आम्ही शरदरावांबरोबर त्यांच्या मलबार हिलच्या घरी पोचलो. त्यांनी मग महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंदराव तळवलकरांना फोन लावला आणि सांगितलं की, आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. बरं, हे सगळं ते निमूटपणे करत होते. त्यांचं नक्की काय चाललंय याचा अंदाज येत नव्हता. आम्ही घालमेलीत. आमची फ्लाइट २४ सप्टेंबरला. आता परदेश दौरा होणार की नाही? एका बाजूला त्यांचं फायली बघण्याचं काम चालू. ते मग म्हणाले की, गोविंदराव येतायत. त्यांना ‘घाशीराम’ प्रकरणाची अद्ययावत माहिती द्या. एवढय़ात गोविंदराव आलेच. मोहनने त्यांना माहिती दिली आणि ते आले तसेच लगोलग गेले. प्रतिभाताई मधूनमधून चहा-फराळ पाठवत होत्याच. तोवर संध्याकाळ झाली. आम्ही आता निघावं म्हणत असतानाच शरदराव म्हणाले की, ‘जरा जाऊन येऊ. मग तुम्ही पुण्याला परता.’ आम्ही ‘कुठे निघायचं?’ असं विचारल्यावर ‘कळेल!’ असं उत्तर आलं!
..तर शरदराव आम्हाला घेऊन शासकीय अ‍ॅम्बॅसेडरने मलबार हिलवरून निघाले. वाटेत एका ठिकाणी गाडी थांबली. ड्रायव्हर खाली उतरला. त्याला शरदराव म्हणाले, ‘हेनाकनचे कॅन्स घे! रिकाम्या हाताने जाणं बरं दिसत नाही.’ आम्ही कुठे निघालोय, हे रहस्य लवकरच कळलं. शरदराव म्हणाले, ‘आपण बांद्रय़ाला बाळासाहेब ठाकरेंच्या घरी चाललोय. चर्चेतून ‘घाशीराम’चं कोर्टाचं प्रकरण मिटतंय का बघू. त्यांना बियर आवडते.’ आमची गाडी कलानगरमध्ये ‘मातोश्री’वर पोचली. आत गेलो. बाळासाहेब ठाकरे (१९२६-२०१२) त्यांच्या उंच पाठीच्या खुर्चीवर बसलेले. हातात पाइप. त्यांचा आवडता कुत्रा बाजूला बसलेला. ते त्याला जवळ बोलावीत होते. पण पठ्ठय़ा पटकन् हलत नव्हता. दोन-तीनदा बोलावल्यावर मग तो त्यांच्याजवळ गेला. शरदराव म्हणाले, ‘आज्ञाधारक दिसत नाही.’ त्यावर बाळासाहेब इतके खळाळून हसले की डोळ्यांत पाणी आलं. शरदरावांनी आमची बाळासाहेबांशी ओळख करून दिली. त्यांनी मात्र ‘घाशीराम’ बघितलेलं नव्हतं. बाळासाहेबांनी आम्हाला ‘मातोश्री’च्या गच्चीवर घेऊन जाण्यास सांगितलं. अनेकजण त्यांच्या भेटीसाठी ताटकळत होते.
गच्चीवर भारतीय बैठक घातलेली. त्यावर चर्चेला आलेली मंडळी बसलेली. त्यात ‘घाशीराम’विरोधात कोर्टात गेलेले दाजी पणशीकर, भालचंद्र पेंढारकर (१९२१-२०१५) आणि नाटय़दर्पण प्रतिष्ठानचे सुधीर दामले हे तिघे बसलेले. सगळेच एकमेकांशी परिचित. नेहमीच्या गप्पा सुरू झाल्या. कधी पोचलात पुण्याहून, वगैरे. तोच बाळासाहेब आले. त्यांनी अत्यंत अनौपचारिक गप्पा सुरू केल्या. विविध चविष्ट पदार्थ आणि प्रत्येकाच्या आवडीची योग्य ती पेये योग्य ते द्रावण घालून येऊ लागली. ‘घाशीराम’ सोडून सर्व विषयांवर चर्चा रंगात. काही वेळाने शरदरावांनी ‘घाशीराम’चा विषय काढला. मोहनने दौऱ्याच्या तयारीचा वृत्तान्त कथन करून ऐनवेळी दौरा रद्द झाल्यास हौशी नाटय़संस्थेला आर्थिक नुकसान होईल, असं आख्यान लावलं. पण त्याचा काही परिणाम नाही. ‘काहीही झालं तरी कोर्टात माघार घेणार नाही. आणि जर कोर्टात निर्णय ‘घाशीराम’च्या बाजूने लागला तर शिवसैनिक विरोध करतील,’ असं त्यांचं म्हणणं. आणि त्यावर ते ठाम. रात्र झाली होती. चर्चेतून काही निघत नाही असं बघून अन्य गप्पा, उत्तम जेवण करून आम्ही शरदरावांच्या गाडीतून माघारी निघालो. गाडीत ‘आता पुढे काय?’ विचारल्यावर शरदराव म्हणाले, ‘ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. कारण त्यांनी त्यांची एक भूमिका घेतलेली आहे. आपण आपली. दौरा ठरला आहे.. तो होणार.’दादरहून रात्री आम्ही पुण्याची टॅक्सी पकडली. पासपोर्ट आहे, व्हिसा आहे, पण देशाची हद्द ओलांडता येईल याची खात्री नाही. बरं, आणीबाणी म्हणावी तर तीही नाही. ज्यांनी ती आणली ते पराभूत होऊन परत जेते झालेले. जे आणीबाणीविरुद्ध लढले ते अल्पकाळ सत्तेवर येऊन आता परत विरोधात बसलेले. नाटकाच्या विरोधात सगळ्या पक्षांचा चोंबाळा झालेला. याला झाकावा, तर दुसरा उघडा पडतोय. हे सगळं रामायण १९८० मध्ये कशासाठी? तर स्वतंत्र भारतातलं लोकनाटय़ परंपरेतलं हौशी रंगभूमीवरचं एक मराठी नाटक परदेशी गेलं तर इतिहासाशी प्रतारणा होऊन देशाची अब्रू जाईल म्हणून! विचारांनी टॅक्सीत झोप काही येईना. सकाळी डेक्कन क्वीनने दादरला आलेलो आम्ही. अंग अगदी आंबून गेलेलं. पहाटे पुण्याला पोचल्यावर जब्बारला पहिल्या लोकलने दौंडचा दवाखाना. त्यात दौंडच्या बाजाराचा दिवस. मला आणि मोहनला स्टेशनसमोरचं ससून सवरेपचार रुग्णालय!
आता राहिले ते ‘घाशीराम’ परदेश दौरा निर्गमनाच्या क्लायमॅक्सचे सीन्स.. ते असे-
पुण्याला गेल्यावर दुसऱ्या दिवशी गोविंदराव तळवलकरांचा दौऱ्याला पाठिंबा देणारा ‘घाशीराम परदेशी गेलाच पाहिजे’ हा घणाघाती अग्रलेख महाराष्ट्र टाइम्समध्ये!
पंतप्रधान कार्यालयातून ‘घाशीराम परदेशी जाणार’ हे स्पष्ट करणारं परिपत्रक प्रसिद्ध.
२१ सप्टेंबरची मध्यरात्र. स्थळ : प्रसिद्ध उद्योगपती नीलकंठ कल्याणी (१९२६-२०१३) यांचं पुण्यातलं निवासस्थान. शरद पवार, मोहन आगाशे, विद्याधर वाटवे आणि नीलकंठराव बसलेले. ते मोहनच्या हातात २३ सप्टेंबरची पुणे-मुंबई इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइटची ‘ए. मोहन अ‍ॅण्ड पार्टी’ नावाने काढलेली तिकिटं ठेवतात. कलाकारांनी गाजावाजा न करता, स्वतंत्रपणे, नातेवाईक बरोबर न घेता लोहगांव विमानतळावर पोचणे.. त्याआधी व्यक्तिगत सामान बालगंधर्व रंगमंदिरापाशी उभ्या असलेल्या ट्रकमध्ये २२ सप्टेंबरला जमा करणं.. सामान पोलीस एस्कॉर्ट बरोबर घेऊन मोहन परस्पर सहारला जाईल.
२२ सप्टेंबरला हायकोर्टात अंतिम सुनावणी. जस्टिस व्ही. के. जोशी यांच्याऐवजी जस्टिस काझी यांच्यासमोर अर्ज वर्ग झालेला. शेवटी उभयपक्षी तडजोड होऊन असं ठरलं की, परदेशातील प्रत्येक प्रयोगाआधी नाना फडणवीस यांच्या विद्वत्तेबाबत एक निवेदन वाचून दाखवल्यावर मगच प्रयोग सुरू करावा. निवेदनाच्या अखेर कोर्टाने असं म्हटलं होतं की, नाना फडणवीसांचा मुत्सद्दीपणा आणि बुद्धिचातुर्यामुळे मराठय़ांचं राज्य २५ र्वष जास्त टिकलं आणि इंग्रज त्यानंतर आले. हा त्यांचा मुत्सद्दीपणा ब्रिटिश इतिहासकारांनीदेखील मान्य केला आहे, वगैरे.
दरम्यान ‘ग्रंथाली’ने पुढाकार घेऊन २२ सप्टेंबरला संध्याकाळी फग्र्युसन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गुपचूप छोटासा निरोप समारंभ उरकला. त्याला आमचा मित्र व पुण्याचा तेव्हाचा उपमहापौर सतीश देसाई आणि भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर (१९२९-२०१४) हे प्रमुख पाहुणे होते.
ठरल्याप्रमाणे चोख घडले. आम्ही सगळे दोन पंखांच्या, उडताना भीती वाटणाऱ्या जुन्या अ‍ॅव्हरो विमानाने मुंबईत सांताक्रूझला आलो. तेथून पोलीस एस्कॉर्टसोबत बसने डायरेक्ट एअर इंडियाच्या सहारवर उभ्या बोइंगच्या शिडीपाशी जाऊन पोचलो. जुन्या सहार विमानतळाची इमारत अजून बांधत होते. तेव्हाचं इंटरनॅशनल टर्मिनल म्हणजे एक मोठा लग्नात असतो तसा मांडव घातलेला होता. सामानाचा ट्रक घेऊन मोहन डायरेक्ट सहारच्या मांडवामध्ये. सोबत हत्यारी पोलीस आणि पुण्याहून खास मोहनच्या सुरक्षेसाठी आलेले- ८० साली संस्थेने केलेल्या ‘भिंत’ व ‘वळण’ या एकांकिका आणि नंतर ‘पडघम’ नाटक गाजवणारे, पुढे स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रांत गाजलेले प्रसाद पुरंदरे, श्रीरंग गोडबोले आणि कल्याण किंकर हे तिघे १८-१९ वर्षांचे तरुण तेव्हा लागेल त्या मदतीसाठी दिवसाचे २४ तास तत्पर होते. तिघंही पुण्याच्या महाराष्ट्र मंडळाचे व्यायामपटू!
पुण्याचे सगळे आलेले; पण मुंबईचा रवींद्र साठे..? तो कुठे दिसतोय, म्हणेपर्यंत पोलिसांच्या व्हॅनमागे एक मोटारसायकल मांडवाजवळ आली. चालवणारा होता विनय आपटे (१९५१-२०१३) आणि मागे होता रवींद्र साठे! मोहनने सगळ्यांचे चेक इन् संस्कार उरकले आणि आता विमानात बसणार तोच प्रसिद्ध नाटय़निर्माते मोहन वाघ (१९२९-२०१०) भलामोठा पुष्पगुच्छ घेऊन पहाटे आम्हाला निरोप द्यायला आलेले. आमचा मुंबईचा व्यवस्थापक विजय देसाई हा आधीपासून तिथे हजर होताच.
अखेर विमान हलले. पहिला थांबा होता- दिल्ली. सगळे झोपेत. सगळ्यांना विलक्षण थकवा आलेला. नवीन सेवक विमानात आले. विमान उडाल्यावर कॅप्टनने घोषणा केली- ‘एअर इंडिया प्राऊडली वेलकम वर्ल्ड फेमस आर्टिस्ट ऑफ मराठी प्ले..’ विमानात २४ सप्टेंबरचे पेपर आलेले. इंडियन एक्स्प्रेस आणि टाइम्स दोघांनी अग्रलेख लिहून दौऱ्याला शुभेच्छा दिलेल्या.
विमान स्थिरावल्यावर बहुतेक सर्व ‘बामणहरीं’च्या हातातल्या चषकात कॅप्टनकडून भेट आलेली श्ॉम्पेन बुडबुडत होती.

तळटीप :
७२ पासूनच्या या प्रकरणाला आता ४३ वर्षे होऊन गेली. नाटकाचे प्रयोग तर ९२ मध्येच आटोपले. सरकारे आली-गेली. ओघात व्यक्तिगत, सामाजिक, राजकीय, वैचारिक, धार्मिक सर्व बाबतीतली असहिष्णुता वृद्धिंगत होत गेली आणि जगण्यातला एकसंधपणा कमी होत तुटकपणा वाटय़ाला येत चालला. आमचे अनेक सुहृद काळाआड गेले. कालौघात मदत अनेकांची झाली; त्यात शरद पवारांची विशेष. पुढील महिन्यात त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होतो आहे. त्यांना आमच्या अ‍ॅडव्हान्समध्ये शुभेच्छा!

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
about writer filmmaker pritish nandy life journey
व्यक्तिवेध : प्रीतीश नंदी
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”

 

– सतीश आळेकर
satish.alekar@gmail.com

 

Story img Loader