|
|
|
गुरुवार, २७ ऑगस्ट २००९, मोहना जोगळेकर-
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ओ.. ड्यूड! ही लेखमालिका म्हणजे भारतीय पालकांच्या अमेरिकन असलेल्या तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख आणि आईने मुलाला पत्र लिहून तिला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न. यातून ओळख होईल ती तिथल्या हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.
सकाळी जाग आली तेव्हा खिडकीतून ऊन आत डोकावत होतं. लॅपटॉप चालू करून शुभमने शेअरचे भाव बघितले. गेल्या महिन्यात शेअर बाजारातली घसरण झाल्यावर शुभमच्या मनात पैसे गुंतवायचं आलं होतं. आईकडून फक्त दोनशे डॉलर्स मिळणार होते. शेवटी बाबांच्या मध्यस्थीने हजार डॉलर्स गुंतवायला मिळाले. त्याला एकदा ते तंत्र जमलं की बाबा आणखी पैसे द्यायलाही तयार होते. शाळेत शिकलेला- इ-ट्रेडिंगचा धडा प्रत्यक्षात अनुभवता येणार म्हणून शुभम खूश झाला होता. बाबांच्या मदतीने खातं उघडलं आणि त्याला शेअरच्या वर खाली होणाऱ्या भावांनी वेडच लावलं. आत्ताही त्याने शेअरचे भाव चढलेले बघितले तसा उत्साहाने तो खाली धावला. ‘मी कंपनी उघडतोय.’ आईने लक्ष दिलं नाही, तसं पुन्हा त्याने तेच म्हटलं. प्रश्नार्थक चेहऱ्याने तिने नुसतंच त्याच्याकडे पाहिलं. ‘बघ आता शेअर विकायचे असतील तर प्रत्येक व्यवहाराला पंधरा डॉलर्स देतो आपण. मी आणि माझे दोन मित्र सल्लागार म्हणून काम सुरू करू. प्रत्येक व्यवहारासाठी सात डॉलर्स. म्हणजे निम्म्या पैशात.’ ‘अरे आत्ता कुठे शेअर्सची खरेदी. विक्री शिकतोयस तू. आणि एकदम कंपनी कसली काढताहात? अभ्यासाचं काय मग?’ ‘ते करूनच आणि कंपनी सुरू करणं एकदम सोपं असतं.’ ‘ते माहीत आहे मला.’ ‘दोनशे डॉलर्स लागतात. जाहिरातदारांकडून पैसे मिळवायचे. एका क्लबमध्ये आम्हाला बिझनेस प्लॅन शिकवतात. तो खोटा असतो आणि हा खरा असेल एवढंच.’ ‘पण जाहिराती मिळवणं इतकं सोपं नसतं!’ ‘आम्ही सगळा आराखडा दाखवू ना त्यांना. आणि नाहीच तर मग आत्ता स्वत:चे थोडे थोडे घालावे लागतील.’ ‘पण पैसे गुंतवायला तुमचा सल्ला कोण घेईल? किती लहान आहात तुम्ही वयाने.’ ‘वय कशाला सांगावं लागेल? आमची वेबसाइट असेल ना.’ पंधरा वर्षांच्या मुलाकडे ती मती गुंग झाल्यासारखी बघत राहिली. ‘हे बघ आई. आमचा या बाबतीत खूप विचार झालाय. आम्ही ठरवलंय की सुरुवातीला दोन सल्ले फुकट द्यायचे. पुन्हा आमच्या सल्ल्याप्रमाणे पैसे गुंतवले आणि एका वर्षांत त्यांना फायदा झाला नाही तर पैसे परत द्यायचे आणि तळटीप (फाइन प्रिंट) असेल की, तुमच्या फायद्या-तोटय़ाला आम्ही जबाबदार नाही म्हणून.’ ‘तू बाबांशी बोल बाबा.’ ‘नाही. मी सगळा प्लॅन करणार आहे आणि मगच बाबांना दाखवीन. तू सुद्धा काही सांगू नकोस.’ तिने नुसती मान हलवली. ‘टी.व्ही. वर दाखवतात ना टिनएजर मिलिनियर. तसं व्हायचं आहे मला.’ तिच्या आ वासलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत त्याने तिच्या हातातला रिकामा कप घेतला. पटकन धुवायला ठेवत तो तिथून पसारही झाला. काही न सुचून ती उगाचच त्याच्या खोलीत डोकावली. लॅपटॉप चालूच होता. त्याची ई-मेल वाचावेत? फेसबुकमध्ये कुणी काय त्याच्याबद्दल लिहिलंय तेही कळेल आणि त्याने काय लिहिलंय तेही. विचारलं कधी की तो स्वत:च दाखवतो. मग असं वाचलेलं कळलं तर चिडेल. तिच्या मनात उलटसुलट विचारांचं आवर्तन चालू होतं. बराच वेळ ती तशीच बसून राहिली. तितक्यात शुभम आलाच. ‘तू माझी पत्र वाचतेयस?’ आपण काहीच न केल्याबद्दल मनातल्या मनात तिने स्वत:चीच पाठ थोपटली. ‘मी कशाला वाचू?’ ‘मग माझ्या खोलीत का आलीस?’ तिला एकदम त्याचा रागच आला. ‘माझी खोली’, ‘माझी पत्रं’.. ही आजकालची मुलं मी, माझं हेच करत राहतात. आवंढा गिळत तिने पुढच्या वादाला तोंड फुटणारे शब्द गिळून टाकले. ‘तुला तुझ्या कंपनीबद्दल विचारायचं होतं. पण तू पळच काढलास. मग सुचेनासं झालं काही म्हणून बसले इथे येऊन. खास कारण काहीच नाही.’ ‘मी धावायला जातोय आता. आल्यावर विचार, मला तू काय विचारायचं आहे ते.’ तिने नुसतीच मान हलवली. ‘तुला बघायचं आहे माझं फेसबुक?’ ‘काय?’आज धक्क्यावर धक्के द्यायचं ठरवलं असावं शुभमने. असंच तिला वाटायला लागलं. ‘बघ ना. आणि ई- मेल वाचलेस तरी चालतील. दाखवू तुला कसं बघायचं ते.’ ‘मला माहीत आहे. माझंपण ट्वीटरचं अकाऊंट आहे.’ ‘काय’? शुभम अवाकच झाला. ‘बरोबर ऐकलंयस तू. फेसबुक झालं आता जुनं. लोक हे नवीन वापरायला लागले आहेत. दाखवू का तुलाच?’ ‘तू तर ग्रेटच आहेस. पण नको. मला फेसबुकच आवडतं.’ तो धावायला निघून गेला. तिने मग त्याने परवानगी दिलीच आहे म्हणून थोडीशी पत्रं वरवर चाळली. विशेष काही नव्हतं. बाजूच्याच ड्रॉवरमधला कागद तिने ओढला आणि भरभर विचार कागदावर उमटायला लागले. शुभ्या, कमालच केलीस तू. एकदम खुलेआम खजिना उघडून ठेवलास माझ्यासमोर. मित्रमैत्रिणींना लिहिलेली पत्रं आईवडिलांनी वाचलेली कुणालाच आवडत नाहीत आणि तू एकदम मेहेरबानच झालास. माझं पत्र वाचून हा फरक का? ते तुलाच सांगावं लागेल. उत्तरच नाही मिळालं मला. ए, हे तुझ्या-माझ्यातलं गुपित आहे बरं का. बाबांनाही मी अजून बोललेले नाही. तू कंपनी सुरू करायची म्हणतोयस. बाबाला सांगायचं नाही असंही म्हणतोस. पण एकदा का तुझा तो बिझनेस प्लॅन तयार झाला की तो दाखवून नीट सांगायला हवं हं बाबाला. अरे, आम्ही घरातीलच माणसं तुला मागे कशाला खेचू? प्रत्येक गोष्टीतले खाचखळगे पालक म्हणून सांगायला हवेत ना, हे असं लिहायला लागलं की धडधडतं उगाचच. वाटतं सुरू केला की काय उपदेश, पण हे बघ हे प्रश्न विचारायचे होते मला तुझ्या कंपनीच्या बाबतीत. ’ कंपनीतला तुझा भागीदार मित्र कोण आहे? एकच की दोन. बहुतेक तिघं आहात असं म्हणालास, पण नेमकं आठवत नाही. ’ नफा वाटून घ्यायचं ठरवलंयत ना तुम्ही? त्याऐवजी मला वाटतं २० टक्के कंपनीच्या नावावरच ठेवावेत. ’ जाहिरातदारांशी बोलायचं तर त्यांच्याकडून भेटीची वेळ घ्यावी लागते हे ठाऊक आहे ना? ’ आम्ही भेटू शकतो का तुझ्या भागीदारांना? मला तर मीच कंपनी चालू करतेय असं वाटतंय. काय भन्नाट कल्पना सुचतात तुम्हा मुलांना. तू विसरलाही असशील, पण पाचवीत असताना तुम्हाला शाळेतून प्रोजेक्ट म्हणून कुठल्यातरी कंपनीला त्याच्या उत्पादनात सुधारणा कशा करता येतील ते कळवायला सांगितलं होतं. तू पेप्सी कंपनीला पत्र लिहिलंस. त्यानंतर त्यांचं एक छानसं आभाराचं पत्र आणि पेप्सीची भरपूर कूपन्स आली होती. तुझा आनंद चेहऱ्यावरून ओसंडत होता. भरपूर पैसे वाचले यातच खूश होतास तू. त्याचाच हा मोठा वृक्ष म्हणायचा का? आमचं आयुष्य किती वेगळं होतं तुझ्या वयाचे होतो तेव्हा. हायस्कूलला गेल्यावर अभ्यास आणि घोकंपट्टी यातच वेळ जायचा की काय असं वाटायला लागलंय. कारण त्याआधी लहान असताना आमची पण डोकी अशीच चालायची. आमच्या उडय़ा अर्थात मिलिनियर, बिलिनियर होण्याच्या नव्हत्या. आम्ही आसपासची मुलं वाळूचा किल्ला, त्याच्या आजूबाजूला वाळूचाच रस्ता, कडेकडेने छोटय़ा झाडांच्या फांद्या असं लावायचो. आमचे शेजारीपाजारी, आईवडील चक्कर टाकून जायचे. तिथे आम्ही देव पण हमखास ठेवायचो - पैसे मिळावेत म्हणून. जमलेल्या पैशातून आइस्क्रीम खायचं ही आमची स्वप्नं. नाहीतर मग छोटी छोटी नाटकं बसवायचो. मे महिन्यात अंगणात प्रयोग. त्यात कुणीतरी एखादा पडदे उगाचच पाडून आमची फजिती करायला असायचाच. नाटकाची तिकिटं पण असायची हं, कागदाची तिकिटं! ती विकायची. विकत घेणारे आमचेच आईवडील आणि शेजारी, पण काय धम्माल असायची. आमचा आनंदही निखळ होता, पण तुझ्या मनात नुसता पैसा तर नाही ना? तसं नसावं अशी मनापासून इच्छा आहे. कारण त्यात यश नाही आलं तर खचून जायला होईल. त्यासाठी प्रयत्न करताना आलेली मजा विसरून जाशील. आमचं तसं झालं नाही, कारण इतक्या लहान वयात इतके पैसे मिळवायचे हे एकच ध्येय नव्हतं. आजूबाजूचं वातावरणही तसं नव्हतं, पण ‘आगे बढो’ असंच म्हणेन मी. या तरी पत्राला उत्तर पाठव. निदान वाचलंस की नाही हे सांगितलंस तरी पुरे. त्यातून त्याबाबत बोललास तर उत्तमच. ता.क. : मी काही तुझी पत्र वाचली नाहीत. फेसबुकही चाळलं नाही. ट्वीट्रसाठी मदत हवी आहे का? मी दाखवेन तुला. तूच तेवढा ‘कॉम्प्युटर सॅवी’ आहेस असं नाही. तुझी आई पण तुझ्या सवाई आहे. मजा करतेय रे. तुझ्या भाषेत सांगायचं तर जस्ट कीडिंग. तुझी आई
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|