तरुणाईचे वय हे हृदयाच्या गुजगोष्टी करण्यासाठी असते. पण सध्या तर तरुण वयातच हृदयविकार जडल्याचे चित्र आहे.
वाढता ताण, बदलती जीवनशैली, अनियमित आणि निकृष्ट आहार आणि व्यसन आदींमुळे हृदयविकाराच्या तक्रारींचे प्रमाण २५ ते ४० या वयोगटात मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे.
ही धोक्याची घंटा असून, तरुणांनी आपल्या हृदयाची योग्य काळजी घेणे वश्यक आहे.
‘‘भारतामध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूप आहे. भारतात ४० टक्के मृत्यू केवळ हृदयविकारामुळे होतात. हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यास अपयश आल्यास २०२०मध्ये जगात सर्वाधिक हृदयविकारी भारतातच आढळतील..’’ जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी जागतिक हृदयदिनानिमित्त असे भाकीत केले होते. त्यांचे हे भाकीत सत्यात उतरण्यास २०२०ची वाट पाहावी लागणार नाही, कारण देशातील हृदयरुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक तरुणांचाच समावेश असल्याचे चित्र आहे. २५ ते ४० या वयोगटात हृदयविकाराचे प्रमाण अधिक असून हे धोकादायक आहे.
तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण अधिक का आहे, याबाबत मधुमेहतज्ज्ञ डॉ. राजेंद्र आगरकर बदलती जीवनशैली हेच मुख्य कारण असल्याचे सांगतात. ‘‘पूर्वीच्या काळी हृदयरोगाचे प्रमाण खूपच कमी होते. मात्र आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयाचा ताण वाढलेला आहे. शारीरिक कष्ट न करता बैठे काम, जेवणाच्या व झोपेच्या चुकीच्या वेळा आदींमुळे हृदयरोग वाढलेला आहे,’’ असे सांगताना डॉ. आगरकर यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग या तिघांचा एकमेकांशी संबंध आहे. त्यामुळे मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे आहे. कित्येकदा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कळते की रुग्णाला मधुमेह होता. मधुमेह व उच्च रक्तदाब असेल तर ते हृदयविकाराला निमंत्रण असते, असे सांगितले.
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश इनामदार हृदयरोगाचा संबंध व्यसनांशी जोडतात. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन हे हृदयरोगास फार मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहे. धूम्रपान, तंबाखू किंवा गुटखा यांचे सेवन याचे प्रमाण आपल्या देशात खूपच आहे. हृदयरोगाची व्याधी जडण्यास त्यांचा मोठा हातभार लागतो, असे डॉ. इनामदार यांनी सांगितले.
बदलती जीवनशैली, निकृष्ट आहार, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप या गोष्टीही हृदयरोगास कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले. सध्या सात्त्विक अन्न खाल्ले जात नाही. सध्याची तरुणाई जंक फूडच्या मागे आहे. सात्त्विक नसलेला आहार सातत्याने पोटात जात असल्याने हृदयरोग होतो. त्याशिवाय प्रदूषणाचे प्रमाणही खूपच वाढलेले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम शरीरावर आणि त्याचबरोबर हृदयावर होतात. हृदय बिघडविण्यास ही प्रदूषके कारणीभूत असल्याचे डॉ. इनामदार म्हणाले.
मानसिक ताण हाही हृदयविकाराचे प्रमाण वाढविणारा महत्त्वाचा घटक आहे. सध्याची तरुणाई करिअरच्या मागे असल्याने अनियमित आणि अधिक वेळ कामात स्वत:ला गुंतवून घेते. त्याचा परिणाम मानसिक ताण वाढण्यावर होतो. सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा मानसिक स्वास्थ्य बिघडते. मनाचा परिणाम शरीरावर होत असल्याने शारीरिक आजार जडतात. अधिक मानसिक ताण हृदयविकार जडण्यास कारणीभूत ठरतो, असे डॉ. आगरकर यांनी सांगितले.
हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीची मोठी गरज असल्याचे डॉ. इनामदार सांगतात. आरोग्यविषयक जागृती लोकांमध्ये रुजविली पाहिजे. केवळ सात्त्विक आहार घेऊन बाहेरील निकृष्ट आहार सेवन करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर हृदयाच्या आणि अन्य वैद्यकीय चाचण्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
– संदीप नलावडे
sandeep.nalawade@expressindia.com
तरुणांनो, हृदय जपा!
तरुणाईचे वय हे हृदयाच्या गुजगोष्टी करण्यासाठी असते. पण सध्या तर तरुण वयातच हृदयविकार जडल्याचे चित्र आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 26-09-2015 at 07:46 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing the no of heart attack patients in youth