अफझलखानाचा वध ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी. ती करताना राजांनी केलेली सिद्धता कौटिल्याने ‘अर्थशास्त्रा’त सांगितलेल्या सूत्रांप्रमाणेच आहे.

जावळी शिवरायांच्या आयुष्यातील भौगोलिक आणि राजकीयदृष्टय़ाही एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण. एका बाजूला सह्यद्री तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वरचा डोंगर अशा खाचेत वसलेल्या जावळीला घनदाट जंगलाचं चिलखत होतंच. कृष्णाजी बाजीच्या ‘चंद्रराव’ पदाला पाठिंबा देऊन राजांनी १६४७ मध्ये जावळीच्या राजकारणात प्रवेश केला होता. राजांच्या राज्यविस्ताराची लालसा जाणून आदिलशाहाने वाईवर १६४९ ला अफझलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अनेक राजकारणे होऊन आदिलशाहाने १६५५ मध्ये अफझलखानाला वाईतून बोलावून कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले. पुढे १६५६ च्या आसपास कृष्णाजी ऊर्फ चंद्रराव मोरे राजांचे उपकार विसरला. राजांच्या मुलखात मस्ती करू लागला. राजांनी समजावण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. १५ जानेवारी १६५६, राजांनी जावळीवर स्वारी करून हा नैसर्गिक व आर्थिकदृष्टय़ा समृद्ध प्रदेश राज्याला जोडला. पुढे फितुरी करणाऱ्या चंद्ररावाला ऑगस्ट महिन्यात ठार केले आणि खऱ्या अर्थाने जावळी राजांची झाली.
महाबळेश्वरच्या पश्चिमेला असलेल्या भोरप्या डोंगरावर राजांनी प्रतापगड बांधला. भविष्यातील एका फार मोठय़ा युद्धनाटय़ासाठी प्रतापगड तयार झाला.
बडय़ा बेगमेने शिवाजीला संपवण्यासाठी धर्मवेडय़ा, अत्यंत पराक्रमी, आदिलशाहावर आत्यंतिक निष्ठा असलेल्या, क्रूर, अहंकारी अशा अफझलखानाची नियुक्ती केली. खानाच्या शिक्क्यातून खानाचा अहंकार जाणवत असे. त्याने शिक्क्यावर लिहिले होते –
गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल।
अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफजल अफजल।।
उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.
त्याचा हा अहंकार सार्थ होता. बीदर कल्याणी भागात लढताना त्याच्यामुळे प्रत्यक्ष औरंगजेबावर कैदैत पडण्याची वेळ आली होती, पण औरंगजेबाने खान महंमदाला आपल्या बाजूला वळवून घेऊन स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र हे कळताच अफझलखान ती मोहीम तशीच टाकून विजापूरला परतला. त्याचा राग दूर करण्यासाठी बडय़ा बेगमेने खान महंमदाला परत बोलावले व विजापुरात शिरता शिरता त्याची कत्तल करण्यात आली. असे अनेक पराक्रम अफझलखानाच्या नावावर होते.
हा खान भोसले घराण्याचा मात्र द्वेष करत होता. शहाजीराजांना बेडय़ा घालून विजापूरला नेणारा, राजांचा मोठा भाऊ संभाजी याच्या मृत्यूला कारण ठरलेला अफझलखानच होता.
राजांविरुद्धची मोहीम खानाने एप्रिल १६५९ मध्ये सुरू केली. असं सांगतात की, ही मोहीम सुरू होण्यापूर्वी अफझलखानाने विजापूरमध्येच असलेल्या त्याच्या अवलिया गुरूची भेट घेतली, पण त्या गुरूला अफझलखानाचे मुंडकेविरहित धड दिसले होते. त्याने आशीर्वाद देण्याऐवजी अफझलखानाला यश येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर अफझलखान चिंता, नैराश्याने पछाडला गेला. त्याच अवस्थेत त्याने आपल्या अनेक स्त्रियांबरोबर काही दिवस भोग व विलासात काढले आणि शेवटच्या दिवशी या सर्व स्त्रियांना ठार केले (वेध महामानवाचा, डॉ. श्रीनिवास सामंत, पृ. ७२, शिवाजी हिज लाइफ अँड टाइम, ग. भ. मेहेंदळे, पृ. २०१). या साऱ्यावरून अफझलखानाची मानसिक अवस्था लक्षात येते.
अफझलखानाचा पहिला मुक्काम विजापुराजवळ तोरवे गावी पडला आणि खानाला पहिला अपशकुन झाला. त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर हत्ती तडकाफडकी मेला. आदिलशाहाने आपला खास बिनीचा हत्ती लगोलग खानाकडे पाठवला. मोहीम सुरू राहिली तरी शकुनापशकुन मानणाऱ्या त्या काळातील लोकांवर याचा कसा आणि किती परिणाम झाला असू शकेल त्याचा अंदाज करता येतो.
खानाचा हत्ती मेला हा अपशकुन मानला तर इकडे राजांची पत्नी सईबाईसाहेब यांना भाद्रपद वद्य चतुर्दशी, ५ सप्टेंबर १६५९ रोजी देवाज्ञा झाली. तसे पाहता हा मोठा अपशकुन मानायला हवा, पण राजाचे जे विविध गुण कौटिल्याने दिले आहेत त्यानुसार निश्चयी स्वभाव, देश, काल व पुरुषाचे प्रयत्न यांनी साध्य होणाऱ्या कार्याला प्राधान्य देणारे असे शिवाजी राजे असल्याने त्यांनी आपले राजकीय जीवन व व्यक्तिगत जीवन यांची सरमिसळ होऊ दिली नाही.
खानाशी लढताना राजांनी मंत्रयुद्धाचा प्रयोग केला. मंत्रयुद्ध म्हणजे कारस्थानं रचणे.
तिकडे अफझलखानाला अपशकुन होत होते आणि इकडे राजांना मात्र शुभशकुन झाला. प्रत्यक्ष देवी स्वप्नात येऊन राजांना म्हणाली, ‘हे वत्सा, त्याला तलवारीच्या जोराच्या वाराने भूमीवर पाड. हे दैत्यशत्रो, सध्यासुद्धा तुळजापूर सोडून तुझ्या साह्यर्थच मी स्वत: जवळ आले असे समज’ (अणुपुराण – कविंद्र परमानंद, सभासदाची बखर, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. अनुक्रमे १८९, १७५).
सभासदकारांच्या मते दुसऱ्या दिवशी राजांनी जिजाऊसाहेब, गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक हंकी, मोरोपंत व निळोपंत, नेताजी पालकर अशा मातब्बर लोकांना स्वप्न सांगून अफझलखानाला धुळीस मिळवण्याचा हेतू स्पष्ट केला, पण तरीही या सर्वाच्या मनात कार्यसिद्धीविषयी शंका होती असे दिसते. यावर राजांनी भारतीय युद्धनीतीतला सर्वात शेवटचा पर्याय सुचवला. ते म्हणाले, ‘‘सला केलियाने प्राणनाश होईल. युद्ध करिता जय जाहलियाने उत्तम व मेलियानेही कीर्ती आहे.. याजकरता युद्ध करावे.’’ यानंतर आपला मृत्यू झाला तरी पुढची सर्व तजवीज करून राजांनी निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
अर्थशास्त्रात ईश्वरी साहाय्याचा उपयोग युद्धात कसा करून घ्यावा हे कौटिल्य पुन:पुन्हा सांगतो. दुर्गलम्भोपाय या तेराव्या अधिकरणात, ‘विजिगीषु परग्राममवाप्तुकाम: सर्वज्ञदैवतसंयोगख्यापनाभ्यां स्वपक्षमुद्धर्षयेत् परपक्षं चोद्वेजयेत्’। (१३.१.१) येथे संदर्भ शत्रूची राजधानी घेण्याचा आहे. शत्रूची राजधानी घ्यायची असेल तर विजिगीषुने आपले सर्वज्ञत्व आणि आपला देवतांशी असलेला संपर्क या गोष्टी जाहीर करून स्वत:च्या लोकांना उल्हसित करावे व शत्रूच्या लोकांना घाबरवून सोडावे. ह्यच अधिकरणात पुढे ७ ते १० या सूत्रांमध्ये कौटिल्य सांगतो, भविष्य कथन करणारे, शकुन सांगणारे, मुहूर्त पाहणारे आणि गुप्तहेर इत्यादींनी राजाच्या सर्वज्ञतेची व दैवतसंयोगाची हकिगत स्वत:च्या देशात पसरवावी. शत्रूच्या देशात त्यांनी विजिगीषुला देवतांचे दर्शन होत असल्याचे व दिव्य कोश व दिव्य सैन्य प्राप्त झाल्याचे सांगावे. राजाची सर्वज्ञता व देवता संपर्क याविषयीचा उल्लेख दहाव्या अधिकरणात कूटयुद्धाच्या ठिकाणीही येतो. असाच उल्लेख याच अधिकरणातील वेगवेगळ्या व्यूहरचनांच्या अध्यायात येतो. त्या ठिकाणी आपल्या राजाचा देवतांशी असेलला संपर्क सांगून शत्रुसैन्यात घबराट उत्पन्न करावी, असे कौटिल्याचे मत आहे (१०.६.४८-५०). राजांची ईश्वरनिष्ठा अखंड मान्य करूनही मंत्रयुद्धातील ‘देवता संपर्क’ ह्य उपायाचा उपयोग शिवरायांनी केलाच नसेल, असे ठामपणे सांगता येत नाही.
अफझलखान युद्धात दोन व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या होत्या एक म्हणजे दूत व दुसरा गुप्तहेर. अर्थशास्त्रात मंत्रयुद्धामध्ये दूताचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. उध्दृतमन्त्रो दूतप्रणिधि:। (१.१६.१) सल्लामसलतीने निर्णय घेतल्यानंतर दूताची कामगिरीवर योजना करावी.
राजांनी खानाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यावर गोपिनाथपंतांबरोबर बसून दोघांनी आण शपथ घेतली. तेव्हा राजांनी खानाकडून आलेल्या पंताजींना खानाचा हेतू विचारला. राजांना मारण्याचा खानाचा हेतू आहे असे सांगून पंतांनी राजांना हिंमत असेल तर खानास जावळीस आणण्याची तयारी दर्शवली. अर्थशास्त्रात दूत म्हणून सांगितलेली सारी कर्तव्ये गोपिनाथपंतांनी पूर्ण केली. दूतप्रणिधि: या अध्यायात शत्रुगोटात गेल्यावर दूताने करावयाची कार्ये सांगताना कौटिल्य म्हणतो, पत्रे पाठवणे, तहाच्या अटींचे पालन करणे, मित्र मिळवणे, फितुरीस प्रोत्साहन देणे, दोन मित्रराष्ट्रांत भेद उत्पन्न करणे, शत्रूचे बांधव व मौल्यवान वस्तूंचा अपहार करणे इत्यादी (१.१६.३३-३४). गोपिनाथपंतांनी राजांकडे शत्रूच्या वैभवाची इत्थंभूत वार्ता आणली. हे वैभव प्रतापगडावर कसे आणले गेले याची सुंदर कहाणी परमानंदांच्या अणुपुराणांत आहे. ते म्हणतात, या आलेल्या पाहुण्यांना शिष्टाचारास अनुसरून देणग्या दिल्या पाहिजेत. त्यासाठी राजांनी खानाच्या छावणीतीलच व्यापाऱ्यांना आवताण दिले. अफझलखानाच्या आज्ञेवरून ते व्यापारी राजांकडे गेले. राजांनी त्यांच्याकडून सर्व रत्ने घेतली आणि त्या व्यापाऱ्यांनाही आपल्याजवळ ठेवून घेतले. परमानंद पुढे म्हणतात, पुष्कळ लोभाच्या आशेने आपण पर्वतशिखरावर सर्व बाजूंनी कोंडलो गेलो हे त्यांनी ओळखले नाही. अगदी अशाच प्रकारे राजांनी आग्य््राात असताना पंधरा हजारांचे हत्ती खरेदी केले होते व त्याचे पैसे दिले नसल्याची बातमी मुहम्मद अमीनखानाने औरंगजेबाला दिली होती.
राजनीतीमध्ये गुप्तहेरांचे महत्त्व कौटिल्याइतके आधुनिक काळात आपल्याकडे मानले आहे का याविषयी शंका यावी अशी परिस्थिती अनेकदा दिसते. कौटिल्य मात्र संस्था व संचारी मिळून नऊ प्रकारच्या गुप्तहेरांचा उल्लेख करतो. संपूर्ण गुप्तहेर खाते कसे उभे करावे व त्यांनी कोणकोणत्या वेशात कार्य करावे याची विस्तृत चर्चा अर्थशास्त्रात येते. यात इतर विविध वेशांबरोबर सिद्ध, तापस, भिक्षुकी या वेशांना कौटिल्य महत्त्व देतो. एकेका बातमीसाठी तो तीन तीन गुप्तहेर नियुक्त करावे, त्यांनी अत्यंत वेगाने बातम्या आणाव्या अशा अनेक गोष्टी सांगतो. हेरखात्याची गुप्तता ही कौटिल्यासाठी फार महत्त्वाची आहे म्हणून तो ‘न चान्योन्यं संस्थास्ते वा विद्यु:’ (१.१२.१२) थोडक्यात या हेरसंस्था किंवा साऱ्या हेरांमध्ये एकमेकांशी कोणताही संपर्क नसावा यावर भर देतो.
शिवाजीची गुप्तहेर व्यवस्था अगदी याच धर्तीवर कार्य करताना दिसते. बहिर्जी नाईक सोडल्यास अगदी क्वचित त्याच्या गुप्तहेरांविषयी माहिती मिळते, पण शत्रूच्या पावलापावलाची बित्तंबातमी राजांना अत्यंत वेगाने मिळत असे. राजांच्या प्रत्येक मोहिमेत ‘गुप्त’ असलेल्या हेरांचे महत्त्व अढळ आहे.
अफझलखानाच्या मोहिमेतसुद्धा अर्थातच प्रत्येक बातमी राजांकडे येत होती. बहिर्जी नाईकाशिवाय दुसरा एक हेर खानाच्या छावणीत फकिराच्या वेशात होता त्याचे नाव नानाजी प्रभु मोसेगावकर.
पुढे खान राजांच्या भेटीला येणार हे निश्चित झाल्यावर राजांनी आणखी एक गोष्ट केली. खानासारखी बडी असामी येणार म्हटल्यावर त्यांची योग्य ती बडदास्त ठेवली पाहिजे म्हणून वाई ते प्रतापगड हा अवघड रस्ता आपल्यासाठी आम्ही सुघड करून देतो, असे पंतांनी खानाला सांगितले. खानाला यात काहीही गैर वाटले नाही. राजांनी वाई ते प्रतापगड या रस्त्यावरची झाडे तोडून मार्ग स्वच्छ करवला, पण त्याच वेळी त्या तोडलेल्या फांद्यांनी इतर छोटय़ा वाटा बंद केल्या. कौटिल्य सांग्रामिक या दहाव्या अधिकरणात अगदी हीच सूचना करतो – शत्रुणामापाते कूपकूटावपातकण्टकिनीश्च स्थापयेत्। (१०.१.१२) शत्रू येण्याच्या मार्गावर विहिरी, झाकलेले खड्डे, काटेरी तारा टाकाव्यात. राजांच्या बाबतीत शत्रू येऊन पोचला होता. आता तो परत जाऊ नये याची तजवीज करायची होती, म्हणून राजांनी मुख्य मार्ग स्वच्छ केला, पण इतर छोटय़ा वाटा बंद करून टाकल्या. कोणत्याही परिस्थितीत शत्रूला संपवण्याची सर्व तयारी राजांनी केली.
आणि विकारी नाम संवत्सर, शके १५८१, गुरुवार १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी भर दुपारी राज्याचा एक मोठा शत्रू संपवला. आपल्या पित्याचा अपमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेतला गेला. ‘न भूतो न भविष्यति’ असा विजय राजांना मिळाला. या विजयामुळे राजांचा दरारा सर्वत्र पसरला. राजे एक शूर, मुत्सद्दी आणि विजिगीषु व्यक्तिमत्त्व म्हणून मान्यता पावले.
आसावरी बापट

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Story img Loader