मुंबई विद्यापीठातर्फे रत्नागिरी जिल्ह्य़ातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल उभारले जाणार आहे. आंबडवे गावातील गावकऱ्यांनी विद्यापीठाला दिलेल्या १४ एकर जागेत हे संकुल उभारण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने उच्च शिक्षणातील विद्यार्थी नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी शैक्षणिकदृष्टय़ा मागास जिल्ह्य़ामध्ये ३७४ मॉडेल पदवी कॉलेजची स्थापना करण्याची योजना २०१०-११पासून अमलात आली. मुंबई विद्यापीठानेही त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर विद्यापीठाला २ मॉडेल महाविद्यालये देण्यात आली. त्यानुसार अंबाडवे या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी एक मॉडेल कॉलेज स्थापन करण्यात आले.
गावकऱ्यांनी या महाविद्यालयासाठी १४ एकर जमीन दिल्याने विद्यापीठासमोरील जागेचा प्रश्न सुटला. या जागेवर महाविद्यालयाची इमारत आणि संकुलाचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यात येईल. त्यासाठी १ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्री-फ्रॅब स्ट्रक्चर जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून महाविद्यालय नवीन संकुलामध्ये सुरू होईल.
या शैक्षणिक संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, उपहारगृह, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, सेमिनार हॉल, सभागृह, खेळाचे साहित्य, विद्यार्थी मदत केंद्र, कर्मचारी वसाहत आदी सोयीसुविधांचा अंतर्भाव त्यात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा