प्रकाशक हरिभाऊ मोटे यांच्या आत्मचरित्रावरील पत्रांचे डॉ. अंजली सोमण यांनी संपादित केलेले ‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दल’ हे पुस्तक पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील अंश..
हरिभाऊ मोटे हे मराठीतील एक ख्यातनाम प्रकाशक. धाडसी निर्णय घेऊन हरिभाऊंनी आगळीवेगळी पुस्तके प्रकाशित केली. विभावरी शिरुरकर, विश्राम बेडेकर अशा लेखकांची पुस्तके त्यांनी काढली. प्रकाशनव्यवहार आणि सिनेव्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत तन-मन-धन पणाला लावून ते जुगार खेळले. ‘सर्वमंगल क्षिप्रा’ या त्यांच्या आत्मचरित्रात ते सारे आलेले आहे. हरिभाऊंना पत्रसंग्रहाचे वेड होते. महाराष्ट्रातील मान्यवरांची पत्रे ‘विश्रब्ध शारदा’ या त्रिखंडात्मक ग्रंथात त्यांनी एकत्र करून प्रसिद्ध केली. ‘सर्वमंगल क्षिप्रा’ या आत्मचरित्रावर अनेक मान्यवरांनी पत्रे लिहिली. त्यातील हे एक पत्र-
‘क्षिप्रा’तील काही भाग प्रकाशित होण्यापूर्वी हरिभाऊंनी पु. ल. देशपांडे यांना वाचायला दिला होता. त्यांनी प्रतिक्रियात्मक उत्तर लिहिले होते. काही लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून प्रसिद्ध व्हावेत यासाठी मोटे यांनी संपादक गोविंद तळवलकर यांच्याकडे पाठविले होते. तळवलकरांनी त्यांचा अभिप्राय कळविला होता. पुढे ‘सर्वमंगल क्षिप्रा’तला काही भाग ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये क्रमश: प्रसिद्ध झाला आणि त्याने वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेतली. पुस्तकाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यांनी हरिभाऊंना प्रतिक्रिया देणारी पत्रे पाठविली. यातून आत्मचरित्राविषयी पत्रे गोळा करण्याची कल्पना हरिभाऊंच्या मनात आणखी दृढ झाली असावी.
पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर काही स्नेह्यंची, परिचितांची पुस्तकाविषयी मते मांडणारी पत्रे आपणहून आली. हरिभाऊंवरील प्रेमामुळे! तीही खूप काही सांगणारी आहेत. काहींनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेली प्रकरणे वाचून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले ‘क्षिप्रा’विषयीचे मनोगत वाचून आपले मत कळवले. काहींना व्यावसायिक कामाकरिता दुसऱ्या शहरात गेल्यानंतर ‘क्षिप्रा’ मिळाले. त्यांनी ‘क्षिप्रा’ उत्स्फूर्तपणे वाचून हरिभाऊंना लिहिले. लिहिणाऱ्यांच्या अशा नाना तऱ्हा! अनाहूतपणे आलेली पत्रे संक्षिप्त असली तरी वेधक आहेत. सामान्य माणूस साहित्य का वाचतो, पुस्तकांची निवड कशी करतो, ते या पत्रांतून लक्षात येते. काही यथोचित, मार्मिक निरीक्षणे आणि विधाने हाती लागतात. थोडक्यात, पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर काय घडते, ते या पत्रव्यवहारातून कळते.
पण हरिभाऊंना काही खास व्यक्तींच्या- विशेषत: थोर साहित्यिकांच्या प्रतिक्रिया हव्या होत्या. म्हणून त्यांनी काही निवडक माणसांना पत्र लिहून पुस्तकाची प्रत भेट म्हणून पाठविली. श्री. गो. वि. करंदीकरांनी (विंदा करंदीकर) जे अभिप्रायात्मक उत्तर पाठविले आहे त्यात हरिभाऊंनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. ‘तीस-चाळीस ओळींत आपले मत परखडपणे कळवावे असे आपण पत्रात लिहिलेत व चिथावणी दिलीत..’ असे करंदीकर म्हणतात. या चिथावणीमुळे जाणकारांनी ‘क्षिप्रा’बद्दलची मते हरिभाऊंना पत्राने कळविली. विंदा करंदीकर पत्रात म्हणतात-
‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दल या आत्मचरित्राविषयी बरीच पत्रे हाती लागली. कमलाबाई टिळक, सुमती देवस्थळे, गिरिजा कीर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), जयवंत दळवी असे लेखक, गोविंद तळवलकर, वा. वि. भट असे संपादक, डॉ. र. वि. हेरवाडकर, रा. प्र. कानिटकर, डॉ. व. दि. कुलकर्णी इत्यादी समीक्षक अशा अनेकांनी विस्तृत पत्रे लिहून ‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दलच्या प्रतिक्रिया हरिभाऊंना कळविलेल्या आहेत. या पत्रसंग्रहाचे संपादन होणे वाङ्मय व्यवहारासाठी गरजेचे होते.
‘सर्वमंगल क्षिप्रा’वरील पत्रव्यवहार सांस्कृतिक दस्तावेज आहे. पत्रे बोलकी असतात. ती भूतकाळाबद्दल बोलतात. त्यांना वर्तमानकाळाचा संदर्भ असतो. ती भविष्याचे विविधरंगी सूचन करतात. पत्रव्यवहाराची मौलिकता यातून लक्षात येते.
नागपूर
दि. ७- ८- ८१
प्रिय हरिभाऊ,
सा. न. वि. वि.
मी सहज लिहायला बसलो. प्रिय लिहून टाकले. भावना तीव्र झाल्याचे द्योतक.
आता सायंकाळचे ५ वाजले आहेत. गेले तीन दिवस ‘सर्वमंगल क्षिप्रा’च्या नादात होतो. आता या क्षणी ते हातातून सोडले. पेन घेतले. लिहायला हवे, उशीर नको.
‘क्षिप्रा’ मला अति-अति आवडले. त्यातला अलिप्त आपलेपणा ही साधनेची परिणती. ती आयतीच हाती आली. संयत भाषाही आयतीच सर्व शोभवून गेली. स्वच्छंद, व्याप, पसारा यांनाही गोमटे, गोजीरवाणे रूप आले. छान वाटले. आनंद झाला..
खूप लिहिले तरी शब्दच वाढतील. आशय हाच!
आपला
वामन चोरघडे
७ आनंदवन, साहित्य सहवास,
वान्द्रे (पूर्व), मुंबई- ५१. ता. ३- १२- ८०
प्रिय हरिभाऊ,
आपण पाठविलेले २० नोव्हेंबरचे पत्र आणि पाठोपाठ आलेली ‘एक सर्वमंगल क्षिप्रा’ची सस्नेह भेट ही दोन्हीही मिळाली. अल्प परिचय असूनही माझ्याबद्दल आपणाला ओढ वाटते असे आपण पत्रात लिहिलेत आणि यात कुठेतरी सुखावल्यासारखे वाटले. ज्यांच्याबरोबर बोलताना एका पिढीचे अंतर कधी जाणवले नाही, किंवा आपल्या बोलण्यावर शिष्टाचाराचा लगाम घालावा असेही वाटले नाही अशी दोन माणसे म्हणजे रामूभय्या आणि तुम्ही. तुमच्या या पुस्तकाच्या कच्च्या हस्तलिखिताचा मी पहिला वाचक असेही तुम्ही लिहिता. पण माझ्या आठवणीप्रमाणे तुम्ही पुस्तकाचा फक्त काही भागच मला दाखवलेला होता. त्यावेळी मी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते मला आता तपशीलवार आठवत नाही. पण जे काही वाचले त्यावरून एक चांगले आत्मचरित्र तुमच्या हातून लिहिले जाण्याची शक्यता जाणवली होती.
ती अपेक्षा काही प्रमाणात ‘एक सर्वमंगल क्षिप्रा’च्या या पहिल्या भागाने पुरी केली. पण जितकी मला त्यावेळी जाणवली होती तितकी पुरी झाली नाही. तुमचे आयुष्यच वैशिष्टय़पूर्ण व वैचित्र्यपूर्ण आहे, तेव्हा त्याचा हा आलेख वाचनीय ठरणे ही गोष्ट अटळ होती. तुम्ही सराईत व कसबी लेखक नसल्यामुळे भाषेचा फुलोरा व फुगवटा यांची बाधा तुमच्या भाषेला होणार नाही याचीही खात्री वाटत होती. शिवाय दोन डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली व भोगलेली अवस्था तिसऱ्या डोळ्याने पुन्हा पाहण्यासाठी जो तटस्थपणा लागतो तोही तुमच्या वृत्तीत उपलब्ध झालेला होता. या सर्व गोष्टींचा प्रत्यय ‘एक सर्वमंगल क्षिप्रा’ वाचताना जरूर आला. मग खटकले काय? उणीव कशाची भासली? विशेष खटकली ती अनावश्यक पत्रांची भरताड. आणि विशेष उणीव भासली ती नितळ एकसंधपणाची. कदाचित या दोन गोष्टी परस्परसंबद्धही असतील. ‘पत्र’ या गोष्टीचाच मला उबग आहे असे नव्हे. ‘नवी ओळख’ या विभागातील पत्रे हा तुमच्या आत्मचरित्राचा अंगभूत भाग वाटतो. त्यामुळे पुस्तकाला अपाय झालेला नाही. (अत्रेंचे कोर्टापुढील अॅफिडेव्हिट हाही त्या घटनेचा अंगभूत भाग आहे.) पण उरलेली बहुसंख्य पत्रे गाळली गेली असती व निवेदनाच्या ओघात त्यांचा आवश्यक तेवढाच उल्लेख केला गेला असता तर पुस्तकाला आता नसलेला एकसंधपणा कदाचित लाभला असता असे वाटते. जिथे पत्रांचा अतिरेक नाही अशी ‘प्रकाशन व्यवसाय व व्यवहार’ आणि ‘चकवा’ ही प्रकरणे मला आत्मचरित्राच्या लयीशी अधिक मिळतीजुळती व अधिक परिणामकारक वाटली. आपण छापलेल्या पत्रांना वाङ्मयाच्या संशोधक चिकित्सकांच्या दरबारी एक वेगळं महत्त्व आहे ही गोष्ट उघडच आहे. पण चांगले आत्मचरित्र हा अशा लोकांसाठी लिहिलेला साधनग्रंथ नव्हे.
असो. ‘वीस-चाळीस ओळींमध्ये आपले मत परखडपणे कळवावे’ असे आपण पत्रात लिहिलेत व चिथावणी दिलीत. ओळींबद्दलची आपली अपेक्षा पुरी झाली नसली तरी परखडपणात फारशी उणीव राहिलेली नसावी!
आपला
गो. वि. करंदीकर (विंदा करंदीकर)