एरवी दैनंदिन व्यवहारात आपण आपल्या पेहरावाकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र पार्टी अथवा मेजवानीप्रसंगी नटूनथटून जातात. अशा समारंभातून नटण्या मुरडण्यात महिला आघाडीवर असल्या तरी पुरुषही आता मागे राहिलेले नाहीत. पार्टीतील माहोलमध्ये आपला प्रभाव टाकण्यासाठी पुरुषही काहीतरी विशेष पेहराव करू लागले आहेत..  

नाताळ किंवा वर्षअखेरीच्या पार्टीला आता मोजून काही दिवसच राहिले आहेत. बहुतेक जण यानिमित्ताने मित्रमंडळी, आप्तस्वकीय अथवा कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत मेजवान्यांचे बेत आखतात. येत्या शनिवार-रविवारी मेजवान्यांचे बेत पक्के होतील. त्यामुळे या विकेन्डला बाजारात खरेदीची झुंबड उडेल. मुलांसाठी फॅशन विश्वात फार काही नवे येत नाही. त्यामुळे आम्हाला पेहराव करण्यासाठी फारसे पर्याय नसतात,अशी  त्यांची तक्रार असते. गेल्या काही वर्षांत मात्र  परिस्थिती बदलत आहे. मुलांसाठाही काही नवे पॅटर्न बाजारात येऊ लागले आहेत. त्यापैकी काही ठळक पर्यायांचा परामर्श या लेखात घेऊ या..

लोफर

जॅकेट, टी-शर्ट, मफलर, चिनोज अशा पोशाखावर बूट अथवा चपलांपेक्षा लोफर्सना तरुण अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे सध्या लोफरची फॅशन इन आहेत. जिन्स आणि चिनोज या दोघांवर हे रंगीबेरंगी लोफर एकदम चांगले दिसतात.

ब्लेझर

पार्टीसाठी ब्लेझर घालणं हा काही नवीन प्रकार नाही. ब्लेझर ही जुनी स्टाइल आहे. मात्र काळानुरूप त्याचे रंग आणि डिझाइन्समध्ये थोडेफार बदल झाले आहेत इतकंच. लेदर जॅकेट्सच्या स्टाइलप्रमाणे ब्लेझरही पार्टीसाठी पूर्वीपासूनच इन आहेत. हल्ली लेदर जॅकेटला पर्याय म्हणून वेल्व्हेट ब्लेझरसुद्धा बाजारात आले आहेत. अशा प्रकारचे जॅकेट्स आणि ब्लेझर सर्वसामान्यपणे डेनिमवर परिधान केलेले पाहायला मिळतात. तसेच कॉटनच्या चिनोजवरही हे जॅकेट्स शोभून दिसतात. तसेच सध्या प्रिटेंड ब्लेझरस्चीही सध्या तरुणांमध्ये चलती दिसून येते.

वुलन मफलर किंवा स्कार्फ

पूर्वी थंडीत लोक मफलर घ्यायचे. मात्र तरुणांना मफलर फारशी आवडत नव्हती. आपल्याला फारशी थंडी वाजत नाही, हेच भासविण्याचा प्रयत्न मुले करीत असत. पण आता मफलर किंवा त्याचा आधुनिक अवतार असलेला स्कार्फ उबेसाठी नव्हे तर रुबाबदारपणासाठी वापरला जातो. मफलर हीसुद्धा स्टाइल स्टेटमेन्ट बनत चालली आहे. त्यामुळे पार्टीत जाताना थंडी असो वा नसो विविध रंगाचे किंवा चेक्स असलेले मफलर गळ्याभोवती लपेटून घेणे तरुणाई पसंत करू लागली आहे. प्लेनमध्येसुद्धा वुलन मफलर बाजारात उपलब्ध आहेत. प्रिंटेड मफलर फूल स्लिव्ह टी-शर्टवर परिधान केले जातात. वुलन मफलर थोडे महाग पडतात. मात्र खास पार्टी असेल तर त्यात आपला प्रभाव पाडण्यासाठी तेवढा खर्च करायला हरकत नाही. वुलन मफलरला दुसरा पर्याय स्कार्फचा आहे. स्कार्फमध्ये चेक्सच्या स्कार्फला तरुण अधिक पसंती देतात.

लेदर जॅकेट..

फक्त शर्ट आणि टी-शर्ट हे दोनच पर्याय मुलांसाठी पूर्वी उपलब्ध होते. आता पार्टी पेहरावात त्यात रुबाबदार लेदर जॅकेटस्ची भर पडू लागली आहे. लेदर जॅकेटस्मुळे मुलांचा रुबाबदारपणा वाढतो. त्याने त्यांच्यातील रांगडेपणा अधिक अधोरेखित होतो. त्यामुळे हल्ली पार्टीमध्ये लेदर जॅकेट्स मोठय़ा प्रमाणात दिसतात. ब्ल्यू डेनिम, फिटिंग व्हाइट प्लेन टी-शर्ट, त्यावर वजनदार लेदर जॅकेट आणि पायात हाइटेड शूज असा रॉकस्टार लूक पार्टीला जाताना कॅरी केलेला पाहायला मिळतो.

स्टॅण्ड कॉलर

पार्टीसाठी एक चांगला पर्याय आहे तो स्टॅण्ड किंवा चायनीज कॉलर शर्टचा. हे स्टॅण्ड कॉलर शर्ट बरेच लोकप्रिय होत चालले आहेत. प्लेनमध्ये ब्राउन, ब्लॅक, व्हाइट रंगातले हे शर्ट पार्टीसाठी चांगले आहेत. शायनिंगच्या शर्टसाठी चायनीज कॉलर असलेले कॉटन शर्ट पार्टीसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत.

प्रिंटेड शर्ट

पार्टीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी बाजारात हजारो प्रिंट्स बाजारात उपलब्ध आहे. तसेच नवीन आलेले ‘सिल्क अँड शाइन’ म्हणजेच सॅटनचे असे शर्ट पार्टीला वापरले जातात. त्यामध्ये सर्वाधिक काळ्या रंगाला पसंती मिळते.तसेच प्लेम, ग्रे, ब्राऊन मोतीया, नेव्ही ब्ल्यू असे काही नवीन रंग बाजारात उपलब्ध आहेत. प्लेन शर्टस् आवडत नसतील तर त्याच मटेरिअल आणि रंगात लाइनिंगचे श र्टही  मिळतात. पार्टीच्या डिसेंट लुकसाठी हा उत्तम पर्याय आहे. मात्र हे कलेक्शन काही ठरावीक पार्टीमध्ये तरुण वापरतात.

कुठे मिळतील..

  • मुबंईतील बांद्रा, खार, मलाड, बोरिवली, दादर अंधेरी, लोखंडवाला येथील ब्रॅण्डेड स्टोरमध्ये अशा प्रकारचे कपडयांच्या असंख्य प्रकार तुम्हाला सहज उपलब्ध होतील.
  • किंमत २०० रुपयांपासून पाच हजार रूपयांपर्यंत

Story img Loader