स्वरतीर्थ सुधीर फडके आणि शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांचा एकत्रित कलाविष्कार असणारं गीतरामायण म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या संस्कृतीचं संचित. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील अमराठी रसिकांवरील जिची मोहिनी अद्याप ओसरलेली नाही, ती ही कलाकृती १ एप्रिलला हीरकमहोत्सवी वर्षांत प्रवेश करत आहे. त्यानिमित्त या सोनेरी पर्वाला दिलेला उजाळा..
चाळीत किंवा इमारतीत एखाद्याच घरी असणाऱ्या रेडिओ सेटवर गंध, अक्षता, फुलं वाहिली आहेत, निरांजनं ओवाळली जातायत. त्या रेडिओसमोर श्रोते दाटीवाटीने तरी प्रचंड उत्कंठेने बसलेत, ज्यांना बसायला जागा मिळाली नाही ते बाहेर उभे आहेत.. हे सर्व कशासाठी? तर दोन-चार मिनिटांचं निवेदन आणि त्यानंतरचं पाच मिनिटांचं गाणं ऐकण्यासाठी.. आजच्या पिढीला हे सगळं विचित्र, अतक्र्य आणि कदाचित हास्यास्पद वाटू शकेल. मात्र ‘गीतरामायण’ नावाच्या महाकाव्याने आजपासून बरोबर ५९ वर्षांपूर्वी उभ्या-आडव्या महाराष्ट्रावर असं गारूड केलं होतं. गदिमा आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष श्रोत्यांना वर्षभर दर आठवडय़ाला नव्याने पटत होती. अवघा महाराष्ट्र त्या प्रतिभेच्या चांदण्यात न्हाऊन निघाला, श्रीमंत झाला.
गीतरामायणाचा जन्म, त्याचा वर्षभराचा प्रवास, त्याला लाभलेली अभूतपूर्व लोकप्रियता आणि काळाच्या कसोटीवर टिकलेलं त्याचं ताजेपण या साऱ्या गोष्टी अचंबित करणाऱ्याच. एवढा सुंदर योग यापूर्वी खचितच जुळून आला असेल. गदिमांचे स्नेही सीताकांत लाड यांच्या मनात पुणे आकाशवाणीसाठी एक सातत्यपूर्ण आणि संस्कारक्षम कार्यक्रम करण्याची कल्पना येते काय आणि गदिमा व बाबूजींच्या सहकार्यातून त्या कल्पनेला मूर्तस्वरूप येतं काय, सारंच विलक्षण. १९५५ ची रामनवमी अगदी तोंडावर आली असता गीतरामायणाच्या रम्य कल्पनेवर या तिघांनी शिक्कामोर्तब केलं आणि अतिशय घाईघाईत तरीही दर्जाशी तडजोड न करता ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ हे पहिलं गीत जन्माला आलंही. यानंतर ठरल्याप्रमाणे गदिमा दर आठवडय़ाला एक गीत लिहीत गेले आणि बाबूजी त्यावर साजेसा स्वरसाज चढवत गेले. एका कवीने वर्षभर दर आठवडय़ाला एक गीत लिहायचे आणि त्याच संगीतकाराने ते स्वरबद्ध करायचे, हा प्रकार अनोखाच. त्या काळाचा विचार केला, तर हा तोंडात बोटं घालायला लावणाराच प्रकार. तेव्हाची मराठी चित्रपटसृष्टी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी विभागलेली होती. सर्वाधिक मागणी असणारे गीतकार-संगीतकार असल्याने बाबूजी आणि गदिमांचा या तीनही शहरांत सातत्याने राबता. त्यामुळे किती व्यग्र वेळापत्रकातून त्यांनी या सर्जनासाठी वेळ दिला असेल, याची कल्पनाच करावी. रामकथा हा गदिमांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे ते विनासायास एकेकगीत लिहीत गेले. गदिमांच्या इतर रचनांप्रमाणेच या रचनांचेही एक प्रमुख वैशिष्टय़ आहे व ते म्हणजे त्यातील चित्रमयता. ही गीते ऐकतानाच नव्हे, तर केवळ वाचतानाही त्यातील प्रसंग कल्पनाचक्षूंसमोर क्षणार्धात उभे राहतात. ‘कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे’ किंवा ‘सोडुनि आसन उठले राघव, उठूनी कवळती आपुले शैशव, पुत्रभेटिचा घडे महोत्सव, परि तो उभयां नच माहिती’ या ओळी असोत, आपल्याला तो प्रसंग सहज दिसू लागतो. सूर्य डोक्यावर आलेला असताना झालेल्या रामजन्माचं वर्णन करताना त्यांच्या प्रतिभेला बहर आला आहे. ‘चैत्रमास त्यांत शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गं सखे राम जन्मला’.. हे ऐकणारा दंगच होतो. ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा’ या गीतात तर त्यांनी मानवी जीवनातील अटळ सत्याचं अतिशय भावस्पर्शी कथन केलं आहे. ही गीतं केवळ राम-सीतेची नाहीत, तर दशरथ, कौसल्या, भरत, कैकेयी, हनुमान, सुग्रीव, जटायू आदी २७ पात्रांच्या तोंडी असलेल्या विविध भावनांना गदिमांनी शब्दबद्ध केलं आहे.
सान-थोर नादावले…
गीतरामायणाच्या श्रवणाने केवळ सर्वसामान्यच आनंदले नाहीत, तर या आविष्कारात देशातील अनेक थोर मंडळीही मुग्ध झाली होती. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीप्रकाश यांच्यासह १९५८मध्ये पंढरपूर येथे बाबूजींच्या स्वरात गीतरामायण ऐकले, त्या वेळी गदिमाही उपस्थित होते. या दोघांनी या कलाकृतीला मनापासून दाद दिली. त्याच वेळी पंढरपूरमध्ये भरलेल्या सवरेदय संमेलनाच्या निमित्ताने विनोबा भावे यांना केवळ १० मिनिटे व तेही पहाटे पाच वाजता गीतरामायण ऐकवण्याची संधी बाबूजींना मिळाली. या १० मिनिटांचा एक तास कसा झाला, ते कोणालाही समजलं नाही. विनोबांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तेव्हा बाबूजी थांबले. या वेळी गदिमांनी विनोबांना गीतरामायणाची एक प्रत भेट दिली.
गीतरामायणातील गीते काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असत. त्या कात्रणांची अनेकांनी चिकटवही केली होती. असा संग्रह करणाऱ्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हेही होते! ‘माडगूळकरांना एकदा त्यांच्या सोयीने भेटायला घेऊन या’ असा निरोप सावरकरांनी बाबूजींकडे धाडला. त्या भेटीत सावरकरांनी माडगूळकरांचा सत्कार केला. ‘आजच्या पिढीत तुमच्या योग्यतेचा दुसरा कवी नाही’ अशा शब्दांत गौरव केला. यामुळे गहिवरलेले माडगूळकर बाबूजींना म्हणाले, एका महाकवीने केलेल्या या सत्कारापेक्षा मोठा सन्मान तो कोणता?
ज्येष्ठ साहित्यिक आणि पंडितांनीही गदिमांचं वेळोवेळी कौतुक केलं. लोकमान्य टिळकांच्या गायकवाड वाडय़ात एका जाहीर कार्यक्रमात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी गदिमांना ‘आधुनिक वाल्मीकी’ ही पदवी दिली.
या गीतांचं आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांतील गेयता. या गेयतेमुळेच बाबूजींच्या हातात जेव्हा गीताचा कागद पडत असे, तेव्हा ते पहिल्यांदा वाचतानाच त्यांच्या मनात सुरांची कारंजी उसळी घेत असावीत. गदिमांच्या या विविधरंगी प्रासादिक रचनांना बाबूजींनी तेवढाच तोलामोलाचा स्वरसाज चढवला आहे. त्यासाठी त्यांनी वाद्यांचा भव्य ताफा वगैरेचा सोस केलेला नाही. कमीत कमी वाद्यवृंदाने या सोप्या रसाळ सुरावटींना तोलून धरलं आहे. कोणत्याही मैफलीची सुरुवात साधारणपणे भूप रागाने व अखेर भैरवीने करण्याचा अलिखित संकेत आहे. ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ हे गीत भूपमध्ये व अखेरचं ‘गा बाळांनो श्री रामायण’ हे गीत भैरवीमध्ये बांधून बाबूजींनी संगीतसभेचे संकेतही आवर्जून पाळल्याचं दिसतं. केवळ हेच दोन राग नाहीत, तर प्रसंगानुरूप यमन, देसकार, तिलक कामोद, भीमपलास, पिलू, बहार, भैरव, तोडी, केदार, सारंग, बिहागडा असे विविध राग त्यांनी योजलेले दिसतात. माझ्या चाली मीच गाणार, असा हट्टही दिसत नाही. वसंतराव देशपांडे, गजानन वाटवे, राम फाटक, चंद्रकांत गोखले, बबनराव नावडीकर आदी पुरुष गायक व लता मंगेशकर, माणिक वर्मा, ललिता फडके, मालती पांडे, कुमुदिनी पेडणेकर आदी गायिकांचा यात सहभाग आहे. सरळसोप्या काव्यासह गदिमांनी लिहिलेलं रसाळ निवेदनही ऐकत राहण्यासारखं आहे. मूळ गीतरामायणात पुरुषोत्तम जोशी यांच्या आवाजात हे निवेदन ऐकायला मिळतं. (पुढे जाहीर कार्यक्रमांत बाबूजींनी ही जबाबदारीही समर्थपणे पेलली.)
बाबूजी आणि गदिमांची आणखी एक कल्पकता थक्क करून सोडते, ती म्हणजे या कथनासाठी त्यांनी वापरलेली फ्लॅशबॅकची कल्पना. अन्य कोणी असतं, तर हे कथन रामाच्या जन्मापासून सुरू केलं असतं, मात्र या दिग्गजांनी काय गंमत केल्ये पाहा, लव-कुश प्रभू श्रीरामांना त्यांच्या सभेत त्यांचेच चरित्र (स्वयें श्री रामप्रभू ऐकती) ऐकवतात व त्यातून ही रामकथा उलगडत जाते.. गीतरामायणाचा शेवटही लव-कुशांनाच उद्देशून म्हटलेल्या ‘गा बाळांनो श्रीरामायण’ या गीताने होतो. या गाण्याचा संदर्भ हा ‘स्वये श्री’च्या आधीचा आहे, म्हणजे जेथून ही कथा सुरू केली तेथे बाबूजी व गदिमांनी श्रोत्यांना अलगदपणे नेऊन सोडलं आहे.
१ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या कालावधीत सादर झालेल्या या रामकथेने लाखो श्रोत्यांना संमोहित केलं. एवढय़ा वर्षांनंतर ते कालबाह्य़ तर झालं नाहीच, उलटपक्षी एक सुरेल दंतकथा ठरलं आहे. यात हनुमानाच्या तोंडी असणाऱ्या ‘प्रभो मज एकच वर द्यावा’ या गीतात ‘जोंवरि हे जग, जोंवरि भाषण, तोंवरि नूतन नित रामायण’ अशी सुंदर पंक्ती आहे.. गदिमांची क्षमा मागून त्यात केवळ एका शब्दाचा बदल करून म्हणावंसं वाटतं..
‘जोवरि हे जग, जोंवरि भाषण, तोंवरि नूतन गीतरामायण’