ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉने आपल्या मित्राची अखेरची इच्छा पूर्ण करत त्याच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या. स्टीव वॉ मंगळवारी वाराणसीत आला होता. हिंदू संस्कृतीनुसार आपल्या अस्थी गंगेच्या पात्रात विसर्जित व्हाव्यात अशी स्टीव वॉचे मित्र स्टीफन यांची अखेरची इच्छा होती. ४ महिन्यांपूर्वी स्टीफन यांचे निधन झाले होते. स्टीफनची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्टीव वॉ आपल्या जॉन्सन या आणखी एका मित्रासह वाराणसीत दाखल झाला होता. वाराणसीत एका गाईडची मदत घेत दोघं दश्वमेध घाटावर पोहोचले. तेथून एका बोटीने ते मनकर्णिका घाटावर पोहोचले आणि हिंदू संस्कृतीनुसार अस्थिविसर्जन केले.
माध्यमांशी बोलताना स्टीव वॉ म्हणाला की, स्टीफन हा माझा खूप जवळचा मित्र होता. आपल्या मृत्यूनंतर अस्थी गंगाघाटावर विसर्जित व्हाव्यात अशी शेवटची इच्छा स्टीफनने व्यक्त केली होती. त्याची इच्छा आज मी पूर्ण केल्याने मला खूप समाधान वाटत आहे. वाराणसीसारखे सुंदर ठिकाण मला पाहता आले. वाराणसीला भेट देण्याची कित्येक वर्षापासूनची इच्छा होती. येथील आध्यात्मिक भावना पाहून मी थक्क झालो.
स्टीव वॉने ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेटविश्वात उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी त्याचे भारताशी तसे खूप जुने नाते आहे. कोलकात्यात ज्येष्ठ समाजसेविका मदर तेरेसा यांच्या कार्याने प्रेरित होऊन वॉने २००९ साली कुष्ठरोगींसाठी एका संस्थेचीही सुरूवात केली. आजही ही संस्था समाजातील उपेक्षित मुलांसाठी काम करते.