|
|
|
‘डेंजर वारा..’ शहराला कवेत घेतोय!
|
|
|
|
|
रवींद्र पाथरे
मुंबई-पुण्यासारखी शहरं आज वेगानं बिल्डर आणि विकासकांच्या घशात चालली आहेत. सत्ताधारी, विरोधी पक्ष-संघटना, गुंड, झोपडीदादा, बिल्डर असे सगळे मिळून संगनमताने पुणे, मुंबई आणि विकासाच्या वाटेवर असलेली सगळीच शहरं एकामागोमाग एक गिळंकृत करीत सुटले आहेत. त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना कधी ताकीद देऊन, तर कधी दहशतीनं गप्प केलं जात आहे. तरीही न ऐकणाऱ्याला या जगातूनच संपवलं जात आहे.
या भयावह परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर नाटककार जयंत पवारलिखित आणि अनिरुद्ध खुटवड दिग्दर्शित ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ हे याच विषयाला तोंड फोडणारं नाटक रंगमंचावर येत आहे. इथल्या मूळच्या सामान्य माणसांना विस्थापित करून दहशतीच्या बळावर त्यांना शहराबाहेर हाकललं जात आहे. जे याला राजी होत नाहीत, त्यांना साम-दाम-दंड-भेद असे सर्व मार्ग अवलंबून नेस्तनाबूत केलं जात आहे. नाहीतर या जगातूनच एक्झिट घ्यायला लावली जात आहे. हे सगळं कळत असून, समोर दिसत असूनही सामान्य माणूस त्याविरुद्ध काहीच करू शकत नाहीए. कारण त्याची ताकद तोकडी पडतेय. तो या भल्यामोठय़ा यंत्रणेविरोधात लढायला असमर्थ आहे. हेच वास्तव जयंत पवार यांनी त्यांच्या ‘काय डेंजर वारा सुटलाय!’मध्ये मांडलं आहे. ‘नगरी बडी बांका’ या एकांकिकेपासून सुरू झालेल्या या विषयाचा प्रवास मुंबई जसजशी बिल्डरांच्या घशात जाऊ लागली तसतसा व्यापक होत गेला. त्याचंच पूर्ण लांबीच्या नाटकातील आजचं रूप ‘डेंजर वारा..’मध्ये साकारलंय. हे नाटक सादरीकरणाची शैली तसंच विषयाच्या बाबतीतसुद्धा भलतंच आव्हानात्मक असल्यानं अनेक रंगकर्मींना त्यानं भुरळ घातली. प्रा. वामन केंद्रे यांच्यापासून गणेश यादवांपर्यंत अनेक दिग्दर्शक हे आव्हान पेलू इच्छित होते. परंतु या ना त्या कारणानं ते घडू शकलं नाही. अनेक निर्मातेही ते करू मागत होते, परंतु गंभीर विषय आणि सादरीकरणासाठी येणारा मोठा खर्च पाहता अनेकांनी प्रारंभीच्या उत्साहानंतर माघार घेतली. अभिनेते अनिल गवस हेही या नाटकाच्या प्रेमात होते. इतकं सशक्त नाटक रंगभूमीवर येऊ शकत नाही, याचा सल त्यांना आत कुठंतरी सतावत होता. तेव्हा त्यांनी हे नाटक सहकारी तत्त्वावर करायचं मनावर घेतलं. स्वत: अनिल गवस, उदय कुलकर्णी, जयंत पवार अशा तिघा-चौघांनी मिळून या नाटकाची निर्मिती करायचं नक्की केलं. मात्र, प्रत्यक्ष प्रयोगांसाठी एखाद्या नाटय़संस्थेचं बॅनर असणं गरजेचं असल्यानं त्यांनी ‘महाराष्ट्र रंगभूमी’ या नाटय़संस्थेचे संतोष कोचरेकर यांच्याकडे विचारणा केली. नाटकाचा विषय ऐकल्यावर कोचरेकरांनाही तो आवडला आणि त्यांनी संस्थेच्या बॅनरबरोबरच निर्मितीतही सहभाग घेण्याचे ठरविले. आता उद्या, गुरुवारी, २९ जुलै रोजी दुपारी ४.३० वा. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होत आहे. या नाटकाच्या प्रवासाबद्दल बोलताना नाटककार जयंत पवार म्हणाले की, ‘गेली काही वर्षे या नाटकाचा विषय सतत माझ्या मनात घोळतो आहे. ‘नगरी बडी बांका’ या नावानं मी काही वर्षांपूर्वी त्यावर एकांकिका लिहिली होती. इथल्या सामान्य माणसांना धाकदपटशानं घराबाहेर काढून त्यांची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याच्या कारवाया सध्या मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. हे एक मोठंच षडयंत्र आहे आणि त्यात बरेच घटक सामील आहेत. या विषयाची व्याप्ती इतपतच नाही, तर त्याला आणखीही असंख्य कंगोरे आहेत. म्हणूनच ‘नगरी बडी बांका’नंतर मी या विषयाकडे पुन: पुन्हा वळत राहिलो आणि त्यातून साकारलंय आजचं ‘काय डेंजर वारा सुटलाय!’’ अभिनेते अनिल गवस यातली दाभाडेची प्रमुख भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या निर्मितीतही त्यांनी पुढाकार घेतलाय. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘हे नाटक मला खूप आवडलं होतं. परंतु त्याला निर्माता मिळत नाही, याचं कमालीचं दु:ख होत होतं. एकदा माझ्या मनात आलं की, मला जर हे नाटक एवढं आवडलंय, तर आपणच ते रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न का करू नये? मी माझी ही कल्पना जयंत पवारांच्या कानावर घातली. मग माझे दोन-तीन मित्र मिळून सहकारी तत्त्वावर आम्ही या नाटकाची निर्मिती करायचं ठरवलं. दरम्यान, आनंदाची गोष्ट म्हणजे निर्माते संतोष कोचरेकरही आमच्या या संकल्पनेत निर्माते म्हणून सामील झाले. त्यामुळे नाटकाच्या प्रयोगांची जबाबदारी आता ते कुशलतेने पार पाडतील, यात शंका नाही. खरं तर मलाच हे नाटक दिग्दर्शित करायचं होतं. परंतु जयंत पवारांनी मला यातली प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शन अशा दोन्ही गोष्टी मी करू नयेत, असं सुचवलं. मग नाटकाचं दिग्दर्शन अनिरुद्ध खुटवड यांच्याकडे द्यायचं ठरलं. या नाटकात व्हिडिओ चित्रणाचाही बराच वापर करावा लागणार होता. त्याची जबाबदारी विनय आपटे यांनी आनंदानं स्वीकारली. हे नाटक आम्हा सगळ्यांसाठीच एक मोठं आव्हान आहे. ते आमच्या परीनं पेलण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. यात आम्ही कितपत यशस्वी झालोत, हे आता प्रेक्षकच ठरवतील.’ नाटकाचे दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड यांचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक. त्यांनी याअगोदर ‘एक रिकामी बाजू’ आणि पुण्याच्या ललित कला केंद्रासाठी ‘अधांतर’चं दिग्दर्शन केलं होतं. ‘अधांतर’ची पाश्र्वभूमी माहीत नसतानाही ज्या संवेदनशीलतेनं अनिरुद्ध खुटवड यांनी ते बसवलं होतं, ते पाहून जयंत पवार प्रभावित झाले आणि आपल्या या नव्या नाटकालाही ते न्याय देऊ शकतील, असं त्यांना वाटलं. त्यामुळे ‘डेंजर वारा..’चं दिग्दर्शन खुटवड यांच्याकडे सोपविण्यात आलं. दिग्दर्शक खुटवड त्याबद्दल म्हणाले की, ‘हे नाटक दिग्दर्शकासाठी मोठंच आव्हान आहे. ते सरळसोट नाहीए. त्यामुळे त्याच्या पसाऱ्याचं आणि व्यापकत्वाचं योग्य ते भान दिग्दर्शकाला असणं गरजेचं आहे. मी माझ्या परीनं या नाटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे.’ नाटकाचे एक निर्माते संतोष कोचरेकर यांनी या नाटकाच्या योग्य प्रकारे प्रदर्शनासाठी कंबर कसलीय. ते म्हणाले की, ‘या नाटकाची ताकद मला वाचनातच कळली आणि मी त्याच्या निर्मितीत सहभागी व्हायचं ठरवलं. माझ्याकडे आजघडीला उत्तम तारखा आहेत. या नाटकाचे प्रयोग योग्य तऱ्हेनं लावून ते चालविण्याचं कसब माझ्यापाशी आहे. आणि मुळात या नाटकातच दम आहे. त्यामुळे मला फार तोशीस पडेल असं वाटत नाही.’ तर असा हा ‘डेंजर वारा..’ उद्यापासून सबंध महाराष्ट्रभर धुमाकूळ घालायला सज्ज झालाय..
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|