मुखपृष्ठ >> लेख >> ‘ ‘सिटीवॉक’मुळे निसर्गप्रेमी झालो ’
 


स्पर्धेचे नियम व अटी




‘ ‘सिटीवॉक’मुळे निसर्गप्रेमी झालो ’ Bookmark and Share Print E-mail
प्रतिनिधी ,गुरुवार २९ जुलै २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबईतला निसर्ग हा एक कुतूहलाचा तर मुंबईचा पाऊस हा औत्सुक्याचा विषय आहे. मुंबईच्या पावसाळ्यातला आगळा निसर्ग अनुभवण्याचा योग ‘लोकसत्ता’ आणि मुंबई विद्यापीठ बहि:शाल शिक्षण विभाग यांनी जुळवून आणला ‘सिटीवॉक’च्या निमित्ताने. रविवार, २४ जुलै रोजी यंदाच्या हंगामातील ‘सिटीवॉक’ना सुरुवात झाली. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकसत्ता’चे वाचक असलेल्या निसर्गप्रेमींचा प्रचंड उत्साह दिसून आला. तरुण, मध्यमवयीन, निवृत्त अशी विविध वयोगटांतील आणि स्तरांतील निसर्गप्रेमी यात सहभागी झाले होते. ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक सुरेश थोरात यांच्या उप्रमुख उपस्थितीत ‘सिटीवॉक’ची सुरुवात झाली. ही सारी वनसंपदा ही नागरिकांचीच असून या श्रीमंतीची मालकी जशी आपली आहे तशी त्याची जबाबदारीही आपलीच आहे, अशी जाणीव थोरात यांनी आपल्या छोटेखानी भाषणात उपस्थितांना करून दिली.
‘सिटीवॉक’मध्ये सहभागी झालेल्या आरती पुराणिक म्हणाल्या की, 'मुंबईत एवढं मोठं जंगल आहे, इतका सुंदर निसर्ग आहे हे माहीतच नव्हतं.. ‘सिटीवॉक’च्या निमित्ताने ही जाणीव होणे हा आमच्यासाठी सुखद धक्काच होता. तर ‘सिटीवॉक’मुळे मी निसर्गप्रेमी झालो, आतापर्यंत मला असं वाटत होतं की अशा प्रकारचा उपक्रम फक्त परदेशातच होऊ शकतो.. पण आता माझा तो गैरसमज दूर झाला.’, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध डॉ. सुभाष पुरंदरे यांनी व्यक्त केली. वनस्पतींच्या संदर्भातील या जाणीवजागृतीच्या ‘सिटीवॉक’प्रमाणेच पक्षी निरीक्षणाचे ‘सिटीवॉक’ही लोकसत्ता व विद्यापीठाच्या या विभागाने सुरू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. आपल्या सभोवताली असलेल्या अनेक वनस्पती, कीटक, फुलं, प्राणी यांची आपल्याला खोलवर माहिती नसते. त्याचा उपयोग, त्याचं महत्त्व, त्याचं वैशिष्टय़ अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. याबद्दलची माहिती या ‘सिटीवॉक’मध्ये सांगितली गेली. ‘या उपक्रमात दिलेली माहिती मुलांसाठी खूपच उपयुक्त ठरेल तरीही आपण याविषयीची एक पुस्तिका प्रकाशित करावी जेणेकरून ‘सिटीवॉक’मध्ये दिलेली माहिती कायमस्वरूपी आमच्याजवळ राहील’, अशी प्रतिक्रिया संजीव गावंडे यांनी दिली. मुंबईसारख्या कँाक्रिटच्या जंगलात झाडांचंही एक जंगल आहे याचा सुखद धक्का सगळ्यांनाच बसत होता.. ‘मुंबईत राहाणाऱ्या हल्लीच्या तरुणाईला वनस्पतींची फारशी माहिती नसते. पण या उपक्रमामुळे आमच्या मुलांच्याही ज्ञानात भर पडली’, असे ‘सिटीवॉक’मध्ये सहभागी झालेल्या स्वप्नीलचे वडील संदीप पेटारे यांनी सांगितले. पुढच्या वेळी आमचे संपूर्ण कुटुंब सहभागी होणार आहे, असेही पटारे म्हणाले.
‘यंदाचं वर्ष जैववैविध्यतेचं वर्ष आहे याची जाणीव आता सगळ्यांना होतेय हे ‘सिटीवॉक’ला मिळालेल्या प्रतिसादामुळे सिद्ध झाले. अनेक वेळा आपण दुतर्फा झाडं असलेल्या रस्त्यावरून चालत असतो. सावली मिळावी म्हणून त्याच झाडांखाली जातो. पण ते झाड कोणतं आहे, त्याचा उपयोग काय, त्याचं वैशिष्टय़ काय याचा आपण विचार कधीच करत नाही. कधीकधी एखादं झाड, कीटक खूप वेगळे दिसतात त्यावेळी आपल्याला त्याच्या आकाराविषयी, रंगाविषयी, दिसण्याविषयी खूप कुतूहल वाटते. पण ते कुतूहल फक्त कुतूहलच रहाते.
पुरेशी सावली मिळाल्यानंतर आपण आपले चालायला लागतो. आपण त्याचा खोलवर विचार करत नाही. काहीवेळा याविषयी आपल्याला माहिती मिळतेही पण त्याचा पुढे उपयोग होऊ शकतो हे तेव्हा जाणवत नाही..’ ‘सिटीवॉक’मध्ये सहभागी झालेले प्रदीप तेंडुलकर सांगत होते. ते पुढे म्हणाले की, ‘मी माझ्या मुलीला गेल्या वर्षीच ‘सिटीवॉक’ला घेऊन आलो असतो तर तिला अजूनच फायदा झाला असता कारण गेल्या वर्षी ती होमी भाभाच्या परीक्षेला बसली होती. तिला याविषयीची माहिती त्या परीक्षेच्या अभ्यायक्रमात होती.. पण त्यावेळी तिने केवळ पुस्तकात असलेली माहिती वाचली होती. तिला प्रत्यक्षात या वनस्पतींची माहिती मिळाली नव्हती. पण ‘सिटीवॉक’मुळे या वर्षी ते शक्य झाले. ‘लोकसत्ता’ आणि मुंबई विद्यापीठ बहि:शाल शिक्षण विभागाने असाच उपक्रम नेहमी सुरू ठेवावा.’
हल्लीच्या तरुणाईवर खूप काही चांगलं-वाईट बोललं जातं. त्यांना फक्त मजा, मस्ती, धमाल हेच हवं असतं असही बोलंलं जातं. पण हे खोटं ठरवलंय ‘सिटी वॉक’मध्ये आलेल्या काही तरुणांनी.. आयपॉड, मोबाईल घेऊन फिरणारी ही तरुण मंडळी मुंबईतल्या जंगलात हरवून गेली होती. ‘आजकालच्या मुलांना वनस्पतींची पुरेशी माहिती नसते किंवा अनेकांना ती जाणून घ्यायची नसते. पण ‘सिटीवॉक’ने त्यांना निसर्गाकडे खेचून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर सगळं काही ‘लाईव्ह’ बघायला मिळतंय म्हणून आमच्याबरोबर असलेली तरुण मंडळी खूप उत्सुक झाली होती’, असं संजीव गावंडे सांगत होते. एखाद्या विषयाबद्दल सखोल माहिती देणारे तितकेच तज्ज्ञ हवेत. ‘सिटी वॉक’मध्येही अशीच काही तज्ज्ञ मंडळी सहभागी झाली होती. ‘माहिती देणारे खूपच हुशार होते, माहिती सांगणारे तज्ज्ञ चांगल्या प्रकारे समजावून सांगत होते’, असे सांगत सविता परळीकर यांनी तज्ज्ञांचे कौतुक केले. निसर्ग पाहताना जर पावसाने साथ दिली तर दुधात साखर असल्यासारखंच वाटेल. निसर्गाचं नेत्रसुख घेताना पाऊस जोडीला असला तर निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. हेमंत भंगले सांगत होते की, ‘आम्ही ज्या दिवशी सिटीवॉकला गेलो त्यादिवशी पावसाने आम्हाला चांगली साथ दिली. पाऊस खूप छान पडत होता त्यामुळे आमची ही शैक्षणिक सहल चांगलीच रंगली’.
‘वनस्पतींची माहिती सांगणाऱ्यांची इच्छाशक्ती खूप होती. काहीवेळा तर चालताना आम्ही थकायचो पण ते थकत नव्हते.’ उदय तर्पे निसर्गतज्ज्ञांचं कौतुक करत होते. माहिती सांगणारे खूपच ‘डेडीकेटेड’ होते असं ते म्हणाले. वनस्पतींबरोबरच कीटक, फुलपाखरू यांचा अभ्यास करणंही तितकच महत्त्वाचं. म्हणूनच वनस्पतींबरोबरच निसर्गातील इतरही घटकांची माहिती या उपक्रमात दिली जात होती. ‘मी नॅशनल पार्कमध्ये यापूर्वी अनेकदा गेले आहे पण सिटीवॉकबरोबर पहिल्यांदाच गेले. खूपच चांगला अनुभव होता.’, असे स्वाती देसाई यांनी सांगितले तर ‘सिटीवॉक’चा अनुभव इतका सुंदर होता की परत या उपक्रमात सहभागी व्हायला नक्की आवडेल, असं रुपाली हंकारे सांगत होत्या.
अशा उत्साहात, आनंदात, पावसात आणि निसर्गाच्या सान्निध्यात हंगामातील पहिला सिटीवॉक पार पडला. सिटीवॉकवरून घरी परत जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण निसर्गाच्या थोडं जवळ आलो आहोत असे भाव उमटले होते !
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.