आणखी सहा महिन्यांनी देश स्वतंत्र होऊन उणीपुरी सत्तर वष्रे पुरी होतील. सत्तर वर्षांनंतरही आमची मानसिकता अजून इंग्रजांचे गुलाम असल्यासारखी असल्याचा एक प्रसंग सोमवारी अनुभवण्यास मिळाला. इंग्रजांच्या हॉटेलात एका भारतीयाला प्रवेश नाकारल्याने ज्या ताजमहाल हॉटेलची निर्मिती सर दोराबजी टाटांनी केली त्या हॉटेलातील हा प्रसंग. बँकिंग उद्योगात क्रांती ठरावी, अशी एक सेवा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हस्ते व नंदन नीलेकणी हे प्रमुख पाहुणे असलेल्या समारंभात राष्ट्राला अपर्ण केली गेली. या समारंभासाठी किमान दोन डझन राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापकीय संचालक कार्यकारी संचालक उपस्थित होते. मुंबईच्या दौऱ्यावर असलेले इंग्लंडचे शाही जोडपे याच हॉटेलात मुक्कामाला होते. हॉटेलच्या आजूबाजूला असलेली सुरक्षाव्यवस्था जास्तच कडक होती. जिन्यावर येणाऱ्या व्यक्तींची छबी वरच्या मजल्यावरून जिन्याच्या दोन्ही अंगांनी प्रेक्षक आपल्या मोबाइलमध्ये कैद करण्याच्या तयारीत होते. कदाचित गव्हर्नर राजन यांचे आगमन थोडय़ाच वेळेत होणार असल्याने हे घडत असावे असे वाटले. परंतु भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. ही सर्व लगबग शाही दाम्पत्याची छबी टिपण्यासाठी होती. हॉटेलातील देशी व परदेशी पाहुण्यात जणू स्पर्धा लागली होती. इतक्याच गव्हर्नर राजन यांचे आगमन व शाही जोडप्याने हॉटेल सोडणे एकाच वेळी घडले. गव्हर्नर राजन जिन्यावरून वर येणार इतक्यात सुरक्षारक्षकाने त्यांना अडवले व जिना बंद असल्याचे सांगून दुसऱ्या रस्त्याने जाण्यास सांगितले. हॉटेलचा कर्मचाऱ्यांचा लवाजमा, साध्या वेशातील पोलीस हे शाही जोडप्यास निरोप देण्यास दरवाजापर्यंत आले असताना राजन यांची कोंडी झाली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरचे पद हे राज शिष्टाचारात केंद्रीय सचिव दर्जाचे पद आहे, याचा उपस्थितांना कदाचित विसर पडला असावा. शाही जोडपे निघून गेल्यावर राजन यांना दुसऱ्या रस्त्याने समारंभास्थळी आणण्यात आले. अतिथी देवो भव हे मान्य करूनही गव्हर्नरांचा योग्य मान न राखला गेल्याने मन विषण्ण झाले. इंग्रज देश सोडून सत्तर वर्षांनंतर आमची मानसिकता ही स्वत:ला गुलाम समजण्याची वृत्तीची कशी याचा ऊहापोह करण्याची वेळ आली आहे. व हीच वृत्ती राहिली तर आपला देश २०२० पर्यंत महासत्ता होण्याच्या नुसत्या तोंडाच्या वाफा दवडणार का हाही प्रश्न पडला.

वसंत मा. कुलकर्णी, मुंबई

यांची सुंदोपसुंदी करमणुकीइतकीच

‘नालायकांचे सोबती’ हा अग्रलेख (११ एप्रिल) वाचला. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर येथे केलेल्या भाषणाचा त्यात समाचार घेतला आहे. पण शिवसेनाप्रमुखांची साक्ष काढून त्यात ‘मुस्काट’सारखे वापरलेले शब्द ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकाच्या परंपरेला साजेसे नाहीत.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘सेक्युलर’ राजकारणाच्या दृष्टीने विचार करता भाजप व शिवसेनेमध्ये अजिबात फरक नाही. या दोन्ही पक्षांचा विशेषत: मुस्लिमांबद्दलचा दृष्टिकोन सारखाच आहे. त्यामुळे तत्कालीन राजकारणाच्या निमित्ताने या दोन पक्षांमध्ये जी सुंदोपसुंदी चालते तिला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने करमणुकीशिवाय काहीही अर्थ नाही. हे दोन पक्ष म्हणजे खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

जयश्री कारखानीस, मुंबई

या गाजरावर बहिष्कारच हवा

‘शंभर कोटीचे गाजर..’ हा अन्वयार्थ (११ एप्रिल) आणि अनुराग ठाकुरांची संतापजनक मुक्ताफळे (लोकसत्ता, १० एप्रिल) वाचली. म्हणे आयपीएल सामने महाराष्ट्राच्या बाहेर गेले तर शंभर कोटींचे नुकसान होईल! महाराष्ट्राचे नुकसान शंभर कोटींचे होईल, पण ‘बीसीसीआय’ची कमाई हजारो कोटींची होईल, हे सांगायला ठाकूर विसरले. आता धोनी म्हणतो आहे की, दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना करा.. तशी उपाययोजना गेल्या १५ वर्षांत झाली नाही, म्हणून तर लोकांनी दोन्ही काँग्रेसना घरी बसवले ना?

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला, त्याला बरेच महिने झाले. पण जेव्हा सोनाराकडून (उच्च न्यायालय) कान टोचले, तेव्हा सरकार आणि मुख्यमंत्री जागे झाले.. मग घोषणा केली गेली की आयपीएल सामने महाराष्ट्राच्या बाहेर गेले तरी चालतील, आम्ही त्यांना पिण्याचे पाणी देणार नाही. हे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. महाराष्ट्र पाण्याच्या थेंबाथेंबासाठी तडफतो आहे. अशा वेळी जनतेला कळकळीची विनंती करावीशी वाटते की, आयपीएल सामन्यांवर बहिष्कार टाका आणि ते पैसे ‘नाम’सारख्या संस्थेला देणगी द्या. मला खात्री आहे, आपण शंभर काय, हजार कोटी जमवू शकतो.

प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे (मुंबई)

अस्मितावाले अशा वेळी कुठे जातात?

पाकिस्तान व भारत संघातील नियोजित  क्रिकेट कसोटी सामना होऊ नये म्हणून काही ‘राष्ट्रप्रेमी’ म्हणवून घेणाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी रात्रीची वेळ साधत खेळ्पट्टी उखडून टाकण्याचा शूरपणा दाखवला होता. आता आयपीएल सामने मुंबईत खेळ्ण्यावरून वाद न्यायालयापर्यंत गेला आहे. असे असताना आयपीएलचे मुंबईतील सामने रद्द न केल्यास खेळपट्टी उखडून टाकू, असे सांगत महाराष्ट्राची येता-जाता अस्मिता जपणारा कोणीच कसा पुढे येत नाही?

श्रीराम गुलगुंद, चारकोप, कांदिवली (मुंबई)

करा की प्रक्रिया.. मिळवा महसूल!

बीसीसीआयकडे इतका पैसा आहे, की ‘आयपीएल’सारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे;  तेव्हा त्यांनाच सांडपाण्यापासून प्रक्रिया केलेले पाणी तयार होईल. अशी यंत्रणा तयार करायला भाग पाडले पाहिजे आणि जो महसूल मिळेल त्याचा दुष्काळी भागासाठी वापर केला पाहिजे. जनता थेंब थेंब पाण्यासाठी मरत असताना बीसीसीआयसारख्या धनाढय़ांना मदत करावीशी वाटत नाही, हे लज्जास्पद वाटते.

कृष्णा घुगे, अहमदपूर (जि.लातूर)

(मुकुंद नवरे (गोरेगाव, मुंबई), अरविंद वैद्य (सोलापूर), श्रीकांत परळकर (दादर, मुंबई), अ‍ॅड. किशोर र. सामंत (भाईंदर), अमित खोत यांनीही ‘आयपीएल’ महाराष्ट्रात भरविण्याच्या भलामणीवर नापसंती व्यक्त करणारी पत्रे पाठविली आहेत.)

समाजमान्य भारतरत्न

महात्मा जोतिबा फुले यांनी केलेल्या अलौकिक कार्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना गुरू मानले होते. अशा महात्मा फुले यांचा जयंती दिन (११ एप्रिल) ठिकठिकाणी आजही साजरा होतो, यात नवल नाही, परंतु या कार्याची भारत सरकारने दखल घेतली नाही. अद्यापि शासनाने भारतरत्न हा पुरस्कार त्यांना प्रदान केला नाही. शासनास त्यांच्या कार्याची जाणे नसणे ही फार मोठी शोकांतिका आहे.

‘भारतरत्न’चा गेल्या दशकभरातला इतिहास निराळा आहे. ‘देशसेवेच्या नावावर त्यांनी फक्त स्वत:चा विकास साधला,’ अशी टीकाही या पुरस्कारानंतर काहींवर झाली होती. याउलट, भारतरत्न पुरस्कार दिला म्हणजेच महात्मा फुलेंचा मोठेपणा वाढणार असे नाही, तर यामुळे या पुरस्काराची गरिमा मात्र निश्चितच वाढणार आहे. म. फुले यांनी केलेले कार्य केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नाही. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच नंतर देशाच्या कानाकोपऱ्यात मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली. त्यांनी केलेले अस्पृश्यता निवारणाचे आणि धर्मसुधारणेचे कार्य हेही मोठे आहे. शेतकरी तथा कष्टकरी यांच्यासाठीही त्यांनी भरीव कार्य केले. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. मुख्य म्हणजे विपुल असे ग्रंथलेखन केले. समाजहिताच्या या भरीव कार्याची दखल घेऊन शासन त्यांना भारतरत्न ही उपाधी प्रदान करो अथवा न करो, परंतु हे मात्र खरे की, महात्मा फुले हे समाजमान्य भारतरत्न आहेत.

सुनील डोंगरदिवे, मूर्तिजापूर (जि. अकोला)

गुजरातमधील दारूबंदीचे साक्षात् विनोद

‘चंद्रपूरमधील दारूबंदीचा तिजोरीला फटका’ (लोकसत्ता, ११ एप्रिल) या बातमीतील ‘गुजरातमध्ये महाराष्ट्रातून चोरून दारू जाते’ हे विधान अर्धसत्य आहे. सीमावासी महाराष्ट्रात येऊन पिऊन जातात; पण महाराष् ट्रातील दारू गुजरातेत अपवादाने मिळते. दमण, सिल्वासा, चंडीगढ या केंद्रशासित प्रदेशांतून किंवा हरयाणा, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांमधून येणारी दारू गुजरातमध्ये प्रामुख्याने मिळते, कारण महाराष्ट्रातील दारूचे भाव जास्त आहेत. दीव हा दमणचाच पिटुकला भाग तर दक्षिण गुजरातमधील मद्यरसिकांचे नंदनवन आहे. गुजरातमध्ये असे एकही गाव नाही जिथे दारू ‘या ना त्या मार्गा’ने मिळत नाही. महागडे  ब्रॅण्डसुद्धा उपलब्ध होतात.  एकदा का तुम्ही ‘मद्यरसिक’ आहात याची ‘विक्रेत्या’ला खात्री पटली की, मग ‘घरपोच सेवा’ सुरू होते. राज्याच्या मध्यवर्ती भागांत ‘क्वार्टर’ आणि ‘बीअर’ अपवादाने मिळते; मात्र तीही आजच्या महाराष्ट्रातील भावाच्या तुलनेत आणखी स्वस्त!

गुजरातेत पिताना कुणी आगळीक केली तर गुन्हा नोंद होऊ शकतो. मात्र बहुतेक स्टार हॉटेलला जोडमून बार आणि सरकारी नियंत्रण असलेली शोभिवंत दुकाने आहेत, जी दुपारी १२ वाजता उघडतात. तुम्ही पर्यटक आहात याचा पुरावा ‘पटवून’ दिल्यावर दरडोई एक ‘खंबा’ आणि परतीचे तिकीट असेल तर आणखी एक मिळू शकतो. विमानाने गेलात तर जास्त ‘जाच’ न होता विमानतळावर ‘सेवा’ आहे. तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर बरेच बरे आणि तुम्ही एनआरआय असाल तर ‘पायघडय़ा’च.

गुजरातेत संपूर्ण दारूबंदी असतानासुद्धा ‘दारूबंदी’ विभाग आहे. या विभागातर्फे जनतेला दारूच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्याबरोबरच स्थानिक ‘गरजवंतांना’ मद्यप्राशनाचे परवाने देण्याचे ‘सामाजिक कार्य’ केले जाते! दारूबंदी आणि त्यावरील साक्षात विनोद कुणाला बघायचा असेल तर, एकदा वापीला जाऊन प्रत्यक्षच पाहा!

–  पी. शामा, औरंगाबाद

loksatta@expressindia.com