|
|
शिवसेनेतील संभाव्य फुटीवर डोळा ठेवून स्मिता ठाकरेंचे काँग्रेसमध्ये स्वागत? जुलै २०१० मध्ये राज्यसभेवर निवडून आणण्याचीही तयारी नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर/विशेष प्रतिनिधी
केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबात फूट पडून चर्चेचा विषय व्हावा म्हणून नव्हे तर शिवसेनेतील भविष्यातील फुटीत आपलाही वाटा असावा म्हणून काँग्रेसने त्यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांना पक्षात आणण्याचा विचार केला असून जुलै २०१० मध्ये त्यांना राज्यसभेवर निवडून आणण्याचीही तयारी चालविली असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
स्मिता ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच पक्षाचे तरुण सरचिटणीस राहुल गांधी यांच्या कार्यशैलीचे कौतुक करून काँग्रेसच्या वाटेने जाण्याचे संकेत दिले आहेत. स्मिता ठाकरे यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाविषयी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी फारसा उत्साह दाखविला नसला तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मात्र निश्चित डावपेचांनुसार स्मिता ठाकरे यांच्या काँग्रेस प्रवेशाची आखणी करीत आहेत. शिवसेनेकडून राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून नाराज होऊन काँग्रेसकडे आकर्षित झालेल्या स्मिता ठाकरे यांना जुलै २०१० मध्ये काँग्रेसकडून तशी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या वर्षी जुलैमध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेचे सहा सदस्य निवृत्त होत असून त्यात शिवराज पाटील, विजय दर्डा, संजय राऊत, राहुल बजाज, तारीक अन्वर, शरद जोशी यांचा समावेश आहे. यापैकी काँग्रेसचे शिवराज पाटील यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपताच त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्याची काँग्रेसमध्ये तयारी चालली आहे. ही रिक्त जागा स्मिता ठाकरे यांना देऊ करण्याचा विचार काँग्रेसने केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. स्मिता ठाकरे यांचा काँग्रेसमध्ये समावेश केल्यास गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्रावर दबदबा प्रस्थापित करणाऱ्या ठाकरे कुटुंबातच फूट पडल्याचा जोरदार संदेश तर जाईलच पण काँग्रेसची गणिते त्याहीपुढची असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भविष्यात अख्खी शिवसेना राज ठाकरे यांच्या ताब्यात जाऊ नये आणि त्यात काँग्रेसचाही वाटा असावा, असेही त्यामागचे डावपेच असल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेत दरारा असतानाच्या काळात स्मिता ठाकरे खूपच पॉवरफुल होत्या. शिवसेनेतील केंद्रस्तरीय ते तालुकास्तरीय नेत्यांपर्यंत त्यांचा सर्वाशी उत्तम संपर्क होता. हाच दुवा पकडून काँग्रेसने शिवसेनेतील भविष्यातील संभाव्य फुटीत ‘लूट’ करण्याचे डावपेच आखल्याचे म्हटले जात आहे. राज्यात सत्तेत नसलेल्या राज ठाकरेंच्या ‘मनसे’कडे जायचे की सत्तेत आणि राज्यभर अस्तित्व असलेल्या काँग्रेसचा आश्रय घ्यायचा, असा प्रश्न शिवसेनेच्या अनेक नेत्यांमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात त्यामुळे निर्माण होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. सारी शिवसेना राज ठाकरे यांच्या ताब्यात जाण्याऐवजी त्यातील काही गट काँग्रेसकडे आणण्याचा हा हेतू स्मिता ठाकरे यांच्या माध्यमातून साध्य होऊ शकतो, असे काँग्रेसश्रेष्ठींना वाटत आहे. स्मिता ठाकरे यांच्या काँग्रेस प्रवेशाविषयी राज्यातील काँग्रेसचे नेते अनुत्साही असले तरी दिल्लीतील नेते मात्र सकारात्मक आहेत. प्रदेश काँग्रेसने तयारी दर्शविली तर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना स्मिता ठाकरे यांच्या प्रवेशाविषयी मुळीच आक्षेप नाही, अशी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते शकील अहमद यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया या संदर्भात बोलकी ठरते.
माझी घुसमट होतेय.. शिवसेना सोडण्याचा निर्णय दु:खद असला तरी माझ्याकडे आता पर्याय राहिलेला नाही. घरात आणि शिवसेनेत आपली कोंडी करण्यात आली व एकाकी पाडण्यात आले. आता श्वास घेणेही शक्य नसल्याने गुदमरण्यापेक्षा काँग्रेसमध्ये जाण्याचा आपण निर्णय घेतला. शिवसेनेच्या संकुचित व फुटीरतावादी भूमिकेमुळे महाराष्ट्रीयन व्यक्तींवर अन्याय झाला आहे तसेच यापुढे कोंडमारा सहन करणे शक्य नसल्यामुळे आपण बाहेर पडत असल्याचे स्मिता ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेसची तत्वप्रणाली जागतिक पातळीवरील विचार करणारी असल्यामुळे आपण काँग्रेसमध्ये जाण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया गांधी ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत त्याबद्दल आपल्याला आदर आहे, असेही त्यांनी सांगितले.
सर्व पर्याय खुले.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही. त्यांच्याबद्दल मनात प्रचंड आदर आहे, परंतु राजकारणातील पुढच्या वाटचालीसाठी आईने सर्व पर्याय खुले ठेवले असल्याची प्रतिक्रिया स्मिता ठाकरे यांच्यावतीने त्यांचा मुलगा राहुल ठाकरेने व्यक्त केली आहे. स्मिता ठाकरे आज दिवसभर मीडियापासून दूर राहिल्या. त्यांच्यावतीने बोलताना राहुलने मी राजकारणी नाही त्यामुळे राजकीय प्रश्न आई ज्यावेळेस तुम्हाला भेटेल त्यावेळीच विचारा, असेही शिताफीने सांगितले.
*प्रत्येकजण निर्णय घेण्यास स्वतंत्र.. शिवसेनेत स्मिता ठाकरे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचा एकही नेता या विषयावर बोलण्यास तयार नाही. शिवसेना नेते मनोहर जोशी यांना विचारले असता उद्धव ठाकरे हेच या विषयावर बोलतील असे सांगून कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले. शिवसेना भवनावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची एकच गर्दी झाली होती. मात्र कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दोन वाक्यात हा विषय संपवून टाकला. कोणीही कोठेही जाण्यास स्वतंत्र आहे, असे सांगून निर्णय झाल्यानंतर या विषयावर बोलेन, असे त्यांनी सांगितले.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|