महिला गटात पिंपरी संघाची सरशी
पूर्वार्धात १३-१८ अशा गुणांनी पिछाडीवर असलेल्या पिंपरी-चिंचवड संघाने मुंबई महाकाळ संघाला ३३-२८ असे हरविले आणि महाकबड्डी लीगमध्ये आव्हान राखले. पुरुषांमध्ये मात्र मुंबईने पिंपरी-चिंचवड संघावर ४३-३४ अशी मात केली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या सामन्यात मुंबईच्या सायली केरीपाळे हिने पूर्वार्धात सहा चढायांमध्ये एका बोनस गुणासह पाच गुण तसेच पकडीत एक गुण असे सहा गुण वसूल केले होते. तिने दिशा जोशी हिची पकड करीत संघास पहिला लोण नोंदविण्यात यश मिळविले. उत्तरार्धातही बराच वेळ मुंबईकडेच आघाडी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांनी २७-२५ अशी आघाडी घेतली होती. तथापि पिंपरी संघाच्या खेळाडूंनी जोरदार पकडी करीत सामन्यास कलाटणी दिली. त्यांनी लोण चढवित ३१-२७ अशी आघाडीही मिळविली. शेवटपर्यंत आघाडी टिकवित त्यांनी ३३-२८ असा विजय मिळविला. त्याचे श्रेय अंकिता जगताप, सत्यवा हळदकैरी व सुमती पुजारी यांच्या खेळास द्यावे लागेल. मुंबईकडून सायली केरीपाळे व काजल जाधव यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
पुरुष गटात मुंबईने सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण मिळविले होते. पहिल्या पाच मिनिटांमध्येच त्यांनी पहिला लोण नोंदविला. पूर्वार्धात त्यांनी आणखी एक लोण चढविला. त्यांनी पूर्वार्धात २५-११ अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात पिंपरीच्या खेळाडूंनी चिवट लढत दिली. तथापि मुंबईची आघाडी तोडणे त्यांना शक्य झाले नाही.
मुंबई संघाकडून उमेश म्हात्रे, नितीन देशमुख यांनी खोलवर चढाया केल्या. मयूर शिवथरकर व देवेंद्र कदम याने सुरेख पकडी केल्या. पिंपरी-चिंचवड संघाच्या जितेंद्र बेडके व गुरुनाथ मोरे यांनी दिलेली झुंज संघाचा पराभव टाळू शकली नाही.