जिनिव्हा- स्वित्र्झलड येथील‘द युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’च्या (सर्न) मुख्य इमारतीबाहेर एक भलीमोठी ब्रॉन्झची नटराजाची मूर्ती आहे. भारत सरकारने ती भेट म्हणून या संस्थेला दिली आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधून काढणारे वैज्ञानिक संशोधन ज्या ठिकाणी होते आहे अशा जागी नटराजाच्या मूर्तीचे काय काम, असा प्रश्न स्वाभाविकपणे कुणालाही पडेल. त्यामागचे कारण विशद करणारा लेख..

‘द युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’ (सर्न), जिनिव्हा, स्वित्र्झलड येथे मुख्य इमारतीच्या बाहेर एक भलीमोठी ब्रॉन्झची नटराजाची मूर्ती आहे. ती मूर्ती ताम्रयुगातील कुणा कारागिराने घडवलेली नसून आधुनिक काळातील शिल्पकारांनी कलात्मकरीतीने बनवलेली आहे. ही मूर्ती भारत सरकारकडून ‘सर्न’ला देणगी म्हणून देण्यात आली आहे. १८ जून २००४ रोजी या दोन मीटर उंचीच्या नटराजाच्या मूर्तीचे अनावरण जीनिव्हातील भारताचे राजदूत के. एम. चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भारताचे विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि डायरेक्टर जनरल ऑफ सर्न डॉ. रॉबर्ट आयमार हे उपस्थित होते. याशिवाय सर्न येथे कार्यरत असलेल्या अनेक शास्त्रज्ञांनीही तिथे उपस्थिती लावली होती.
भारताचे सर्नशी असलेले घनिष्ठ संबंध साजरे करण्यासाठी भारताकडून ही मूर्ती देणगीदाखल देण्यात आली. ही नटराजाचीच मूर्ती देणगी म्हणून देण्यामागे भारताची विशिष्ट अशी भूमिका आहे. आपल्याकडे नटराज म्हणजे शिवशंकराची नृत्यमुद्रा मानतात. भगवान शिवशंकराला नृत्य आणि एकंदर कलेची देवता म्हणूनच आपण जाणतो. सबअॅटॉमिक कणांच्या वैश्विक नृत्यासाठी शिवशंकराच्या नृत्याचा रूपक म्हणून जो वापर केला जातो, त्याचा सखोल अर्थ लक्षात घेऊन अत्यंत विचारपूर्वक ही देणगी भारत सरकारने दिली आहे. सर्नमधील पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ या कणांविषयीच संशोधन करीत आहेत.
शिवशंकराचे नृत्य आणि सबअॅटॉमिक कणांच्या नर्तनाची तुलना प्रथम केली ती फिट्झॉफ काप्रा या लेखकाने त्याच्या ‘द डान्स ऑफ शिवा : द हिंदू व्ह्यू ऑफ मॅटर इन द लाइट ऑफ मॉडर्न फिजिक्स’ या लेखात. हा लेख १९७२ साली ‘मेन करंट्स इन मॉडर्न थॉट’मध्ये प्रसिद्ध झाला होता. शिवशंकराचे वैश्विक नृत्य हा विषय नंतर काप्रा यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या ‘द टाओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना होऊन बसला. हे पुस्तक १९७५ मध्ये प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर आजतागायत त्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. आत्तापर्यंत या पुस्तकाच्या ४० आवृत्त्या निघाल्या आहेत. सर्न प्रयोगशाळेबाहेर बसवण्यात आलेल्या नटराजाच्या मूर्तीशेजारी एक विशेष फलक लावण्यात आला आहे- ज्यावर ‘द टाओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकातील शिवशंकराच्या वैश्विक नृत्याबद्दलची अवतरणे दिली आहेत. त्यावर लिहिले आहे..
‘आनंद के. कुमारस्वामी यांनी असे म्हटले आहे की, नटराजाच्या तालबद्ध मूर्तीचे अद्वितीय लावण्य, आकर्षकपणा आणि शक्ती यांच्या पलीकडे जाऊन बघितल्यास देवाच्या अस्तित्वाची स्वच्छ कल्पना यातून येते, ज्याचा कुठल्याही धर्माने अथवा कलेने अभिमान बाळगावा.’
अलीकडेच फिट्झॉफ काप्रा यांनी असे मत व्यक्त केले आहे की, ‘आधुनिक पदार्थविज्ञानशास्त्राने हे दाखवून दिले आहे की, निर्मिती आणि संहाराचे चक्र फक्त ऋ तूंच्या बदलातून अथवा
जन्म-मरणाच्या चक्रातूनच व्यक्त होते असे नाही, तर निर्जीवांमध्येही तेच तत्त्व आहे..’ आणि त्यामुळे ‘आधुनिक पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांसाठी आता शिवशंकराचे नृत्य म्हणजे सबअॅटॉमिक कणांचे नृत्य आहे.’
ते असेही म्हणाले की, ‘हजारो वर्षांपूर्वी भारतीय कलाकारांनी नृत्य करणाऱ्या शिवाच्या सुंदर मूर्ती ब्रॉन्झमध्ये घडवल्या. आपल्या काळात पदार्थविज्ञान- शास्त्रज्ञांनी त्या वैश्विक नृत्याची तसबीर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्यासमोर उभी केली आहे. अशा तऱ्हेने वैश्विक नृत्याच्या रूपकामुळे प्राचीन पुराणकथा, धर्म, कला आणि आधुनिक पदार्थविज्ञानशास्त्र यांचे एकीकरण झाले आहे.’
सर्न येथील प्रयोगशाळेत ‘देवकणां’चे (गॉड्स पार्टिकल) अस्तित्व सिद्ध झाले आहे. या देवकणांच्या अस्तित्वामधूनच निर्मिती, स्थिती आणि लय यांचा स्रोत एकच आहे असा इशारा मिळत आहे. हीच बाब मोठय़ा कलात्मकरीतीने या नटराजाच्या मूर्तीतून प्रकट होते. त्यामुळे सर्नच्या मुख्यालयाबाहेर असलेल्या नटराजाच्या मूर्तीचे अस्तित्व अर्थपूर्ण ठरले आहे.
नटराजाच्या या तांडवनृत्याचा संबंध फिट्झॉफ काप्रांनी मूलकणांशी कसा लावला आहे, ते बघू या. आपल्याभोवतीचे सर्व पदार्थ आणि पर्यायाने त्यातले अणू फक्त तीन मोठय़ा कणांनी बनलेले असतात- प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. याशिवाय चौथाही कण आहे, तो म्हणजे फोटॉन. पण तो वजनरहित असून विद्युतचुंबकीय प्रारणाचे एकक आहे. यापैकी प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि फोटॉन हे स्थिर कण आहेत. म्हणजे जोपर्यंत त्यांची इतर कणांशी टक्कर होऊन त्यांचा नाश होत नाही तोपर्यंत अमर्याद काळ ते तसेच राहतील. याउलट, कथा न्यूट्रॉन कणांची आहे. त्यांचे स्वयंप्रेरणेने- कोणाशी टक्कर न होताही- तुकडे तुकडे होतात. म्हणजे ते ‘डिसइंटिग्रेट’ होतात. या डिसइंटिग्रेशनला ‘बिटा डीके’ असे म्हणतात. ही विशिष्ट प्रकारच्या अणुकिरणोत्सर्गाची (रेडिओअॅक्टिव्हीटी) एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये न्यूट्रॉनचे रूपांतर प्रोटॉनमध्ये होते. जोडीला त्यातून एका इलेक्ट्रॉनची आणि एका वजनरहित कणाची- ज्याला न्युट्रिनो म्हणतात- त्याची निर्मिती होते. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनप्रमाणेच न्युट्रिनोसुद्धा एक स्थिर कण आहे.
निसर्गत:च प्रत्येक मूलकणाचा एक प्रतिकण (अँटिपार्टिकल) असतो. ज्याचे वजन सारखेच, पण त्यावरील भार मात्र विरुद्ध असतो. इलेक्ट्रॉनचा प्रतिकण असतो पॉसिट्रॉन, तर फोटॉनचा प्रतिकण स्वत: फोटॉनच असतो. तसेच प्रोटॉनचा अँटिप्रोटॉन, न्युट्रॉनचा अँटिन्युट्रॉन आणि न्युट्रिनोचा अँटिन्युट्रिनो हे प्रतिकण असतात. बिटा डीकेमध्ये वास्तविक ‘अँटिन्युट्रिनो’च तयार होतात, ‘न्युट्रिनो’ नाही.
ज्या वेगवेगळ्या मूलकणांचा उल्लेख वर झाला आहे, ते आत्तापर्यंत माहिती असलेल्या असंख्य मूलकणांपैकी एक छोटासा भाग आहेत. बाकी सगळे मूलकण अस्थिर असून अगदी थोडय़ाच काळात डीके होतात, म्हणजे त्यांचा ऱ्हास होतो आणि त्यांचे रूपांतर दुसऱ्या कणांमध्ये होते. त्यातल्या काही कणांचा परत ऱ्हास होऊन त्यांचे अजून वेगळ्या कणांत रूपांतर होते. जोपर्यंत स्थिर कण निर्माण होत नाही तोपर्यंत असा ऱ्हास होतच राहतो.
अशा अस्थिर कणांचा अभ्यास करणे फार खर्चीक मामला आहे. ‘पार्टिकल अॅक्सिलरेटर’सारख्या उपकरणामध्ये कणांच्या मुद्दाम टक्करी घडवून आणून त्यांचा माग ‘बबल चेंबर’सारख्या उपकरणात घेतला जातो. बरेचसे अस्थिर कण हे अतिशय थोडय़ा काळासाठी अस्तित्वात येतात अणि नष्ट होतात. त्यामुळे ते बबल चेंबरसारख्या उपकरणात दिसू शकत नाहीत आणि त्यांचा मागही लागू शकत नाही. फोटॉन्स, लेप्टॉन्स, बॅरिऑन्ससारख्या काहीच कणांचे माग बबल चेंबरमध्ये लागू शकतात.
अशा प्रकारचे सर्व कण अॅक्सिलरेटरमध्ये कणांच्या टक्करी मुद्दाम घडवून आणून निर्माण केले जातात. त्यांच्या होणाऱ्या टक्करींची नोंद बबल चेंबर या उपकरणात केली जाते. आपल्याला ते रेखाकृतीसारख्या चित्रातून पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या टक्करींमध्ये अनेक कण तयार होतात आणि नष्टही होतात. अनेक गुंतागुंतीच्या घटनांच्या मालिका घडतात. टक्करींमधून पहिल्यांदा निर्माण होणारे कण बऱ्याच वेळा नष्ट होतात आणि हजारो नवीन कण त्यातून निर्माण होतात, जे पुढे जाऊन परत कोणावर तरी आपटतात किंवा नष्ट होतात. कधी कधी तर अशा असंख्य पायऱ्यांमध्ये ही घटना चालू राहते. या घटनांचे जणू रेखाचित्र आपल्याला बबल चेंबरमध्ये बघायला मिळते. अशाच एका चित्रात (ज्यांना ‘फाइनमन डायग्रॅम’ म्हणतात) निर्मिती आणि नष्ट होण्याची क्रिया कणांच्या पातळीवर स्पष्ट दिसते. कणांच्या या निर्मिती आणि लयाच्या खेळाला अनेकांनी नृत्याची उपमा दिली आहे. या घटनांमध्ये खूप ऊर्जा असलेल्या अदृश्य (बबल चेंबरमध्ये फोटॉन दिसत नाही) अशा फोटॉनचा एकाएकी स्फोट होऊन त्यातून इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन ही भार असलेल्या कणांची जोडी तयार होते. हे सरळसरळ ऊर्जेमधून पदार्थ तयार होण्याचे स्वच्छ उदाहरण आहे. अशा घटनांमध्ये सुरुवातीची ऊर्जा जेवढी जास्त, तेवढे जास्त कण तयार होतात.
या सगळ्या टक्करी मुद्दाम कृत्रिम ऊर्जा पुरवून प्रयोगशाळेत घडवून आणलेल्या आहेत; ज्यासाठी प्रचंड मोठय़ा आकाराची आणि मोठय़ा प्रमाणात ऊर्जा निर्माण करू शकणारी मशिन्स लागतात. निसर्गत: पृथ्वीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ऊर्जा मिळू शकत नाही, त्यामुळे पदार्थाची (मोठय़ा कणांची) निर्मिती होऊ शकत नाही. परंतु बाहेरच्या अवकाशात मात्र परिस्थिती वेगळी आहे. ताऱ्यांच्या अंतरंगात- जिथे प्रचंड मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा असते तिथे- ही प्रक्रिया सतत चालू असते. त्यातून निघालेल्या विद्युत चुंबकीय लहरींतून वेगवेगळ्या ऊर्जेचे फोटॉन्स बाहेर पडून ते अखंडपणे आंतरतारकीय अवकाशातून प्रवास करत असतात. तसेच ‘कॉस्मिक रेडिएशन’मधून फोटॉन्स आणि असंख्य वजनदार कणही प्रवास करत असतात. या कॉस्मिक रेडिएशनचा मूळ स्रोत अजून अज्ञात आहे.
जेव्हा भरपूर ऊर्जा असलेले कण (कॉस्मिक पार्टिकल्स) पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते वातावरणातील कणांवर आपटून त्यातून असंख्य इतर कण निर्माण करतात. ते कण पुढे अजून कण निर्माण करतात किंवा नष्ट होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत अशा तऱ्हेने एका प्रोटॉनमधून असंख्य कण निर्माण होण्याच्या घटनांची साखळी तयार होते. ऊर्जेचा एक अखंड प्रवाह अशा तऱ्हेने वातावरणातून वाहताना निर्मिती आणि नाशाचा एक लयबद्ध नृत्याविष्कार घडवत असतो. असाच एक आविष्कार सर्न येथील बबल चेंबरच्या चित्रांमधून अचानक बघायला मिळाला.
केनेथ फोर्ड नावाच्या लेखकाने त्याच्या ‘द वर्ल्ड ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स’ या पुस्तकात एका अशाच गुंतागुंतीच्या, पण खऱ्या रेखाचित्राबद्दल म्हटले आहे की, प्रत्येक प्रोटॉन कधी ना कधी हा अशी निर्मिती आणि संहाराचा नृत्याविष्कार दाखवतोच. ऊर्जेचे नृत्य किंवा निर्मिती आणि संहाराचे नृत्य असे शब्द वापरणारा फोर्ड हा एकटाच भौतिकशास्त्रज्ञ नाही. फिट्झॉॅफ काप्राच्या म्हणण्याप्रमाणे, कणांच्या विश्वातून ऊर्जेचा प्रवाह वाहतानाचे चित्र डोळ्यासमोर आल्यास कोणाच्याही मनात लय-तालयुक्त नृत्यच डोळ्यासमोर येईल. आधुनिक भौतिकशास्त्राने आपल्याला हेच शिकवले आहे की हालचाल, लय आणि ताल हे पदार्थाचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. पृथ्वीवर असो किंवा अवकाशात- पदार्थ सतत वैश्विक नृत्यात मग्न असतात.
भूगर्भशास्त्रातही याचे उदाहरण मिळते. पृथ्वीच्या इतिहासात २५ लाख वर्षांमध्ये १७ वेळा हिमयुगे येऊन गेली आहेत. त्या प्रत्येक वेळेला पृथ्वीवर निर्मिती आणि लयाची तितकीच आवर्तने होऊन गेली आहेत. आणि या निर्मिती आणि लयाचे आपण स्वत: खुद्द साक्षात उदाहरण आहोतच. आपल्या शरीरातील एलमेंटरी ट्रॅकवरचा जो म्युकसचा थर असतो तो दर तीन दिवसाला बदलतो. तसे झाले नाही तर आपल्यासाठी ते घातक असते. इथेही निर्मिती आणि लय हे चक्र चालूच असते.
फिट्झॉॅफ काप्रा म्हणतात, ‘The metaphor of the cosmic dance has found its most profound and beautiful expression in Hinduism in the image of dancing god Shiva.’ हिंदू समजानुसार, सर्वच जीवन हे एका मोठय़ा वैश्विक प्रक्रियेचा- म्हणजे निर्मिती आणि संहाराच्या तालबद्ध प्रक्रियेचा भाग असते. शिवाचे तांडव नृत्य हेच दर्शवते. म्हणजे ते केवळ वैश्विक निर्मिती आणि संहाराचेच नव्हे तर जन्म-मरणाचेही चक्र दर्शवते. या विश्वातील असंख्य सजीव आणि निर्जीव गोष्टी सतत बदलत असतात.. म्हणजेच त्या भ्रामक आहेत.
आधुनिक भौतिकशास्त्राने हेच दाखवून दिले आहे की, निर्मिती आणि संहाराचा ताल फक्त ऋ तुचक्राच्या बदलांतून किंवा जन्म-मरणाच्या फेऱ्यातूनच असतो असे नाही, तर निर्जीव वस्तूतूनही असतो. प्रत्यक्षात निर्मितीचे आणि संहाराचे नृत्य हे पदार्थाच्या अस्तित्वाचेच मूळ आहे. अणूतील प्रत्येक कण हा नुसता ऊर्जा-नृत्य करत नाही, तर तो स्वत: ऊर्जा- नृत्यच आहे.. जणू निर्मिती आणि संहाराची स्पंदनेच!
आधुनिक भौतिकशास्त्रज्ञांसाठी शिवतांडव म्हणजे मूलकणांचे नृत्य.. निर्मिती आणि संहाराचे अखंड नृत्य. पऋत़्ळीवर आणि ब्रह्मांडातही. शेकडो वर्षांपूर्वी शिल्पकारांनी ब्राँझमध्ये नृत्य करणाऱ्या शिवाच्या सुंदर मूर्ती घडवल्या- ज्या आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. आधुनिक शिल्पकारांनी- म्हणजे शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या वैश्विक नृत्याचे चित्र सर्नमध्ये आपल्यासमोर उभे केले आहे. बबल चेंबरमध्ये दिसणारे पॅटर्न- जे अखंड चाललेल्या वैश्विक नृत्याचे साक्षीदार आहेत- ते म्हणजे आपल्या डोळ्याला दिसू शकणारे शिवाच्या नृत्याचे आधुनिक तंत्राने दाखवलेले रूप होय. वैश्विक नृत्याचे रूपक हे प्राचीन पुराणकथा व धर्माच्या आधारावर तरलेली कला आणि आधुनिक विज्ञान यांचे एकीकरण आहे. खरोखरीच शास्त्रातील अतिसुंदर असे हे काव्य आहे.
लीना दामले lee.dams@gmail.com

Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Nazca lines
Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Story img Loader