महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतले व्यासंगी संपादक गोविंदराव तळवलकर हे अभिजनवादी होते की नव्हते,  या चर्चेपल्याड एक व्यक्ती म्हणून.. एक रसीलं,  रसिक आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून ते फारच थोडय़ांच्या वाटय़ाला आले. त्यांच्या चिरपरिचित प्रतिमेपलीकडचे तळवलकर नेमके कसे होते, याची खुमासदार ओळख करून देणारे लेख..

अग्रलेखाबाहेरचे गोविंदराव अनुभवणं म्हणजे निव्वळ, नितळ आनंद. आणि त्या आनंदातलं शिकणं. पत्रकारितेत काही काळ गोव्यात होतो तेव्हा हा आनंद गवसला. आणि नंतर गोविंदरावांच्या निधनापर्यंत तो झिरपत राहिला. आता प्रश्न पडतो- अग्रलेखातले गोविंदराव अधिक विलोभनीय होते की प्रत्यक्षातले? निवडणं कठीण आहे.

kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
CM Devendra Fadnavis and Pankaj Bhoyar will visit Datta Meghes residence in Khamla
असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…
Chief Minister Devendra Fadnavis announces that Naxalism will be contained within three years Nagpur news
नक्षलवाद तीन वर्षांत आटोक्यात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण
Pune Municipal Corporation takes action after stray dog ​​attack
भटक्या श्वानांच्या हल्ल्यानंतर महापालिकेने उचलले हे पाऊल!
MPSC State Services Exam 2023, MPSC State Services Exam 2023 Result, MPSC Result Process ,
‘एमपीएससी’चा ढीसाळपणा : निकालाच्या तीन महिन्यांपासून संपूर्ण प्रक्रिया रखडली…
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?

गोव्यात गेल्यानंतर काही महिन्यांनीच गोविंदराव तिकडे येणार होते. आदल्या दिवशी फोन आला.. उद्या सकाळी हॉटेलात भेटा. सकाळी साडेअकराला मांडवीत पोहोचलो. तळवलकर खोलीत स्थिरावलेले होते. फिकट गुलाबी रंगाचा कुडता, तशाच रंगाचा लेंगा. पायात सपाता. बंद गॅलरीतून मांडवी नदीचं पात्र दाखवणारी त्यांची रूम. तिथं निवांतपणे ते वाचत बसलेले. त्यांनीच खुर्ची ओढली. ‘ही माझी आवडती खोली,’ ते म्हणाले. नंतर जेव्हा जेव्हा तळवलकर आले, तेव्हा तेव्हा त्यांना मांडवीदर्शन होईल अशीच खोली मिळत गेली.

‘बसा,’ म्हणाले, ‘आज काय कार्यक्रम?’

मी म्हटलं, ‘काही खास नाही.’

‘मी तिथनं निघताना लाडांना निरोप दिलाय. आंग्ले आणि वसंतरावांनाही सांगा. रात्री इथंच बोलवा. आणि तुम्ही पण या. आठ वाजता. हरकत नाही ना?’

मी ‘हो’ म्हटलं.

लाड म्हणजे सीताकांत सोडले तर त्यावेळी बाकीचे फारसे कोणी माहीत नव्हते. गोव्यातल्या तळवलकर चाहत्या अशा समव्यावसायिकांनी तपशील पुरवला. प्रभाकर आंगले, उद्योगपती वसंतराव जोशी, गोव्यात असले तर ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’चे रामकृष्ण नायक, झालंच तर लाड हे तळवलकरांच्या गोव्यातल्या बैठकांचे खास भिडू. मग त्यांचे नंबर शोधून त्यांना निरोप दिले. आंग्ले आणि लाड पणजीतलेच. त्यांच्या घरीच जाऊन आलो.

संध्याकाळी परत मांडवीवर. गोविंदराव अंघोळ वगैरे करून इव्हिनिंग वेअरमध्ये तयार. आता ते यजमान झालेले. अगदी बारीकसारीक तपशीलही ते ठरवत होते. वाईनवालं कोणी आहे का..? जेवणात काय काय सांगावं?

त्यांच्याबरोबर माझी ही अशी पहिलीच संध्याकाळ. म्हणाले, ‘सतीशला बोलवा.’

हे एक खासच प्रकरण. मांडवीचा मॅनेजर सतीश प्रभू कामत गोविंदरावांचा खास माणूस. तोपर्यंत अनेकदा मी मांडवीत गेलेलो. सतीशही अनेकदा भेटलेला. पण मला हे नातं माहीत नव्हतं. ‘अरे.. तळवलकरबाब किते म्हंट्ता..’ सतीशची आल्या आल्या साद.

कोणी सतीशला गोविंदरावांशी अशा सलगीत बोलताना पाहिलं असतं तर त्याची नक्की दातखीळ बसली असती. तळवलकरांचा फोन जरी आला तरी त्यावेळी काहीजण उभं राहून बोलायचे. त्यामुळे त्यांच्याशी असं मोकळंढाकळं बोलणारा हॉटेलचा व्यवस्थापक पाहून नाही म्हटलं तरी मीही गरगरलोच. मग सतीशनं चौकशी केली.. नेहमीचे सगळे जमणारेत ना, वगैरे. मग म्हणाला, ‘इथं बसूच नका. मी तुम्हाला वेगळी रूम लावून देतो.’

जेवणाचं वगैरे काही मग बघावं लागलंच नाही. सगळी सूत्रं सतीशकडे. गोविंदरावांना काय आवडतं, याचा पुरेपूर तपशील त्याच्याकडे होता. अगदी सुंगटाच्या किस्मुरसकट सतीशनं सगळी व्यवस्था केलेली. छोटय़ा सुक्या प्राँझचं ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा घातलेलं किस्मुर गोविंदरावांच्या आवडीचं. त्यांना त्याचं काही नाव सांगता येईना. पण तरी सतीशनं ते बरोबर पाठवलं. वर उद्या कोणती तरी समुद्रभाजी बनवतोय, हेही सांगून गेला.

ते सगळं झाल्यावर लाडांना आणायला मी गेलो. येईपर्यंत सगळेच जमलेले. वसंतरावांनी आपल्या खास चामडय़ाच्या पाऊचमधून स्कॉचची बाटली काढली. पाठोपाठ पाइप आणि त्याची चांदीची उपकरणं. ‘तुझे आहे..’मधले काकाजी आणि रामुभय्या दाते यांचं कोकणी कॉकटेल म्हणजे वसंतराव. गोविंदराव आले की वसंतराव खास ठेवणीतला स्टॉक काढत, याचा अनुभव नंतर अनेकदा आला. हा नियम इतका कसून पाळला जात असे, की पुढे कधीतरी एकदा वसंतरावांना यायला बराच उशीर झाला म्हणून गोविंदराव, लाड आणि मी (तोपर्यंत भीड चेपली होती!) अशी सुरुवात केली होती, तर वसंतरावांनी आल्यावर गोविंदरावांच्या समोरची अख्खी बाटली- ग्लासातला द्रव पदार्थ सरळ बेसिनमध्ये ओतला आणि स्वत: आणलेली स्कॉच सगळ्यांना सव्‍‌र्ह केली होती.

तर आता गोविंदराव ग्लास भरत होते. सौ. लाडांना विचारलं : लाडांना व्हिस्की ना..? आणि त्या ‘हो’ म्हणेपर्यंत सीताकांत लाडांचा ग्लास भरला. मग मला विचारलं, ‘तुम्ही काय?’

मी म्हटलं, ‘काही नाही.’

‘असं? मग तुम्हाला गोव्यात पाठवून काय उपयोग?’ गोविंदरावांची प्रतिक्रिया.

‘अहो, तुमच्यासमोर कसं हो म्हणणार?’ सौ. लाडांची मध्यस्थी.

मग तळवलकरांनी माझाही ग्लास भरला. माझा हा पहिलाच अनुभव. म्हणजे तळवलकरांच्या पंगतीतला. पुरता बुजलेलो. त्यावेळी त्या स्कॉचचं आकर्षण जास्त (खोटं कशाला बोला?) की या समोरच्यांच्या गप्पांचं कुतूहल जास्त, असा प्रश्न पडला होता. एखादी गाण्याची बैठक ऐकावी अशा त्या गप्पा होत्या. तळवलकर नुकतेच इंग्लंडहून आलेले. त्याआधी वसंतराव तात्यासाहेबांना घेऊन इंग्लंडला जाऊन आलेले. मग एकूणच शेक्सपिअर आणि तात्यासाहेब याभोवती गप्पा फिरत राहिल्या. शेक्सपिअरच्या समाधीपुढे गेल्यावर तात्यासाहेबांना काय वाटलं, याचं साभिनय वर्णन वसंतरावांनी केलेलं अजूनही आठवतंय. बारा-साडेबारापर्यंत हे सारं चाललं. निघताना मला एकटय़ालाच कळेल असं तळवलकर म्हणाले : ‘सकाळी ११ वाजता या. आपल्याला लाडांकडे जायचंय.’

दुसऱ्या दिवशी लाडांकडे. त्यांच्याकडच्या बैठकीचा नूरच वेगळा. अगदी ठरवल्यासारखं दोघंही वेळ न घालवता थेट बालगंधर्वाच्या काळात घुसले. लाडांनी त्यांच्याकडच्या बालगंधर्वाच्या निवडक तबकडय़ा लावल्या. मग मधेच पीएलचा नाही तर मन्सुरअण्णांचा संदर्भ देत या गाण्यातल्या गमती दोघं एकमेकांना सांगत बसले.

गोविंदराव त्यानंतर अनेकदा गोव्यात आले. आणि आधीही आलेले असणार. पण लाडांकडची बालगंधर्वाची बैठक कधी चुकायची नाही.

आणखी एक संध्याकाळ अशीच लक्षात आहे. त्यावेळी गोविंदराव ‘ताज आग्वाद’मध्ये उतरणार होते. मला जरा आश्चर्यच वाटलं. कारण ताज जरा आडवाटेला आहे. आणि एका संध्याकाळपुरतेच ते तिथे असणार होते. लगेच मुंबईला त्यांना परतायचं होतं. त्यामुळे नेहमीची बैठक जमणार नव्हती. मलाच जरा चुकचुकल्यासारखं वाटत होतं.

त्या दिवशी ताजमध्ये त्यांना भेटायला गेलो. तिथल्या अति खास व्हीव्हीआयपी अशा लाऊंजमध्ये तळवलकर होते. नंदनवन जर खरोखरच असेल तर तिथंच असायला हवं असं वाटायला लावणारा एकंदर माहोल. कल्पनेच्याही पलीकडचं श्रीमंती वातावरण. पण ती श्रीमंती उबग आणणारी नाही. तिला खास अशी कलात्मक उंची.

त्या गप्पांचा विषय नेहमीपेक्षा वेगळा. देशाचं अर्थकारण, काँग्रेसचं औद्योगिक धोरण वगैरेंवर तळवलकर सांगत होते. समोरची ती व्यक्तीही एखाद्या तटस्थ प्राध्यापकाला ऐकावं अशा पद्धतीनं त्यांचं ऐकत होती. त्या व्यक्तीच्या वागण्यातली खानदानी अदब, अत्यंत मृदू भाषा, ऐकत राहावं असं इंग्रजी आणि हे सारं जे काही आसपास दिसतंय त्याचेच नाही, तर देशातल्या अनेक प्रचंड उद्योगांचे मालक असूनही वागण्यात कमालीचा साधेपणा..

रतन टाटा आणि गोविंदराव यांना एकत्र बघणं आणि ऐकणं हा एक अनुभव होता. आपल्या समूहातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या संचालकांसाठी दरवर्षी टाटा मान्यवरांची व्याख्यानं आयोजित करतात. आसपासच्या घटनांकडे वेगळ्या नजरेनं पाहता यायला हवं, हा यामागचा उद्देश. त्यावर्षीचं असं गेट-टुगेदर गोव्यात होतं. त्यासाठी गोविंदराव आले होते. ‘पण आमचा कार्यक्रम कुठंही असला तरी गोविंदरावांचं एक व्याख्यान ठरलेलं असतंच,’ असं टाटा म्हणाले.

याआधीही एकदा गोविंदरावांच्या कार्यालयात रतन टाटांना पाहिलेलं होतं. टेल्कोच्या पुण्यातल्या कारखान्यात तो प्रसिद्ध संप असताना टाटा एका संध्याकाळी तळवलकरांकडे आलेले होते. ते ज्या दिवशी तेथे आले होते, त्याच रात्री तो संप मोडीत निघाला होता. या योगायोगाबद्दल अनेकदा विचारल्यावर गोविंदरावांनी काय झालं याची थोडीशी कल्पना दिली होती.

आता गोविंदरावांच्या तोंडून टाटांच्या फोर्ट आग्वादची जन्मकथा ऐकायला मिळाली. गोव्यात हॉटेल उभं करायचं जेव्हा टाटांनी ठरवलं तेव्हा खुद्द लिजंडरी जेआरडींना स्वत: भाऊसाहेब बांदोडकर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. अख्खं गोवा हिंडल्यावर जेआरडी आग्वादला आल्यावर त्या जागेच्या प्रेमातच पडले. इथंच आपलं हॉटेल होणार, हा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. आणि सारे सरकारी सोपस्कार भाऊसाहेबांनी त्याच क्षणी ऑन द स्पॉट पूर्ण केले. हे सारं गोविंदरावांना एकदा भाऊसाहेबांनीच ऐकवलेलं. आता रतन टाटांच्या साक्षीनं गोविंदरावांच्या तोंडून ते ऐकायला मिळत होतं.

एका भेटीत त्यांना प्रतापसिंग राण्यांनी त्यांच्या साखळीच्या घरी बोलावलं होतं. जाऊन-येऊन चांगले तीन-चार तास गोविंदराव एकटे सापडणार होते. मी तर त्यांच्याशी काय काय बोलायचं, याचे मुद्देच जुळवून ठेवले होते. म्हटलं, संधी सोडायची नाही. त्यांचं वाचन, एकंदर पत्रकारिता वगैरे विषय नेहमीचेच होते. आज यावर काहीही बोलायचं नाही.

गोविंदरावांना माणूस म्हणून जगताना काही समस्या आल्या असतील की नाही? सुरुवातीला ते डोंबिवलीला राहायचे, तेव्हा लोकलचा प्रवास, मुली लहान असताना त्यांचं दुखणं-खुपणं, शाळा-कॉलेज प्रवेश.. झालंच तर भाजी वगैरे आणणं.. हे त्यांना कधी पाहावं लागलं का? आणि तरुण असताना आचरटपणा म्हणता येईल असं कधी गोविंदराव वागले होते का?

तर त्यावरही त्यांची उत्तरं खास अशी होती. मुलींचं आजारपण वगैरे तसं काही फारसं झाल्याचं आठवत नाही म्हणाले. पण त्या लहान असताना बरंच काही गोविंदरावांचे सासरे बघायचे. आचरटपणा सदरात मोडतील अशा त्यांच्या आठवणी विद्याधर गोखल्यांपासून सुरू व्हायच्या. ‘लोकसत्ता’त असताना ते आणि गोखलेअण्णा बरोबर असायचे. खरं म्हणजे दोघांचे स्वभाव म्हणजे दोन टोकं. अनेक गमतीजमतींना हे दोघे साक्षीदार असायचे. रात्रपाळ्या आणि त्यानंतरची जागरणं वगैरे अनेक घटना गोविंदरावांच्या तोंडून निघत गेल्या. तेव्हाचे ‘लोकसत्ता’चे संपादक ह. रा. महाजनी हे दोघांचं कॉमन टार्गेट. गोखलेअण्णा आणि गोविंदराव अशी जोडीच होती, म्हणे. विद्याधर गोखल्यांमुळे आपल्याला उत्तम, खानदानी लावणी कशी ऐकायला मिळाली, याचीही आठवण त्यांच्याकडून ऐकायला मिळाली. या आणि वेगवेगळ्या विषयांवरचं ह. रां.चं भाष्य.. हे सारं त्या दिवशी गोविंदराव बोलत गेले. सारखं वाटत होतं, हे रेकॉर्ड करायला हवं होतं.

गोव्यातली आणखी एक बैठक तर अजूनही मनात जशीच्या तशी आहे. श्री. पु. आणि सौ. श्री. पु. भागवत, रामकृष्ण नायक, मोहनदास सुखठणकर, वसंतराव, श्री. व सौ. लाड, आंग्ले असे सगळेच जमले. गोविंदराव गोव्यात आले म्हणून. ४२ ची चळवळ ते मराठी नाटय़लेखन.. असा कवेत घेता येणार नाही इतका प्रचंड परीघ होता गप्पांचा. रेकॉर्डच करायला हवं होतं ते.

पुढे मी मुंबईत परतलो आणि काही वर्षांनी गोविंदराव अमेरिकेला गेले. त्यांच्याशी आवर्जून पत्रव्यवहार करावा इतके काही आपण मोठे नाही, हे कळत होतं. त्यामुळे अदृश्य अशी एक भिंत तयार झाली त्यांच्यात आणि माझ्यात. ती तोडण्याचं श्रेय अशोक जैन यांना. ९८ साली इंग्लंड सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यानं सहा महिने लंडनमध्ये होतो. हे गोविंदरावांना जैनांनी कळवलं. त्यावर गोविंदरावांचं पत्र आलं. तीन पानी.

लंडनमध्ये मी काय काय करायला हवं, याची जंत्रीच होती त्या पत्रात. लंडन विद्यापीठातल्या पबमध्ये कोणत्या खुर्चीवर साक्षात् मार्क्‍स येऊन बसायचा, कोव्हेंट गार्डनमध्ये चार्ली चॅप्लिनचा पुतळा कुठे आहे, वॉर म्युझियम का बघायचं, कोणत्या ठिकाणी कोणतं पेय प्यायला हवं, इतकंच काय- ऑस्ट्रियन आणि अन्य वाइन्समधला फरक काय, आणि तो कसा ओळखायचा.. असं सगळं काय काय. पण त्या पत्राचं शेवटचं वाक्य

गोविंदरावांची जातकुळी दाखवून देणारं. गोविंदरावांनी पत्राचा शेवट करताना लिहिलं होतं- ‘Give My Love To London.l

अगदी अलीकडेपर्यंत त्यांच्याशी ई-मेलसंवाद सुरू होता. मध्यंतरी त्यांच्या काही माजी सहकाऱ्यांनी एका दिवाळी अंकातल्या लेखाच्या निमित्तानं मोहीमच चालवली. तो लेखही त्यांच्याच सहकाऱ्यानं लिहिलेला आणि तो एकमेकांना पाठवण्याचा रिकामटेकडा उद्योगही सहकाऱ्यांचाच. मला वाटलं, गोविंदरावांना हे फारच लागलं वगैरे असेल. त्यानंतर महिन्याभरानं मी भीत भीतच त्यांना तसं विचारलं. गोविंदरावांनी ते वाचलेलंही नव्हतं. पण त्यांना तुमच्याविरोधात कोण कोण काय काय लिहितंय, हे कोणा सुहृदानं कळवलेलं होतं. त्याविषयी छेडल्यावर गोविंदराव म्हणाले, ‘मी प्रतिक्रिया द्यावी इतक्या लायकीचे, वकुबाचे हे लोक नाहीत. आणि दुसरं म्हणजे मी आयुष्यभर एक नियम कसोशीनं पाळला. तो म्हणजे कधीही स्पष्टीकरण द्यायचं नाही. ज्यांना मी माहिती आहे, त्यांना त्याची गरज नाही. आणि ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी मी का ते द्यावं?’

हा एक मोठाच धडा. पत्रकारितेतल्या विद्यार्थिदशेत असताना दि. वि. गोखले एकदा गोविंदरावांसमोर घेऊन गेले होते. तेव्हा गोविंदराव म्हणाले होते, ‘पत्रकारितेत राहणार असाल तर एक लक्षात ठेवा. वारा वाहतोय त्याच्या विरुद्ध दिशेला नजर हवी.’

ही ८४ सालची घटना.

या ३३ वर्षांत जाणवत गेलं- हे विरुद्ध दिशेला पाहायची क्षमता असणारे कमी कमी होत चाललेत. आणि आता तर गोविंदरावही आपल्यात नाहीत..

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

(या लेखातील काही अंश २००३ मध्ये ‘ललित’च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

Story img Loader