राष्ट्र उभारणीत स्त्रियांचा सहभाग, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे शिक्षण, डॉक्टर-इंजिनीयर म्हणून कार्यरत असणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण याबाबतीत बरंच काही लिहून झालंय. अनेक चर्चा रंगल्यात. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन स्त्रियांनी शिक्षण घ्यावं, नोकरी करावी (घर सांभाळून) इथपर्यंत समाज येऊन पोहोचलाय. परंतु विशेष नजरेत न येता समाजात आपलं स्थान पक्कं करून, स्वत:ची ओळखच नाही तर छाप पाडणाऱ्या स्त्री अभियंता अर्थात इंजिनीअर स्त्रिया या समाजात होत्या. आहेत आणि आता तर त्यांची संख्या वाढतेही आहे. कधी ऑन फिल्ड वा शॉप फ्लोअरवर राहून, शिक्षकी पेशात राहून केवळ पदवीच नाही तर पदव्युत्तर शिक्षण घेऊन, डॉक्टरेट करून स्वत:ची बुद्धिमता आणि कर्तृत्व या दोन्ही पातळ्यांवर लिलया वावरणाऱ्या अनेक स्त्रिया या देशात आहेत. येत्या १५ सप्टेंबरच्या इंजिनीयिरग दिनानिमित्ताने त्यांच्याविषयी..

भारतीय स्त्री अभियंत्यांविषयी बोलायचं झालं तर १९४० मध्ये कॉलेज ऑफ इंजिनीयिरग, गिंडी ( सीईजी) येथे तीन स्त्रियांनी इंजिनीयिरगसाठी प्रवेश घेतला. प्रशस्तिपत्रकावर ‘तो’ लिहिणाऱ्यांसाठी ‘ती’ लिहिण्याची ही पहिलीच वेळ. ‘सीईजी’मध्ये प्रवेश घेणाऱ्या या तिघी म्हणजे पी. के. थ्रेशिया, लीलम्मा जॉर्ज आणि ए. ललिता. यातील ललिता यांनी विद्युत तर इतर दोघींनी स्थापत्य अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. यासाठी त्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. के. सी. चको यांनी पुढाकार घेतला.

Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती

स्त्रियांनी जुजबी शिक्षण घेण्याच्या त्या काळातील या स्त्रियांचे हे पाऊल निश्चितच दखल घेण्यासारखं होतं. वैयक्तिक आयुष्याची घडी नीट बसविण्यासाठी घेतलेली ही झेप नंतर वैयक्तिक न राहता आपल्या शिक्षणाचा पर्यायाने ज्ञानाचा उपयोग विधायक कामांसाठी या तिघींनीही केला. त्या काळानुसार ललिता यांचा विवाह चौदाव्या वर्षी झाला आणि त्यांच्या अठराव्या वर्षी चार महिन्यांची मुलगी असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. वडिलांच्या प्रोत्साहनाने त्यांनी ‘सीईजी’मध्ये प्रवेश घेतला आणि एक एक यश संपादन करीत एक यशस्वी विद्युत अभियांत्रिकी स्त्री म्हणून नावलौकिक मिळविला. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी जमालपूर रेल्वे येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सिमला येथे सेंट्रल स्टँडर्डस् ऑर्गनायझेशन येथे नोकरी केली आणि त्याबरोबरच ‘इलेक्ट्रिकल इन्स्टिटय़ूशन ऑफ लंडन’ येथून देखील पदवी घेतली आणि आपले संशोधन कार्य सुरू केले.

जिलेक्ट्रोमोनियम, स्मोकलेस ओव्हन आणि इलेक्ट्रिक फ्लेम प्रोडय़ुसर या तीन संशोधनासाठी पेटंट्स घेतली आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे भाक्रा-नांगल या जलविद्युत प्रकल्पासाठी जनित्रे तयार केलीत. तसेच तेथील सब स्टेशनचे आराखडे तयार करण्यासाठी त्या नावाजल्या गेल्या. १९६४ मध्ये अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेस त्यांना विशेष निमंत्रण होते.

केरळातील लीलम्मा जॉर्ज या लहानपणापासून कुशाग्र बुद्धीच्या असल्याने त्यांच्या वडिलांची त्यांनी डॉक्टर व्हावे अशी इच्छा होती. त्यानुसार त्यांनी १९३८ मध्ये ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, लुधियाना येथे प्रवेश घेतला. पंधरा वर्षांच्या लील्लमांनी त्यावेळी पाच दिवसांचा रेल्वे प्रवास एका लाकडी बेंचवरून करून लुधियानाच्या महाविद्यालयात पोहोचल्या. घरची आठवण काढत कसेबसे पहिले वर्ष निभावले. द्वितीय वर्षांत मात्र जेव्हा अ‍ॅनाटोमी विषय सुरू झाला तेव्हा शरीर विच्छेदन हा प्रकार काही त्यांना झेपला नाही आणि त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु तो निर्णय वडिलांना पटला नाही आणि त्यांनी पुन्हा दिल्लीच्या मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळवून दिला. परंतु शरीर – विच्छेदनाबाबतची भीती काही केल्या जाईना तेव्हा त्यांनी ‘सीईजी’ येथे स्थापत्य अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयामध्ये मुलींसाठी वसतिगृह देखील नसताना या तिघींनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. इंजिनीयर झाल्यानंतर त्यांनी त्रावणकोर येथे पी. डब्ल्यू. डी. येथे ज्युनिअर इंजिनीयर म्हणून नोकरी केली आणि एक वर्षांच्या आत त्या इंग्लंडला शहर व्यवस्थापन शिकण्यासाठी गेल्या.

पी.डब्ल्यू.डी मध्ये असताना त्यांनी हाऊसिंग कॉलनीचे अनेक प्रकल्प यशस्वी केले. १९७० मध्ये ‘क्रिस्ट चर्च ऑफ त्रिवेंद्रम’चे बांधकाम केले आणि १९७८ मध्ये चीफ इंजिनीयर म्हणून निवृत्त झाल्या.

याच शाखेतल्या पी. के. थ्रेशिया. यांनी १९४४ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीतील पदवी घेतली आणि १९७१ मध्ये केरळ राज्याच्या चीफ इंजिनीयर म्हणून निवृत्त झाल्या. लहानपणापासूनच त्यांच्या बुद्धीची चमक दिसताच त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘सीईजी’मध्ये प्रवेश घेण्यासाठी पाठविले. त्या काळात केवळ हेच महाविद्यालय मुलींना अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देत होते. पदवी घेतल्यानंतर त्या पब्लिक वर्कस कमिशन, कोची येथे सेक्शन ऑफिसर म्हणून रुजू झाल्या. असिस्टंट इंजिनीयर, एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर, सुपरीटेंडंट इंजिनीयर आणि चिफ इंजिनीयर अशी चढती कमान घेत त्यांनी केरळ येथील रस्ते आणि बांधकाम विभागात लक्षणीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जवळपास पस्तीस पूल, दवाखाने, शाळा, रस्ते बांधले. त्यांनी पहिला बिटूमेन रस्ता देखील बांधला. तसेच त्या इंडियन रोड काँग्रेस (आय.आर. सी.) च्या देखील मानद सभासद होत्या.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या सुधा मूर्ती या देखील संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधर आहेत. ‘टेक्निकली साऊंड आणि एथिकली स्ट्राँग’ अशी त्यांचीही कहाणी रंजक आहे. केवळ स्त्री म्हणून इंजिनीयर असून देखील त्यांना टाटा समूहातील नोकरी नाकारण्यात आली, तेव्हा जे.आर.डी. सारख्यांना त्यांनी वास्तवाचे भान दिले, हे अनेकांना माहीत असेल. कर्नाटकातील शाळांमध्ये संगणक आणि वाचनालय या दोन महत्त्वपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. बंगळुरू विद्यापीठात शिक्षिका म्हणून काम करीत असतानाच त्यांनी दोन टेक्निकल आणि तीन शिक्षण पद्धतींवर पुस्तके लिहिली आहेत. ‘इन्फोसिस फाऊंडेशन’तर्फे त्या अनेक समाजोपयोगी कामे करीत असतात.

अशा अनेक अभियांत्रिकी स्त्रिया अखंड कार्यरत राहून विधायक कामे करीत असतात. मला स्वत:ला खरोखर ज्यांच्याबद्दल आदर आणि अभिमान आहे अशा माझ्या मैत्रिणी म्हणजे डॉ. तनुजा बांदिवडेकर आणि डॉ. आशा इंगळे. या दोघींचाही मला या लेखाच्या निमित्ताने उल्लेख करावासा वाटतो.

वडिलांच्या प्रेरणेने स्वेच्छेने डॉ. तनुजा यांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत पदवी तसेच आयआयटी मुंबई या नामवंत संस्थेतून पीएच.डी. केली. मुली शक्यतो जी शाखा टाळतात, अशा स्ट्रक्चरल इंजिनीअिरग या विषयातील त्या तज्ज्ञ आहेत. त्यांच्या वर्गात इतर मुलांबरोबर केवळ दोनच मुली होत्या. पदव्युत्तर शिक्षण घेताना दहा मुलांमध्ये त्या एकटय़ाच. कॅन्टीनमध्ये वगैरे त्यांना एकटीलाच जावं लागे. तेव्हापासूनच कुठलंही काम स्वतंत्रपणे हाताळण्याची पात्रता त्यांनी अंगी बाणवली. महाराष्ट्र शासनाच्या त्या परवानाधारक अभियंत्या आहेत. पुरुषप्रधान असणाऱ्या या क्षेत्रात त्यांना प्रत्येकवेळी आपली पात्रता सिद्ध करावी लागली. स्टील स्ट्रक्चर्स या विषयात पारंगत असणाऱ्या तनुजा प्रत्येक प्रकल्पासाठी स्टील बांधणीच्या वेळी प्रत्यक्ष हजर असतात आणि या कामातील कुठलीही दिरंगाई खपवून घेत नाहीत. भूजच्या भूकंपाच्या वेळी त्यांनी डिझाइन केलेल्या बांधकामाची हानी झाली नाही, ही त्यांच्या कामाची पावती. त्यांनी स्वबळावर जवळपास पंचवीस – तीस प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. तसेच आता त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागल्या आहेत.

मुलींनी इंजिनीअिरग करू नये, असे ठाम मत असणाऱ्या आईचा विरोध पत्करून डॉ. आशा इंगळे यांनी वडील आणि भाऊ यांच्या प्रोत्साहनाने नागपूरच्या व्हीआरसी या कॉलेजमध्ये मेटॅलर्जी या अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. इथेही साठ मुलांच्या बॅचमध्ये केवळ तिघी मुली. परंतु कुठलीही विशेष सुविधा नाकारून त्यांनी इतर मुलांच्या बरोबरीने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयआयटी मुंबई येथे एम. टेक. तसेच डॉक्टरेट केले. मटेरिअल सायन्स/ प्रोसेस मेटॅलर्जी हे त्यांचे अभ्यासाचे विषय. डॉक्टरेट केल्यानंतर त्या ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हस’ या कंपनीत रीसर्च डिव्हिजनमध्ये काम करू लागल्या. येथे त्या अगदी शॉप फ्लोअर वर इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर काम करीत असत.

इलेक्ट्रिक मोटर्ससाठी लागणाऱ्या स्टीलवर प्रोसेसिंग करून कमी किमतीत ते उपलब्ध करून देणे या विषयावर त्यांनी अखंड संशोधन करून अशा प्रकारचे स्टील उपलब्ध करून दिले. शॉप फ्लोअरवर काम करताना तिथे स्त्रियांसाठी स्वच्छतागृहेही नसायची. तरीसुद्धा त्यांच्या कामावरील श्रद्धा आणि उत्तम ज्ञान याचा उपयोग करून त्यांच्या टीमने जवळपास पंचवीस – तीस प्रोजेक्ट्स यशस्वी केले. १२ वर्षांनंतर मुंबईतल्या इंजिनीअिरग कॉलेजमध्ये देखील ‘इनोव्हेटिव्ह टीचिंग-लर्निग’ या प्रकल्पांतर्गत त्या अनेक शैक्षणिक बदल घडवू इच्छितात.

मी स्वत: जेव्हा ‘नीरी’ या संस्थेत प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून काम करीत होते तेव्हा आम्ही आग्रा वॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टमचे डिझाइन केले आणि ते प्रत्यक्षात उतरविले. आमच्या संशोधनातून सुचविलेले चांगल्या प्रतीचे पाइप्स तेथील प्रस्थापितांनी नाकरले आणि मी आणि माझी मैत्रीण जेव्हा लखनऊ येथे ही डिझाइन्स घेऊन गेलो तेव्हा काठय़ा-दांडे घेऊन ते लोक ऑफिसमध्ये शिरले. परंतु आम्ही आमच्या कामावर ठाम होतो. आणि पुढे काही वर्षांनी तेथील चीफ इंजिनीयर्सनी सांगितले की तुमचे डिझाइन आणि पाइप्स आम्ही वापरले आणि ते आता देखील उत्तम काम देताहेत.

इंजिनीयर्सचा आपल्या ज्ञानावर पूर्ण विश्वास असेल तर विधायक कामे योग्य रीतीने पूर्ण होतात. होय, परंतु ती समजा स्त्री असेल तर तिला ते पटवून देण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. परंतु साहाय्यक समजून घेणारे असतील तर अनेक आव्हाने यशस्वीरीत्या पेलू शकते.

माझ्या अनेक इंजिनीयर मैत्रिणींनी आपले करिअर उच्च शिक्षण, व्यावसायिक बांधिलकी  या सगळ्या आव्हानांना पेलूनही कुटुंबही  व्यवस्थित सांभाळलंय. स्वत:च्या संसारिक जबाबदाऱ्याही त्या लीलया पेलताहेत. परिणामी त्यांना नवरा, मुलं, घरची मंडळी यांचा योग्य पाठिंबाही मिळतोय. माझ्याकडेही जेव्हा मुली पीएच.डी. करण्यासाठी येतात तेव्हा साशंक असणाऱ्या मुलींना मी त्यांना करिअर बरोबर घर – संसाराचं महत्त्व वर्क – लाइफ बॅलन्सचं सूत्र पटवून देते. आपली हे दोन्ही सांभाळण्याची योग्यता आणि क्षमता आहे हे जाणवून देते.

तेव्हा आपल्या देशाच्या विकासात या सगळ्या अभियांत्रिकी स्त्रियांचा हातभार लागला आहे. लागतो आहे आणि लागणार आहे. परंतु त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढावं यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. सहभाग वाढवावा लागेल.

– डॉ. मीनल माटेगांवकर

meenal.mategaonkar@gmail.com

(लेखिका एनएमआयएमएस, एमपीएसटीएमई, मुंबई येथे सह-प्राध्यापिका जलस्रोत अभियांत्रिकी आहेत. )