ऑनलाईन व्यवहार करताना विविध कारणांमुळे खात्यातून पैसे कमी होतात पण व्यवहार अयशस्वी किंवा ट्रान्झॅक्शन फेल होतं. डेबिट कार्ड स्वाइप करतानाही अशाप्रकारची समस्या येते. यानंतर ग्राहक सेवा केंद्र किंवा बँकेच्या फेऱ्या मारण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय उपलब्ध नसतो. शिवाय पैसे खात्यात परत जमा होत नाहीत तोपर्यंत मानसिक त्रास होतो तो वेगळा. पण, आता बँकांच्या मनमानी कारभारावर चाप बसणार आहे. तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे.

ऑनलाइन व्यवहार एखाद्या कारणास्ताव अयशस्वी झाल्यास रिफंड मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये बँकेकडून ग्राहकाला द्यावे लागणार आहेत. या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं परिपत्रक जारी केलं आहे. आरबीआयने ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास संबंधित टर्न अराउंड टाइम (टीएटी) नियमांत बदल केला आहे. या बदलानंतर बँक ग्राहकांना फेल ट्रान्झॅक्शनच्या पैशांसाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. बँकांकडे तक्रार केल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. यानुसार तुमचा ऑनलाइन व्यवहार काही कारणास्तव अयशस्वी झाल्यास जर एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी संबंधित बँकेकडून तुमच्या खात्यात 100 रुपये जमा केले जातील. रिफंड मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये बँकेने ग्राहकाच्या खात्यात द्यावे, असा हा नियम आहे. UPI, IMPS, NACH द्वारे अर्थात मोबाइल वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू असणार आहे.

याशिवाय, ऑनलाइन व्यवहारांव्यतिरिक्त आरबीआयने नॉन-डिजीटल ट्रान्झॅक्शन्ससाठीही वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममध्ये अयशस्वी झालेल्या व्यवहारांबाबत केलेल्या तक्रारीचं निवारण पाच दिवसांमध्ये न झाल्यास ग्राहकाच्या खात्यात दररोज 100 रुपये दंड बँकांना द्यावा लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.ग्राहकांना या नियमानुसार लाभ न मिळाल्यास रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतात. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अशा प्रकरणांची स्वत:हून दखल घेत ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होतील. बँकांना तक्रारीविना ग्राहकांना पैसे परत करावे लागतील.