खासगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीविरोधात गेले महिनाभर सह्य़ांची मोहीम, ऑनलाइन पिटिशन, पंतप्रधान, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना ई-मेल आदी माध्यमांतून देशभर सुरू असलेल्या पालकांच्या आंदोलनाला शनिवारी, २५ एप्रिल रोजी आणखी बळकट करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यभरातील पालक आझाद मैदानात एकत्र जमून मनमानी शुल्कवाढ करणाऱ्या शाळाचालकांच्या विरोधात धरणे आंदोलन करणार आहेत.
पालकांनी शुल्कवाढीला विरोध केला म्हणून मुलाला काढून टाकणे, वाढीव शुल्क भरले नाही म्हणून मुलाला शाळेतच कोंडून ठेवले अशा किती तरी तक्रारी राज्यभरातून पालक करीत आहेत. मनमानी शुल्कवाढीवरून उद्भवणाऱ्या या वादांना कंटाळलेल्या पालकांनी राज्यस्तरावरच मोहीम उघडली होती. त्याला देशभरातील काही पालक संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे. या मोहिमेंतर्गत थेट पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जागे करण्याची मोहीम पालकांनी उघडली होती.
यात मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, पिंपरी, चिंचवड, जळगाव, ठाणे, वाशी, ऐरोली, डोंबिवली, औरंगाबाद येथील पालकांचा समावेश आहे. आता हे पालक ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या स्वयंसेवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शनिवारी, सकाळी ११ वाजता आझाद मैदानात जमून आंदोलन करणार आहेत.
पालकांच्या मागण्या
*ज्या शाळा २० हजारांहून अधिक शुल्क आकारत आहेत त्या नफेखोरी करणाऱ्या नाही ना याची पडताळणी करा.
*शिक्षण मंडळ कुठलेही असले तरी एक राज्य, एक अभ्यासक्रम असावा.
*वेगवेगळ्या सुविधांच्या नावाखाली वसूल होणारे शुल्क बंद करा.
*शाळेतून पुस्तके, गणवेश घेण्याचे बंधन नको.
*जास्तीत जास्त शुल्क किती असावे यावर मर्यादा हवी.
*प्रवेशाच्या वेळेस विद्यार्थ्यांची व पालकांची मुलाखत घेण्यावर र्निबध.

Story img Loader