मुखपृष्ठ >> व्यक्तिवेध >> पं. हरिप्रसाद चौरसिया
 


स्पर्धेचे नियम व अटी




पं. हरिप्रसाद चौरसिया Bookmark and Share Print E-mail
बुधवार, १४ ऑक्टोबर  २००९
वडील पहिलवान असले तरी त्यात मन रमण्याची शक्यता नाही. मुलाने आपलीच कला आत्मसात करावी आणि आयुष्य सार्थकी लावावे, अशी इच्छा असली, तरी केवळ वडिलांच्या समाधानासाठी तालमीत जाणाऱ्या हरिप्रसाद चौरसिया यांचे खरे प्रेम व्यायामापेक्षा सुरांवरच होते. त्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षांपासून त्यांनी बनारसच्या पंडित राजाराम यांच्याकडे गाणे शिकायला सुरुवात केली. नंतर काही दिवसांतच पंडित भोलानाथ यांचे बासरीवादन ऐकून त्यांचा जीव त्या वाद्यावर जडला आणि नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. ओरिसातील ‘अक्षय प्रतिष्ठान’चा मानाचा ‘अक्षय सन्मान’ पंडित हरिप्रसाद यांना जाहीर झाला, तो त्यांच्या आयुष्यभरातील कामगिरीबद्दल! त्यांचे मनापासून अभिनंदन अशासाठी करायचे, की गेल्या काही वर्षांत स्व. पन्नालाल घोष यांच्यानंतर स्वत:च्या प्रतिभेने एखाद्या वाद्यावर हुकमत प्राप्त करून ते अतिशय लोकप्रिय करण्याची जादुई किमया दीर्घकाळ त्यांनी केली आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच त्यांना आकाशवाणीमध्ये नोकरी मिळाली आणि त्यांनी आपले बासरीवादनाचे तंत्र विकसित करायला सुरुवात केली. उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांची कन्या अन्नपूर्णादेवी यांच्याकडून त्यांना काही काळ मार्गदर्शन मिळाले. घरात संगीताची कोणतीही परंपरा नसताना जागतिक दर्जाचा कलावंत होण्यासाठी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी जे अपार कष्ट घेतले आहेत, ते अतुलनीय आहेत. ‘सेल्फ मेड मॅन’ असे वर्णन करता येऊ शकेल, अशा अगदी विरळा कलावंतांपैकी चौरसिया हे एक आहेत. परंपरा आणि नवता यांचे एक अनोखे मिश्रण असणाऱ्या या कलावंताने बासरी या वाद्यावर एवढे प्रभुत्व मिळवले आहे, की साऱ्यांनी अचंबित व्हावे. भारतच नव्हे तर साऱ्या जगात ज्ञात असलेले संगीताची निर्मिती करणारे पहिले वाद्य म्हणून बासरी (फ्लूट)ओळखली जाते. इसवी सनपूर्व चार हजार वर्षे आधी इजिप्तमध्ये फ्लूट हे वाद्य सापडल्याचा पुरावा सापडतो. भारतीय संस्कृतीत तर बासरी या वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले, ते कृष्णामुळे! त्याची मुरली ही भारतीय संस्कृतीमधील एक फार महत्त्वाची खूण ठरली. मानवाला संगीत या गोष्टीचे भान आले असेलच तर ते निसर्गत: व्यक्त होत असलेल्या नादसातत्यामुळे! हे नादसातत्य त्याला कदाचित वेळूच्या बनात ऐकू आले असेल. पोकळ अशा बांबूमधून गळय़ातून निघणाऱ्या सात स्वरांसारखेच तंतोतंत स्वर निर्माण होऊ शकतात, हा मानवासाठी एक फार मोठा चमत्कार होता. गळय़ातून व्यक्त होणाऱ्या संगीताशी त्यामुळेच बासरी आपले नाते सांगते आणि ती गळय़ाप्रमाणेच गाऊ लागते. बासरीवादनाची स्वत:ची खास शैली निर्माण करून या क्षेत्रात स्वत:चे घराणे स्थापन करण्याची क्षमता असणारे हरिप्रसाद चौरसिया हे केवळ अभिजात संगीतातच रमले नाहीत, तर त्यांनी भारतीय चित्रपट संगीत अनेक अर्थानी समृद्ध केले. अनेक ध्वनिमुद्रिकांमध्ये त्यांनी बासरीवर संगत तर केली आहेच, परंतु ‘सिलसिला’सारख्या चित्रपटाला संगीत देताना आपली वेगळी ओळखही सिद्ध केली. वयाच्या तिसाव्या वर्षी चौरसिया यांनी पं. शिवकुमार शर्मा (संतूर) आणि पं. ब्रिजभूषण काब्रा (गिटार) यांच्याबरोबर सादर केलेला ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंपरेशी आपले नाते घट्ट करत असतानाच पाश्चात्त्य संगीताशीही नवे नाते जोडण्यासाठी चौरसिया यांच्याकडे कमालीची प्रतिभा आहे. त्यामुळेच ते जगातील एक श्रेष्ठ बासरीवादक म्हणून ओळखले जातात. (रॉटरडॅम म्युझिक कॉन्झर्वेटरीच्या जागतिक संगीत विभागाचे ते प्रमुखही आहेत.) पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, कोणार्क सन्मान, यशभारती सन्मान मिळाल्यानंतरही ते आजही आपली सर्जनशीलता सतत ताजी ठेवण्याचा जो प्रयत्न करतात. मुंबईत त्यांनी स्थापन केलेल्या गुरुकुलात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. वडिलांच्या प्रेमाखातर तालमीत जाऊन पहिलवान होता आले नसले तरी त्यामुळेच आज वयाच्या सत्तरीतही दमसास टिकवून कला सादर करता येते आहे, याचे समाधान जेवढे त्यांना आहे, तेवढेच जगातील रसिकांनाही आहे.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.