‘मल्ल ध्यरात्रीनंतरचे तास’ हा तमिळ लेखिका-कवयित्री सलमा यांच्या कादंबरीचा मराठी अनुवाद आहे. विविध भारतीय भाषांमध्ये लेखन करणाऱ्या स्त्रियांच्या साहित्याची ‘भारतीय लेखिका’ ही मालिका ‘मनोविकास प्रकाशना’ने प्रसिद्ध केली आहे. याच मालिकेतलं हे पुस्तक आहे.
वातावरण, आशय, मांडणी अशा सगळ्याच अंगांनी विचार करता ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ही वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे. एकविसाव्या शतकातही भारतीय मुस्लीम कुटुंबात काटेकोरपणे पाळली जाणारी पारंपरिकता, पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवर असलेली बेसुमार बंधनं, त्यामुळे त्यांची होणारी घुसमट, त्यांच्या अपूर्ण वासना, त्यांची स्वप्नं, त्यांची असोशी, त्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी, नोकरीधंद्याच्या निमित्तानं बाहेर पडणाऱ्या पुरुषांच्या अनुपस्थितीतलं आणि तरीही त्यांच्याशीच बांधलं गेलेलं त्यांचं जगणं आणि आपापल्या परीनं या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यांचे विद्रोह आणि त्यांनी परस्परांना दिलेली बदलाची हाक या सगळ्याचं चित्रण सलमा यांनी कादंबरीत फार प्रवाहीपणे केलं आहे.
मुळात सलमा या स्वत:ही पारंपरिक मुस्लीम कुटुंबात वाढल्या. तामिळनाडूमधल्या तिरुचिरापल्ली या जिल्ह्य़ाजवळच्या एका लहानशा खेडय़ातला त्यांचा जन्म. शिक्षण फक्त नववीपर्यंतच. मुलींना चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहायची परवानगी नसताना मत्रिणींसोबत जाऊन सिनेमा पाहिल्यामुळे घरच्यांनी शाळा बंद केली आणि पुढची नऊ र्वष त्यांनी स्वत:च्याच घरात तुरुंगवास भोगला. बळजबरीनं सोसाव्या लागलेल्या या एकांतवासात त्यांच्या मनाचा जो कोंडमारा झाला, त्याला त्यांनी कवितेद्वारा वाट करून दिली. वयाच्या तेराव्या वर्षांपासून त्या कविता करताहेत. आई-वडिलांनी त्यांच्या या अभिव्यक्तीला आक्षेप घेतला नाही, तरी मुस्लीम समाजाला त्यांचं हे पुढारलेपण मान्य नव्हतंच. अश्लील आणि बीभत्स लेखन केल्याचा आरोपही त्यांच्यावर या समाजानं केला. पुढे लग्नाच्या वेळीही टोपणनावानंच लेखन करायचं या अटीवर सासरच्या लोकांनी त्यांच्या लेखनाला परवानगी दिली.
अत्यंत संवेदनशील मनानं वयात येण्याच्या टप्प्यावर सलमा यांनी अनुभवलेलं असं एकाकीपण, शेकडो-हजारो कोस दूर असलेलं स्वातंत्र्य, त्यांच्या आकांक्षा, त्या वयात तीव्रतेनं उफाळून येणाऱ्या शारीर ऊर्मी, यांचं प्रतििबब त्यांच्या या कादंबरीतही पडलं आहे. वरवर पाहता ही राबिया या वयात येऊ लागलेल्या लहान मुलीची कथा आहे. पण ही केवळ राबियाची कथा नाहीच. तिची आई, आजी, मावशी, काकू, चुलत बहीण, मत्रिणी, शेजारणी अशा अनेक बायकांचं जगणं ओवून घेणारी ही कथा आहे. राबियाच्या छोटय़ा-मोठय़ा इच्छा, तिची स्वप्नं रंगवतानाच तिचा सगळा परिवार, तिचे नातेवाईक, त्यांची सुखं-दु:खं, त्यांचे सण-उत्सव, तिची शाळा, तिच्या मत्रिणी-मित्र, एका मित्राविषयी तिला वाटणारं आकर्षण या सगळ्याचं चित्रण सलमा यांनी अशा पद्धतीनं केलं आहे, की कॅलिडिओस्कोप पाहताना भान हरपावं तसा वाचक गुंगून जातो.
एक ठळक व्यक्तिरेखा, तिच्या आयुष्यातली एखादी मोठी घटना आणि त्या अनुषंगानं इतर उपकथानकं अशी या कादंबरीची रचना नाही. राबिया ही नायिका असली तरी ती इतर व्यक्तिरेखांपेक्षा भिन्न नाही. तिच्या आशाआकांक्षाही जगावेगळ्या नाहीत. डोंगर चढता येणं, सायकल शिकता येणं एवढय़ा साध्या तिच्या इच्छा आहेत. बंड पुकारण्याचा तिचा स्वभाव नाही, पण ती स्वत:ला आणि भवतालाला, भोवतालच्या माणसांना आतल्या नजरेनं निरखते आहे. आपल्या कुवतीनुसार जगण्याचा अर्थ लावू बघते आहे आणि बंडाचा झेंडा हातात न घेताही जगणं थोडं थोडं बदलू पाहणाऱ्या बायकांच्या ताकदीचा अदमास घेते आहे. त्यामुळेच ही कादंबरी म्हणजे राबियाचं बोट पकडून दाखविलेला राबियासह रहिमा, जोहरा, फिरदौस, वहिदा, अमीना, सबिया अशा अनेक स्त्रियांच्या रोजच्या जगण्याचा हा कॅलिडिओस्कोप आहे. कडक र्निबधांखाली दडपली गेलेली स्त्रियांची आयुष्यं, विधवा आणि घटस्फोटित बायकांचं अपमानित जगणं, पुरुषांच्या कामवासनो, इच्छेविरुद्ध पूर्ण करण्याच्या सक्तीचा तिटकारा, लैंगिक भूक न भागल्यामुळे जाणवणारी अतृप्तता, असे अनेक करडे धागे या कादंबरीत आहेत. तरीही भाषेचा प्रवाहीपणा, त्यातली सहजता, व्यक्तिगत अनुभवांची बठक असल्यामुळे शब्दांना लाभलेली निर्लेप प्रांजळता, एखादं निसर्गदृश्य पाहून चित्रकारानं सहज कुंचला फिरवावा तसं कोणताही अभिनिवेश न बाळगता, वास्तव आहे तसंच मांडण्याची हातोटी, या लेखनगुणांमुळे मुस्लीम स्त्रियांचं उंबऱ्याच्या आतलं विश्वही काळ्या-पांढऱ्या उदास रंगांऐवजी लोलकासारखं अनेक लोभस रंगांत वाचकापुढे उलगडत जातं.
सलमा यांच्या लेखणीचं वैशिष्टय़ हे की ती धीट आहे, पण धारदार नाही. ती स्पष्ट-पारदर्शी आहे, पण ती वासनांमध्ये गुरफटलेली, अश्लील नाही. ती संवेदनशील आहे, पण ती भावनांचे अतिरेकी उमाळे व्यक्त करणारी नाही. स्वत:च्या अनुभवांची सोबत असली तरी मुस्लीम समाजातल्या स्त्रियांच्या आणि स्वातंत्र्याला मुकलेल्या इतर अनेक स्त्रियांच्या जगण्याची फार उत्कट जाणीव सलमा यांच्या या कादंबरीत उमटली आहे.
सोनाली नवांगुळ यांनी मराठी अनुवाद करताना सलमा यांच्या मूळ लेखनाची नस चांगली पकडली आहे. इंग्रजीवरून अनुवाद करतानाही सलमा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि लेखनशैलीचा गाभा त्यांना नेमका सापडला आहे, असं कादंबरी वाचताना वाटतं. कणभरही कृत्रिमता येऊ न देता भाषेतला प्रवाहीपणा त्यांनी कायम राखला आहे. सलमा यांचा अल्प परिचय आणि त्यांच्या दोन लहानशा मुलाखतीही पुस्तकाच्या प्रारंभी आहेत. त्यांच्या लेखन प्रेरणा, त्यांची आजवरची वाटचाल, त्यांची माहेर आणि सासरची कौटुंबिक पाश्र्वभूमी, सामाजिक-राजकीय क्षेत्रातलं त्यांचं काम, त्यांनी सोसलेला विरोध, त्यांना मिळालेलं यश आणि त्यांची स्वच्छ, साधी जीवनदृष्टी या सगळ्याची कल्पना यावरून येते.
भारतीय स्त्रियांच्या लेखनप्रवाहात लक्षणीय भर टाकणारं आणि स्त्रीमुक्तीविषयक रूढ लेखनापलीकडे जाणारं पुस्तक म्हणून सलमा यांच्या या पुस्तकाची नोंद घ्यायला हवी.

‘मध्यरात्रीनंतरचे तास’
मूळ लेखिका- सलमा
मराठी अनुवाद- सोनाली नवांगुळ
मनोविकास प्रकाशन, पुणे.
पृष्ठे- ५६१, मूल्य – ५५० रुपये.
वर्षां गजेंद्रगडकर