कुलभूषण जाधव हे ‘रॉ’चे गुप्तचर असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचा इन्कार भारताने अधिकृतपणे केला आहे, तर या आरोपांत तथ्यही असू शकते असे प्रसारमाध्यमे म्हणत आहेत. देशप्रेमी नागरिकांना प्रसारमाध्यमांवर संतापण्यासाठी आणखी एक निमित्त देणाऱ्या या प्रकरणाच्या आधीही भारताने अधिकृतपणे काही इन्कार केले होते. पण म्हणून ‘रॉ’ने आपले काम थांबवले होते असेही नाही..  ते सुरूच होते आणि देशाच्या परराष्ट्रनीतीला यश देणाऱ्या  काही कथा त्या कामातूनच घडत होत्या..

जानेवारी १९७१.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

अजून बांगलादेश युद्धाला तोंड फुटायचे होते. वातावरणात जबरदस्त तणाव होता. अशा काळात ती संपूर्ण देशास हादरवून टाकणारी घटना घडली.

दोन काश्मिरी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या ‘गंगा’ या विमानाचे अपहरण केले. श्रीनगरहून जम्मूकडे निघालेले हे विमान. दहशतवाद्यांनी एक पिस्तुल आणि हातबॉम्ब यांचे भय दाखवून पळवले. लाहोरला नेले. चार कर्मचारी आणि २६ प्रवाशांना ओलीस ठेवले.

हा ‘आयएसआय’चा मोठाच विजय होता. कारण जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे हे दहशतवादी वस्तुत: आयएसआयचेच एजंट होते. त्यातल्या एकाचे नाव हाशीम कुरेशी. त्याला आयएसआयनेच प्रशिक्षित केले होते. अश्रफ कुरेशी या चुलतभावाला सोबत घेऊन त्याने ही कामगिरी केली होती. त्यांची मागणी होती अल-फतह संघटनेच्या ३६ दहशतवाद्यांची सुटका करण्याची. पण अशा धमक्यांपुढे भारत कदापि झुकणार नाही, असे इंदिरा गांधी यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली होती.

तिकडे पाकिस्तानात मात्र आनंदोत्सव सुरू होता. जे कंदहार विमान अपहरणाच्या वेळी झाले, तसेच तेव्हाही झाले होते. हाशीम कुरेशीला स्वातंत्र्यसैनिक म्हणून डोक्यावर घेतले जात होते. लाहोर विमानतळावर कोणत्याही आडकाठीशिवाय त्याला फिरू दिले जात होते. तो पत्रकारांना मुलाखती देत होता. दुसऱ्या दिवशी त्याने पाकिस्तानकडे एक मागणी केली- झुल्फिकार अली भुट्टो यांना भेटण्याची. पाकिस्तानी नेते वरवर या घटनेचा निषेध करीत असताना भुट्टो मात्र त्याच्या मागे उभे राहिले होते. ते अगदी विमानाजवळ जाऊन त्याला भेटले.

त्यानंतर हाशीमने अचानक सर्व प्रवाशांची सुटका केली. पण अपहरणनाटय़ संपले असे वाटत असतानाच अचानक त्या विमानाला आग लागली. ती आयएसआयने लावली की हाशीमने बॉम्बस्फोट करून ते उडवले, हे काही समजले नाही. पण काहीही झाले तरी आयएसआयने भारताचे नाक कापले होते.

चिडलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ही घटना नेली. पाकिस्तान कसा दहशतवाद्यांना मदत करतो ते दाखवून दिले. आता पाकिस्तानवर काही तरी कारवाई करणे आवश्यकच होते. अखेर इंदिरा गांधी यांनी ‘नाईलाजा’ने एक आदेश दिला. पाकिस्तानी विमानांना भारतीय हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घातली.

त्या काळातील वृत्तपत्रे पाहिली तर लक्षात येईल, की या प्रकरणावरून तेव्हाही सामान्य जनतेने सरकारवर टीका केली होती. नेहमीप्रमाणे शेपटीघालू धोरणच हे. भारताचे हे दुबळेपण पाहून सच्च्या देशभक्तांचे रक्त सळसळणारच. नेहरू-गांधी घराण्याच्या शांततावादी धोरणामुळेच पाकिस्तान असे धाडस करू शकते, असे कोणालाही वाटणारच. पण..

आंतरराष्ट्रीय राजकारणात जे दिसते ते तसेच असते असे नसते. यात भारताचे नाक वगैरे काहीही कापले गेले नव्हते. तर हे ‘गंगा अपहरण प्रकरण’ म्हणजे भारताचा मोठा विजय होता. ‘रॉ’च्या शीरपेचातील एक लखलखता तुरा होता. कारण या सगळ्या अपहरणनाटय़ाचा सूत्रधार होती ‘रॉ’आणि दिग्दर्शक होते आर. एन. काव.

घडले होते ते असे, की जानेवारी १९७१च्या दुसऱ्या आठवडय़ात सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी या हाशीम कुरेशीला सीमेवर घुसखोरी करताना पकडले होते. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यात त्याने आयएसआयच्या या योजनेची माहिती दिली. योजना साधी नव्हती. त्यांना नुसतेच विमान अपहरण करायचे नव्हते. तर राजीव गांधी ज्या विमानाचे पायलट असतील तेच विमान पळवायचे होते. इंदिरा गांधी यांना कोंडीत पकडण्याचा हा डाव होता.

ही माहिती तातडीने रॉचे प्रमुख आर. एन. काव यांना कळविण्यात आली. याचे एक कारण म्हणजे हाशीम हा आता आयएसआयसाठी काम करीत असला, तरी तो मूळचा रॉचा एजंट होता. रॉनेच त्याला पाकव्याप्त काश्मिरात पाठवले होते. पण तेथे जाऊन तो बिघडला. आयएसआयसाठी काम करू लागला.

काव यांना हे समजताच त्यांनी पाकिस्तानवरच हा डाव उलटविण्याचे ठरवले. त्यासाठी इंदिरा गांधी यांची मंजुरी घेतली आणि त्यांनी हाशीम कुरेशीला फितवले. आताही त्याने अपहरणाची योजना पार पाडायचीच होती, पण ती काव यांनी आखून दिल्याप्रमाणे. विमान कसे पळवायचे, मागण्या कोणत्या करायच्या, लाहोरमध्ये काय बोलायचे, कोणाला भेटायचे हे सगळे ठरवून देण्यात आले होते.

हे सगळे कशासाठी करण्यात आले होते?

हेतू दोन होते. एक म्हणजे- पाकिस्तानला दहशतवादी समर्थक ठरवणे आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानच्या युद्धतयारीत खोडा निर्माण करणे. बांगलादेशात पाकिस्तानहून लष्कर पाठविण्याचा एक मार्ग होता हवाई. तोच या अपहरणाच्या निमित्ताने भारताने बंद केला.

तर याला म्हणतात ‘रॉ’!

*****

‘रॉ’ अर्थात रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग. भारताची केवळ परराष्ट्रांत हेरगिरी करणारी गुप्तचर संघटना.

नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणामुळे ही संघटना सध्या चर्चेत आहे. हल्ली रॉवर चित्रपटही येऊ  लागले आहेत. ते तद्दन फिल्मी असले तरी त्यामुळे या संघटनेबद्दल लोकमानसात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पण जेम्स बॉण्डपद्धतीच्या त्या चित्रपटांतून रॉ म्हणजे नेमके काय हे कसे कळावे? तसाही एकंदरच रॉबद्दलच्या खऱ्या माहितीचा दुष्काळच आहे. जगभरात ‘सीआयए’, ‘मोसाद’, ‘केजीबी’ यांसारख्या संघटनांबद्दल जेवढे लिखाण झाले आहे, या संघटनांच्या गुप्तचरांनी जेवढे लिखाण केले आहे, त्याच्या तुलनेत रॉबद्दलचे लिखाण नगण्यच म्हणावे लागेल. रॉचे बी. रमण, आर. के. यादव, मेजर जनरल व्ही. के. सिंग, अमर भूषण तसेच मलय कृष्ण धर अशा काही अधिकाऱ्यांनी लिहिलेली पाच-सात पुस्तके वगळता रॉबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. खरे तर आपल्यापेक्षा पाकिस्तानी माध्यमांत रॉबद्दल अधिक लिहून आले आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी घटनेत त्यांना रॉचा हात दिसतो. किंबहुना तहरिक-ए-तालिबान ही संघटनासुद्धा रॉनेच उभारली असा तेथील लोकप्रिय षड्यंत्र सिद्धांत आहे. तो अर्थातच प्रोपगंडाचा भाग असतो. सर्वच देश तो करीत असतात. परंतु रॉसारख्या संस्थांबद्दलच्या अधिकृततेच्या जवळ जाणाऱ्या माहितीच्या अभावामुळे झाले असे, की आपणा भारतीयांच्या मनात देशाची एक विचित्र दुबळी प्रतिमा तयार झाली.

खरे तर, शत्रूराष्ट्र हे आक्रमक आहे, अनैतिक आहे; आपला देश मात्र नैतिकतेने वागणारा आहे. आंतरराष्ट्रीय संकेत पाळणारा आहे, अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय समुदायात असणे हे फायद्याचेच असते. ते नैतिक बळ गमावणे हे परराष्ट्र धोरणातील अपयश मानले जाते. म्हणूनच गुप्तचरांच्या कारवायांबद्दल बढाया मारायच्या नसतात. आम्ही आता अमुकतमुक करणार आहोत, असे सत्ताधाऱ्यांनी जाहीर सभांतून बोलायचे नसते. ते बोलून हानी होते ती नैतिक बळाची. याचा अर्थ आपण काय करतो आहोत किंवा केले, याची माहिती अन्य राष्ट्रांना नसतेच असे नाही. एकमेकांच्या गुप्तचरांना फितवण्याचे, त्यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेण्याचे प्रकार सर्वच देश करीत असतात. त्यापासून रॉसुद्धा मुक्त नाही. रॉचे अशोक साठे सीआयएच्या संपर्कात होते. मेजर आर. एस. सोनी आयएसआयसाठी काम करीत होते. अलीकडचे सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे रवींद्र सिंग यांचे. हे रॉमधील मोठे अधिकारी. पण पैशाच्या लोभाने ते सीआयएला सामील झाले. हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. पण ते सीआयएच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी मोठय़ा चलाखीने त्यांना नेपाळमार्गे अमेरिकेला हलविले. तेथे त्यांना नवी ओळख देण्यात आली. अशा प्रकारे अगदी तथाकथित मित्रराष्ट्रही एकमेकांवर हेरगिरी करीत असतात. आता आपल्याकडील अनेकांना असे वाटते की माध्यमांतून गुप्तचरांबद्दल काही बोलणे म्हणजे शत्रूराष्ट्राला माहिती पुरवणे. कुलभूषण जाधव प्रकरणात हे पाहायला मिळाले. आता गुप्तचर संघटनांना एकमेकांबद्दलची माहिती वर्तमानपत्रांतील बातम्यांतून मिळते असे वाटणे हा बावळटपणाच. या अशा सामूहिक बावळटपणामुळे देशाचे नुकसानच होते. अखेर आपले सरकार काहीच करीत नाही, ते दुबळे आहे, आपल्या गुप्तचर संस्था कमजोर आहेत, अशी जनभावना तयार होणे हे काही राज्यव्यवस्थेसाठी फायद्याचे नसते. ती हानी टाळायची असेल तर गुप्तचर संस्थांचा इतिहास नागरिकांसमोर येणे आवश्यक असते.

*****

रॉच्या इतिहासाला आरंभ होतो तो २१ सप्टेंबर १९६८पासून. १९६२ आणि ६५च्या युद्धात शत्रूंची पुरेशी गोपनीय माहिती मिळविण्यात इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)ला आलेल्या अपयशामुळे, परराष्ट्रांत हेरगिरी करणारी वेगळी संस्था स्थापन करण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला. त्याची जबाबदारी त्यांनी सोपविली रामेश्वर नाथ काव यांच्याकडे.

कोण होते हे काव?

ते तेव्हा ‘आयबी’चे संयुक्त संचालक होते हे झालेच, पण ते त्याहून उंच होते. संगीतक्षेत्रातील मंडळी गुरूचे नाव निघताच कानाच्या पाळीला आदरभावाने हात लावतात. हेरगिरीच्या विश्वात काव यांचे हेच स्थान आहे. भारतीय गुप्तचरांचे पितामहच ते. ‘लिजंड’ म्हणावेत अशी माणसे कमीच असतात. ते त्यातील एक होते. आणि हे मत केवळ भारतीयांचेच नव्हते. १९८२ मध्ये फ्रान्सचे तत्कालीन गुप्तचर प्रमुख काऊंट अलेक्झांडर दे मॅरेन्चे यांनी ७०च्या दशकातील जगातील पाच सर्वोत्तम गुप्तचर प्रमुखांत काव यांची गणना केली होती. थोरले जॉर्ज बुश हे सीआयएचे प्रमुख होते. तेही काव यांचे चाहते. एकदा अमेरिका भेटीत त्यांनी काव यांना एक भेटवस्तू दिली होती. तो होता घोडय़ावर बसलेल्या अमेरिकन काऊबॉयचा छोटासा पुतळा. का, तर रॉच्या गुप्तचरांना ‘कावबॉइज्’ म्हणतात म्हणून. त्या पुतळ्याची मोठी प्रतिकृती आज रॉच्या मुख्यालयात दिमाखाने उभी आहे.

आज रॉच्या नावावर ज्या काही मोठय़ा अभिमानास्पद कामगिऱ्या सांगितल्या जातात, त्यात काव यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यातील पहिली सर्वात महत्त्वाची आणि बऱ्यापैकी गवगवा झालेली कामगिरी म्हणजे बांगलादेश निर्मितीची. आपल्या हे लक्षातच येत नसते, की आपण त्या युद्धात पाकिस्तानचा नुसताच पराभव केलेला नाही, तर त्या देशाची फाळणी केली आहे. त्यात जेवढे लष्कराचे श्रेय आहे, तेवढेच रॉ (आणि आयबी)चेही श्रेय आहे. काय केले होते रॉने?

बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान असताना तेथे जगातील एक मोठी बंडखोर संघटना उभारली. तिचे नाव मुक्तिफौज. नंतर तिला मुक्तिवाहिनी म्हणण्यात येऊ  लागले. तिचे दोन भाग होते- नियमित वाहिनी आणि गोना वाहिनी. ही गोना वाहिनी अधिक खतरनाक होती. रॉच्या गुप्तचरांनी या वाहिनीतील बंडखोरांना घातपाताचे प्रशिक्षण दिले होते. याशिवाय रॉने आणखी एक दहशतवादी संघटना तयार केली होती. तिचे नाव कादर वाहिनी. टायगर सिद्दिकी या नावाने ओळखला जाणारा बंडखोर नेता अब्दुल कादर सिद्दिकी हा तिचा नेता होता. रॉचे गुप्तचर आणि या बंडखोर फौजा यांनी पाकिस्तानी सैन्याला अक्षरश: सळो की पळो करून सोडले होते. ‘मिशन रॉ’मधील माहितीनुसार, साधारणत: मार्च ते ऑगस्ट १९७१ या काळात मुक्ती वाहिनीच्या बंडखोरांनी १५ ते २० हजार पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले होते. याबद्दल नंतर बोलताना पाकिस्तानचे लेफ्ट. जनरल नियाझी म्हणाले होते, ‘‘त्यांनी आम्हाला आंधळे आणि बहिरे करून टाकले होते.’’ रॉला मिळालेले हे प्रमाणपत्रच!

बांगलादेश मुक्तिसंग्रामात रॉने मोठे काम केले होते, हे तसे अनेकांना माहीत असते. ही कामगिरी होती पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची. पण रॉने देश जोडण्याचेही महत्त्वाचे कार्य केले आहे. सिक्कीमच्या विलीनीकरणाचे बरेचसे श्रेय द्यावे लागेल ते रॉला. सिक्कीमचे तत्कालीन राजे पाल्देन थोंडून नामग्याल, त्यांची अमेरिकन पत्नी होप कूक यांच्या सिक्कीमला स्वतंत्र ठेवण्याच्या सर्व कारवाया हाणून पाडत इंदिरा गांधी यांनी हे राज्य भारतात सामील करून घेतले. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही.

एकीकडे चीन आणि दुसरीकडे अमेरिका यांचा प्रचंड दबाव होता. सिक्कीमची राणी होप कूक ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि धोरणी बाई. तिच्या आडून सीआयए काम करीत होती. पुढे १९७२ मध्ये जेव्हा सिक्कीममध्ये निवडणुका लागल्या, तेव्हा तेथे भारतविरोधी भावना भडकाविण्यासाठी तिने सीआयएला थेट मैदानात उतरविले होते. राजा आणि त्याच्या पक्षाला मदत करण्यासाठी ‘युसिस’चे तत्कालीन संचालक होल्डब्रूक ब्रॅडली हे गंगटोकमध्ये तळ ठोकून होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच कलकत्त्यातील अमेरिकी वकिलातीतील सीआयएचे एक अधिकारी पीटर बुले हे राजाला भेटून आले होते. तेव्हा तेथे सामना जसा राजेशाही विरुद्ध लोकशाही असा होता; तसाच तो सीआयए विरुद्ध रॉ असाही होता. रॉने तेथील लोकशाहीवादी नेत्यांना एकत्र आणले. त्यांना सर्व प्रकारची मदत केली. तेथील लेप्चा-भुतिया जमातीचे काझी ल्हेन्डूप दोर्जी हे प्रतिष्ठित नेते. ते राजाच्या विरोधात होते. त्याला रॉने खतपाणी घातले. त्यांची पत्नी एलिसा मारिया. ही मूळची बेल्जियमची. तिचा आणि होप कूक हिचा छत्तीसचा आकडा. होप कूकचा वापर सीआयए करीत होती. रॉच्या अधिकाऱ्यांनी मग एलिसा मारिया हिला हाताशी धरले. तिला सिक्कीममधून तडीपार करण्यात आले. तेव्हा कालिपाँगमध्ये ती राहू लागली. तेथे रॉने तिला सर्व प्रकारची मदत केली. हेरगिरीचा मोठा आखाडाच सिक्कीममध्ये त्या काळात रंगला होता. एकीकडे राजाचे दमनयंत्र आणि दुसरीकडे रॉने भडकाविलेले आंदोलन यांत अखेर विजय भारताचाच झाला.

श्रीलंकेतील अल्पसंख्याक हिंदू तमिळी वर्षांनुवर्षे सिंहलींचे अत्याचार सहन करीत असत. त्यांच्यासाठी स्वतंत्र राज्य स्थापण्याच्या कल्पनेला इंदिरा गांधी यांचा पूर्ण पाठिंबा होता. अशा आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत विचार करण्यासाठी त्यांनी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती, त्यात काव हेही होते. ‘एलटीटीई’ही हिंदू तमिळींची दहशतवादी संघटना हे या समितीचेच अपत्य. पुढे ही योजना फसली. परंतु रॉ कोणत्या स्तरावर कारवाया करीत असते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

पाकिस्तान हे तर रॉचे नेहमीचेच लक्ष्य. पाकची आयएसआय ईशान्य भारत, काश्मीर आणि पंजाबात फुटीरतावादी कारवाया करीत असताना, रॉही त्यांना तशाच प्रकारचे प्रत्युत्तर देत होती. पाकिस्तानातील ‘जिये सिंध’ ही चळवळ त्याचेच फलीत. त्या काळात पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनी सिंध प्रांतांतील घरांवर स्वतंत्र ध्वज लावलेले दिसत. मोरारजी देसाई यांनी १९७७ मध्ये रॉच्या या कारवाया थांबविल्या. पण पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पाकिस्तानी दहशतवादाला जशाच तसे उत्तर देण्याचे धोरण आखले. जिये सिंध, मुहाजिर कौमी मुव्हमेंट, बलुचिस्तानातील स्वातंत्र्यवादी चळवळ यांना खतपाणी घालण्याचे काम रॉनेच केल्याचे सांगितले जाते. रॉच्या काही अधिकाऱ्यांच्या मते, तेथे रॉच्या एजंटांनी अनेक घातपाती कारवायाही केल्या आहेत. राजीव गांधी यांच्या आदेशावरून रॉने पाकिस्तानचे खलिस्तानवादी मनसुबे हाणून पाडण्यासाठी हेरगिरीविरोधी दोन पथके (सीआयटी-एक्स आणि सीआयटी-जे) स्थापन केली होती. त्याकाळात भारतातील दहशतवादी हल्ल्यांना लाहोर, कराची आणि मुल्तानमधील हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले जात होते. ही पथके गुजराल सरकारच्या काळात गुंडाळण्यात आली. अर्थात सरकारी पातळीवरून आपण हे सारे नेहमीच नाकारत आलो आहोत. मात्र पाकिस्तानातील सामरिक विश्लेषक लेफ्ट. जन. अमजद शोएब यांच्यावर विश्वास ठेवायचा, तर पाकिस्तानातील राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि माध्यमे यांच्यात रॉने मोठय़ा प्रमाणावर शिरकाव केला आहे. एवढेच नव्हे, तर लष्करातही रॉचे अनेक एजंट आहेत. त्यातील काहींना अटकही झाली आहे. पाकिस्तानमध्ये अंदाधुंदी माजविणे, त्याला आर्थिकदृष्टय़ा कमजोर करण्यासाठी रॉ काम करीत आहे. यात खरोखरच तथ्य आहे का? हा प्रोपगंडाचाही भाग असू शकतो. एक मात्र खरे, की रॉ अशा प्रकारचे काम करू शकते. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र कौशिक.

हा राजस्थानातील तरुण. त्याला रॉने हेरले. दोन वर्षे हेरगिरीचे प्रशिक्षण दिले. मुस्लिम धर्म- संस्कृतीचे, उर्दू भाषेचे शिक्षण दिले. अगदी सुंता करून त्याला पक्का मुस्लिम बनविले. बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे देऊन १९७५ मध्ये त्याला पाकिस्तानात पाठविले. तो तेथे सैन्यात सामील झाला. वरच्या पदावर गेला. लग्नही केले त्याने तेथे. दोन मुले झाली त्याला. अनेक वर्षे त्याने तेथून रॉसाठी हेरगिरी केली. आयबीचे माजी संचालक मलय कृष्ण धर यांच्यानुसार, तो तेथे हनीफ या नावाने वावरत होता. पण अखेर तो पकडला गेला. त्याचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यातच तो आजारी पडला. मेंदूवर परिणाम झाला त्याच्या. १९९८ पर्यंत आपण त्याचे अस्तित्व नाकारले होते. अखेर पाकिस्तानी मानवाधिकार आयोगाने पाकिस्तानी तुरुंगातून त्याला शोधून काढले, तेव्हा कुठे आपण ते स्वीकारले. पण पाकिस्तानी तुरुंगातच तो मृत्यू पावला.

अशा अनेक कहाण्यांनी रॉचा इतिहास समृद्ध आहे. कहाण्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, मॉरिशसपासून, सेशल्स, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या. त्यातील काही उघड झाल्या. अनेक गुलदस्त्यात आहेत. त्या समजतील, न समजतील, पण एक मात्र खरे की ज्या काही गोष्टी रॉअधिकाऱ्यांच्या पुस्तकांतून आपल्यासमोर आल्या आहेत, त्यातून आपणही काही कमी नाही, हेच दिसते. येता-जाता इस्रायलचे उदाहरण देणारे आपण, त्यावरून आपल्या सरकारांना नावे ठेवणारे आपण.. पडद्याआड काय चाललेले असते याचा अनेकदा पत्ताही नसतो आपल्याला. त्यातूनच मग अनेक गैरसमज कुरवाळत बसतो.. देशाच्या दौर्बल्याचे, शांततावादी धोरणाचे. त्यातील काही दूर व्हावेत म्हणून या ‘रॉ’च्या झुंजार कथा..

संदर्भ-

The Kaoboys of R&AW – Down Memory Lane : B. Raman, Lancer Publishers, 2013

Mission R&AW : R. K. Yadav, Manas Publications, 2014

India’s External Intelligence : Maj. Gen. V. K. Singh, Manas Publications, 2013

Intelligence – An Insider’s View : Ashok Karnik, FINS, 2015

Operation Triple X : M. K. Dhar, Manas Publications, 2012 (Novel)

RAW agents operate in various Pakistani departments, organisations : dawn.com/news/1277853

रवि आमले ravi.amale@expressindia.com

Story img Loader