२१ ऑगस्ट २०१६ च्या ‘लोकरंग’मध्ये वसुंधरा काशीकर-भागवत यांचा ‘मराठीने नुक्ता स्वीकारावा का?’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर भाषा-अभ्यासकांनी अनुकूलता व्यक्त केली आहे. मराठी भाषा सोपी व्हावी, या उद्देशाने एक कोशकार या नात्याने सुचविलेल्या काही सुधारणा..
माझी मातृभाषा सिंधी असून, हिंदी विषयाचा मी सेवानिवृत्त प्राध्यापक आहे. सिंधी, हिंदी, मराठी व उर्दू भाषा मला अवगत आहेत. एक कोशकार म्हणून हिंदी, मराठी व सिंधी भाषेच्या संदर्भातील काही अडचणी व समस्या यांची मला पूर्ण जाणीव आहे. १९४७ साली देशाची फाळणी झाल्यावर सिंधी समाज भारतात आला आणि निरनिराळ्या राज्यांतून स्थायिक झाला. मीही त्यापैकी एक. माझे कुटुंबीय महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचेच झाले. माझे प्राथमिक शिक्षण नगरमधील सिंधी माध्यमाच्या शाळेत झाले. त्यावेळेस ‘अरेबिक सिंधी’ लिपीतून सिंधी भाषा शिकवली जात असे. सहावी-सातवीत मराठी हा विषयही होता. तेव्हा पहिल्यांदा मराठीचा परिचय झाला. सिंधी माध्यमिक शाळा नसल्यामुळे सातवी पास झाल्यानंतर नगरमधील दादा चौधरी विद्यालय या मराठी शाळेत मी प्रवेश घेतला. शिक्षणाचे माध्यम मराठी असल्यामुळे भाषेच्या अनेक अडचणी समोर आल्या. त्याला कारण होते- आमचे चुकीचे मराठी उच्चार! सिंधी विद्यार्थ्यांना ‘ळ’ या अक्षराचा उच्चार जमत नसे. च, ज, झ इत्यादी अक्षरांचे दोन वेगवेगळे उच्चार होतात, हेही आम्हाला माहीत नव्हते. पण पुढे मराठी साहित्याच्या वाचनाने, शिक्षक व जवळचे मित्र यांच्या मदतीने मी मराठी भाषा चांगल्या रीतीने शिकत गेलो.
पुढे हिंदी-मराठी विषय घेऊन पुणे विद्यापीठातून एम. ए. झालो व अहमदनगर महाविद्यालयात हिंदीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. मराठी भाषा व वाङ्मय हेही माझ्या अभ्यासाचे विषय होते. या भाषाप्रेमातूनच मी मराठीतून सिंधीत व सिंधीतून मराठीत भाषांतरकार्य करू लागलो. या अनुवादाच्या कामात शब्दकोशाची गरज होती. त्या गरजेपोटी पुढे मी ‘मराठी-सिंधी’ व ‘सिंधी-मराठी’ असे शब्दकोशही तयार केले. त्यानंतर ‘श्रीज्ञानेश्वरी’, ‘दासबोध’, ‘मनाचे श्लोक’, संक्षिप्त स्वरूपात संत तुकाराम महाराज यांची ‘गाथा’ही सिंधीत आणली.
महाविद्यालयात हिंदी शिकवताना माझा कल विद्यार्थ्यांना शुद्ध हिंदी लिहिणे शिकवण्याकडे असे. या विचारातून पुढे मी ‘शुद्ध हिंदी कैसे लिखें?’ नावाची पुस्तिकाही छापली. हे सांगण्याचा उद्देश एवढाच, की कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात लिहिली गेली पाहिजे आणि बोललीही पाहिजे. भाषेचे काही नियम दुर्लक्षित केले किंवा नियमांना डावलून स्वैरपणा स्वीकारला तर भाषेची हानी होते. सिंधीभाषक असल्यामुळे मला हिंदी भाषादेखील नवीनच होती. अध्यापन व अभ्यास यामुळे हिंदी शुद्धलेखनातीलही काही अडचणी माझ्यासमोर होत्या. उदा. ‘ज्ञ’ या वर्णाचा उच्चार ‘ग्य’ असा केला जातो. हे अक्षर मराठीतही आहे. मराठीत याचा उच्चार ‘द्न्य’ असा केला जातो. इंग्रजीच्या रोमन लिपीत हे अक्षर लिहिताना फरक जाणवतो. उदा. हिंदीतील ‘ज्ञानपीठ’ शब्द इंग्रजीत ‘Jnanpith’ लिहिला जातो. ‘ज्ञानपीठ’ शब्द मराठीभाषक ‘Dnyanpith’ असा लिहितो. दुसरे उदाहरण ‘ऋ’ अक्षराचे आहे. हे अक्षर हिंदी व मराठी- दोन्हीत आहे. पण या एकाच अक्षराचा उच्चार दोन्ही भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. संस्कृतमधील या ‘ऋ’चा उच्चार मराठीत काहीसा उकाराप्रमाणे केला जातो. उदा. ‘ऋ ण’चा उच्चार ‘रुण’; ‘ऋ तू’चा उच्चार ‘रुतू’; ‘संस्कृत’चा उच्चार ‘संस्क्रुत’; ‘कृती’चा उच्चार ‘क्रुती’, इत्यादी. हिंदीमध्ये ‘ऋ’चा उच्चार ‘इ’काराप्रमाणे करतात. उदा. ‘ऋ ण’चा उच्चार ‘रिण’; ‘ऋ तु’चा उच्चार ‘रितु’; ‘संस्कृत’चा उच्चार ‘संस्क्रित’; ‘कृति’चा उच्चार ‘क्रिति’.. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. या अक्षरांच्या उच्चारातील ही भिन्नता मूळ संस्कृत भाषेमुळे, व्याकरणामुळे वा परंपरा इ.मुळे आली असावी.
हिंदी व मराठी वर्णमालेत ‘ड’ आणि ‘ढ’ हे दोन वर्ण आहेत. ‘ड’ डमरूचा व ‘ढ’ ढगाचा. अर्थात दोन्ही भाषेत ‘ड’चे दोन उच्चार व ‘ढ’चेही दोन उच्चार! अलीकडेच दिल्लीच्या केंद्रीय हिंदी निदेशालयाने ‘मानक हिंदी वर्तनी’मध्ये ‘ड’ आणि ‘ढ’ या दोन अक्षरांचे दोन-दोन उच्चार लक्षात येण्याच्या उद्देशाने हिंदी वर्णमालेत या दोन्ही अक्षरांच्या खाली टिंब/ नुक्ता देऊन पार्थक्य आणलं आहे. ‘डम्’ आणि ‘ढम्’ या दोन वर्णाचा समावेश करून हिंदी वर्णमाला सुटसुटीत केली आहे. उदा. ‘झाडम्’, ‘पेडम्’, ‘पडमव’, ‘भेडम्’, ‘लडमई’, ‘खडम’, ‘खडम्कवासला’, ‘खिडम्की’ किंवा ‘पढमई’, ‘पढम्ना’, ‘कढमई’, ‘बढम्ना’, ‘बाढम्’, ‘बढम्ई’, ‘बढिम्या’, ‘काढम’, इ. अक्षरांखाली टिंब दिल्यामुळे त्या शब्दाचा तसा उच्चार करावा हे समजते. ‘ड’ आणि ‘ढ’ ही दोन्ही अक्षरे मराठीतही आहेत. मात्र, या प्रत्येक अक्षराचे दोन उच्चार होतात. त्यामुळे नेमका कोणता उच्चार करावा, हे नवीन वा अमराठी माणसाला समजत नाही. उदा. ‘झाड’ शब्दातील ‘ड’चा उच्चार कसा असावा? ‘ड’ डमरूचा की ‘ड’- पडणे, अडविणे, इ. मधला? तसेच ‘वाढ’ (वाढणे), शब्दातील ‘ढ’चा उच्चार कसा करावा? ‘ढ’ ढगाचा की ‘ढ’- काढणे, मढी, कढी, इ. शब्दांमधील ‘ढ’प्रमाणे करावा? सांगण्याचा मुद्दा एवढाच, की मराठीतसुद्धा हिंदीप्रमाणे एका ‘ढ’खाली टिंब/नुक्ता देऊन उच्चारांच्या दृष्टीने वेगळेपणा आणायला काहीच हरकत नाही. यामुळे मराठी वर्णमालेत दोन अक्षरांची भर पडेल, पण त्यामुळे उच्चारपद्धती सोपी होईल.
ब्राह्मी लिपीपासून निर्माण झालेली व अनेक शतकांमध्ये बदलत आलेली देवनागरी ही भारतीय लिपी आहे आणि ती अनेक दोषांपासून मुक्त आहे. आजच्या घडीला हिंदी वा मराठीमध्ये- अर्थातच देवनागरी लिपीमध्ये जे काही थोडेफार दोष आहेत, ते दूर करण्याचा व भाषेला शास्त्रशुद्ध बनविण्याचा प्रामाणिक प्रयत्न विद्वान, भाषातज्ज्ञ व शासनाने केला पाहिजे असे वाटते. अर्थात जसं अक्षर, तसा त्याचा उच्चार व जसा उच्चार तसं ते अक्षर लिहिता आले पाहिजे. असे काही महत्त्वाचे बदल केल्याने किंवा काही विशिष्ट खुणांचा वापर केल्याने भाषेतील दोष कमी होतील व भाषा सुलभ/ सोपी होईल असे वाटते.
काही भाषांमध्ये अनुस्वाराला, अक्षराच्या वर दिल्या जाणाऱ्या टिंबाला (बिंदू) फार महत्त्व असतं. अनुनासिक उच्चाराचं ते प्रतीक असतं. अरबी, फारसी वा उर्दू लिपीतील अनेक अक्षरांच्या वर व खाली नुक्ता (किंवा नुक्ते) दिला जातो. उच्चार व अर्थ यामधील फरक समजावा म्हणून या नुक्त्यांचा/ टिंबांचा वापर केला जातो. उर्दू-फारसी वर्णमालेत या नुक्त्यांना फार महत्त्व आहे. या भाषा जेव्हा देवनागरी लिपीत/ हिंदीत लिहिण्याचा प्रयत्न झाला तेव्हा देवनागरीतील काही अक्षरांच्या खाली नुक्ता/ टिंब देण्याची प्रथा सुरू झाली असावी. त्यामुळे त्या अक्षरांचा वा शब्दांचा विशिष्ट उच्चार समजत असे. मराठीप्रमाणे हिंदीतही असंख्य फारसी, उर्दू शब्द आलेले आहेत. काही अक्षरांचे उच्चार नीट समजावेत व ते करता यावेत म्हणून त्या अक्षरांखाली एक ‘नुक्ता’/ टिंब दिला जातो. उदा. गजम्ल, फम्ना, फमरसी, जिम्ंदगी, जम्मानत, जमेर, जम्बरदस्त, खम्राब, खमुशी, ख्मुशहाल, ख्मबरदार, गम्म, गमलिब इ.! अर्थातच येथे उच्चाराला महत्त्व आहे. उर्दू-फारसी भाषेत उच्चारांच्या व लिहिण्याच्या दृष्टीने ‘जम्’ अक्षराचे चार प्रकार आहेत.‘स’ या अक्षराचे तीन प्रकार आहेत. ‘त’ अक्षराचे दोन प्रकार आहेत. ‘ह’चेही दोन प्रकार आहेत. उर्दू-फारसी व्याकरण व परंपरा, संस्कृती आदींच्या दृष्टीने या अक्षरांचे उच्चार वेगवेगळे आहेत. सर्वसामान्य माणसाला ते करता येणे अवघड आहे. पण काही विद्वान, कलावंत, धर्मवेत्ते, दूरदर्शन निवेदक आदी अगदी स्पष्टपणे हे उच्चार करतात.
यादृष्टीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने १९६८ साली प्रसिद्ध केलेला श्रीपाद जोशी व प्रा. एन. एस. गोरेकर यांचा ‘उर्दू-मराठी शब्दकोश’ पाहणे उद्बोधक ठरेल. या कोशात उर्दू वर्णाचे लेखन आणि उच्चारण यांचा तक्ता दिलेला आहे. उर्दू-फारसी अक्षरांचे देवनागरी लिपीत लिप्यंतर करणे सोपे व्हावे व समजावे यासाठी देवनागरी अक्षरांखाली नुक्ते / टिंब देऊन व काही ठिकाणी अक्षराच्या बाजूला एकेरी अवतरणचिन्ह देऊन लेखन व उच्चार स्पष्ट केलेले आहेत. उदा. ‘अंदाजम्’, ‘कम्ंदील’, ‘कम्‘ईद’, ‘ख्मान’, ‘राहम्त’, ‘रुतम्ब’, ‘त’अज्जुब’, ‘जमुल्म’, ‘जमुल्फम्’, ‘गमुलाम’, इत्यादी.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी तयार केलेल्या माझ्या ‘मराठी-सिंधी’ शब्दकोशात मराठी शब्दांचे अर्थ देवनागरी सिंधी लिपीतून देताना मीही अनेक अक्षरांखाली टिंब व इतर चिन्हे वापरली आहेत. अर्थातच हे शब्द फारसी, उर्दू वा अरेबिक भाषांमधून सिंधीत आलेले आहेत. अनेक शतकांपासून सिंध प्रांतावर मुस्लीम शासकांचं राज्य होतं. त्यामुळे सिंधी भाषेवर अरबी-फारसी-उर्दूचा प्रभाव अटळ होता. या भाषांमधून सिंधीत आलेल्या अनेक शब्दांचे देवनागरी सिंधीत लेखन करताना काही अक्षरांखाली नुक्ता व आणखी काही खुणा देण्याची पद्धत सुरू झाली. उदा. जम्मीन, गम्जम्ल, फम्रक, जमहिर, गम्म, फमलाद, जमलिम, इ.
इंग्रजांनी १८४३ साली सिंध प्रांत काबीज केल्यानंतर हैद्राबाद (सिंध) येथील ब्रिटिश सहायक जिल्हाधिकारी कॅप्टन जॉर्ज स्टॅक यांनी सिंधी भाषेचा सखोल अभ्यास करून तीन ग्रंथ प्रकाशित केले. ‘सिंधी ग्रामर’ (१८४९), ‘इंग्लिश-सिंधी डिक्शनरी’ (१८४९) आणि ‘सिंधी-इंग्लिश डिक्शनरी’! या तिन्ही ग्रंथांसाठी त्यांनी देवनागरी लिपीचा वापर केलेला आहे. आणि त्यांनी काही अक्षरांखाली नुक्तेही दिलेले आहेत. म्हणजे नुक्ता/ टिंब देण्याची पद्धत बरीच जुनी आहे.
मराठी भाषेतसुद्धा नुक्ता देण्याची ही पद्धत असायला हवी असे अनेक वर्षांपासून माझ्या मनात आहे. भाषा व साहित्याचा अभ्यासक व प्राध्यापक म्हणून किंवा पूर्वी थिएटर ग्रुपतर्फे मराठी नाटकं दिग्दर्शित व वेळप्रसंगी अभिनय करण्याच्या दृष्टीने मराठीतील दोन- दोन उच्चार असणाऱ्या च, ज, झ, ड आणि ढ या अक्षरांच्या खाली टिंब वा एखादी खूण असावी, की जेणेकरून त्यांचे दोन भिन्न असे उच्चार समजतील व करता येतील असं वाटत असे. सिंधी भाषेत चार अंत:स्फोटक (Implosive) ध्वनी आहेत. त्यांचा उच्चार थोडासा वेगळा करावा यादृष्टीने त्यांच्याखाली एक बारीक रेषा देऊन हा फरक स्पष्ट केला जातो.
पुण्यातील जर्मन भाषेचे विद्वान आणि माझे मित्र प्रा. अविनाश बिनीवाले यांनी ‘मराठी-जर्मन’ व ‘जर्मन-मराठी’ शब्दकोश तयार केलेले आहेत. मीही ‘जर्मन-मराठी-सिंधी’ या भाषांतर शब्दकोशाचे कार्य त्यांच्याबरोबर केले आहे. हिंदी, गुजराती इ. भाषा अवगत असणारे प्रा. बिनीवाले यांनी उच्चारांच्या दृष्टीने आपल्या शब्दकोशात ‘च, ज आणि झ’ या मराठी अक्षरांखाली नुक्ता/टिंब देऊन उच्चारांमधला फरक स्पष्टपणे दाखवला आहे. उदा. आत्ताचम्, नुकताचम्, सराफम्, चमेरटी, चमेरी, तेचम्, सजम्विलेला, पैशाचम्ं, जम्ळणे, गरजम्, झमड, भाजम्णे, जमगेवर, जमुळणी, चमलू, झमेप, झम्टकणे, इ. आपली पुस्तकं संगणकावर स्वत:च टाईप करणारे प्रा. बिनीवाले यांचे हे कार्य जरी किचकट असले तरी फार महत्त्वाचे आहे.
मराठी भाषेतील ‘च’, ‘ज’ आणि ‘झ’ या अक्षरांचे उच्चार वेगळे करण्याच्या वसुंधरा काशीकर-भागवत यांच्या विचारांशी सहमत होत असताना आणखी दोन सूचना कराव्याशा वाटतात. (१) मराठीतील ‘ज’चे उच्चारण दोन प्रकारे होत असते. जीव, जग, जेवण, जीवन, इ.सारख्या शब्दांमध्ये ‘ज’ चे उच्चारण तालव्य (Palatal) होते. पण जगणे, जुगार, जोर, समज, इ. सारख्या शब्दांमधील ‘ज’ चे उच्चारण हे दंततालव्य किंवा दंतमूलीय (Dental- Palatal) होते. आणि याच ‘ज’खाली नुक्ता/ टिंब द्यावा असे सुचविले आहे.- ‘जम्’! हिंदी-उर्दूप्रमाणे मराठीतील ‘ज’च्या खाली नुक्ता देताना एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की, या ‘जम्’चं उच्चारण मराठीत उर्दू-हिंदी ‘जम्’प्रमाणे करू नये. कारण उर्दू-फारसीमधील ‘ज़’ (ज़े) हे अक्षर वत्स्र्य (Alveolar) आहे. मराठी ‘जम्’चे उच्चारण दंततालव्य आहे, उर्दू उच्चारापेक्षा वेगळे आहे. (२) दुसरी सूचना अशी की, मराठीमध्ये ‘ड’ आणि ‘ढ’चेही जे दोन-दोन उच्चार केले जातात, त्या अक्षरांखालीसुद्धा नुक्ता/ टिंब वा एखादी खूण देऊन उच्चारांचा वेगळेपणा स्पष्ट करावा. (झाडम्, पडम्णे, गडम्द; वाढणे, पाढम, माढम, ओढम, इ.)
सध्याच्या संगणक युगात भाषा, लिपी व साहित्य या क्षेत्रातही महत्त्वाचे बदल होत आहेत. संगणकाद्वारे लेखनामध्ये अनेक बदल करणे सहज शक्य आहे. म्हणून मराठीतल्या काही अक्षरांखाली टिंब वा इतर खुणा देऊन उच्चारांचा वेगळेपणा सहज दाखविता येईल. यासाठी मराठी भाषेचे विद्वान, भाषातज्ज्ञ, महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय, मराठी भाषा विकास परिषद, सी-डॅक इत्यादी संस्थांच्या सहकार्याने व संमतीने हे कार्य व्हावे अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.
प्रा. लछमन परसराम हर्दवाणी lphardwani@yahoo.com