‘शोध’ या गाजलेल्या थ्रिलर कादंबरीचे लेखक मुरलीधर खैरनार यांचे नुकतेच निधन झाले. राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी त्यांना लिहिलेले अनावृत पत्र..
प्रिय मुरलीधर,
फेब्रुवारीला मी तुझ्या घराच्या फाटकात तुझा हात हातात घेतला तेव्हा मी तुला जवळजवळ तीन तपांनंतर प्रत्यक्ष भेटत होतो. वयानुसार आलेला थोडा स्थूलपणा, केसांचा करडेपणा वगळता तू फार बदलला नव्हतास. तोच खर्जातला भरदार आवाज. तोच चेहऱ्यावरचा बुलंद आत्मविश्वास. अनोळखी माणसाला मग्रूर अहंमान्यता वाटावी इतकी बेदरकार नजर. मात्र, सहवासातील सलगी साधल्यावर, औपचारिकतेची बंधनं तुटल्यावर सहज समोरच्याच्या मनाचा तळठाव घेणारा साधेपणा. दुर्दम्य उत्साह आणि वाक्या-वाक्यातूनच नव्हे, तर शब्दा-शब्दांतून डोकावणारी धारदार, तीक्ष्ण बुद्धिमत्ता.
या साऱ्यात टोचत होती ती तुझ्या हातावर अडकवलेली इंट्राकॅथची सुई.. आमच्या नजरेला, आणि कदाचित तुझ्या शिरेलाही. फक्त ती सुईच जाणीव करून देत होती तुझ्या दुर्धर व्याधीची. तीच तेवढी सांगत होती, ‘अहो, या माणसाचं नुकतंच एक भलंथोरलं ऑपरेशन झालंय. ऑपरेशननंतरही तो विषसमान औषधोपचाराला नेटानं तोंड देतोय. साऱ्याला तो निश्चयानं भिडतो, धीरानं सोसतो. कधी फारच त्रासला तर कळवळतो, तडफडतो; पण पुन्हा खंबीरपणे उभा राहतो. कण्हतो थोडा; पण पुन्हा जीवनगाणं म्हणत राहतो.’ आणि सुईचं हे सांगणं सहज हातावेगळं करत तू हसतमुखानं माझा हात दाबत तुझ्या ‘ऊर्जस’ बंगल्यात आमचं स्वागत करत होतास.
तीन तपांपूर्वी आपण भेटायचो; पण बहुतेक वेळा स्पर्धक म्हणून. नाशिकचा मुरलीधर खैरनार म्हणजे सगळ्या नाटक व वक्तृत्व स्पर्धामध्ये स्पर्धकांमधला ‘डार्क हॉर्स’- द ब्लॅक स्टॅलियन. मुरलीधरला कितवं बक्षीस मिळणार, किंबहुना बक्षीस मिळणार की नाही- याची कुणाला उत्सुकता नसायची. तुला तर बहुधा त्याची फिकीरही नसायची. सर्वाना- श्रोते, प्रेक्षक, स्पर्धक, संयोजकांपासून अगदी परीक्षकांपर्यंत सर्वाना उत्कंठा असायची- आज आपल्या पोतडीतून मुरलीधर कोणती अजब जादू बाहेर काढणार? आणि तूही कधी आम्हा कुणाला निराश केलं नाहीस. दरवेळी ‘नयी सोच, नयी तालीम’ घेऊन तू काहीतरी वेगळं करायचास आणि बक्षिसं मिळालेल्या, न मिळालेल्या आमच्यासारख्या अनेकांच्या कामापेक्षा ते तुझं करणं नुसतं वेगळंच नाही, तर काहीतरी भन्नाट असायचं. रंगमंच असो वा व्यासपीठ- त्याचा तीन मितींचा अवकाश तू असा काही वळवायचास, वाकवायचास, की तो दृक्श्राव्य अनुभव चार-पाच-सहा मितींचा बनून जायचा.
आपल्या अशाच एका भेटीतला एक प्रसंग आजही माझ्या नजरेसमोर दिसतो.. कानांत घुमतो.
१९७७ ची गोष्ट. महाविद्यालयीन आयुष्यात अहमदनगर येथे होणाऱ्या शारदा करंडक स्पर्धेचं एक उंच मानाचं स्थान. आतापर्यंत कथाकथनासाठी म्हणून घेतली जाणारी ती स्पर्धा त्यावर्षीपासून एकपात्री प्रवेश स्पर्धा म्हणून घेतली जाणार होती. स्पर्धा सुरू झाली. बहुतेक स्पर्धकांनी एकांकिका, नाटय़प्रवेश, कथा अशा कथानक-नाटय़-अभिनयप्रधान सादरीकरणाची निवड केली होती. तुझं नाव पुकारलं गेलं. तू सादर केल्यास कविता. वसंत आबाजी डहाके यांच्या कविता. त्यात सर्वात शेवटी कवितेच्या ओळी सादर करत तू मंचावरील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलास. पण कसा? पहिल्या टोकाशी तू छातीवर हाताची घडी घालून ताठ उभा. मग पावला-पावलानं अन् ओळी-ओळीनं तुझी उंची कमी होत गेली. वाकलास. मग पोक काढलंस. मग कमरेत झुकलास. मग गुडघ्यावर. मग उकिडवा बसलेला. मग रांगत. आणि सरतेशेवटी लोळत भुईसपाट झालेला. प्रेक्षक सुन्न, हतबुद्ध झालेले. एका अचाट संहितेचं अफाट सादरीकरण. तुझ्या त्या प्रयोगाचं विश्लेषण करणं पाहणाऱ्यांच्या चौकटीच्या आवाक्यात बसत नव्हतं. तुझ्या त्या आविष्काराचा भार त्या चौकटीला पेलणारा नव्हता. ते आविष्करण ती चौकट नुसती मोडणारं नव्हतं; उद्ध्वस्त करणारं होतं.
महाविद्यालयीन आयुष्यात हौस म्हणून केलेल्या या गोष्टींपासून नंतर मी दूर झालो. तर तू त्यात उडी घेतलीस. बुडी मारली. रमलास. नव्या गोष्टी शोधत राहिलास. नाटक, एकांकिका, चित्रपट, टीव्ही मालिका, व्याख्यानं.. कितीतरी माध्यमं हाताळत राहिलास. नाशिकचे तुझे उपक्रम कधीमधी कानावर यायचे. गप्पांमध्ये कधीमधी तुझ्याबद्दलच्या आठवणी डोकं वर काढायच्या. पण तुझी अचानक अशी गाठ पडेल, अशा कारणांनी पडेल आणि तुझ्या तब्येतीच्या अशा वळणावर पडेल अशी कल्पनाही करणं अशक्य होतं.
आमच्या पंकज क्षेमकल्याणीनं तुझ्या ‘शोध’ची संहिता गेल्या वर्षी डिसेंबरच्या आसपास राजहंस प्रकाशनाकडे पाठवली. स्पायरल बाइंडिंग केलेली सुमारे सव्वाशे-दीडशे पानं. वरती एका अर्धवृत किंवा अर्ध-अनावृत कमनीय युवतीचं रंगीत चित्र. अगदी जेम्स हॅडली चेसच्या पुस्तकावर शोभावं असं.
संहितालेखक तू असल्याचं माहीत असल्यानं ते मुखपृष्ठ फार मनावर न घेता वाचायला सुरुवात केली आणि दीडशे पानांचं ते झपाटणं जेव्हा संपलं तेव्हा लक्षात आलं- ही अर्धीमुर्धीच संहिता आपल्यापर्यंत आलीय.
लगेचच मी पंकजकडे विचारणा केली, ‘अरे, ही तर अर्धवट संहिता आहे. बाकीच्याचं काय?’
‘अहो, खैरनारसरांचं लिखाण चालूच आहे. ‘राजहंस’ला पसंत असेल तर बाकीचंही लवकरच पूर्ण करून पाठवून देतील.’
‘राजहंसचा होकार कळव त्यांना. आणि कधी पूर्ण होईल, ते विचार.’
त्या संहितेचं मराठीतलं वेगळेपण दिलीप माजगावकरांनीही टिपलं होतं. दरम्यानच्या काळात या संहितेच्या गारुडात आणखी एकजण अडकले होते- संजय भास्कर जोशी. राजहंसतर्फे या संहितेवर संपादकीय संस्करण त्यांनी करावं, असं दिलीप माजगावकरांनी सुचवलं. राजहंसच्या संपादक मंडळानंही त्याला अनुमोदन दिलं. आणि मग आम्ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात नाशिकला तुझ्या घरी धडकलो.
‘शोध’च्या संदर्भातली ती पहिलीच बैठक. या लिखाणाच्या निमित्तानं तू केलेला अभ्यास, भटकंती, तुला आलेले अनुभव, ब्लॉगवर तू केलेल्या टिप्पण्या, त्याला मिळालेला प्रतिसाद.. सगळं आम्हाला सांगताना बैठकीची मैफल तू अशी रंगवलीस, की चार-पाच तास कसे गेले, कळलं नाही.
त्या लिखाणाबाबत संजय भास्कर तुझ्याशी बोलत होते. अन् तुझ्या तब्येतीबाबत तुझी पत्नी मृणाल अन् मित्र लोकेश शेवडे माझ्याशी बोलत होते. बोलणं काळजीचं. अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर जीवघेण्या धोक्याची किनार ल्यालेला आशावादी सूर. वेळेशी शर्यत खेळत असल्याचा संदिग्ध इशारा. गुणवत्तेशी तडजोड नको, पण तरीही पुस्तकाची निर्मिती शक्य तितकी त्वरेनं व्हावी- अशी अबोल, अस्पष्ट अपेक्षा.
तुझं बोलणं चाललं होतं-
‘हा या कथानकाचा पहिला भाग. सगळी मांडणी दोन खंडांमध्ये करायचं माझ्या मनात आहे. पहिल्या भागात ज्या व्यक्तिरेखा काहीशा अधुऱ्या, अस्पष्ट राहताहेत; त्याच दुसऱ्या भागात मध्यवर्ती बनतील. उदाहणार्थ- अभोणकर. माझ्या अभ्यासातून माझ्या मनात उभं राहिलेलं शिवाजीराजांचं जे चित्र- दूर भविष्यदर्शी नजर असलेला, त्या काळात एका पुरोगामी, प्रगतशील समाजाचं स्वप्न पाहणारा अन् ते प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा द्रष्टा राज्यकर्ता- ते चित्र दुसऱ्या भागात जास्त ठसठशीत बनेल. वाचकाच्या लक्षात येईल- खजिना हा द्रव्याचा नव्हता; खरा खजिना वेगळाच होता. खरा झगडा त्या वेगळ्या खजिन्यासाठी होता.’
दोन भागांचा विचार न करता ही कादंबरी संपूर्ण आणि स्वतंत्रपणे उभी राहील अशी लिहायची. मग नंतर काही काळानं या पाश्र्वभूमीवर दुसरी- अन् तीही संपूर्ण आणि स्वतंत्रपणे उभी राहील अशा कादंबरीचा विचार करायचा. हा निर्णय पक्का करून आम्ही तुझी रजा घेतली.
नंतर मग तू मागे वळून पाहिलंच नाहीस. संहिता पूर्ण केलीस. तुझ्या तब्येतीची हालहवाल लोकेश आणि पंकजकडून समजायची. कधी धीर यायचा, कधी सुटायचा.
‘शोध’चं मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णीकडे दिलेलं. तेही तुला जवळचे. तुझ्या तब्येतीची त्यांनाही कल्पना होतीच. ‘शोध’चा अवघा माहौल पकडणारं अफलातून कव्हर चंद्रमोहननी इतक्या कमी वेळात पूर्ण करून दिलं, की त्यांच्यासाठी तो एक उच्चांकच ठरावा. चंद्रमोहनच्या कव्हरला न्याय देणारं नेपथ्य मंचासाठी अन् कार्यक्रमासाठी उभारून तू ‘शोध’च्या प्रकाशन समारंभात चंद्रमोहनच्या कुंचल्याला एक आगळी दाद दिलीस.
सगळेच आपापल्या परीनं काळाशी शर्यत खेळत होते.
आणि ‘शोध’ प्रकाशित झाली.
‘शोध’चं वेगळेपण माहीत असल्यानं दिलीप माजगावकर अन् रेखा माजगावकर खास तुला भेटायला म्हणून पहिली प्रत घेऊन नाशिकला आले. त्यांच्याबरोबरच्या तुझ्या गप्पा, भेटीतला तुझा उत्साह, घरच्या साऱ्यांचं अगत्य, जमलेल्या सगळ्यांचा मूड.. ते सगळं चित्र पाहून वाटलं, ‘या पुस्तकानं मुरलीला अजून दहा र्वष आयुष्य बहाल केलंय.’ मलाच नाही, साऱ्यांनाच वाटलं.
‘शोध’चं लिखाण, त्यातले टप्पे, अनुभव, वेगवेगळ्या प्रतिक्रिया- साऱ्याचा तुझ्याकडे आणखी एक खजिनाच जमला होता. त्याचं एक स्वतंत्र पुस्तक करावं असंही आपलं बोलणं झालं. म्हणजे आता तुझ्यापुढे दोन लेखनप्रकल्प होते. एक- ‘शोध’च्या कथानकाच्या पाश्र्वभूमीवरची पुढची कादंबरी, आणि दोन- ‘द मेकिंग ऑफ शोध.’
आणि अगदी पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाच्या दिवशीसुद्धा तू तोच तसाच ‘मुरली’ होतास. तीनच दिवस आधी केमोथेरपीचा खूप त्रास होऊनही तो मागे टाकून ठामपणे कार्यक्रमात उभा राहिलेला. तशाच भरदार आवाजात श्रोत्यांशी प्रभावी दिलखुलास संवाद साधलेला.
आणि समारंभाला आलेले सगळे सुहृदही भारावलेले होते. या आगळ्यावेगळ्या पुस्तकामुळे आजारपणानंसुद्धा आपली पकड ढिली केली असावी.
जुलैच्या अठरा तारखेला पुस्तक प्रकाशित झालं आणि अवघ्या चार महिन्यांत त्याची दुसरी आवृत्ती आली. खरं सांगतो, मुरली, मराठीत असा भाग्ययोग दुर्मीळ. पण याला ‘भाग्ययोग’ तरी कसं म्हणू? एका अचाट कल्पनेवरचं अफाट थ्रिलर तू लिहिलंस.. तुझ्या आजवरच्या लौकिकाला साजेसंच. त्याला मराठी वाचकांनी भरभरून दाद दिली होती. ती तू मिळवणारच होतास.. खेचून आणणारच होतास.
मग फोनाफोनीतून कळत होतं- तुझा मुंबईला कार्यक्रम होता. तू अमूक ठिकाणी व्याख्यानाला गेलास. तिकडे तमक्याला भेटलास. आजारपण आता तुझ्यापासून थोडं दूरच राहतंय, लांबूनच टाळतंय, असं वाटू लागलं.
दहा नोव्हेंबरला तू फोनवर सांगितलंस, ‘पुणे मराठी ग्रंथालयाच्या कार्यक्रमासाठी सतरा तारखेला पुण्याला येतोय. तुझ्याकडेच मुक्काम टाकीन.’ म्हटलं, छान. आता निवांत भेट होईल. त्याला पुढच्या लेखनप्रकल्पाविषयी विचारू. त्यातूनच त्याला बळ मिळत जाणार.
पण तुझ्यासाठी अन् माझ्यासाठीही ती ‘सतरा नोव्हेंबर’ तारीख आलीच नाही. लोकेशचा आणि पंकजचा फोन आला फक्त : ‘मुरली- मेंदूत रक्तस्राव- अर्धागवायू- आयसीयू- व्हेंटिलेटर.’ खरं तर आपण शर्यत हरल्याचं सगळ्यांनाच कळत होतं; पण तू कदाचित नाही हरणार, अशीही वेडी आशा वाटत असावी. त्यांच्या त्या आशेसाठीच बहुदा; पण तू शुद्धीवर आलास. तुला भवतालचं भान लाभलं. आयसीयूतून बाहेर पडलास. दुसऱ्या आवृत्तीची प्रत हाताळलीस. आणि मग-
शर्यत संपली.
मुरली, शर्यत म्हटली की हार-जीत असतेच. आणि ही शर्यत तर प्रत्येकजणच पळत असतो.
मात्र, ‘शोध’ फक्त मुरलीधर खैरनारच लिहू शकतो. म्हणूनच तुला विचारतो- ‘महाराष्ट्रदेशातून जातीपातीपासूनची विषमता उच्छेदण्याचं नुसतं स्वप्न पाहणारा नव्हे, तर तशी एक भक्कम योजना बांधणारा शिवाजीराजा तुला भेटला. ती योजना पुढे रेटण्याच्या प्रयत्नांत कट-कारस्थानांचा बळी ठरलेला संभाजीराजा तुला दिसला. त्या योजनेची पिढय़ान् पिढय़ा जपणूक करणारे शिलेदार तुला ठाऊक झाले. हे सारं पाहताना एक वेगळं स्वप्नवत समाजदृश्य वाचकांना दाखवायचंही तू ठरवलंस.
हे सारं सारं
‘मुरलीधर, तू कधी रे लिहिशील?’