उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचलचा अंतर्गत भाग आजदेखील अनेक बाबतीत दुर्गमच आहे. या प्रदेशात पर्यटकदेखील फारसे भेट देत नसताना, सात मराठी सायकलस्वारांनी मात्र मनसोक्त सायकली दौडवून अनोखी दिवाळी साजरी केली.
शहराच्या गजबजाटापासून कुठेतरी दूरवर गेल्या वर्षांची (२०१३) दिवाळी साजरी करायची होती. नेहमीच्या वाटेवर न जाता नवीन वाट शोधावी या विचाराने आम्ही नऊजण एकत्र आलो. ३० ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या सोळा दिवसांच्या अरुणाचल प्रदेशातील सायकलिंगमध्ये एक क्षणही प्रवासाचा शीण आला नाही. उलट इथे आलो नसतो तर आयुष्यात नक्कीच काहीतरी अविस्मरणीय गमावलं असतं ही भावना आज मनात आहे.
वालाँगजवळच्या सलंगम येथे टििडग नदीच्या पलीकडे गेल्यावर चीनमधून येणाऱ्या लोहित नदीचे पात्र सुरू होते अणि भारतीय हद्दीतील किबिथू या शेवटच्या गावाला पोहोचेपर्यंत ती सोबत असते. एका बाजूला लोहित नदीचं विशाल पात्र अणि दुसऱ्या बाजूला उंचच उंच डोंगर, असा हा जाऊन-येऊन साडेसातशे किलोमीटरचा पल्ला सायकलवर पार करण्याचा थरार वेगळा आहे.
आमचा पहिला मुक्काम टाफ्रागाम गावातील विवेकानंद केंद्र विद्यालयात होता. तेजू या जिल्ह्यच्या ठिकाणाहून आम्ही निघालो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. टाफ्रागाम तेजूपासून बारा किलोमीटर आहे, त्यात शेवटचे दोन किलोमीटर चढ. अरुणाचल प्रदेशमध्ये पहाटे साडेचार वाजता सूर्योदय होतो आणि दुपारी साडेचार वाजता अंधार. त्यामुळे अंधारात सायकल चालवायची होती. तासाभरात पोहोचू असा आमचा अंदाज होता. दहा किलोमीटर अंतर हेडटॉर्च लावून कापल्यानंतर चढाईला सुरुवात झाली. परंतु आमच्या अपेक्षेपेक्षा हा चढ अधिक होता. अंधारात सायकल चालवताना घ्यायला लागणारी खबरदारी, सायकलवरचे सामान अणि चढ त्यामुळे शरीर थकले होते. परंतु मुक्कामाच्या ठिकाणाच्या शंभर मीटर अगोदर आम्हाला ‘भारत माता की जय’, ‘ईस्ट हो या वेस्ट, इंडिया इज द बेस्ट’ अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या. वर पोहोचलो तर साधारण शंभर मुली आमच्या स्वागतासाठी हातात दिवे घेऊन उभ्या होत्या. आमच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून, गंध लावून आणि पेढे भरवून आमचे स्वागत करण्यात आले.
या अनपेक्षित स्वागताने थकवा क्षणार्धात कुठल्या कुठे पळून गेला. पंधरा दिवसांच्या सायकल प्रवासातला हा एक अनुभव. असे अनेक अनुभव आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आणि रोज येत होते. सायकलवर सामान लावून िहडणारे सात निळे-पिवळे तरुण (आमची आम्हाला आणि लोकांना लगेच ओळख पटावी यासाठी आम्ही या रंगांचे टी-शर्ट तयार केले होते.) पाहून अचंबित होणारे चेहरे, खूश होऊन जिलेबी खाऊ घालणारे हॉटेल मालक, आपल्या अंगणातील झाडांची फळे तोडायला देणारे स्थानिक, स्वत:हून बोलावून चहा आणि भजी खाऊ घालणारे लष्करी अधिकारी, म्यानमारमध्ये ‘लेक ऑफ नो रिटर्न’पर्यंतच्या वाटेवर सोडायला आलेला तिकडचा लष्करी अधिकारी, ‘कोल इंडिया’सारख्या राष्ट्रीय संस्थेच्या गेस्ट हाऊसमध्ये मोफत राहायची सोय, या आणि अशा अनेक गोष्टींचा अनुभव आम्ही या सफरीमध्ये घेतला.
आसामपासून सायकिलगला सुरुवात केल्यावर वालाँगपर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते लागले. लोहित नदीच्या बाजूने एका बाजूला असलेल्या उंचच उंच डोंगरांच्या कडेकडेने वळणं घेत जाणारा रस्ता, कधी कधी काही मीटर, तर कधी काही किलोमीटर फक्त चढाई आणि मग मस्त उतार, दोन डोंगरांना जोडणारे लष्कराने बांधलेले जुने लोखंडी पूल, एकच वाहन जाईल अशी अरुंद वाट, डोंगर फोडून काढलेला रस्ता, धबधब्यांचे साचलेले पाणी, तर कधी रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे झालेला चिखल.. त्यामुळे रोज काहीतरी वेगळे समोर वाढून ठेवलेले असायचे.
डोंगर आणि नदी बरोबरीनेच जात असली तरी प्रत्येक ठिकाणी त्यांचे रूप बदलते. नदीतील पाण्याचा निळाशार रंग, त्यातले दगड-गोटे, आक्रसलेलं आणि रुंद झालेलं पात्र तिची भव्यता सतत जाणवून देतात. डोंगरांवरही झाडांचे विविध कोलाज पाहायला मिळतात. अरुणाचल प्रदेशमध्ये शिरल्यानंतर भारत-चीन सीमारेषेच्या दिशेने जाताना घनदाट वृक्षराजी, सीमेजवळ पोहोचू तशी विरळ होत जाते. सीमेलगतच्या परिसरात हिरव्यागार वनराईचे रूपांतर सुरूच्या बनात होते आणि डोंगरमाथ्यावरही बर्फ दिसू लागतो. सायकलवरून हे अगदी जवळून पाहायला मिळतं आणि पावलोपावली बदलणारा हा प्रदेश पॅडल मारण्यासाठी आणखी प्रोत्साहित करतो.
ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले गेली दोन वष्रे या परिसरात भटकंती करत आहेत. त्यांना या प्रदेशातही सायकलिंग करता येऊ शकतं, हे प्रकर्षांने जाणवलं. त्याशिवाय तेथील निसर्गसौंदर्य, माणसं, युद्धाची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आणि सायकलस्वाराला सायकलिंगसाठी खुणावेल असा प्रदेश हे समीकरण येथे अगदी उत्तमरीत्या जुळून येतं. त्यामुळे आम्हाला येथे जाण्यासाठी विचार करायला भाग पाडण्यात आणि ही सायकल सफर यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता
या सायकल प्रवासाचं शेवटचं पण मुख्य स्थानक हे लोहितच्या डाव्या कुशीत वसलेलं टुमदार वालाँग हे होतं. वालाँगमधील युद्धस्मारक, १९८७ नंतर बंद पडलेली धावपट्टी, एका लढाऊ विमानाचे अवशेष यांना भेट देऊन रस्त्यावर आलं की, लोहित नदीचं पात्र पुन्हा आक्रसतं. वालाँगला धावपट्टीजवळच आता एक युद्ध स्मारक उभं आहे. त्यावर कोरलेल्या- ‘द सेण्टिनल हिल्स दॅट राउंड अस स्टॅण्ड बेअर विटनेस दॅट वी लव्ह अवर लँड. अमिडस्ट श्ॉटर्ड रॉक्स अँड फ्लेिमग पाइन वी फॉट अँड डाइड ऑन नाम्ती प्लेन. ओ लोहित जेण्टली बाय अस ग्लाइड पेल स्टार्स अबव्ह अस सॉफ्टली शाइन अॅज वी स्लीप हिअर इन सन अँड रेन’ या ओळी पुरेशा बोलक्या आहेत.
पर्यटकांच्या गराडय़ात लुप्त न झालेल्या आणि १९६२ च्या युद्धानंतर कात टाकलेल्या वालाँंगपर्यंत सायकलवरून जाता आलं. वालाँगपासून १८ किलोमीटर उंचावर असलेल्या ‘हेल्मेट टॉप’ या युद्ध स्मारकापर्यंत सायकिलग करण्याचा अनुभव सर्वात विलक्षण होता. तिथे सायकलिंगला आम्हाला जवळपास चार तास लागले. पहिला चार किलोमीटरचा चढ हा जवळपास ३०-४० अंशातलाच आहे आणि त्यापुढे नागमोडी वळणे घेत जाणारा अरुंद रस्ता. एरवीसुद्धा लष्कराच्या वाहनांशिवाय इतर वाहने तेथे जात नाहीत, त्यामुळे कुणी सायकलवर जाणं दुरापास्तच. अशा या रस्त्यावर पहिल्यांदाच सायकल गेली. पण भारतीय सनिक खाली वालाँगपासून ते भारत-चीन सीमेपर्यंत १९६२ साली तीन दिवस-रात्र चालत गेले होते, त्यांच्या तुलनेत आमचे कष्ट कुठल्याच परिमाणात बसत नव्हते.
चार तास सायकलिंग केल्यावर इतक्या उंचावर गरमागरम कॉफी आणि मोमोज एका स्थानिक मित्राने आम्हाला खाऊ घातले. तिथे जाऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी सायकलवरच भारत-चीन सीमारेषेवर असलेल्या काहो आणि किबिथू या गावांना भेट दिली. तो या सायकल सफरीचा सर्वोच्च िबदू होता. कारण या संपूर्ण प्रदेशातही पहिल्यांदाच सायकल जाऊन आली. सीमारेषेपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेल्या काहो या गावात जाण्यासाठी तर आजही तारांच्या पुलावरून जावे लागते. म्हणून पलीकडे जाताना आम्हीसुद्धा आमच्या सायकली रस्त्याच्या कडेला झाडांच्या फांद्याखाली झाकून ठेवल्या.
साधारण शंभर मीटरच्या या पुलावरून एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो. यावरूनच आजही येथील लोक इतर जगाशी कसे जोडले गेले असतील याची कल्पनाच केलेली बरी. काहोहून किबिथूला जाताना पुन्हा एकदा लोहित नदीचे पात्र विशाल होते. परंतु किबिथूला पोहोचतानाच दूरवरून दिसत असलेले चीनमधील बर्फाच्छादित डोंगर अंगावर येतात. किबिथू हे केवळ २०-२५ घरांचे गाव. पण सीमारेषेवर वसलेल्या या गावाच्या निसर्गसौंदर्याला तोड नाही. भारतातील कोणत्याही भागातील लोकांच्या आधी हे लोक सूर्याचं दर्शन घेतात. कारण सूर्योदय या प्रदेशातून होतो. समोर चीनमधून वाहत येणारी लोहित नदी आणि काही किलोमीटरवर डोळ्यांना दिसणार चीन. हा अनुभव खूपच विलक्षण होता. किबिथूहून वालाँगला परतताना अंधारातून सायकल चालवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. हा प्रवास साधारण २५-३० किलोमीटरचा. त्यात अनेक चढ-उतार ठरलेलेच. वालाँगच्या सहा किलोमीटर अलीकडे नामती प्लेन्सला असलेल्या युद्ध स्मारकाच्या ठिकाणी पोहोचल्यावर सपाट भूमीवरून १८० अंशांमध्ये केवळ ताऱ्यांनी खच्च भरलेलं आभाळ पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन न करता येणासारखाच.
डोंगराळ भागामुळे लोकसंख्या कमी, गावंही साधारण २५-३० किलोमीटर अंतरावर वसलेली. एका गावाची लोकसंख्या फार फार तर शंभर. लोकांच्या गरजाही मर्यादितच, त्यामुळे येथे लोक सतत प्रवास करत नाहीत. महत्त्वाचंच काम आलं तर थेट जिल्ह्यंच्या ठिकाणी जावं लागतं. हा प्रवासही रस्त्यांच्या उंच-सखलपणामुळे महाग. खासगी सुमो अथवा टेम्पो हेच प्रवासाचं माध्यम किंवा फार फार तर स्वत:ची गाडी अथवा बाइक. म्हणून या रस्त्यावर सायकलिंग करणारे आम्ही लोकांच्या आकर्षणाचा विषय झालो होतो. एखाद्या गावाच्या ठिकाणी गप्पा सुरू झाल्या की कुठून, कशासाठी, सायकलवरच का आलात ही प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची. एक-दोन दिवसांत अंगवळणी पडली होती. काही वेळेला आमचे छापील माहितीपत्रक देऊन काम व्हायचं, तर काही वेळेस अनेकांना वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलण्यातच अधिक रस असायचा. मुळात आम्हालाही ते हवंच होतं. कारण त्यासाठीच तर सायकलिंगचा अट्टहास केला होता. बोलताना त्यांची भाषा, खाणं, राहणं, पेहराव, व्यवसाय, विचारसरणी जाणून घेता यायची. एकाच देशात राहूनही आपण आणि ते यांमधला फरक हळूहळू लक्षात येत होता. उर्वरित भारत आणि ईशान्येकडील भारत यांमध्ये इतकं अंतर का आहे, याचा हळूहळू उलगडा होत होता. पण या संभाषणांमधून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे, ईशान्येकडील इतर राज्यांच्या तुलनेत अरुणाचल प्रदेश खूपच इतर भारतीय प्रदेशांकडे झुकलेला आहे. तिथे िहदीची अवहेलना आणि इतर प्रदेशांतील लोकांचा तिरस्कार केला जात नाही.
लांबचा पल्ला असल्यामुळे वाटेत कुठे कुठे राहता येईल हे ठरवले होते. काही मुक्कामी वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे आयत्या वेळी बदलावे लागले. त्यापकी सलंगम येथील मुक्काम लष्करी छावणीत झाला. उदयाक पास हा जवळपास २३ किलोमीटरचा चढ चढण्यासाठीच आम्हाला संध्याकाळचे चार वाजले. सततचा चढ आणि वाहनांची वर्दळ यामुळे पॅडलिंग थोडं हळू सुरू होतं. लोहित व्ह्य़ू पॉइंटवरही ठरवून काही वेळ घालवला. या ठिकाणाहून लोहित नदीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. उजव्या हाताला पसरलेल्या डोंगररांगा, समोर मनमौजीपणे वाहणारी लोहित नदी आणि डाव्या हाताला नदीच्या पात्रात ठसठशीतपणे दिसणारी परशुरामाची शिळा. एका नजरेत मावणार नाही, एवढा मोठा कॅनव्हास होता. उदयाक पासला आम्ही पोहोचलो तेव्हा अंधार पडायची वेळ झाली होती आणि आम्हाला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणखी २५ किलोमीटर अंतर पार करायचे होते. संध्याकाळी चार वाजता ते शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही एका टेम्पोसोबत दरीच्या पायथ्याशी असलेल्या सलंगम येथील हरी नावाच्या टपरीवजा हॉटेलवर आम्ही येतोय असा निरोप पाठवला. तिथे एक लष्कराची छोटी पोस्टही आहे, याची आम्हाला माहिती होती. परंतु लष्करासमोर आयत्या वेळी जाऊन उभं राहिल्यास किती सकारात्मक प्रतिसाद मिळेल याविषयी आम्ही साशंक होतो. पण निर्णय खाली पोहोचल्यावर घेऊ असे ठरले.
लेक ऑफ नो रिटर्न
प्रत्यक्षात ही आहे दलदल, पण डोंगराळ प्रदेश असल्यामुळे पूर्वी विमानांना या भागात सिग्नल मिळत नसे, त्यामुळे ती खाली हिरव्यागार दिसणाऱ्या गालीच्यावर उतरत. परंतु प्रत्यक्षात तिथे दलदल असल्याने बुडून गायब होत. पुढे इथवर जाणारा कच्चा रस्ताही तयार करताना अनेक कामगार गायब झाले, परिणामी त्याचे नाव ‘लेक ऑफ नो रिटर्न’ असे पडले. इथे जाण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधून बर्मा म्हणजेच आत्ताच्या म्यानमारमध्ये जाण्यासाठी पांगसाऊ पासला जावे लागते. जयरामपूरहून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या नामपाँगच्या पायथ्यापासून पांगसाऊ पासच्या रस्त्याला सुरुवात होते. इथून अवघ्या बारा किलोमीटरवर भारत-म्यानमार हद्द आहे. तिथे पोहोचण्यासाठी बारा किलोमीटरचा संपूर्ण चढाचा रस्ता आहे. त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. दर महिन्याच्या दहा, वीस आणि तीस या तीन तारखांना भारतीय हद्दीतून म्यानमारच्या हद्दीत मोफत जाण्याची परवानगी आहे. त्यासाठी एक दिवसाचा पास दिला जातो. व्यापाऱ्यांना जीवनावश्यक २२ वस्तू नेता-आणता येतात. पाच बाय दहा फुटाचे गेट, एवढीच काय ती हद्द. त्यातही आपल्या बाजूकडे लष्कराची छावणी आहे, परंतु म्यानमारचे अवघे दोन सनिक गेटवर पायात स्लीपर घालून उभे होते. पुढे काही मीटर अंतरावर लष्कराची चेक पोस्ट आहे.
भारत-म्यानमार सीमारेषेमधील अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता हा नो मॅन्स लँड आहे. म्यानमारमधील तरुण बाईक्सवरून एका हद्दीतून दुसऱ्या हद्दीत सोडतात. आपल्याला या प्रवासासाठी त्यांना ५०-१०० रुपये मोजावे लागतात. आम्हाला आपल्या लष्कराने सायकल घेऊन पलीकडे जायची परवानगी दिली. सुदैवाने म्यानमारच्या लष्करानेही ‘लेक ऑफ नो रिटर्न’पर्यंत सायकल वापरण्यास अनुमती दिली. तिथल्या लष्करी अधिकाऱ्याने आमच्यासोबत एक बाईकस्वारही काही अंतरापर्यंत पाठवला. लेकच्या दिशेने जाताना एका स्थानिक व्यक्तीने आम्हाला अडवले, परंतु तोपर्यंत आमच्यासोबतचा बाईकस्वार माघारी जाऊन चेक पोस्टवरील लष्करी अधिकाऱ्यास घेऊन आला होता. मग तो अधिकारी आम्हाला स्वत: लेकच्या दिशेने असलेल्या गावाच्या वेशीपर्यंत सोडायला आला. लेकपर्यंत जाणाऱ्या दोन किलोमीटपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूच्या कापणी करून ठेवलेल्या भातशेतीमधून वाट काढत आम्ही लेकपर्यंत पोहोचलो आणि लेकच्या किनारी बसून सोबत नेलेला जॅम-ब्रेड फस्त केला. दरम्यान, तिथे असलेल्या काही चिमुकल्यांनी लाकडी बोटीतून आम्हाला लेकमध्ये उगवलेली गुलाबी कमळे काढून आमच्यावर फेकून मारण्याचा खेळ सुरू केला होता. त्यातून आमच्याकडे जवळपास २०-२५ कमळं जमली. नावावरूनच लेकपर्यंत जाण्याची धास्ती वाटणाऱ्या जागेवरून आम्ही कमळांचे गुच्छ घेऊन परतलो. सीमेवर भरलेल्या बाजारात फेरफटका मारून थुक्पा, बर्मा चहा, खीर अशा स्थानिक पदार्थाचा आनंदही घेऊन परतलो.
आता अंधारात एकूण सतरा किलोमीटरचा रस्ता आम्हाला उतरायचा होता. आधीच्या वाटेत चढ असल्यामुळे जेवण पुढील मुक्कामावर करू म्हणत पुढे ढकलत आलो होतो. त्यामुळे सर्वानाच प्रचंड भूक लागली होती. टाफ्रागामहून निघताना बांधून घेतलेला पुलाव फस्त केल्यानंतर, गारठवणाऱ्या थंडीत आणि अंधारात आम्ही सायकल रांगेत चालवत घाट उतरवायला सुरुवात केली. सर्वाच्या कपाळावर चमकणारे दिवे आणि थोडय़ा थोडय़ा अंतरावर एकामागोमाग सर्व आहेत याची खातरजमा करण्यासाठी एक ते सात आकडे घेत सायकली उतरवत होतो. खपूच रस्ता होता. डावीकडे खड्डा, उजवीकडे खड्डा, पाणी, दगड, झाड पडलंय अशा सूचना देत पॅडलिंग सुरू होतं. मध्येच थांबून एकमेकांवर विनोद करणं, कोणी झोपत नाही ना याची खातरजमा करणं हे सुरूच होतं. साधारण अर्धा रस्ता उतरल्यावर वाटेतच एका साधूची झोपडी लागली अंधारात अनोळख्या ठिकाणी काही गडबड नको म्हणून आम्ही त्याला टाळून भराभर पुढे गेलो, तरी आम्हाला पाहून त्याने ‘जय भोलेनाथ’ची आरोळी ठोकलीच. मिट्ट काळोखात, धुराच्या सान्निध्यात आणि गांजाच्या संगतीने तो उघडाबंब साधू गारठय़ातही ताजातवाना होता. गेली पंचवीस वष्रे तो तिथे ठाण मांडून बसला आहे, हे आम्हाला परतीच्या प्रवासात कळले.
सलंगमला उतरेपर्यंत सात वाजले होते. आमच्या आधीच गाडीतून पुढे गेलेल्या आल्हाद गोडबोले यांनी लष्कर आणि हरी हॉटेलमध्ये आमचा निरोप देऊन ठेवला होता. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवणाची आणि लष्कराकडे राहण्याची सोय असे गणित जुळून आले. जवानांनी पिण्यासाठी गरम पाणी दिले, उणे २५ तापमानामध्ये वापरल्या जाणाऱ्या स्लििपग बॅग आम्हाला झोपायला दिल्या. रात्री बराच वेळ आम्ही तिथल्या दोन जवानांसोबत गप्पा मारत होतो. सकाळी उठल्यावर चहा देताना त्यांनी आयत्या वेळी न्याहरी आणि जेवणाची सोय करू शकलो नाही, याबाबत दिलगिरीही व्यक्त केली. पण आमच्यासाठी एवढेच भरपूर होते. सकाळी तिथून निघताना आम्ही मुंबईहून नेलेला चिवडा आणि खाज्याचे पाकीट देऊन त्यांचा निरोप घेतला. साधारण १०-१२ किलोमीटर अंतर उतरवल्यावर आम्ही टििडग नदीच्या पुलावर येऊन पोहोचलो. टििडग नदीवरचा जुना लोखंडी-लाकडी पूल फोटोग्राफीसाठी करण्यासाठी खुणावत होता. पुलावर उभं राहून नदीमध्ये पाहिल्यास पाण्याखालच्या दगड-गोटय़ांचे रंग अगदी स्पष्टपणे सांगता येतील इतके शुद्ध पाणी वाहत होतं. त्या दिवशी दिवाळी होती आणि या जागेशिवाय घरापासून-शहरापासून इतकी चांगली जागा दिवाळी साजरी करायला मिळूच शकली नसती. २०१३ ची आमची दिवाळी टििडग नदीवर साजरी झाली. खडखडे लाडू भरवून एकमेकांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सायकलसोबत फोटो काढले आणि या क्षणासाठी इथवर आणल्याबद्दल प्रत्येकाने मनोमन सायकलचे आभारही मानले.
असा झाला सायकल प्रवास
सोळा दिवसांमध्ये साधारण साडेसातशे किलोमीटर सायकलिंग झाले. साडेसात हजार फुटांवरून सुरुवात केल्यानंतर आम्ही जवळपास साडेआठ फुटांपर्यंत सायकल वरून आलो. मुंबई-कोलकाता-दिब्रूगढ (आसाम) असा विमानप्रवास केल्यानंतर, दिब्रूगढच्या मोहनबारी विमानतळ ते तिनसुखिया हा तीस किलोमीटरचा प्रवास टेम्पोमध्ये पॅक केलेल्या सायकल टाकून केला. दुसऱ्या दिवशी तिनसुखिया (आसाम) ते अरुणाचल प्रदेश आणि आसामची सीमारेषा असलेल्या दिराक गेटपासून सुरू झालेला सायकल प्रवास भारत-चीन सीमारेषेला भोज्जा करून, म्यानमारमध्ये साधारण १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून पुन्हा एकदा आसाममधील तिनसुखिया या शहरात येऊन थांबला. दिराक गेट – तेजू – सलंगम – हायलिआंग – चांगवन्ती – वालाँग आणि परशुराम कुंडावरून परत येताना ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या स्टिलवेल किंवा लिडो रोडवरून सायकलिंग केलं. याच रस्त्यावर असलेल्या लेखापानी या सद्य:स्थितीत सुरू नसलेल्या ईशान्येकडील भारताच्या शेवटच्या रेल्वे स्थानकालाही भेट दिली. तिथून सायकलिंग करतच पांगसाऊ पासपर्यंत गेलो. हा पास भारत आणि म्यानमारच्या सीमेवर आहे. तिनसुखियापर्यंतच्या परतीच्या प्रवासात जयरामपूर तसेच दिगबोईमध्ये असलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारकाला आणि ज्या ठिकाणी भारताला पहिल्यांदा तेल सापडलं त्या जागी उभारण्यात आलेल्या म्युझियमलाही भेट दिली. वाटेत वाक्रो – जागून – खरसांग – जयरामपूर – मार्गारेटा – तिनसुखिया करत पुन्हा एकदा मुंबईसाठी दिब्रूगढहून आकाशाच्या दिशेने झेपावलो.
दुसऱ्या दिवशी आम्हाला चांगवन्ती या गावी पोहोचायचे होते. पण तो मुक्काम हुकला आणि आम्ही चांगवन्तीच्या अलीकडे २५ किलोमीटर कुईबांग नावाच्या गावात एका शाळेतील तौसिक या शिक्षकाकडे राहिलो. त्याने तो राहत असलेली शाळेची खोली, जेवण तयार करण्यासाठी स्वयंपाकघर असं सर्वच आमच्या हवाली केलं.
वालाँगहून परतीच्या प्रवासात परशुराम कुंडाच्या बाजूला राहायची वेळ आमच्यावर आली. उदयाक पासवरून कुंडाच्या दिशेने खाली उतरताना माझ्या सायकलचा टायर पंक्चर झाला आणि त्यानंतर निकामी झालेल्या ब्रेक पॅडने हा प्रवास आणखीनच मंद केला. त्याचा परिणाम आम्हाला तिथून पंधरा किलोमीटरवर असलेल्या वाक्रो या गावी पोहोचणे अवघड होऊन बसले. त्यामुळे कुंडाशेजारी असलेल्या मंदिरात राहण्याची व्यवस्था होते का हे पाहण्यासाठी आशीष गेला. राहण्याची व्यवस्था होईल, पण भोजन मिळणं कठीण आहे, असं तिथल्या साधूने सांगितलं. एका किलोमीटरवर असणाऱ्या रस्त्यालगच्या हॉटेलात खाण्याची सोय होत होती. भारत, म्यानमार आणि चीन या तिन्ही देशांच्या सीमा जिथे मिळतात, त्या अन्जाव जिल्ह्यतून लोहित नदी वालाँगला येते. पुढे तेजूजवळ ती आसामच्या पठारावर उतरते. इथपर्यंतचा तिचा अवखळ प्रवास परशुराम कुंडापाशी शांत होतो.
आम्हाला राहण्यासाठी देण्यात आलेला मोठा हॉल प्रत्यक्षात चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे खंडहर होता. वीज नाही, एका कोपऱ्याला सुकलेलं गवत पडलेलं, आजूबाजूला फिरणारी पाखरं असं काहीसं. शहरात लख्ख प्रकाशात राहणाऱ्यांसाठी तर ते फारच भीतीदायक. नाही म्हणायला साधूबाबांनी आम्हाला अंथरायला एक मोठी सतरंजी दिली होती. ती हॉलच्या मधोमध अंथरून आम्ही सर्वानी त्यावर ठाण मांडलं. एका बाजूला दरीतून येणारा वारा आणि वाहत्या पाण्याचा आवाज व दुसऱ्या बाजूला आम्ही राहत असलेल्या अंधाऱ्या खोलीबाबतच्या शंकाकुशंका. पण त्या ठिकाणी गोल बसून नकाशावर टॉर्च मारून पुढील प्रवासाची केलेली आखणी केवळ धमाल. साधूबाबांनी नाही म्हणत म्हणत तिथल्या काही साधूंच्या मदतीने आमच्या जेवणाची सोय केली. गरमागरम गव्हाच्या चपात्या, बटाटय़ाची भाजी आणि नुकत्याच व्यालेल्या गाईचे गरम दूध असा जेवणाचा बेत होता.
सकाळी निघताना साधूबाबांना भेटायला गेलो तेव्हा ते ध्यान करायला बसले होते. आयत्या वेळी केलेल्या आमच्या आदरातिथ्याबद्दल आम्ही त्यांना दक्षिणा देऊ केली, त्यांनी निमूटपणे काहीही न बोलता हसतमुखाने ठेवून घेतली. असाच आणखी एक कायमस्वरूपी लक्षात राहिला तो मार्गारेटामधील मुक्काम. मार्गारेटा हे मोठे शहर असल्यामुळे तिथे जाऊन मिळेल तिथे राहायचं असा आमचा मानस होता. पण वाटेत भेटलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने आम्हाला थांबवून ‘कोल इंडिया’च्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याबाबत सुचवले. विशेष म्हणजे आमची तिथे केवळ राहायची मोफत सोयच झाली नाही, तर तिथे असलेल्या पीटीआयच्या स्थानिक फोटोग्राफरने खूश होऊन रात्री स्वखर्चाने जेवण दिले. विवेकानंद केंद्र विद्यालय शाळांमधील सर्वच मुक्काम कायम स्मरणात राहणारे आहेत. तिनसुखिया, टाफ्रागाम, आमलिआंग शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आम्हीसुद्धा त्यांच्यातलेच होऊन गेलो होतो.
उर्वरित देशाच्या तुलनेत हा प्रदेश अगदीच वेगळा आहे. डोळे दिपवून टाकणारं निसर्गसौंदर्य, साधी-कष्टाळू-सुंदर माणसं आणि सर्वापासून अलिप्त राहूनही आनंदात जगायला शिकवणारी जीवनशैली यामुळे हा प्रदेश पहिल्याच भेटीत आपलंसं करून टाकतो. या प्रदेशाचा नसíगक ढाचा लक्षात घेता सायकल आणि या प्रदेशाची जोडी अगदी उत्तमरीत्या जमते. दूरदूरवर पसरलेलं अस्मानी सौंदर्य न्याहाळत सायकलवरून फिरणं या प्रदेशाच्या जातकुळीला शोभणारं आहे. सोळा दिवसांच्या या सायकल प्रवासानंतर कुणाच्याही चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. पॅडल मारून पाय थकलेले नव्हते. उलट वेळेअभावी वाटेत असलेल्या काही ठिकाणांना भेट देण्याची संधी राहूनच गेली याची खंत आजही आहे. परंतु खंत करत बसणं हा भटक्यांचा स्वभाव नाही, त्यामुळे पुढील वर्षी अशीच एखादी सायकल सफर कुठल्या भागात करता येईल याची आत्तापासून मोहीम सुरू झालेली आहे.