आपल्या शरीराची गरज खूपदा आपल्याला समजतेच असे नाही. आयुर्वेदाने त्यातले मर्म ओळखून असे काही उपाय सांगितले आहेत, जे आपल्याला फारसे आवडणार नाहीत पण शरीराला गरजेचे असतील.
कोरडा मसाज, अंग रगडणे
हल्ली अॅक्युप्रेशर या शास्त्राची खूप मोठी चलती आहे. आयुर्वेदात एकशे सात मर्मस्थाने सांगितली आहेत. ती स्थाने व अॅक्युप्रेशरची दाबण्याची ठिकाणे फार भिन्न नाहीत. आपल्याकडे कोरडय़ा द्रव्यांचा मसाज किंवा अंग रगडून, चेपून घेण्याची प्रथा आहे. ज्यांचे पूर्णपणे वाताचे दुखणे आहे, तेल मसाज करून त्रास होतो, दिवसभर श्रमाचे काम आहे त्यांनी अंग रगडून घेण्याचा अभ्यास जरूर करून घ्यावा. माझ्या वडिलांना नाना सत्याग्रहांत गोऱ्या सोजिऱ्यांच्या लाठय़ा, काठय़ा, बुटाच्या लाथा खाव्या लागल्या होत्या. त्याशिवाय पाठीवर कापडाची ओझी वाहून त्यांनी फिरतीचा व्यवसाय केला. यामुळे उतार आयुष्यात कंबर खूप दुखायची. त्याकरिता मी नियमितपणे तेलाचा किंवा संगजिरे चूर्णाचा मसाज करायचो. वडिलांना बराच आराम पडायचा.
लेप
लेप ही आयुर्वेदाची स्पेश्ॉलिटी आहे. लेपांचा उद्देश दोन प्रकारचा असतो. सूज, दु:ख, जखडणे कमी करणे किंवा आग, उष्णता, लाली कमी करणे. यात पहिल्या प्रकाराचा लेप जाड असतो. त्याने दीर्घकाळ उष्णता धरून ठेवून दुसऱ्या भागाला ती उष्णता द्यायची असते. ही द्रव्ये कोणतीही असोत ती उष्ण असावीत. उष्णता कमी करण्याकरता जे लेप लावायचे ते गार, पातळ व पुन:पुन्हा लावावे. हा लेप सुकला की काढून टाकावा. या लेपाने त्या जागेची उष्णता शोषून घेतली जाते.
शोधन
शरीराचे स्वास्थ टिकवणे किंवा रोग हटविणे याकरिता आपल्या शरीरास थोडा वेळ क्लेश द्यावे लागतात. कष्ट होतात, न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तसेच उलटी व जुलाब किंवा डाग देणे, रक्त काढणे या उपायांचे आहे. शरीरातील फाजील वाढलेले दोष जवळच्या मार्गाने काढून टाकणे काही वेळा फारच आवश्यक असते. जेव्हा कफ वा पित्त खूप वाढते, माणूस बलवान आहे तेव्हा हे उपचार जरूर करावे. ज्या उपायांनी तात्काळ आराम पडतो. आपल्या सृष्टीत मांजराला अजीर्ण झाले तर ते गवत खाते व उलटी करवते. माकडाला खाणे जास्त झाले तर बाहाव्याच्या शेंगाचे झाड शोधून शेंगा खाऊन जुलाब करवते. रानटी बैल किंवा हत्ती माजाला आले की आपसात तुंबळ युद्ध करून माज उतरवितात. आम्हाला मात्र उलटीला किंवा रक्त काढायला भय वाटते, हे बरोबर नाही.क्रोध, क्षुधानिग्रह, मद्यपान
शास्त्रात सर्वाना पटणारे अनेक उपाय आहेत, तसेच माझ्यासारख्या साशंक व्यक्तीला न पटणारे उपायही घाम काढण्याकरिता सांगितलेले आहेत. या उपायांमागचे मर्म लक्षात घेऊन तारतम्याने त्याचा वापर करावा. भरपूर मद्यपान केल्यास शरीरातून खूप घाम बाहेर पडतो. किंवा अनेकदा माणसाला खूप क्रोध करावयास भाग पडले तर त्याच्या शरीराला बऱ्यापैकी घाम फुटतो. उपाशी राहूनही घाम निघतो अशा उपायांवर चिंतनाची गरज आहे.
उलटी
आमाशयात फार कफ किंवा पित्त साठले, पच्माशयात साठले तर दमा, खोकला, पोटफुगी, तोंडाला पाणी सुटणे, उलटीची भावना, अंगाला खाज सुटणे, कफ-पित्ताच्या तक्रारीत मीठ पाणी पिऊन उलटी करावी. ती सुसह्य़ व्हावी, लवकर व्हावी असे वाटत असेल तर पाण्याअगोदर भरपूर दूध किंवा उसाचा रस किंवा दोन्ही प्यावे. त्यानंतर पुन्हा असे दोष वाढू नये म्हणून काळजी घ्यावी. मीठ पाण्याने उलटी होत नाही असे वाटले तर मोहरीचे पाणी वापरावे. हे व याशिवाय इतर पदार्थ तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावे. नवजात अर्भकाला वेखंड, मध चाटविण्याचा उद्देश फाजील कफ पडून जावा हाच आहे. मध मोठय़ा प्रमाणात घेतला तर उलटी होते.
जुलाब
जुलाबाची शेकडो औषधे बाजारात आहेत. त्यापेक्षा प्रथम मनुका, द्राक्षे, अंजीर, गुलाबफूल, दूध व तूप असे निरुपद्रवी पदार्थ वापरून बघावे. कडू दोडका, कडू घोसाळे यांच्या बियांचे चूर्ण उलटी किंवा जुलाब दोन्ही करवते. किंवा वायूच्या तक्रारीकरिता तीन महिन्यांतून एकदा मोठय़ा मात्रेने एरंडेल तेल जरूर घ्यावे. सोबत सुंठीचा काढा घ्यावा. भरपूर केळी रात्री खाउन काहींना जुलाब लागू पडतो. प्रयोग करून पाहावयास हवे.
रक्तक्षोमण, डाग व क्षारकर्म
इसब, गजकर्ण, नायटा या वाहत्या, पू असलेल्या त्वचा विकारात खूप खाज असली तर थोडे काचेच्या तुकडय़ाने न भिता इसब किंवा गजकर्णावरून जोरात व वेगाने ओरखडे काढावे. थोडे अशुद्ध रक्त जाऊ द्यावे. बरेच वाटते. मात्र हा प्रयोग बलवान माणसांवर जरूर करावा. तळपायाच्या कुरूपाला सळई, चमचा, उलथने लालबुंद तापवून डाग द्यावा. वर राख किंवा चांगले तूप लावावे. कुरूप लवकर बरे होते. करूप कापू नये. मूळव्याधीचा मोड किंवा चामखीळ, फाजील वाढलेले मांस, जाड कातडी याकरिता अनेक क्षार घासून लावावे. आघाडा, सातू, केळीचे खुंट, निवडुंग, रुई अशा विविध वनस्पतींचे पचांग जाळून पाण्यात भिजत ठेवून, ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात. क्षाराचे तंत्र तसे पाहिले तर अजिबात अवघड नाही. काही नाही तर मीठ व हळद पूड या वाढलेल्या मांसल भागाला घासून लावून पाहावी. मोड, चामखीळ बसून जाते. थोडे झोंबते.
फुले, चूळ
माळीण किंवा नाकाला सूज येणे, नाक ठणकणे याकरिता सुगंधी फुले हुंगावयास सांगितली आहेत. लहानपणी उघडय़ावर झोपलो असता माझे स्वत:चे कानात किडा गेला. तो आत फिरु लागला. मला विलक्षण तीव्र वेदना होऊ लागल्या. माझे वडील ‘वैद्य खडीवाले’ यांनी लगेच कोमट पाण्याची चूळ भरून माझ्या कानात जोरात सोडली. त्याबरोबर किडा बाहेर आला. एका क्षणात मला बरे वाटले. ही १९४० सालची गोष्ट असावी. या ‘औषधाविना उपचाराला’ काही विलक्षणच मोल आहे.
मीठ, हळद
काही वेळेस पडजीभ वाढते, खोकला सुरू होतो. पडजिभेला चमच्याच्या टोकाने मीठ किंवा हळद चेपून लावण्याबरोबर पडजीभ बसते. खोकला थांबतो.
घोडय़ाचा केस, मीठ, तेल
मूळव्याध हा विलक्षण पीडा देणारा विकार आहे. या विकारात जेव्हा हाताला लागण्यासारखा थोडा मोठा मोड असतो, त्यावेळेस घोडय़ाचा केस त्या मोडाच्या मुळाशी चांगला ताण देऊन बांधला की प्रथम थोडा त्रास होतो. पण दोन-तीन दिवसांनी मोड गळून पडतो. याच प्रकारे चामखिळीला घोडय़ाचा केस बांधून शस्त्रक्रियेशिवाय चामखीळ काढता येतात. मात्र चामखिळी थोडय़ा मोठय़ा हव्या. चिखल्या हा विकार पाण्यात काम करणाऱ्या बायकांच्या पाचवीला पुजलेलाच आहे. चिखल्या झालेल्या बेचक्यात रात्री, कणभर मीठ मिसळेलं गोडेतेल घासून लावावे. प्रथम थोडे झोंबते. आरडाओरडा करावासा वाटतो. पण चिखल्या रात्रीत बऱ्या होतात. माझ्या कुटुंबावर या उपचाराचा प्रथम प्रयोग केला, तो यशस्वी ठरला.
राख, शेण
भाजलेल्या जागी गवारीची किंवा शेणाची राख किंवा गोडे तेल किंवा दोन्हीचे मिश्रण फोड येऊ देत नाही. फोड बसून जातात. कुठे कापले, खरचटले, जखम झाली, रक्त वाहू लागले तर गाईचे शेण थापावे. गाईचे शेण व गोमूत्र मोठे अॅन्टीसेप्टिक आहे.
गुळण्या
काही लहान मुलामुलींना चष्म्याचा वाढता नंबर ही समस्या होऊन बसली आहे. नियमाने सकाळी साध्या पाण्याच्या खळखळून चुळा भरणे, तसेच नाकाने पाणी पिण्याचा नित्य उपक्रम चालू केल्यास सतत वाढणारा चष्म्याचा नंबर कमी होतो. सर्दी, पडसे, खोकला, दमा, आवाज बसणे या विकारात मीठ, हळद व गरम पाण्याच्या गुळण्या अर्धा विकार बरा करतात. विकार वाढू देत नाही, माहीत असूनही आम्ही नुसतीच औषधे मागतो. तोंड येणे, घशात फोड येणे या तक्रारीत याच पद्धतीने तूप व गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. आराम पडतो हे निश्चित.
हवापालट
कफाचे विकार, सर्दी, पडसे, खोकला, दमा, क्षय यांसारख्या रोगात दिवसेंदिवस औषधे काम करेनाशई झाली आहेत. रोगप्रतिकारशक्ती कमी पडते. रोग औषधांना पुरून उरतो. नवनवीन औषधांचे संशोधन काहीच करू शकत नाही असे दिसते. अशा वेळेस हवापालट हा मोठाच उपाय आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान तीन आठवडे हा प्रयोग करावा. तसेच त्या काळात दीर्घश्वसन, प्राणायाम करून फुप्फुसाची ताकद वाढवावी व पुन्हा नवजीवन प्राप्त झाल्यासारखे रोगाशी लढावे. ज्यांना हवापालट शक्य नाही त्यांनी किमान ज्या खोलीत आपण राहतो, रात्री झोपतो ती खोली बदलावी. त्यामुळे दीर्घकालीन दूषित हवेपासून लांब गेल्याचा फायदा फुप्फुसांना मिळतो.
(पूर्वार्ध)
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com