|
|
सोमवार, ४ जानेवारी २०१० बिहारचे नाव उच्चारले की नाके मुरडणाऱ्यांची संख्या कमी नाही. ‘बिमारू’ राज्यांमध्ये मोडणारे एक राज्य, तिथे प्रगतीच्या नावाने शिमगा असल्यानेच आमच्या राज्यात ते येतात, आदी गोष्टीही आपल्याकडे सर्रास सांगितल्या जातात. आपले राज्य प्रगतिपथावर नेमके कुठे आहे, याचा विचार न करता बिहारच्या नावाने ओरडायचा तसाही आपला आवडता छंद! या सगळय़ा कल्पना, वल्गना यांना छेद देणारी एक बातमी आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये बिहारने आपल्या एकूण घरगुती उत्पादनात ११.०५ टक्क्यांनी वाढ केली आहे. या बाबतीत ते राज्य गुजरातपेक्षा अवघे दोन शतांश टक्क्यांनी मागे आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नीतीशकुमार यांचे सरकार आहे. पाच वर्षांपूर्वी राबडीदेवी आणि त्याही आधी लालूप्रसाद यादव यांची सत्ता होती. तेव्हा ही प्रगती नकारात्मक ५.१५ एवढीच होती. लालूंपूर्वी सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसनेही बिहारचा प्रगतीच्या दृष्टीने कधी विचारच केला नाही. भारतातील सर्वात वाईट प्रगती असणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश यांच्या बरोबरीने बिहारचे नाव घेतले जात होते. नीतीशकुमारांनी आपल्या हाती सत्ता येताच सर्वप्रथम खंडणीखोरांना, गुन्हेगारांना, गुन्हेगार राजकारण्यांना धडा शिकवायचा निर्णय घेतला. या राज्यात कुणीही परमेश्वराघरची गाय नाही, हे आधी लक्षात घ्या असे त्यांनी या साऱ्यांना बजावले. बिहारमध्ये सर्वात तेजीत असणारा धंदा कोणता, तर माणसांना पळवून नेणे आणि त्यांच्या बदल्यात पैसे मिळवणे! नीतीशकुमारांनी त्यांना आधी चाप लावला. कोणतीही बंदूक ही परवान्याशिवाय असणार नाही, हे जाहीर करून त्यांनी बंदुका पोलीस स्टेशनात जमा करायला लावल्या. गुन्हेगारीचा सुळसुळाट कमी केला. सामान्य माणसाचे जीवन सुकर केले. जागतिक बँकेला या बदलाची नोंद घ्यावी लागली आणि बिहार हे गुंतवणुकीसाठी योग्य राज्य असल्याचे त्यांना जाहीर करणे भाग पडले. समाजाच्या अगदी तळागाळात वर्गाला नीतीशकुमारांनी मदतीचा हात दिला. मागास जाती-जमाती आणि मुस्लिम समाज यांच्यातल्या अगदी दरिद्री असणाऱ्या वर्गासाठी सरकारी योजना राबवायचा आदेश दिला. परिणाम असा झाला, की ग्रामीण भागात जातीयवादाने प्रदूषित बनलेल्या वातावरणात सौहार्द निर्माण झाले. बिहारमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये १०३३ कोटी रुपयांच्या थेट गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. ही रक्कम त्या मानाने कमी असली तरी त्यासाठी लागणारा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे. २०९ खासगी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी काहींनी आपले काम सुरूही केले आहे. पंचायतीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवून महिलावर्गाला क्रांतिकारक बदलाचे घटक म्हणून त्यांनी स्थान दिले. नीतीशकुमार सत्तेवर आले तेव्हा पाटण्याच्या सचिवालयात आणि अन्य सरकारी कार्यालयांमध्ये रेमिंग्टनचे जुने टाइपरायटर कार्यास सिद्ध होते. ते बदलावेत, असेही कुणाला तोपर्यंत वाटले नव्हते. संगणकीय प्रशासन हा तर पुढचा भाग होता. नीतीशकुमार सत्तेवर आल्या आल्या, २००५ मध्ये नवीनचंद्र सिन्हा या आमदाराचे निधन झाले. नीतीशकुमारांनी सिन्हा यांचा अंत्यसंस्कार सरकारी इतमामाने होईल, असे जाहीर केले. त्यांना बंदुकीच्या पाच फैरींची सलामी द्यायचा निर्णयही त्यांनी घेतला. बंदुकीच्या दोन फैरी व्यवस्थित उडाल्या आणि तिसऱ्या-चौथ्या फैरीच्या वेळी बंदुकीच्या चापाचे केवळ आवाज होत राहिले. हे सगळे नीतीशकुमारांसमोर घडले, तेव्हा स्मशानभूमीवर गंभीर प्रसंग असूनही उपस्थितांमध्ये हसू फुटले होते. नीतीशकुमारांना हा प्रकार खाली मान घालायला लावणारा वाटला. प्रशासनाची ही गैरहजेरी आहे, असे त्यांनी मानले आणि ते कामाला लागले. लष्करातल्या अकरा हजार सेवानिवृत्त सैनिकांची मदत घेऊन त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला वळण लावायचा निर्णय घेतला. पोलिसांना नवी शस्त्रे दिली आणि कुठेही गुंडगिरी झाली तर ती कठोरपणाने मोडून काढायचा आदेश त्यांनी दिला. बिहारचे रस्ते हा एक विनोदी प्रकार होता. लालूप्रसादांनी पाटण्याचे रस्ते एका प्रख्यात अभिनेत्रीच्या गालासारखे बनवायचे फक्त आश्वासन दिले होते! प्रत्यक्षात घडले काहीच नव्हते! नीतीशकुमारांनी बिहारसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करून रस्त्यांचा चेहरामोहरा पालटला. संपूर्ण देशात उत्पादन होणाऱ्या सिमेंटचा सर्वात मोठा ग्राहक म्हणून बिहार ओळखले जाऊ लागले. रस्त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंटचा त्यात जास्त वाटा आहे. उद्योगांना सर्वाधिक सवलती देऊन औद्योगिक विकासालाच नीतीशकुमारांनी चालना दिली. अगदी पाच वर्षांपूर्वीपर्यंत पाटण्याहून दिल्लीला आणि पाटण्याहून कोलकात्याला दिवसातून विमानांची दोन उड्डाणे व्हायची, ती आता प्रत्येकी सात होतात. गया शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी गयेला आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा, यासाठी आग्रह धरला. आज विमानसेवेने गया शहर हे यांगून, बँकॉक, कोलंबो या शहरांशी जोडण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक आले तर आपल्या राज्याविषयी बाहेरच्या देशांमध्ये चांगले बोलले जाईल; पर्यटक, वाढतील, परदेशी गुंतवणूक वाढेल, हे त्यांनी पाहिले. आपल्या राज्यात गुंतवणूक वाढावी, यासाठी परदेश दौरे न करताही त्यांनी ती पदरात पाडून घेतली. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नीतीशकुमारांच्या पक्षाला खासगी कंपन्यांकडे हेलिकॉप्टर राखून ठेवायचा विसर पडला. संयुक्त जनता दल हा मूळच्या समाजवाद्यांचा असल्याने तेही स्वाभाविकच होय. नीतीशकुमारांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष सहभागी आहे. त्यांची पक्षीय यंत्रणा बऱ्यापैकी कार्यक्षम असल्याने नीतीशकुमारांना भाजप नेत्यांच्या नाकदुऱ्या काढून स्वत:साठी हेलिकॉप्टर मिळवावे लागले असते. त्यांनी तसे करण्यापेक्षा आपल्यावर विश्वास असणाऱ्या जनतेला, मागास जाती-जमातींना फक्त आवाहन करणे पसंत केले आणि भल्याभल्यांना पाणी पाजले. असेही एखाद्या राज्यात घडू शकते, हा अन्य राज्यांच्या नेत्यांसाठी एक आदर्श ठरावा. नीतीशकुमारांनी फक्त उत्पादनात वाढ केली, विकास दरात वाढ केली, असे नाही; तर त्यांनी खऱ्या अर्थाने मुला-मुलींमध्ये समानता आणायचा प्रयत्न केला. सात ते १० वर्षे वयोगटातल्या सर्वाधिक मुला-मुलींची नावे शाळांमध्ये नोंदवण्यात आली आहेत. विशेषत: मुलींनी शाळेत जावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बिहारसारख्या राज्यात नक्षलवाद्यांचा उपद्रव जास्त आहे. दक्षिण बिहारमध्ये त्यांचा सुळसुळाट प्रगतीला मारक ठरतो आहे. गेल्याच महिन्यात गया जिल्हय़ातल्या एका खेडेगावात नक्षलवाद्यांनी एक दुमजली शाळा बॉम्बने उद्ध्वस्त केली. तिथल्या मातीच्या ढिगाऱ्यात नक्षलवाद्यांनी ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिले होते, की गरिबांना शिक्षणासाठी दुमजली शाळा नको, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि चांगला शिक्षक हवा. शाळेशिवाय शिक्षक हवा, म्हणजे त्याने गुरुकुल पद्धतीने झाडाखाली शाळा चालवायची का? नक्षलवाद्यांना हा प्रश्न करून उपयोग नाही. बिहारमध्ये गेल्या वर्षी नक्षलवाद्यांनी ६००-७०० जणांना मारले. एक लाख जणांचे सक्तीने स्थलांतर घडवले, असे असूनही बिहार प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो, हे विशेष आहे. हा अडथळा थोडा कमी झाला, तर बिहारसारखे राज्य आणखी भरारी मारू शकते. जागतिक बँक आणि ‘इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन’ यांनी आपल्या अलीकडल्या एका संयुक्त अहवालात बिहारमधल्या बदललेल्या वातावरणाची दखल घेतली आहे. आणखी पाच वर्षांत बिहार हे भरभराटीत पहिल्या क्रमांकावर असेल, हे पाहायला मिळेल, असा नीतीशकुमारांना विश्वास आहे. शेती, आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांतच आपली ही प्रगती दिसेल, असे ते म्हणतात. या वर्षांच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होतील, तेव्हा या गोष्टींचा विचार केला जाईलच, पण निवडणूक असो वा नसो, एक व्यक्ती आपल्या राज्याच्या विकासाच्या ध्यासाने पछाडू शकते, हे काय कमी आहे? एका अर्थाने नीतीशकुमारांनी घडवून आणलेला हा चमत्कारच आहे.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|