सुपरबोल. दरवर्षी हा खेळ खेळाइतकाच, किंबहुना खेळापेक्षा इतर कारणांनीही गाजतो. गेल्या आठवडय़ात रविवारी खेळला गेलेला सुपरबोलही याला अपवाद नाही. सुपरबोलचं हे ५० वं वर्ष. मध्यंतरातील कार्यक्रमासाठी गायलेली बियॉन्से या वेळेला वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
फुटबॉल या खेळाच्या विजेतेपदासाठी दरवर्षी होणारी चुरस म्हणजे सुपरबोल. अमेरिकेतील राष्ट्रीय फुटबॉल संघटनेत (NFL) असलेले ३२ संघ दोन गटांत विभागलेले आहेत. ते राष्ट्रीय फुटबॉल संघ (NFC) आणि अमेरिकन फुटबॉल संघ (AFC) या नावाने ओळखले जातात. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात हे संघ सुपरबोलपर्यंत पोहोचण्यासाठी खेळतात. आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतात. फेब्रुवारी महिन्याचा पहिला रविवार ‘सुपरबोल सन्डे’ म्हणूनच ओळखला जातो. यावेळी अंतिम लढत होती- कॅरोलायना पॅंथर आणि डेनवर ब्रॉन्को या दोन संघांमध्ये.
यानिमित्ताने सगळे एकत्र जमतात. खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत, गप्पा मारत लाखो लोक हा खेळ टीव्हीवर पाहतात. हा खेळ जितका खेळासाठी प्रसिद्ध आहे, तितकाच अनेक कारणांसाठी. काहींना खेळाची आवड म्हणून, तर काहीजण केवळ जाहिरातींसाठी सुपरबोल पाहतात. मध्यांतरात होणाऱ्या कार्यक्रमाचं आकर्षण असणारा वर्गही खूप मोठा आहे. मायकल जॅक्सन, मॅडोना, व्हिटनी ुस्टन अशा एकाहून एक नामवंत कलाकारांनी यात आपले कार्यक्रम सादर केले आहेत.
या वेळेला होते ब्रुनो मार्स, कोल्डप्ले आणि पॉपसिंगर बियॉन्से. बियॉन्से आणि तिच्या सहकारी नर्तिकांनी घातलेल्या पोशाखावरून, तिच्या गाण्यातील शब्दांवरून सध्या हवा तापलेली आहे. आफ्रिकन- अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या हक्कांसाठी दिलेल्या लढय़ातील एक चळवळ म्हणजे ब्लॅक पॅन्थर्स चळवळ. बियॉन्से आणि सहकारी नर्तिकांचा काळ्या रंगाचा पेहेराव आणि टोपी या दोन्ही गोष्टी त्या चळवळीतील कार्यकर्त्यांसारख्या होत्या. या नृत्यातून माल्कम एक्स या मानवी हक्कांसाठी जागरूक असलेल्या आफ्रिकन-अमेरिकन नेत्याबद्दलचा आदर व्यक्त केला गेला. तसंच नृत्यातील मुठी वळवून उंचावलेले हात म्हणजे ‘ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ची आठवण करून देण्याचा प्रयत्न होता. १९६८ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक वितरणाच्या वेळेला अमेरिकन राष्ट्रगीत सुरू झाल्यावर आफ्रिकन-अमेरिकन विजेत्यांनी मुठी उंचावल्या होत्या, तशाच तऱ्हेने या नृत्यातही त्याचा वापर केला गेला होता. बियॉन्सेने सादर केलेल्या नृत्यानंतर सुरू झालेल्या या चर्चेत भर पडली ती सुपरबोलच्या आधी- म्हणजे शनिवारी बियॉन्सेने तिच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या ‘फॉरमेशन’ हे शीर्षक असलेल्या गाण्याने! या गाण्यातून आफ्रिकन-अमेरिकन लोकांवर पोलिसांकडून केले जाणारे अत्याचार थांबवावेत असं सुचवण्यात आलं आहे. ते दाखवताना एक छोटा मुलगा रस्त्यावर पोलिसांच्या समोर हाताने थांबण्याची खूण करत उभा आहे असं दाखवलं आहे. आणि पोलिसांच्या मागे असलेल्या भिंतीवर ‘स्टॉप शूटिंग अॅट अस’ हे वाक्य दिसतं. या गाण्यात पाण्यात बुडणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर बियॉन्से बसलेली दिसते. या गाण्यातून बियॉन्सेने पोलिसांची प्रतिमा धुळीला मिळवली असा तिच्यावर आरोप होत आहे. जे पोलीस तिला आणि जनतेला संरक्षण देतात त्यांची बदनामी अशा रीतीने करून बियॉन्सेने काय साधलं, असं लोकांना वाटतं. वर्णभेदाविरुद्ध विरोध दर्शवण्याची सुपरबोल ही योग्य जागा नाही, या मताच्या लोकांनी राष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचं ठरवलं आहे.
याआधी सुपरबोलच्या इतिहासात गाजलेला प्रसंग म्हणजे जॅनेट जॅक्सन आणि जस्टिन टिम्बरलेक यांच्या गाण्याच्या वेळेला घडलेली घटना. जस्टिन टिम्बरलेकच्या हातून ‘रॉक युवर बॉडी’ गाणं म्हणताना जॅनेटने घातलेलं जॅकेट चुकून ओढलं गेलं, फाटलं आणि त्यामुळे तिचं वक्षस्थळ उघडं पडलं. लाखो लोकांनी हा प्रसंग टीव्हीवर पाहिला. ‘वार्डरोब मालफंक्शन’ म्हणून कुप्रसिद्ध झालेला हा किस्सा कितीतरी महिने वादळ उठवणारा ठरला. किंबहुना, सुपरबोल म्हटलं की प्रथम या प्रसंगाचीच आठवण आज १२ र्वष होऊन गेली तरी लोकांच्या मनात ताजी होते. या प्रसंगाची परिणती म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बंदच झालं. असे अनपेक्षित लाजिरवाणे प्रसंग टाळण्यासाठी थेट प्रक्षेपण म्हणून जे आपण पाहतो ते काही क्षणानंतर दाखवलेलं दृश्य असतं.
हा प्रसंग ज्यांनी टीव्हीवर पाहिला नाही अशांपैकी एक होते जावेद करीम. २००४ साली तो प्रसंग पुन्हा पाहण्यासाठी काही मार्गच नव्हता. तिथं नक्की काय घडलं, याचं कुतूहल असलेल्या जावेद आणि त्यांचे मित्र स्टीव्ह आणि चॅड यांच्या मनात तेव्हा लोक स्वत:च चित्रीकरण अपलोड करू शकतील असं संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना आली. या कल्पनेचं मूर्तरूप म्हणजेच यू-टय़ुब. या एका प्रसंगाने प्रसार माध्यमांमध्ये घडलेले हे दोन मोठे बदल!
सुपरबोल जसा अशा घटनांनी गाजतो, तितकाच तो प्रसिद्ध आहे जाहिरातींमुळे. सुपरबोल प्रक्षेपणाच्या दरम्यान जाहिरात झळकण्यासाठी कंपन्यांना ३० सेकंदांसाठी जवळजवळ ३० लाख डॉलर्स मोजावे लागतात. ‘क्रॅश द सुपरबोल’ अशी स्पर्धाही फ्रिटो ले ही चिप्स उत्पादक कंपनी घेते. २०१६ हे या स्पर्धेचं शेवटचं वर्ष होतं. डोरिटो चिप्सच्या जाहिरात स्पर्धेत हातात कॅमेरा आणि कल्पना असलेल्या कुणालाही भाग घेता येत होता. शेवटच्या वर्षांत कंपनीने विजेत्याला हॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवून देण्याचेही जाहीर केले आहे. २००६ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत २०१३ पासून जगभरातून कुणीही भाग घेऊ शकत होते. आलेल्या जाहिरातींतील कमीत कमी एक जाहिरात या खेळादरम्यान दाखवण्याची हमी कंपनीची! त्याव्यतिरिक्त ‘यूएसए टुडे’च्या सर्वेक्षणात सर्वात जास्त गुण मिळालेल्या जाहिरातीला चार लाख ते दहा लाख डॉलर्सचं बक्षीसही कंपनीकडून मिळत होतं. या अखेरच्या वर्षी ४५०० स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातील ५० स्पर्धकांनी उपान्त्यपूर्व फेरी गाठली. उपान्त्य फेरीतील तीन स्पर्धकांपैकी विजेती ठरली ती ‘डोरिटोज डॉग्ज’ जाहिरात. तीन कुत्र्यांना डोरिटो चिप्स खायची इच्छा असते आणि ती ते कशी पुरी करतात, ते विनोदी पद्धतीने दाखवलेली ही जाहिरात. अवघ्या एक हजार डॉलर्समध्ये तयार झालेल्या या जाहिरातीने जेकब चेसला हॉलीवूडमध्ये प्रवेश तर मिळालाच, पण त्याचबरोबर दहा लाख डॉलर्स बक्षीसही!
‘यूएसए टुडे’च्या सर्वेक्षणानुसार, व्यावसायिक जाहिरातींमध्ये या वर्षी हंडे कंपनीने बाजी मारली. गाडी व गाडीतील अत्याधुनिक यंत्रणेची जाहिरात करणाऱ्या या जाहिरातीत मुलगी तिच्या मित्राबरोबर पहिल्यांदाच बाहेर जात आहे. वडील आग्रहाने नवीन हंडे गाडीची किल्ली मुलाच्या स्वाधीन करतात. गाडीमधील ‘कार फाइंडर’मुळे गाडी कुठे आहे, ते वडलांना कळत राहतं आणि त्या- त्या ठिकाणी ते पोचतात. दोघांना ‘एकांत’ मिळूच देत नाहीत, अशी ही जाहिरात. मुलगा कंटाळून थोडय़ाच वेळात मुलीला घरी सोडतो. आणि बाबा मुलीला विचारतात, ‘मग काय केलं तुम्ही आज?’ आणि जाहिरातीचा शेवट होतो- ‘बिकॉज डॅड गोट डू व्हॉट डॅड गोट टू डू’ या वाक्याने.
सुपरबोलमध्ये दाखविल्या गेलेल्या जाहिरातीत विनोद, प्राणी आणि सेलिब्रेटी या तीन गोष्टींचा वापर प्रामुख्याने केलेला होता. सुपरबोल म्हटलं की जाहिराती, वादग्रस्त घटना जितक्या महत्त्वाच्या, तितकेच प्राणीही. दरवर्षी ही स्पर्धा कोण जिंकेल, याचा अंदाज वर्तवायला प्राणीही पुढे सरसावतात. एका प्राणिसंग्रहालयातील माकडांनी म्हणे त्यांच्यासमोर ठेवलेल्या चिठ्ठय़ांतून ‘कॅरोलायना पॅन्थर’ लिहिलेला कागद उचलला, तर दुसऱ्या प्राणिसंग्रहालयात कासवं संथगतीने मार्गक्रमणा करत ‘ब्रान्को’पर्यंत पोचली. टेडी बेअर नावाच्या साळूचे फेसबुकवर ४५ हजार चाहते आहेत, तर यू-टय़ूबवर २४ हजार अनुयायी. साळूचे आत्तापर्यंत चारपैकी तीन अंदाज अचूक ठरले. यावेळीही डेन्वर ब्रान्को जिंकतील, हा साळूचा अंदाज खरा ठरला.
या सगळ्यात सर्वसामान्यांनी तरी का बरं मागे राहावं? पैजा मारण्याची चढाओढ सुपरबोलच्या वेळी खेळात रंगत भरते. कुठला संघ जिंकेल, यावरच पैजा मारण्याइतके लोक अल्पसंतुष्ट नाहीत. या वर्षी सुपरबोल होता कॅलिफोर्नियामध्ये. तिथे भूकंप होईल का, बियॉन्से कार्यक्रम सादर करेल तेव्हा कोणत्या रंगाच्या चपला घालेल, खेळ टीव्हीवर दाखवला जात असताना शहराला अभिमान असलेला गोल्डन गेट पूल किती वेळा दाखवला जाईल, पेटन मॅनिंग निवृत्ती जाहीर करेल का, केली तर ते सांगताना त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळतील का, असे सवाल घेऊन एकापेक्षा एक पैजा मारल्या गेल्या. या पैजांमुळे काही काही वेळा कंटाळवाणा होऊ लागलेल्या खेळातही रंगत यायला लागते. तसंही कुणाच्या मनोरंजनाची काय साधनं असतील हे ज्याचं त्यानेच तर ठरवायचं.
आता राहता राहिले खेळाडू. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी प्रत्येकाकडे ‘लाभदायी’ म्हणून काहीतरी गोष्ट असतेच. दोन्ही संघातील खेळाडू याला अपवाद नाहीत. कुणी काळ्या रंगाचे बूट घालतं, तर कुणी खेळताना च्युइंगम चघळतं, ते कडक राहिलं तर आपण जिंकणार, अशी त्या खेळाडूला खात्री वाटते.
एक ना अनेक.. सुपरबोल आणि त्याचे हे असे भन्नाट किस्से! आता काही काळ बियॉन्से प्रकरण चघळायचं.. आणि नंतर वाट पाहायची ती पुढच्या वर्षीच्या सुपरबोलची. का? अर्थात या साऱ्याच गोष्टींकरता!
मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर – mohanajoglekar@gmail.com