कादंबरीकार विश्वास पाटील यांची ‘लस्ट फॉर लालबाग’ ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. तीत ‘दाह’ या आपल्या कादंबरीचे कथाबीज, त्यातली काही पात्रं आणि घटनांचा वापर करण्यात आल्याचा ‘दाह’चे लेखक व विश्वास पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांचा दावा आहे. विश्वास पाटील यांच्या याआधीच्या कादंबऱ्यांतही अन्य लेखकांच्या कादंबऱ्यांतील घटना-प्रसंगांचे साधम्र्य आढळून येत असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात कशी होत असते, आपल्या निकटवर्तीयांबद्दल लिहितानाही विश्वास पाटील कसे दडपून असत्यकथन करतात, हे सप्रमाण दाखवणारा लेख..
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या कटु आठवणी कालौघात नष्ट होत आल्या तरी त्या काळातलं गोबेल्स प्रचारतंत्र मात्र चिरंतनच आहे. हाच फंडा साहित्यक्षेत्रात वापरण्याचा मान जातो तो ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्याकडे! त्यासाठी अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘लस्ट फॉर लालबाग’ या कादंबरीचं देता येईल. या कादंबरीचा मुख्य स्रोत किंवा मूळ म्हणजे माझी ७ जुलै २०१४ रोजी प्रकाशित झालेली ‘दाह’ ही कादंबरी!
विश्वास पाटील हे माझे ज्येष्ठ बंधू. ‘लस्ट फॉर लालबाग’ प्रकाशित होईपर्यंत विश्वासनं माझे वडील महिपती पाटील, मी स्वत:, लक्ष्मीबाई सागावकर (तिला ‘नानूबाई’ही म्हटलं जाई.) या माझ्या मावशीपासून ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे, माझे गावकरी ते लालबाग-परळच्या भूभागापर्यंत अनेकांना वेठीस धरलं होतं. त्यामागची सबळ कारणं दोन : एक म्हणजे ‘दाह’पासून झालेली उचलेगिरी उघड होऊ नये व दुसरं म्हणजे ‘लस्ट फॉर लालबाग’चं आक्रमक मार्केटिंग. आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यात तसं गैर काही नाही. परंतु त्यातही सत्याची चाड हवी व तेवढय़ा योग्यतेचं आपलं उत्पादनही हवं! माणसाचा सामाजिक दर्जा वाढला की लोक त्याच्याकडे आदराने पाहतात. त्याच्यावर विश्वास ठेवतात. याचाच गैरफायदा कसा घेतला जातो, याचं भेदक उदाहरण म्हणजे विश्वास पाटील यांचं अलीकडचं मीडियातलं गोबेल्स प्रचारतंत्र. जेव्हा सामूहिक शिकार केली जाते तेव्हा जंगलात हाकारे घातले जातात. त्यामुळे शिकार होणारं जनावर गांगरून जातं, भांबावतं व शिकाऱ्याच्या जाळ्यात अलगद अडकतं. अन् विश्वास पाटील यांच्यासारखा कसलेला शिकारी असेल तर मग पाहायलाच नको. बरे, इतके उपद्व्याप करूनही ‘लस्ट फॉर लालबाग’ची भट्टी केवळ बिघडलेलीच नाही, तर तिनं इतिहासाशीही फारकत घेतली आहे.
मी लिहिलेल्या ‘दाह’ कादंबरीचं मीडियापासून समीक्षक आणि वाचकांनीही उत्तम स्वागत केलं. तिला काही पुरस्कारही लाभले. ‘दाह’मधील माझं मनोगतही दाहक होतं. त्यात मी साहित्य क्षेत्रात संशोधनाच्या नावाखाली चाललेल्या वाटमाऱ्यांबाबत लिहिलं होतं. शिवाय माणूस मोठा झाला की त्याला सोयीनं होणारं विस्मरण, आपल्या सोयीचं तेवढंच सादर करण्याची प्रवृत्ती, नसानसांत भिनणारं ढोंग, लबाडी, दुसऱ्यांची मुळं उखडणारा डामडौल अशा रोगट प्रवृत्तींबद्दल मी त्यात आसूड ओढले होते. ‘ते कुणासाठी?’ असा प्रश्न काहींनी मला विचारला होता. त्यावेळी मी त्यांना ‘थोडे थांबा व वाट पाहा’ असा सबुरीचा सल्ला दिला होता. अन् ‘लस्ट फॉर लालबाग’मध्ये विश्वासनं तो सार्थ करून दाखवला! मी इतक्या खात्रीनं ती विधानं का करू शकलो? याची कारणं दोन : ‘दाह’मधला दाहक वास्तव मसाला पाहून कुणालाही त्याची चोरी करण्याची ‘लस्ट’ ही होणारच. दुसरं- विश्वासचा साळसूदपणा माझ्या चांगलाच परिचयाचा होता. त्यामुळे तो असं वागणारच याची मला पक्की खात्री होती.
‘दाह’चा पहिला कच्चा खर्डा तयार झाला तो १९९७ मध्ये. तेव्हा विश्वास ‘महानायक’ कादंबरी लिहिण्यात मश्गुल असल्यानं त्यानं तो ‘नंतर वाचतो’ असं मला सांगितलं. दरम्यान, साहित्यिक वामन होवाळ यांनी हस्तलिखित वाचून त्याच्या दोन कादंबऱ्या करण्याचा सल्ला मला दिला. विश्वासची ‘महानायक’ कादंबरी १९९८ च्या नोव्हेंबरमध्ये बाजारात आली. त्यानंतर त्याने वर्षभरात ‘दाह’चा पहिला खर्डा वाचला. त्यावेळी त्याची पहिली प्रतिक्रिया होती- ‘मलाच या विषयावर लिहायचे होते. पण बरे झाले तू लिहिलेस ते!’ मात्र, साप्ताहिक ‘साधना’ (२४ ऑक्टोबर २०१५) च्या अंकात विश्वासनं ‘साधारणत: पंधरा वर्षांपूर्वीच याचे (‘लस्ट’चे) बीज माझ्या मनात केव्हातरी पडले होते- सुप्तावस्थेतच..’ असं लिहिलं आहे. ते बीज माझ्या ‘दाह’मुळेच पडलं होतं, हे वास्तव. पण ते कबूल करायचं तर भावाच्या कादंबरीची किंचित का होईना, चोरी केल्याचा आरोप झाला तर..? ही भीती. मात्र, त्यापासून पळवाट काढण्यासाठी विश्वासनं अलीकडे मारलेल्या कोलांटउडय़ा तर त्यापेक्षाही भयानक. विशेष म्हणजे ‘दाह’चा कच्चा खर्डा वाचल्यानंतर त्यानं मला ‘तुझ्या कादंबरीचं पुढे काय केलंस?’ असं कधी एका शब्दानंही विचारलं नव्हतं. या ठिकाणी मला ग. दि. माडगूळकर या तपस्व्याची प्रकर्षांनं आठवण येते. त्यांनी व्यंकटेश माडगूळकर या आपल्या कनिष्ठ बंधूंच्या ‘बनगरवाडी’ कादंबरीचं हस्तलिखित वाचलं तेव्हा त्यांना शाबासकी देताना गदिमा म्हणाले होते, ‘व्यंकोबा, तुम्ही एका अनोख्या आणि अस्पर्श अशा जगाची छान ओळख करून दिली आहे. माणदेशातील मातीचा रंग, गंध व नादही तुम्ही तुमच्या शब्दांत पकडला आहे.’ (संदर्भ : सा. ‘साधना’- १९ डिसेंबर २०१५ मधील द. ता. भोसले यांचा ‘बनगरवाडी : ६० वर्षांनंतर पाहताना..’ हा लेख) मात्र, ‘दाह’च्या बाबतीत मनात पाप व साप एकाच वेळी खेळत असतील तर असं काही सुचत नसावं असं वाटतं.
‘दाह’ची पाश्र्वभूमी ही चाळ व खाणावळींची. विश्वासनंही ‘लस्ट फॉर’च्या नायक-नायिकेसाठी खाणावळीचाच प्लॉट वापरला आहे. तो नसता वापरला तरी चालण्यासारखं होतं. त्याऐवजी तो दुसराही प्लॉट घेऊ शकत होता. मात्र, काही सरकारी अधिकाऱ्यांना हडेलहप्पी करण्याची सवयच असते. विश्वासला ती फारच. पण एक मात्र खरं, की ‘लस्ट फॉर’च्या अगोदर माझी ‘दाह’ कादंबरी आली नसती तर मात्र माझा बाजारच उठला असता. विश्वासचं हे गोपनीय चौर्यकर्म मला एका प्रकाशकांमुळे कळलं. हे प्रकाशक विश्वासबरोबर त्याच्या ‘लस्ट’साठी एका घटकाची माहिती घ्यायला गेले होते. त्या प्रकाशकाशी गप्पा मारण्याच्या ओघात मला कळले की, माझ्या कादंबरीत असलेल्या प्रकरणाशी साधम्र्य असलेल्या घटकाचीच त्यांनी माहिती घेतली आहे! त्या प्रकाशकानंही माझ्या हस्तलिखितामधलं ते प्रकरण पाहिलं आणि ते म्हणाले, ‘पाटील, यात माझं नाव मात्र कुठे येऊ देऊ नका.’ हे ऐकल्यानंतर मला दरदरून घाम फुटायचाच बाकी राहिला होता.
विश्वास पाटील यांच्या या गुपचूप कृत्याचं भांडं एकदा फुटल्यानंतर आम्ही तातडीने ‘दाह’च्या प्रकाशनाचे सोपस्कार पार पाडले. तोवर कादंबरी पडून असली तरी माहिती मिळेल तसतसा मी तीअपडेट करीत होतो. २०११-१२ पर्यंत हे काम सुरूच असल्यानं ते शक्य झालं. पण योग्य वेळी ते प्रकाशकच भेटले नसते तर? ‘दाह’ अगोदर आल्यामुळे ‘लस्ट’चा प्लॉट फुलवताना विश्वासची झालेली मुस्कटदाबी, कोंडी आणि कुतरओढ कादंबरीत पदोपदी जाणवते.
विश्वास पाटील यांच्या लेखनाला ‘सपोर्ट’ लागतो, अशी साहित्यवर्तुळात जोरदार चर्चा चालते. जसं की, प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी धरण आणि धरणग्रस्तांवर १९७४ मध्ये लिहिलेल्या ‘देवाची साक्ष’वर ‘झाडाझडती’, शिवाजी सावंतांच्या ‘छावा’वर ‘संभाजी’, आनंद यादवांच्या ‘गोतावळा’वर ‘पांगिरा’.. ‘पानिपत’च्या बाबतीत तर बेळगाव ‘तरुण भारत’च्या १९९९ च्या दिवाळी अंकात विद्या सप्रे यांनी विश्वासची अक्षरश: पिसं काढली होती! अलीकडेच जवळच्या एका सद्गृहस्थांनी नलगे यांची ‘देवाची साक्ष’ ही कादंबरी माझ्याकडे पाठवली. कादंबरीच्या सुरुवातीलाच धरणाच्या बांधकामासाठी शेतातील फणसाची झाडं पाडली म्हणून सोनार्लीच्या म्हातारीला वेड लागल्याचा प्रसंग आहे. विश्वासच्या ‘झाडाझडती’तही पेरूच्या, केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे भिरंबाटलेल्या गोविंदाचं चित्रण आहे! एकाच विषयावर अनेक लेखकांनी लिहिण्यात काही चूक नाही; परंतु हा प्रश्न विश्वासच्याच बाबतीत नेहमी का उद्भवतो? याबद्दल मात्र साहित्यवर्तुळात नेहमीच चर्चा रंगते. एक मात्र खरं, की ‘दाह’चा ‘लस्टी’ अनुभव माझ्यासाठी इतका दाहक ठरला, की भावाबाबत माझ्या मनात जी काही माया होती ती बऱ्यापैकी पातळ झाली! लवकरच मेहता पब्लिशिंग हाऊसकडून माझी दुसरी कादंबरी ‘नक्षलबारी’ प्रकाशित होत आहे. मी ‘नक्षलबारी’चे हस्तलिखित ६ जून २०१५ रोजी त्यांना सुपूर्द केले व प्रकाशनाबाबत २९ जून २०१५ रोजी त्यांच्याशी करारही झाला आहे. विश्वासला माझ्याजवळ असलेल्या ‘नक्षलबारी’च्या हस्तलिखिताची प्रत वाचायची आहे. त्यानं दोन वेळा मागणी केली; पण मी दोन्ही वेळा त्याला चक्क नकार दिला. दुधानं तोंड पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो म्हणतात ते उगाच नाही.
तर मुद्दा असा- ‘लस्ट फॉर लालबाग’बाबत विश्वासनं उठवलेलं रान व प्रत्यक्ष कादंबरी याबाबत काही मुद्दे विचारात घेण्याअगोदर आपण विश्वास पाटील यांच्यासारखा बडा लेखकही थापा मारताना कसा तोंडघशी पडतो याचं अलीकडेच घडलेलं एक उदाहरण पाहू. ‘ऋतुरंग’च्या २०१५ च्या दिवाळी अंकात ‘मु. पो. नेर्ले’ हा विश्वास पाटील यांचा टुकार लेख आला आहे. त्या लेखात विश्वासनं प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या ‘अंगाई’ या कथेसंबंधी लिहिले आहे. या कथेवर चित्रपटही निघाला होता. तर या कथेत गावावर ओढवलेला दुष्काळ दूर व्हावा म्हणून भेडसगावच्या पाटलाची सून आपल्या बाळासह तलावात बलिदान करते, याचा संदर्भ देऊन विश्वास लिहितो, ‘ती बहाद्दर तरुणी म्हणजे आमच्याच नेल्र्याची लेक. माझ्या खापर-पणजोबांची बहीणच.’ इतकी पराक्रमी पूर्वज कुणाला आवडणार नाही? पण यातलं सत्य असं- लोककथा स्वरूपात असलेल्या आणि तळ्यात स्वत:ला बळी देणाऱ्या त्या वीरांगनेच्या गावाचे, गणगोताचे दस्तावेज उपलब्ध नाहीत. त्यामुळे नलगे यांनी तिला कथेच्या मागणीनुसार एखादं माहेर असावं म्हणून भेडसगावजवळच्या आमच्या नेर्ले गावाचं नाव दिलं होतं! (प्रा. नलगे यांनीच मला हे सांगितलं.) कथेतील त्या संदर्भाकित गावाचा पदर पकडून विश्वासनं ती आपल्या खापर-पणजोबांची बहीणच असल्याचं ठोकून दिलं आहे!
‘लस्ट फॉर लालबाग’ आपल्या अंगी कशी भिनली होती याचा डंका वाजवताना विश्वासनं आपल्या हाताशी धरलेल्या आमच्या नानूमावशीचा क्रमांक यात वरचा. याबाबतीत चॅनेलवरच्या मुलाखतींबरोबरच म. टा. (८ नोव्हेंबर २०१५) तसेच सा. ‘साधना’मध्येही (२४ ऑक्टोबर २०१५) त्यानं खर्डेघाशी केली आहे. हे करताना त्यानं नानूमावशीचा इतिहासच बदलून टाकला आहे. माझ्या या नानूमावशीची खाणावळ पहिल्यांदा क्रॉफर्ड मार्केट परिसरातील नागदेवीला भाडय़ाच्या खोलीत सुरू झाली होती. त्यानंतर तिनं त्याच परिसरातील केळाच्या माळ्यावर (हिचं दुसरं नाव- काशिनाथ बिल्डिंग) प्रथम भाडय़ानं व नंतर खोली विकत घेऊन आपली खाणावळ सुरू ठेवली. मुंबईत असेपर्यंत साधारणत: २००० सालापर्यंत ती तिथंच राहत होती. विश्वासच्या अतिरिक्त प्रेमाच्या डोसामुळे महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडावं लागल्यानंतर मला मुंबईच्या कामगारविश्वाचं विराट दर्शन घडलं होतं. त्यावेळी मला डिलाईल रोडवरची वाणी चाळ नंबर तीन आणि या मावशीकडे काही वर्षे राहण्याचा योग आला. विश्वासनं ही नानूमावशी डिलाईल रोडवर गिरणी कामगारांसाठी घरगुती खाणावळ चालवायची, असा तिच्या आयुष्यात ऐतिहासिक फेरफार तर केलाच; शिवाय दमदार लेखणीचं लेणं लाभलेले पाटील इथंच थांबतील तर ते कसदार लेखक कसले! मावशीचा इतिहासही कसा देदीप्यमान हवा ना! म्हणजे ‘ला मिझरेबल’च्या तोडीचा! म्हणून त्यानं नानूमावशीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात लाठय़ा खाल्ल्याचंही ‘साधना’च्या अंकात ठोकून दिलंय. शासकीय नोंदीनुसार माझ्या मावशीचा जन्म १९४१ चा. तिची थोरली बहीण सीता (१९३२), हौसाई.. ही आमची आई (१९३७), भाऊ बंडू (१९३९), तर सावत्रभाऊ किसन (१९३८) असा हा जन्माचा सिलसिला आहे. सीतामावशीच्या जन्माअगोदर आमच्या आजीला बंडू व कोंडी ही दोन अपत्ये झाली होती. ती लहान असतानाच दगावली. त्यांचं रेकॉर्डही शासनदरबारी उपलब्ध आहे. तर.. संयुक्त महाराष्ट्राची प्रथम मागणी केली ती विठ्ठल ताम्हणकर यांनी. तीही १९१७ मध्ये. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन पेटलं ते फाजल अली कमिशनचा द्विभाषिक राज्याचा १० ऑक्टोबर १९५५ चा अहवाल आणि १६ जानेवारी १९५६ ची नेहरूंची मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा झाल्यानंतर! तेव्हा १६ ते २२ जानेवारीदरम्यान मुंबईत मोठय़ा प्रमाणावर दंगे होऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ लोक हुतात्मा झाले. त्यावेळी माझी मावशी सांगलीपासून ६०-७० कि. मी.वर असलेल्या बिळाशी या गावी राहत होती. त्यावेळी ती अवघी १५ वर्षांची होती व तिचं लग्नही झालं नव्हतं. १९५८ च्या दरम्यान तिचं लग्न झाल्यानंतरही ती तीन वर्षे माहेरीच होती. मग ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लाठय़ाकाठय़ा खायला कुठे गेली? दोन वर्षांपूर्वी तिचं निधन झालं. ‘लस्ट फॉर लालबाग’च्या प्रकाशनाला नानूमावशी हवी होती, असा विश्वासनं वरचेवर गळा काढलाय. शिवाय विश्वासला नानूमावशी खाणावळीत करपून जात असल्याचंही भारी दु:ख! विश्वास पाटील हे १९८१-८२ दरम्यान डेप्युटी कलेक्टर झाले. त्यानंतरही मावशीची खाणावळ किमान २० वर्षे सुरू होती. या काळात मावशीचा खाणावळीच्या धुरात कोंडलेला जीव मुक्त करावा असं त्यांना का वाटलं नाही? अर्थात नानूमावशीचं इतकं भाग्य कुठलं हो? ‘लस्ट’चा डंका संपला की तिचं नावही असंच लय पावेल.
विश्वासनं ‘माझं बालपण बऱ्यापैकी डिलाईल रोडला गेल्याचं’ सा. ‘साधना’पासून अन्यत्र केलेली विधानं अशीच थुका लावणारी. त्याचं बालपण डिलाईल रोडवरच्या कोणत्या चाळीत गेलं, ते विश्वासनं एकदा जाहीरच करावं. दुसरं म्हणजे विश्वास ज्या काळात अशा एखाद्या चाळीत राहिला असेल, त्या काळात नेल्र्यात मग आमच्याबरोबर कोण राहत होतं, याचीही पडताळणी करण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळेल. विश्वासनं माझ्या वडिलांची चव्हाटय़ावर आणलेली कथाही अशीच मनोवेधक. माझ्या वडिलांनी मिलमध्ये अवघं चार-पाच दिवसच काम केलं होतं. त्या दिवसांतही त्यांना आपल्या गावाची, शेतीवाडीची खूप आठवण यायची. ते पाहून त्यांच्या जॉबरनं त्यांना ‘बाळा, तू हाडाचा शेतकरी आहेस. तू परत जा,’ असं सांगून त्यांना लगेचच गावी पाठवलं होतं. पण विश्वासनं मात्र आपल्या ‘लस्ट’साठी ‘साधना’, युनिक फीचर्सच्या ‘महा-अनुभव’सह अनेक ठिकाणी इतकी विसंगत माहिती लिहिली आहे, की पुत्राचा हा पराक्रम पाहून त्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं असतं. आणि शेवटच्या घटका मोजत असताना तोंड न फिरवता ते विश्वासकडे एकटक पाहत राहिले असते. शिवाय मरणासन्न पित्याला चिठ्ठी लिहिण्याची नौबतही लेकरावर आली नसती! एका लेखात विश्वास लिहितो, ‘आमचे वडील धनराज मिल जळाल्याने शेतीकडे वळले.’ तर दुसरीकडे ‘कालांतरा’ने हा शब्द वापरून त्यांना गावी पाठवले जाते. अन्य एका ठिकाणी मिलमधल्या नोकरीसाठी वडिलांना दोन वर्षे बहाल केली आहेत! विश्वासचा जसं सुचेल तसं ठोकून द्यायचा हा फंडाही भारी गमतीशीर. त्यावर मी आक्षेप घेतल्यावर ८ नोव्हेंबर २०१५ च्या ‘लस्ट’च्या भारतमाता थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात विश्वासनं आपली भाषा बदलून ‘काही दिवस का होईना, माझ्या वडिलांनी मिलमध्ये नोकरी केल्या’चे आपल्या भाषणात सांगितले होते.
‘साधना’ साप्ताहिकाच्या (२४ ऑक्टोबर २०१५) अंकात विश्वासनं कवी नारायण सुर्वेना पंधरा वर्षांपूर्वी भेटण्याचा योग आल्याचं व नंतर एका भेटीत ‘लस्ट’च्या दोन-चार घटना त्यांना सांगितल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यावेळी विश्वासनं व्हिक्टर ूगोच्या ‘ला मिझरेबल’चा संदर्भ त्यांच्या तोंडी टाकला नव्हता. कदाचित असं काहीतरी आपण करावं असं त्याला त्यावेळी वाटलं नसावं, किंवा सुचलं तरी नसावं. नंतर मात्र ‘म. टा.’च्या ८ नोव्हेंबर २०१५ च्या अंकातील लेखात ‘पोरा, व्हिक्टर ूगोच्या ‘ला मिझरेबल’च्या पोतासारखे काहीतरी तुझ्या पोतडीत मला दिसते आहे..’ असं सुर्वे म्हणाल्याचा दावा विश्वासनं केला आहे. विश्वासनं हीच री ‘लस्ट’च्या ‘सलाम’ या मनोगतातही ओढली आहे. बरं, सुर्वेना तुम्ही असं म्हणालात का, अशी विचारण्याची सोय आता उरली नाही. कारण २०१० मध्येच ते स्वर्गवासी! दुसरी गोष्ट अशी की, साप्ताहिक ‘साधना’च्या (२४ ऑक्टोबर २०१५) अंकात विश्वासनं ‘साधारणत: पंधरा वर्षांपूर्वीच याचे (‘लस्ट’चे) बीज माझ्या मनात केव्हातरी पडले होते- सुप्तावस्थेतच!’असं लिहिलं आहे. मग त्याचवेळी तो नारायण सुर्वेशी दोन-चार घटनांची चर्चा केल्याचा दावा कसा काय करू शकतो? मला वाटतं, विश्वासनं इतका आटापिटा करण्यापेक्षा ‘माझ्या लहान भावाची ‘दाह’ वाचल्यानंतरच माझ्या मनात हे बीज रुजलं,’ असं म्हटलं असतं तर त्याचं काहीच नुकसान होणार नव्हतं. बरे, आपल्या कर्तृत्वाला सुर्वेच्या नावाचा आधार देऊन हे ‘ला मिझरेबल’च आहे व त्याच नजरेनं तुम्हीही ते वाचा, हा वाचकांसाठीही गर्भित इशारा समजायचा का?
‘दाह’ व ‘लस्ट’मधील काही पात्रांमध्ये साम्यस्थळं आहेत. त्यापैकी उदाहरणादाखल द्यायचं झालं तर ‘दाह’मधील लहान-थोर पुरुषांचा उपभोग घेणारा शामराव घडुले व ‘लस्ट’मधील साळवी इन्स्पेक्टर.. ‘दाह’मधील जया चाफेकरनीला गावाकडे राहणारा तिचा नवरा नाना भोसले लुबाडतो, तर ‘लस्ट’मध्ये तात्या रेडकरला त्याचा भाऊ ! मी जया चाफेकरनीचं पात्र ज्या खाणावळीवरून घेतलं आहे, ती आपल्या साठीत डिलाईल रोडवरच्या वाणी चाळ नंबर दोनमध्ये राहत होती. तिला भेटण्याची मला खूप इच्छा होती. मोरारजी मिलचे कामगार जगन्नाथ डांगे हे १९९५ मध्ये मला तिच्याकडे घेऊन गेले होते. त्या वयातही ती बाई काय होती म्हणून सांगू!
कोणत्याही कलाकृतीवर त्या- त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची मोठी छाप असते असं म्हणतात. ‘लस्ट फॉर’मध्ये मात्र याची मात्रा भलतीच ज्यादा आहे. विश्वासनं ‘लस्ट फॉर लालबाग’च्या आगमनापूर्वी मिळेल त्या मीडियामध्ये मिळेल त्या विषयावर चर्वितचर्वण केलं होतं. विश्वास हा मला कमालीचा ‘स्प्लिट पर्सनॅलिटी’चा माणूस वाटतो. हे समजून घेण्यासाठी ‘ऋतुरंग’च्या २०१५ च्या दिवाळी अंकामध्ये त्यानं लिहिलेला तो टुकार लेख परत पाहू. त्याची सुरुवात त्यातल्या सोन्याक्काच्या बाळंतपणापासून करू. ही सोन्याक्का बाळंतपणासाठी बापाच्या घरी आलेली. तिचं नऊ महिन्यांचं नगाऱ्यासारखं फुगलेलं लोंबतं पोट. तिचं सारं अंग जड झालेलं. विश्वासच्या म्हणण्यानुसार, तिच्या घरचे दुसऱ्या शेतात कामाला गेलेले. अन् ही तिकडे जाण्याऐवजी डोंगराशेजारच्या दुसऱ्याच शेतात नऊ वर्षांच्या विश्वासला सोबत घेऊन भातखाचरात तण काढायला जाते. तेही श्रावण महिन्यात. तिला आपल्या घरचे ज्या शेताकडे गेले होते तिकडं का जावंसं वाटलं नाही? पुढचा कल्पनाविलास तरी पाहा! ती पहाऱ्यावर नऊ वर्षे वयाच्या या खरमरीत गडय़ाला- म्हणजे विश्वासला बसवते व स्वत: ओढय़ाच्या थंडगार पाण्यात शिरून बाळंत होते. आपलं बाळ ओढय़ाच्या पाण्यात धुते. दगडानं नाळ तोडते. अन् डोक्यावरच्या पाटीत गवताचा पाळणा करून बाळ ठेवते व घरी परतते! विचार करा.. तेव्हा विश्वास नऊ वर्षांचा. म्हणजे हा काळ १९६६ च्या दरम्यानचा. त्या काळात गाडीवाटेला साजेशा रस्त्यांवर गुडघा, मांडय़ाभर चिखल असायचा. शेतं पाण्यानं भरलेली असायची. अशा स्थितीत ती आपलं लोंबतं पोट घेऊन रस्त्यावरून, बांधावरून चालणार कशी व शेतात भांगलणार तरी कशी? मला तर या बाळंतपणात विश्वासचा आंबटशौकीनपणाच दिसतो. पण.. असो. ‘ला मिझरेबल’च्या धुंदीत असे चमत्कारही होणार नाहीतच असं नाही. विश्वासनं लेखात असंही लिहिलं आहे की, ‘पूर्वी आमच्या गावात दरवर्षी किमान दोन-तीन खून पडले नाहीत असं कधी झालं नाही.’ मी म्हणतो, दरवर्षी इतकी माणसं मारायला आणायची कुठून हो? १९५० च्या आसपास आमच्या गावात दिंडे वस्तीवर तीन खून झाले होते- ते श्रीपती दिंडे, गणपती दिंडे आणि दगडू दिंडे यांचे. त्यानंतर दिंडय़ातल्या बुजुर्गानी एकत्र बसून ‘असं होत राहिलं तर आपण सर्व दिंडे संपून जाऊ,’ असं म्हणत आपापसात समेट घडवून आणला होता. त्यानंतर १९७१ च्या सुमारास रामू तुका पाटील यांचा खून झाला. हे रामू म्हणजे आमच्या वडिलांचे मित्र. नेर्लेकरांना हे चारच खून माहीत आहेत. पण विश्वास पाटील आपल्या गावावर लेख लिहीत आहेत म्हणजे ते गाव उठून दिसायला नको का? त्याच लेखातील आमच्या घराण्याच्या पूर्वज आऊबाईच्या कहाणीलाही अशीच असत्याची धार आहे. विश्वास लिहितो की, ‘आऊबाई १८२० च्या दरम्यान धारवाड-बेळगावपर्यंत जाऊन व्यापार करायची.’ यातली विसंगती पाहा. त्याच लेखात तो म्हणतो, ‘आमच्या चुलतआजीनं वाघाला जळक्या फाळीनं मारलं. त्यावेळी जंगल अगदी गावाच्या परसदारापर्यंत भिडलं होतं.’ चुलत का असेना, पण आजीचा कालखंड म्हणजे १९४० ते ६० चा धरू. तर दुसरीकडे युनिक फीचर्सच्या ‘महा-अनुभव’च्या ऑगस्ट २०१४ च्या अंकात विश्वास असं म्हणतो, ‘जमिनीचे कज्जे-खटले लढवण्यासाठी आमचे वडील महिपती पाटील हे रात्री बारा वाजता कोल्हापूरला जायला चालत निघत. त्यावेळी अतिशय भीतीदायक वाटणाऱ्या वाघबिळाची खिंड उतरून ते एकटेच जात. त्यावेळी नीट रस्ते नव्हते. वाहने नव्हती. आता हाही काळ १९५० ते १९६०-७० दरम्यानचा. कोल्हापूपर्यंत जायला १९५०-६० च्या काळात रस्ते नसतील, तर १८२० च्या आसपास आऊबाई बेळगावपर्यंत कशी जात होती? तो रस्ताही कोल्हापूरवरूनच पुढे जात होता! शिवाय तिच्या संरक्षणाचं, निबिड अरण्याचं, खोल भीतीदायक ओढय़ा-नाल्यांचं काय? यातली खरी गोम अशी आहे की, विश्वासनं आमच्या जुन्या वाडय़ात अलीकडेच यल्लमादेवीची स्थापना केलेय. (स्थापना म्हणजे वाडय़ातल्या जुन्याच दगडाला रेणुकामाता म्हणून पुजलंय!) त्याबाबत विश्वास म्हणतो की, त्याला या क्षेत्रातील एका तज्ज्ञ माणसानं यल्लमा तुमच्या खानदानात पूर्वीपासून होती व तिचाच तुम्हाला त्रास होत असल्याचं सांगितलंय. देव म्हटलं की सगळेच भोळे व खुळेही होतात. आता ही यल्लमा कर्नाटकमधून आमच्या गावापर्यंत कशी आली, हे चुलत्या-पुतण्यांना पटवायला नको का? म्हणून आऊबाईला व्यापाराच्या निमित्तानं बेळगाव-धारवाडपर्यंत धाडण्याचा हा खटाटोप! त्याच लेखात माझ्या वडिलांनी गोळीबारात जखमी झालेल्या बाबूराव पाटणकरांना खांद्यावर घेऊन नऊ कि. मी.चं जंगलरान तुडवल्याचं विश्वासनं लिहिलं आहे. हीही अशीच लोणकढी. त्या लेखानुसार, भुताबरोबर कुस्ती खेळणारे माझे वडील कुणालाही कशाला खांद्यावर घेतील? ही काय विक्रम-वेताळाची गोष्ट आहे? अशा समयी ते इंग्रजांना भिडणार नाहीत का? याबाबत मी विश्वासला विचारलं, ‘असं असेल तर दादांना स्वातंत्र्यसैनिक पुरस्कार का मिळाला नाही?’ तर विश्वासनं त्याचं दिलेलं उत्तर मासलेवाईक होतं. ‘दादांकडे कागदोपत्री पुरावा कुठं आहे?’ जर पुरावाच नसेल तर त्याबाबत तुम्ही लिहिताच कशाला?
विश्वास पाटील हे नामवंत लेखक, जिल्हाधिकारी पदावर काम करणारे वरिष्ठ नोकरशहा, सोबत खिशात खुळखुळणारा पैसा.. मग कोण कशाला विश्वासला खोटं ठरवण्याची हिंमत करेल?
यानिमित्तानं मला पडलेला प्रश्न म्हणजे- अशी थापेबाजी करताना इतकी मोठी नावाजलेली माणसं अशी विचित्र का वागतात? विश्वासच्या अशाच बेताल व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव ‘लस्ट फॉर लालबाग’मध्ये ठायी ठायी आढळतो, हे मराठी साहित्य क्षेत्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल.
सुरेश पाटील
sureshpatilt@gmail.com