गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल झाल्याचे पाहायला मिळाले. या बदलामुळे संघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्यास सुरुवात झाली. क्रिकेटमधील या परिवर्तन चक्रात भारतीय संघात अनेक नवीन चेहरे हे सामान्य कुटुंबातून आले. अशाच दिग्गजांमध्ये भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह एकेकाळी भारताच्या गोलंदाजीची मुख्य धुरा सांभाळणाऱ्या झहीर खानचा समावेश होतो. यांच्याशिवाय हरभजन सिंग आणि सध्या भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या रवींद्र जाडेजा आणि उमेश यादव यांचाही समावेश होतो. कठोर परिश्रमाने सर्व गोष्टी साध्य करता येतात, हेच यांनी दाखवून दिले.

वीरेंद्र सेहवाग-
कसोटीमध्ये तब्बल तीनवेळा त्रिशतकी खेळी आणि एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या वीरेंद्र सेहवागला सध्या नजफगडचा नवाब म्हणून ओळखले जाते. पण हा धडाकेबाज सलामीवर सामान्य कुटुंबियातून आला. त्याचे वडील व्यापारी होते. एवढेच नाही तर त्याची जडण घडण ही ५० सदस्यांच्या सामुहिक कुटुंबियात झाली. सेहवाग क्रिकेटच्या सरावासाठी घरापासून तब्बल ८४ किमीचा प्रवास करायचा. मैदानातील मेहनतीने त्याने दिग्गजांमध्ये आपले नाव कोरले.

 

झहीर खान-
लहानपणापासूनच झहीर खानला भारतीय संघात खेळण्याची इच्छा होती. झहीरचा जन्म नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या छोट्याशा गावी झाला. त्याचे वडील छायाचित्रकार होते. तर त्याची आई शिक्षिका होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील झहीर भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न बाळगून वयाच्या १७ व्या वर्षी तो मुंबईत आला. यादरम्यान त्याने मुंबईत नोकरीही केली. अखेर २००० मध्ये त्याला मुंबईच्या संघात संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले हे क्रिकेट जाणकार कदापि नाकारणार नाहीत.

 

उमेश यादव-
झहीरनंतर भारतीय संघात सध्या उमेश यादव चांगली कामगिरी करताना दिसतोय. यादवचे वडील कोळशाच्या खाणीमध्ये काम करत होते. त्याच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. अशा परिस्थितीत कठोर परिश्रमातून उमेश यादवने भारतीय संघात स्थान मिळवले. सध्याच्या घडीला यादव भारतीय गोलंदाजी ताफ्यातून मुख्य गोलंदाज आहे.

रवींद्र जाडेजा-
चाहत्यांनी सर पदवी बहाल केलेल्या रवींद्र जाडेजाने काही दिवसांपूर्वीच विवाह थाटला. त्याच्या शाही लग्नाची चर्चा देखील रंगल्याचे पाहायला मिळाले. पण सुरुवातीच्या काळात जाडेजाच्या कुटुंबीय आर्थिक मंदीत सापडले होते. त्याचे वडील एका खासगी कंपनीत वॉचमन म्हणून कार्यरत होते. वडिलांच्या वेतनात कसेबसे त्यांचे घर चालायचे. अशा परिस्थितीत क्रिकेटमध्ये करिअर करणे त्याच्यासाठी अग्निपरीक्षाच होती. पण मेहनत कधी वाया जात नाही, हे जाडेजाने दाखवून दिले. सध्याच्या घडीला कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये जाडेजा अव्वल स्थानी आहे.

हभजन सिंग-
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत हरभजन तिसऱ्या स्थानावर आहे. १९९८ मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर भज्जीला तब्बल तीनवर्षे संघाबाहेर बसावे लागले. संघात स्थान मिळत नसल्यामुळे त्याने कॅनडामध्ये जाऊन टॅक्सी चालवण्याचाही निर्णय घेतला होता. पण अखेर २००१ मध्ये त्याला भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली. या संधीनंतर त्याचे आयुष्यच बदलले.

Story img Loader