उन्हाळी सुटी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच; पण येथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून हा अनुभव घ्यायला हरकत नाही.

निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. पण फळांचा राजा आंबा, तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणला आहे. या सर्व निसर्गाच्या समृद्धीसोबतच अनेक निसर्गनवल कोकणात जागोजागी विखुरलेली पाहायला मिळतात. आपण कोकणात सडय़ावर कोरलेली मानवनिर्मित कातळशिल्पे यापूर्वी पाहिली आहेतच. त्याचसोबत अनेक निसर्गनिर्मित नवलस्थाने कोकणात आहेत. ती प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिली पाहिजेत.
संगनातेश्वरचा सिंहनाद : मुंबई गोवा महामार्गावर लांजा आणि राजापूरच्यामध्ये ओणी नावाचे गाव आहे. इथून एक रस्ता पाचलमार्गे अणुस्कुरा घाटाकडे जातो. याच पाचल गावापाशी अर्जुना नदीच्या तीरावर संगनातेश्वराचे प्राचीन मंदिर उभे आहे. या शिवमंदिरात ऐकू येणारा आवाज हे या ठिकाणचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. शेजारीच असलेल्या नदीतून घागरीने पाणी आणून ते मंदिरातील अभिषेकपात्रात ओतले की त्या धारा शिवपिंडीवर पडू लागल्या की गाभाऱ्यात जुन्या रेडीओच्या व्हॉल्वमधून यायचा असा स्पष्ट आणि तीव्र आवाज यायला लागतो. स्थानिक लोक याला सिंहनाद म्हणून ओळखतात. परिसर शांत असल्यामुळे हा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतो. नदीपात्रातील काही विशिष्ट दगडांवरदेखील पाण्याची धार धरली असता असाच आवाज येतो. हा नक्कीच एक नैसर्गिक चमत्कार म्हणायला हवा. भू वैज्ञानिकांच्या मते काही विशिष्ट खडकांतून अशा प्रकाराचा आवाज येऊ शकतो. या खडकाचं विश्लेषण अजून झालेलं नाही.
उमाडय़ाचो महादेव : वैभववाडी-तरळे या रस्त्यावर शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नदी वाहते. नदीपात्र उथळ असून त्यात एक निसर्गनवल दडले आहे. या नदीच्या पात्रातून कायम बुडबुडे वरती येत असतात. विविध ठिकाणाहून येणारे हे बुडबुडे आपल्या पायाला गुदगुल्या करतात. ही बुडबुडय़ांची मालिका अव्याहत सुरू असते. ऐन उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी कमी असल्यामुळे तर हे बुडबुडे अगदी जवळून आणि नीट पाहता येतात. अगदी असाच प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मठ या गावी असलेल्या बोंबडेश्वर महादेवाच्या मंदिरातसुद्धा पाहायला मिळतो. मंदिरातच असलेल्या पाण्याच्या छोटय़ाशा तलावातून अधूनमधून हे बुडबुडे येत असतात. उमाडे, बोंबडे म्हणजेच बुडबुडे. हे निसर्गनवलदेखील मुद्दाम जाऊन पाहायला हवे. काही भू वैज्ञानिकांच्या मते अशा ठिकाणी जर मिथेन वायूचं प्रमाण अधिक असेल तर असे बुडबुडे तयार होऊ शकतात.
नायरी-तिवऱ्याचा बारमाही धबधबा: पूर्ण राज्यात दुष्काळाचे सावट असताना उन्हाळ्यात धबधबा हा शब्द ऐकायला पण छान वाटते ना. पण कोकणात बारमाही कोसळणारे चक्क तीन धबधबे आहेत. त्यातला एक आहे दाभोसा इथे, दुसरा आहे तरळे गावाजवळ नापणे इथे आणि तिसरा कसबा संगमेश्वरजवळ असलेला नायरी-तिवऱ्याचा धबधबा. कसबा संगमेश्वरला जाताना एक फाटा नायरी गावाकडे जातो. तिथून नायरी या छोटय़ाशा गावी आपले वाहन लावायचे आणि २ किलोमीटरची रम्य पायपीट करायची. ऐतिहासिक प्राचीनगड आपल्या पाठीशी असतोच. ही जंगलातील वाट आपल्याला थेट धबधब्याशी घेऊन जाते. हाच धोधवण्याचा धबधबा म्हणून ओळखला जातो. ऐन मे महिन्यातसुद्धा १५ फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहूनच प्रसन्न वाटते. डोहात पाणी कमी असेल तर इथे धबधब्याखाली अंग शेकून घेण्यासारखे दुसरे सुख नाही.
हेदवीची बामणघळ : हेदवी गावी हा निसर्ग चमत्कार आवर्जून पाहावा. कातळ खडकात एक मोठी नैसर्गिक घळ तयार झाली आहे. भरतीच्या वेळी पाण्याचा मोठा लोंढा इथे आत घुसतो, तो मागे जात असताना दुसरी लाट मागून येऊन त्या पाण्याला पुन्हा आत ढकलते. दुप्पट वेगाने आलेला हा पाण्याचा प्रवाह पुढे अडतो आणि एक मोठा पाण्याचा २५-३० फूट उंचीचा स्तंभ तयार होतो. भरतीच्या वेळा पाहून हा चमत्कार एकदा तरी पहावाच.
याचसोबत कोकणात असलेली गरम पाण्याची अनेक कुंड, हरिहरेश्वर इथे समुद्राच्या लाटा वर्षांनुवर्षे आदळून कडेच्या खडकांमध्ये झालेली जाळीदार नक्षी, मालवणजवळ असलेल्या हडी या गावी नदीमधे तयार झालेले बेट म्हणजेच पाणखोल जुवे, कोलाडच्या जवळ नागशेत गावी असलेले रांजणखळगे अशी एक ना अनेक निसर्गनवल कोकणात जागोजागी दिसतात. समुद्रकिनारे, किल्ले आणि मांसे याशिवाय कोकणात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या भटकंतीमध्ये समाविष्ट करायला हव्यात. अशा स्थळांना भेट दिली तर आपली भटकंती समृद्ध होऊ शकते.
आशुतोष बापट – ashutosh.treks@gmail.com

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Best American Short Stories O Henry Prize Stories author book
बुकबातमी: कथेतला ‘तृतीयपुरुष’ हरवला आहे?