गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे गुन्हा आहे. यामुळे अनेक अपघात झाल्याचे आपण नियमित पाहतो. मात्र, एखादा महत्त्वाचा फोन आल्यास आपण नियमाकडे आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करुन फोन उचलतो. पण तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आता ड्रायव्हिंग करताना आपोआप डू नॉट डिस्टर्बची सुविधा सुरु होणार आहे.
नुकत्याच लाँच झालेल्या गुगलच्या पिक्सल फोनमध्ये यासाठी एक खास सेंसर सुविधा बसविण्यात आली आहे. गुगलने पिक्सल फोनसोबत ‘पिक्सेल एंबिएंट सर्विसेज’ नावाचे नवे अॅप देखील सुरु केले आहे. या अॅपच्या स्क्रीनशॉट मध्ये एक ऑटोमेटिक सेटिंग आहे ज्यामुळे युजर ड्रायव्हिंग करत असल्याचा अंदाज येतो आणि डीएनडी सेवा सुरु करतो. अॅपल आणि सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये देखील ‘डीएनडी’ मोड देण्यात आला आहे. हे फोन लाँच झाले असले तरीही ग्राहकांना ते नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होणार आहेत. नुकतीच या फोनची फिचर्स लीक झाली होती. पिक्सेल २ आणि पिक्सेल २ XL हे हायटेक फीचर्स असणारे स्मार्टफोन अॅपलला टक्कर देण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
या दोन्ही फोनच्या बॅटरी बॅकअपविषयीच्या चर्चांना उधाण आले असून पिक्सेल २ मध्ये २७०० मिलीअॅम्पिअर्सची आणि पिक्सेल २ XL मध्ये २५२० मिलीअॅम्पियर्सची बॅटरी असेल असे बोलले जात आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचर असेल. तसेच कॅमेरा, स्टोरेज, उत्तम स्क्रीन अशी अनेक फिचर्स यामध्ये देण्यात आली आहेत. या नवीन फिचरमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल असे म्हटले जात आहे.