मुखपृष्ठ >> महत्वाच्या बातम्या >> ग्राहक पंचायतीच्या रेटय़ामुळे ‘लक्स गोल्ड कॉइन’ची जाहिरात मागे
 


स्पर्धेचे नियम व अटी




ग्राहक पंचायतीच्या रेटय़ामुळे ‘लक्स गोल्ड कॉइन’ची जाहिरात मागे Bookmark and Share Print E-mail
मुंबई, १५ जानेवारी/प्रतिनिधी
मुंबई ग्राहक पंचायतने न्यायालयात धाव घेऊन नेटाने पाठपुरावा केल्यानंतर ‘लक्स’ साबणाचे उत्पादन करणाऱ्या ‘हिंदूस्तान युनिलिव्हर’ या बलाढय़ कंपनीने गेले तीन महिने वृत्तपत्रे व टीव्हीवर चालविलेला ‘लक्स गोल्ड कॉईन ऑफर’च्या जाहिरातींचा धमाका बंद करण्याचे ठरविले आहे गोवा आणि हिमाचल प्रदेशातील कारखान्यात उशिरात उशिरा १० डिसेंबपर्यंत उत्पादित केलेल्या ‘लक्स’ साबणाच्या वडय़ांमध्येच सोन्याची नाणी घालण्यात आली असल्याने आणि कारखान्यात तयार होणाऱ्या साबणाच्या वडय़ा उत्पादनानंतर २४ तासांच्या आत वेष्ठणावगुंठित (पॅकेिजग) केल्या जात असल्याने २० जानेवारीपर्यंत ‘पॅक’ केलेल्या ‘लक्स’च्या वडीमध्ये सोन्याचे नाणे मिळू शकते हे ग्राहकांना दाखविले जाणारे आमिष मुळातच फसवे आणि लबाडीचे आहे, असा युक्तिवाद ग्राहक पंचायतीने केला होता.
हिंदूस्तान लिव्हर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई ग्राहक पंचायतच्या कार्यालयास भेट देऊन पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे, चिटणीस ज्योती मोडक व ‘अ‍ॅड वॉच क्लब’च्या प्रमुख अनुराधा देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी दोन्ही बाजूंनी आपापले दृष्टिकोन मांडले. त्यानंतर आता कंपनीचे कार्यकारी संचालक (विधी) अशोक गुप्ता यांनी शिरीष देशपांडे यांना १४ जानेवारी रोजी पत्र पाठवून यापुढे कंपनी ‘लक्स गोल्ड कॉईन ऑफर’ची जाहिरात करणार नाही, असे कळविले आहे. तांत्रिक कारणांमुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील जाहिरात बंद होण्यास तीन-चार दिवस लागू शकतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. शनिवार आणि रविवारी नेमकी स्थिती स्पष्ट करणाऱ्या जाहिराती दिल्या जातील, असेही कंपनीने कळविले आहे. थोडक्यात, ऑफरची जाहिरातबाजी मागे घेतली असली तरी आत सोन्याचे नाणे घालून याआधी उत्पादित केलेल्या ‘लक्स’ साबणाच्या वडय़ांची बाजारातील विक्री जाहिरातीशिवाय सुरुच राहील, असा कंपनीचा पवित्रा आहे.
मुळात आमची जाहिरात फसवी नव्हती, असे कंपनीचे म्हणणे असले तरी जाहिरातींमधील काही मजकुराचे स्वरूप ग्राहकांचा गैरसमज होऊ शकेल, असे होते ही गोष्ट कंपनीने मान्य केली आहे. ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ ही देशातील सर्वात मोठी जाहिरातदार कंपनी आहे. जागृक ग्राहक संघटनेने एवढया मोठय़ा कंपनीस कैचीत पकडून माघार घ्यायला लावणे ही बाब ग्राहक चळवळीस बळकटी देणारी आहे.
ऑक्टोबरमध्ये कंपनीने ‘लक्स गोल्ड कॉईन ऑफर’ प्रसिद्धीमाध्यमांतून जाहीर केली. त्यानंतर ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड तारे-तारकांच्या लोभस छब्यांसह या ऑफरची आक्रमकपणे जाहिरात सुरु केली गेली. ५ ऑक्टोबर २००९ ते २० जानेवारी २०१० या काळात उत्पादित केल्या जाणाऱ्या ‘लक्स’ साबणाच्या हजारो वडय़ांमध्ये तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे घालण्यात येणार आहे. ‘लक्स’ खरेदी करा व आपण नशिबवान असाल तर तुम्हालाही सोन्याचे नाणे मिळू शकेल, असे आवाहन या जाहिरातींमधून ग्राहकांना केले गेले होते.
उत्पादकाने आपल्या मालाच्या विक्रीसाठी किंवा त्याच्या जाहिरातीसाठी स्पर्धा, लॉटरी किंवा नशिबावर विसंबून असलेली कोणतीही योजना राबविणे ही ग्राहक संरक्षण कायद्याने अनुचित व्यापार प्रथा ठरविली असून त्याविरुद्धच्या तक्रारींची सुनावणी करून ग्राहकांच्या हितरक्षणासाठी आवस्यक ते आदेश देण्याचे अधिकार ग्राहक न्यायालयांना दिले गेले आहेत. याचा आधार घेऊन मुंबई ग्राहक पंचायतने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे याचिका दाखल केली व या जाहिरातीस बंदी करण्याखेरीज ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल कंपनीस राष्ट्रीय ग्राहक कल्याण निधीत अडीच कोटी रुपये देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली. या याचिकेवर आयोगापुढे ४ व ५ जानेवारी रोजी सुनावणी झाली व कोणताही अंतरिम आदेश न देता प्रकरण ६ एप्रिलपर्यंत तहकूब केले गेले. परंतु ५ व६ डिसेंबर रोजी ‘पॅक’ केलेल्या ‘लक्स’च्या वडय़ांवरही ‘गोल्ड कॉईन ऑफर’चे वेष्ठण असल्याचे बाजारात आढळल्यानंतर ग्राहक पंचायतीने कंपनीकडे नेटाने पाठपुरावा केला.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.