टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती! टाटांनी केलेली संपत्तीनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच ‘टाटायन’!
भारतातील एखाद्या उद्योगसमूहाचा तुलनात्मक संदर्भ देताना ‘हे काय कोणी टाटा-बिर्ला लागून गेले आहेत का?’ असे सहजगत्या म्हटले जाते. टाटा हे नाव भारतीय उद्योगक्षेत्रात कायम क्रमांक एकवर राहिले आहे. याची सुरुवात नवसारीच्या नुसरेवानजी टाटांपासून होते. नुसरेवानजी टाटा यांना वयाच्या १७ व्या वर्षी- ३ मार्च १८३९ रोजी अपत्यप्राप्ती झाली. जमशेट असे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले. हाच मुलगा पुढे जाऊन भारतीय उद्योगविश्वाचा पाया घालणार होता. नुसरेवानजी आपल्या पत्नी व मुलासह नवसारीहून मुंबईला आले. त्यांनी कापसाचा व्यापार सुरू केला. पण अगदी लहान प्रमाणात. कारण त्यांच्याकडे फारसे भांडवल गाठीशी नव्हते. त्यांचे भांडवल त्यांचा मुलगा जमशेट हेच होते. जमशेट १७ वर्षांचा असताना भारतात प्रथमच इंग्रजी भाषेचे शिक्षण मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सुरू झाले. जमशेटला जागतिक व्यापाराची जाण इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे होऊ लागली. त्याने पहिला परदेश दौरा केला तो चीनचा. आपल्या पहिल्याच दौऱ्यात हाँगकाँगमध्ये ‘जमशेटजी अ‍ॅण्ड अर्देशिर’ या नावाने कंपनी स्थापन केली. ही कंपनी धंदा करणार होती दोन गोष्टींचा.. एक म्हणजे कापूस आणि दुसरी- अफू. अर्थात हा व्यापार मुख्यत: ब्रिटिश कंपन्यांबरोबर होत असे. युरोपातील यांत्रिकीकरणामुळे वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आले होते. ‘टाटायन’मध्ये गिरीश कुबेर म्हणतात, ‘‘आता अनेकांना कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल, पण इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीची बरीच ऊर्जा या अफू व्यापारातून आली होती. अफू व्यापारातला सगळा पसा क्रांतीतले नवनवे प्रयोग करण्यासाठी वापरला गेला. शेवटी उद्योगाचीसुद्धा एक नशा असते. सुरुवातीच्या काळात ही नशा अफूनं पुरवली. आणि दुसरं असं, की अफू ही त्यावेळी आजच्याइतकी अपवित्र मानली जात नव्हती. टाटांची कंपनी युरोपला कापूस पुरवायची, अफू चीनला आणि त्या बदल्यात वेलदोडे, चहा, सोनं आणि तयार कापड भारतात आणलं जायचं. सुरुवातीपासूनच या व्यापाराला इतकी गती आली, की या कंपनीला थेट चीनमध्ये हाँगकाँग येथे शाखा उघडावी लागली.’’
त्यानंतर जमशेटजींनी थेट लंडनमध्ये आपले कार्यालय सुरू केले. त्या काळात जमशेटजी वारंवार लँकेशायर-लिव्हरपूलला जात असत. या भेटीत त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, आत्तापर्यंत आपण फक्त बनियेगिरी (ट्रेडिंग) करत होतो. आपल्याला मोठे व्हायचे असेल तर उद्योग करायला हवा. याच काळात थॉमस कार्लाइल यांचे भाषण ऐकण्याची संधी जमशेटजींना मिळाली. त्यात कार्लाइल यांचे एक वाक्य- ‘ज्या देशाला पोलादाचे महत्त्व कळेल, त्या देशाला सोन्याची खाण गवसेल,’ असे होते, ते त्यांच्या मनावर पक्के ठसले. या वाक्याच्या पोटात पुढे उदयाला येणाऱ्या व वेगाने भरभराटीस येणाऱ्या टाटा उद्योगसमूहाचे बीज दडलेले होते.
गिरीश कुबेर यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकात टाटा समूहाच्या अगदी सुरुवातीपासून ते अलीकडच्या नॅनो प्रकल्पापर्यंत आणि रतन टाटांच्या पायउतार होण्यापर्यंतच्या काळाचा इतिहास शैलीदारपणे रेखाटला गेला आहे. भारतीय उद्योगविश्वाच्या प्रारंभापासून आजवर झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा बॉम्बे हाऊसच्या (टाटा समूहाचे जागतिक मुख्यालय) दृष्टिकोनातून या पुस्तकात केला गेला आहे. टाटांच्या कौटुंबिक इतिहासाच्या बॅकड्रॉपसमोर त्यांच्या उद्योगविश्वाचा विस्तृत आढावा घेतला गेला आहे. या पुस्तकात असलेली बरीच दुर्मीळ माहिती आधी कुठे पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली असेल असे वाटत नाही. उदा. १९२० साली अँटवर्प येथे जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय खेळाडूंचा सगळा खर्च जमशेटजींनी स्वत:च्या पशांनी केला होता. पुढे पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा सर्व खर्चही जमशेटजींनीच आपल्या खिशातून दिला होता.
उद्योगविश्वापलीकडे जाऊन जमशेटजींना आध्यात्मिक व वैज्ञानिक विषयांतही गहिरा रस होता. विवेकानंद आणि जमशेटजींचे संबंध खूप जवळचे होते. त्यांनी २३ नोव्हेंबर १८९८ रोजी एक महत्त्वाचे पत्र स्वामीजींना लिहिले. या पत्रामुळे भारताचे सामाजिक, धार्मिक व वैज्ञानिक जीवन एक नवे वळण घेणार होते.
प्रिय स्वामी विवेकानंद..
काही वर्षांपूर्वी आपण एका बोटीत सहप्रवासी होतो. हे आपणास आठवत असेल अशी आशा आहे. त्यावेळी आपल्यात बऱ्याच विषयांवर चर्चा झाली होती आणि देश व समाज या विषयांवरच्या आपल्या मतांनी माझ्या मनात तेव्हापासून घर केलेलं आहे. देशउभारणीच्या दृष्टीनं अशीच एक विज्ञान संशोधन संस्था उभारण्याचा माझा मानस आहे. त्याबाबत आपल्या कानावर कदाचित काही आलंच असेल. मला खात्री आहे, भारताच्या प्रेरणांना चांगली वाट काढून द्यायची असेल तर साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धर्मपुरुषांसाठी मठ, धर्मशाळा वगरेपेक्षा विज्ञान रुजेल, त्याचा प्रसार होईल असं काही करणं मला महत्त्वाचं वाटतं. अशा काही कामात तितक्याच कोणा ध्येयवादी व्यक्तीनं झोकून दिल्यास कामाची परिणामकारकता वाढेल आणि देशाचं नावही गौरवानं घेतलं जाईल. विवेकानंदांइतकी योग्य व्यक्ती कोण आहे आता? तुमचे याबाबतचे विचार जरूर कळवावेत. तुम्ही एखादं पत्रक जरी काढलंत या प्रश्नावर, तरी त्याचा वातावरणनिर्मितीसाठी मोठाच उपयोग होईल. मी त्याचा सगळा खर्च उचलायला तयार आहे..
तुमचा विश्वासू..
जे. एन. टाटा
टाटा आणि विवेकानंद यांच्यात एक अदृश्य बंध तयार झाला होता १८९३ साली! टाटा त्यावेळी जपानहून अमेरिकेतील शिकागो इथं औद्योगिक प्रदर्शनासाठी निघाले होते आणि विवेकानंद निघाले होते जागतिक धर्मसंसदेसाठी! अमृतयोग असा, की ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ या बोटीवर दोघेही एकाच वेळी होते. दोघांनाही मुबलक वेळ होता आणि दोघांनीही त्याचं चीज केलं. पुढच्या आयुष्यात दोघांचाही एकमेकांवर प्रभाव राहिला. स्वामी विवेकानंदांना जमशेटजींच्या कार्याचं महत्त्व मनापासून जाणवलं होतं आणि या उद्योगमहर्षीस विवेकानंदांची महती मोहवत होती. टाटांना आता नव्या स्वप्नासाठी विवेकानंदांची साथ हवी होती.
लॉर्ड कर्झनच्या विरोधाला न जुमानता पार टोकाची भूमिका घेऊन न्या. महादेव गोिवद रानडे, छबिलदास लल्लूभाई अशा विचारवंत, धनवंतांची मदत घेऊन, तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड हॅमिल्टन यांचा दबाव लॉर्ड कर्झनवर आणून आणि प्रसंगी त्यासाठी तातडीने स्वत:चे मृत्युपत्र करून त्यात या संस्थेच्या उभारणीची भविष्यातील तरतूद जमशेटजींनी केली. मृत्युपत्रात त्यांनी असे लिहून ठेवले की, ‘‘मी आहे तोपर्यंत हे केंद्र उभे राहिले नाही तर त्यासाठी माझ्या पश्चात माझ्या संपत्तीतून त्यासाठी मदत दिली जाईल.’’ पुढे मदतीचा हात मिळत गेला आणि म्हैसूर संस्थाननेही या संस्थेच्या मदतनिधीसाठी सढळ मदत केली. या संस्थेचे नाव होते- ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’! पण ही संस्था उभी राहिलेली पाहणे मात्र जमशेटजींच्या नशिबी नव्हते. जर्मनीच्या दौऱ्यावर असताना नोहाईम इथे त्यांचे निधन झाले. ‘टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’- म्हणजे पूर्वाश्रमीची ‘टिस्को’ व आताची ‘टाटा स्टील’ आणि ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ ही दोन्ही स्वप्नं दुर्दैवाने त्यांच्या डोळ्यादेखत पूर्ण झाली नाहीत. याचं कारण जमशेटजींच्या स्वप्नं आणि त्यांची व्याप्ती इतकी भव्य होती, की ती पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या कोणाला दहा जन्म घ्यावे लागले असते. जमशेटजींनी एका जन्मात जी काही स्वप्नं पेरली, त्यावर भारत नावाच्या पुढे स्वतंत्र झालेल्या देशाला आपल्या पायांवर उभं राहण्याचं औद्योगिक बळ मिळालं. टाटांचं ‘ताजमहाल’ जेव्हा सुरू झालं त्यावेळी ते इंग्रजांना म्हणाले होते, ‘‘या हॉटेलची मालकी स्वत:कडे ठेवण्यात मला काडीचाही रस नाही. मला इच्छा आहे ती आमच्या देशात असं काही करता येतं, हे दाखवण्याची. इतरांनी पाहून त्यापासून प्रेरणा घ्यावी, याची.’’ इंडियन हॉटेल्स लि. या कंपनीच्या ताजमहाल हॉटेलची स्वप्नवत जन्मकथा पुस्तकातून वाचण्याजोगी आहे.
जमशेटजींनी घातलेल्या भक्कम पायावर त्यांच्या वारसांनी टाटा उद्योगसमूह पुढे वाढवत नेला. अनेक उद्योग सुरू केले. ते भरभराटीला आणले. कापड गिरण्या (एम्प्रेस मिल्स, टाटा टेक्स्टाइल), वीजनिर्मिती (टाटा पॉवर), पोलाद (टिस्को- आता ‘टाटा स्टील’), विमान वाहतूक (एअर इंडिया), अवजड वाहनेनिर्मिती, रेल्वे-रूळ व डबे (टेल्को- आता ‘टाटा मोटर्स’), इंडियन हॉटेल्स (ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स), हाफकिन इन्स्टिटय़ूट (लस-संवर्धन), टाटा समाजविज्ञान संस्था (समाजकार्य), टाटा प्रेस (मुद्रण व प्रकाशन), तनिष्क (सोने, दागिने), एनसीपीए (सांस्कृतिक कार्य), टाटा स्वच्छ (शुद्ध पाणी व्यवस्था), टाटा ग्लोबल बेव्हरेजेस (पाणी, पेये), टाटा स्काय (टेलीव्हिजन सिग्नल वितरण यंत्रणा), ट्रेंट (व्यापारउदीम), टाटा हाऊसिंग (घरबांधणी), टायटन (घडय़ाळे), टॉम्को (साबण, श्ॉम्पू), नेल्को (रेडिओ), लॅक्मे (सौंदर्यप्रसाधने), एसीसी (सीमेंट), चहा उद्योग (टाटा टी), मीठ (टाटा सॉल्ट), कॉस्टिक सोडा (टाटा केमिकल्स), कीटकनाशके (रॅलीज), मोबाइल फोन (डोकोमो), सॉफ्टवेअर (टी. ई. सी.), इंटरनेट (हाय टेलीकम्युनिकेशन), तयार कपडे (वेस्टसाइड), इलेक्ट्रॉनिक्स (क्रोमा), कॉफी शॉप्स (स्टारबक्स) अशा आणि अनेक यशस्वी कंपन्या टाटा समूहाने जगाला दिल्या. आस्रेलर ही इंग्लंडमधील सर्वात अधिक कर्मचारी असणारी महाकाय पोलाद कंपनी, आलिशान जग्वार आणि लँडरोव्हर या वाहनांचे ब्रँड्स आणि कारखाने असे काही नामांकित परदेशी उद्योगही आज टाटा उद्योगसमूहाच्या ताब्यात आहेत.
रतन टाटा यांनी टाटा समूहात सहसा न घडणारी अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये अत्युच्च पदांवर आणले. आधीचे मूळगावकर, केरकर, पेंडसे असे काही सन्मान्य अपवाद जरूर होते; पण रतन टाटांनी ते अधिक विस्तारले. जे. आर. डी. टाटांच्या अति सज्जनपणाचा फायदा घेत वर्षांनुवष्रे कंपनी ही आपली जहागिरी बनवून आपल्याच सग्यासोयऱ्यांबरोबर मनमानी करणारे, कितीही वय वाढले तरी निवृत्त न होणारे टाटा समूहातील मठाधिपती त्यांनी घरी पाठवले. निवृत्तीचे वय ७५ वष्रे निश्चित केले. यात टिस्कोचे रूसी मोदी, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ असे सामथ्र्यवान दिग्गज होते. रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यांतून नवे रक्त आणले आणि लंगडणाऱ्या कंपन्या भरभराटीने धावू लागल्या. रतन टाटांनी आपणच केलेला नियम काटेकोरपणे पाळला. आपल्या हयातीतच आपला वारस व्यवस्थित रीतीने निवडला आणि स्वत:ही ७५ व्या वर्षी निवृत्त झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये जाणेही बंद केले.
गिरीश कुबेरांना टाटा कंपन्यांविषयी अगदी बालपणापासून कुतूहल होते. याविषयी ते लिहितात, ‘‘लहानपणी माझे एक आजोबा (आईचे मामा) कै. सदाशिव प्रभुणे यांच्यामुळे टाटा मंडळींच्या कथा कानावर यायच्या. हे आजोबा टाटा केमिकल्समध्ये मोठय़ा हुद्दय़ावर होते. अगदी थेट त्या कंपनीचे संस्थापक दरबारी सेठ वगरेंच्या बठकीतले. राहायला सौराष्ट्रातल्या मिठापूर या टाटा केमिकल्स कंपनीच्या गावी. त्यांची माझी गाठ तशी वर्षांतून एक-दोनदाच पडायची. मे महिन्यात आजोळी नातेवाईकांच्या मेळाव्यात किंवा असेच कधी मधे आले तर. पण मधे मधे कोणी ना कोणी नातेवाईक मिठापूरला जाऊन आलेला असायचा. मग त्याच्या तोंडून आजोबांच्या थाटामाटाचं वर्णन कानावर यायचं. त्यांचा दहा-बारा खोल्यांचा बंगला. नोकरचाकर. कार्यालयातनं यायला-जायला गाडी आणि आजोबांच्या नावामुळे त्या गावात आणि शेजारच्या द्वारकेतही आमच्या नातेवाईकांची होणारी सरबराई याच्या रसाळ कथा ऐकायला मिळत. आजोबा जेव्हा येत तेव्हा त्यांच्या तोंडून मिठापूरची कारखाना उभारणी, सेठ यांची बुद्धिमत्ता, मिठापूरला आले तर किंवा आजोबा मुंबईत बॉम्बे हाऊसमध्ये गेल्यावर जेआरडी कसे वागतात- असं सारं ऐकायला मिळे. त्यात जाणवायचं हे की, आजोबा जेआरडींच्या ज्या साधेपणाविषयी बोलायचे, तसाच साधेपणा आजोबांच्या वागण्यातही दिसायचा. नोकरीत असताना सस्पेंडर वगरे घालून झोकात राहणारे आजोबा निवृत्तीनंतर एकदम भगव्या पायघोळ कफनीत गेले. लांबलचक दाढी. भगवी कफनी. संध्याकाळ असेल तर हातात व्हिस्कीचा ग्लास आणि गप्पा टाटा समूहातल्या.. ते दृश्य अजूनही डोळ्यांसमोर येतं. टाटा म्हणजे काय आणि किती, हे माहीत असायचं ते वय नव्हतं. त्यावेळी आमच्या वयाच्या नजरेतनं सर्वात श्रीमंत म्हणजे हे आजोबा. त्यामुळे एक झालं, श्रीमंतीविषयीच्या मध्यमवर्गीय गरसमजांची पुटं मनावर कधी चढली नाहीत. आणि मग मोठं होताना टाटा समूहातली कोणती ना कोणती कंपनी वेगवेगळ्या कारणांनी भेटत राहिली.’’
लेखकाच्या आजोबांच्या अशा वेगळ्या पद्धतीच्या वागण्यातून टाटांची संपत्तीनिर्मितीतील सात्त्विकता आयुष्यभर टाटांकडे अधिकारपद भूषविलेल्या त्यांच्या आजोबांच्या व्यक्तिगत आयुष्यात थेट उतरलेली दिसत होती. ती लेखकाच्या कोवळ्या बालमनावर खोलवर ठसली आणि बहुधा त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती घडली आहे, हे जाणवते. सर दोराबजी टाटा, सर रतनजी टाटा, जे. आर. डी. टाटा, नवल टाटा आणि रतन टाटा या टाटा उद्योगसमूहातील महत्त्वाच्या व्यक्तींविषयी खूप महत्त्वाची माहिती या पुस्तकात ओघाने वाचावयास मिळते. सुभाषचंद्र बोसांपासून (टिस्को, जमशेदपूर) ते जॉर्ज फर्नाडिसांपर्यंतचे अनेक युनियन नेते टाटा समूहात कामगारांच्या वतीने लक्ष घालत होते. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच मोरारजींपासून शरद पवारांपर्यंत बडे नेते टाटा या भारताच्या औद्यौगिक स्वप्नात सामील झालेले दिसतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे टाटा समूहाची देश आणि समाजासाठी हृदयाच्या तळापासून सर्व प्रकारची मदत करण्याची आस्था हे होय. नुसता देणगीचा चेक फाडला आणि विषय संपला असे टाटांबद्दल कधी घडले नाही. आश्रय दिलेल्या संस्थेच्या उभारणीपासून पुढे ढवळाढवळ न करता ती संस्था कशी सुस्थितीत कार्यरत राहील हे वेळोवेळी आपुलकीने पाहणे, ही टाटा समूहाची खासियत राहिली आहे.
स्वत:च्या कंपनीच्या भागभांडवलात अगदी कमी भांडवल- म्हणजे तीन ते पाच टक्क्यांइतके नाममात्र ठेवून कंपनीचे व्यवस्थापन आपल्या हातात ठेवणे हे फक्त टाटांनाच जमले, ते त्यांच्या नि:स्वार्थी, समाजाभिमुख, दानशूर आणि निरलस प्रतिमेमुळे होय. संपत्तीनिर्मितीतील सात्त्विकता हेच खरे टाटांचे भांडवल राहिले आहे. तुकोबांच्या अभंगाप्रमाणे ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी।’ हे टाटांचे ब्रीदवाक्य आहे.
पुस्तकाच्या शेवटी रतन टाटा यांची विस्तृत मुलाखत उद्धृत केलेली आहे. मुलाखतीच्या सुरुवातीला कुबेर म्हणतात, ‘‘टाटा आडनावाच्या कोणाशी तरी गप्पा मारायला मिळाव्यात, ही कळायला लागल्यापासूनची इच्छा होती. त्यांच्यातलं टाटापण समजून घ्यायचं होतं. पिढय़ान् पिढय़ा ही माणसं इतकं काय काय कसं काय करत राहतात, हा प्रश्न होता. आसपास मराठी उद्योग-घराण्यांची कलेवरं मुबलक दिसत असताना हा असा कोणता गुण आहे, की जो टाटापण पिढय़ान् पिढय़ा जिवंत ठेवतो, हा मुद्दा सतावत होता.’’
ते पुढे म्हणतात, ‘‘मराठी रक्तातली उद्यमशीलता तीन पिढय़ांत साधारण संपते. पहिली पिढी कष्ट करून उद्योग स्थापते.. म्हणजे शाईच्या पुडय़ा तयार करते, नांगर बनवते किंवा दंतमंजन वगरे बनवून काही ना काही करू पाहते. दुसरी वडलांच्या या कुटीरोद्योगाचं उद्योगात रूपांतर करते, तो वाढवते. आणि वाटू लागतं, चला- मराठीतही उद्योगघराणं जन्माला आलं. पण नंतरची पिढी मात्र वाडवडलांचं संचित फुंकून खाण्याचं पुण्यकर्म करते. चौथ्या पिढीच्या आसपास जे काही असतं ते गाळात गेलेलं असतं. हा आपला जागृत इतिहास आहे. एखाद् दुसरा अपवाद.
मग या टाटांनाच हे असं कसं जमतं? आपल्यासारख्या संपत्तीनिर्मितीला शून्य महत्त्व देणाऱ्या देशात हे टाटापण कसं फुलतं? कसं बहरतं? – हे पुस्तकात जरूर वाचा!
टाटांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते जातिवंत उद्योगपती आहेत. त्यांचं लक्ष गल्ल्याकडे नसतं. आपल्याकडे असं गल्ल्यावर लक्ष ठेवून बेरजा-वजाबाक्या करणाऱ्यांतून उद्योगपती झाले नाहीत असं नाही. पण त्यांची स्वप्नं फारच लहान. कारण ते मुळात व्यापारी आहेत. गल्ल्यावर नजर ठेवणारे फार लांब जाऊ शकत नाहीत. टाटांचं तसं नाही. असं का? – हे पुस्तकात वाचायला हवं.
कोणा एका.. बहुधा बंगाली लेखकानं म्हणून ठेवलंय, की ‘देशात खरं शहर फक्त मुंबईच. बाकीची शहरं म्हणजे विस्तारलेली खेडी.’ त्या धर्तीवर असं म्हणता येईल, की देशात खरे उद्योगपती टाटाच. बाकीचे जवळपास सर्व विस्तारित व्यापारीच. तेव्हा एका तरी टाटाला हे असं जवळून पाहावं, त्यांच्याशी बोलावं, ही फार दिवसांची इच्छा होती..’’ असं कुबेर म्हणतात.
कुबेरांची मुलाखतीची इच्छा पूर्ण झाली. त्यांना जशी रतन टाटांनी विस्तृत मुलाखत दिली तशी दुसऱ्या कोणाला मिळाली असेल असे वाटत नाही. रतन टाटांचा उल्लेख ‘उपभोगशून्य स्वामी’ असा ते आदराने करतात. ४३६ पृष्ठांच्या या पुस्तकात भारतीय समाजकारण, औद्योगिकीकरण, राजकारण, समाजसेवा, आधुनिकता, सेवावृत्ती यांचा घेतलेला आढावा वाचनीय आहे. पुस्तक हाती घेतल्यावर ते पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही.
पुस्तकाच्या मनोगतात शेवटी कुबेर विनयाने म्हणतात, ‘‘या पुस्तकाचंही तेच. ‘टाटा’ या नावाचं कर्तृत्व कोणाही लेखकाच्या कृतीपेक्षा दशांगुळं वर राहील यात तीळमात्रही शंका नाही. या पुस्तकात समग्र टाटा आहे असा माझा दावा नाही. परंतु त्या लोभस टाटापणाचा किमान परिचय तरी या पुस्तकातून व्हावा असा प्रयत्न मात्र मी नक्की आणि नेकीनं केला आहे. वाचकांना तो भावला तर त्यामागची संपूर्ण पुण्याई ‘टाटा’ या नावाची आहे, हे मी अर्थातच जाणतो. या पुस्तकाच्या निमित्तानं वाचकांच्या टाटानंदात सहभागी होता आलं तर त्या आनंदाचा वाहक ठरल्याचं समाधान मला नक्कीच असेल. त्या जोडीला या पुस्तकामुळे संपत्तीनिर्मितीतील सात्त्विकताही वाचकांपर्यंत पोहोचली तर ते अधिक समाधान देणारं असेल. त्यात कमी पडलो असेन तर ते अपश्रेय आणि न्यून अर्थातच माझं.’’
‘टाटायन’ प्रसिद्ध झाल्यावर सहा महिन्यांतच पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या, यात श्रेय कुणाचे, याचे उत्तर मिळते.

टीप : १९७१ साली झालेली लोकसभेची निवडणूक नवल टाटा यांनी मुंबईतून लढवली होती. जॉर्ज फर्नाडिस आणि नवल टाटा अशी समोरासमोर लढत असताना डॉ. कैलास हे इंदिरा काँग्रेसचे कोणालाही ठाऊक नसलेले उमेदवार आश्चर्यकारकरीत्या निवडून आले होते. त्यावेळी त्या अटीतटीच्या निवडणुकीविषयी रतन टाटा म्हणतात, ‘‘आणि त्यातही आश्चर्य म्हणजे नवल टाटांच्या मागं कोण? तर नुकत्याच स्थापन झालेल्या नव्या संघटनेचे- शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे. त्यावेळी त्यांचा ‘िहदुहृदयसम्राट’ व्हायचा होता. नवल टाटा यांना मदत करणाऱ्यांच्या फळीत आणखी एक होते. जयंतराव साळगावकर. नवल टाटा यांचा भविष्यावर विश्वास होता की नाही, माहीत नाही; पण त्यांना ज्योतिष आवडायचं, हे नक्की. त्यामुळे त्यांच्या खिशात पंचांग असायचं. या पंचांग मुद्दय़ावर त्यांचा आणि जयंतरावांचा संबंध आला असावा. हे असं विचित्र वाटेल असं समीकरण का आणि कसं तयार झालं, त्या सगळ्याबाबत तितकीशी माहिती उपलब्ध नाही. पण हे झालं होतं खरं.’’ (पृष्ठ- २०३)
‘टाटायन’- गिरीश कुबेर, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ४३६, किंमत- ४०० रुपये. 
(प्रस्तुत समीक्षकाच्या कुटुंबाच्या कालनिर्णय उद्योग उभारणीसाठी सुरुवातीच्या संघर्षकाळात नवल टाटांनी जी मदत केली ती कधीच विसरता येणार नाही. अशा आमच्यासारख्या किती लोकांच्या हृदयाला टाटा कुटुंबीयांनी स्पर्श केला असेल याची गणती नाही.)

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nanaji Deshmukh Panchayat Samiti tops state for Tiroda Panchayat Samiti Sustainable Development Award 2024
नानाजी देशमुख राष्ट्रीय पंचायतराज पुरस्काराने तिरोडा पंचायत समिती सन्मानित
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

– जयराज साळगावकर
jayraj3june@gmail.com

 

Story img Loader