महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी प्रसिद्ध असलेला भोंडला विदर्भात मात्र भुलाबाईच्या उत्सवाच्या स्वरूपात साजरा होतो.

महाराष्ट्र हे शेतीप्रधान, कृषीप्रधान राज्य आहे. शेती ही तर अगदी अनादी कालापासून केली जाते, त्यामुळेच शेती आणि लोकजीवन, लोकसंस्कृती या एकमेकांना फार पूरक गोष्टी आहेत. त्यातही महाराष्ट्रातील लोकजीवन, लोकसंस्कृती, कृषीसंस्कृती ही फार वैशिष्टय़पूर्ण, वैविध्यपूर्ण श्रीमंत आणि विविधांगी आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात भौगोलिक विविधतेमुळे लोकसंस्कृती, कृषीसंस्कृतीमध्ये, लोकजीवनामध्ये वैविध्य आढळून येते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कृषीसंस्कृतीची श्रीमंती फार अनोखी आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण, दख्खन, मावळ, प. महाराष्ट्र या सर्व प्रांतांमध्ये कृषीसंस्कृतीची वेगळी श्रीमंती पाहायला मिळते. या विविध प्रांतांतील शेतीजीवनातील कित्येक सण, उत्सव, परंपरा या आपले अनोखेपण आणि श्रीमंतीपणा राखून आहेत. शेतकऱ्याच्या घरात, शेतात, शेतमाल कापणीला, काढणीला आला की त्याचा आनंद हा शेतकरी, कष्टकरी आनंदाने आपल्या आपल्या रूढी, परंपरांप्रमाणे सण उत्सवाच्या स्वरूपात साजरा करतो. विदर्भातील कृषीविश्व हे शेतकरी आत्महत्यासारख्या समस्यांनी त्रस्त असले तरीदेखील विदर्भातील कृषीसंस्कृतीने आपली नाळ विविध कृषी सण, उत्सव, परंपरांशी कायम ठेवली आहे. आणि त्यामुळेच वैदर्भीय कृषी लोकसंस्कृती जिवंत आहे. खरिपाची पेरणी झाल्यावर दसरा, दिवाळीपर्यंत खरिपाचं पीक हे पूर्णपणे काढणीला, कापणीला येतं आणि साधारणत: कष्टाने पिकवलेल्या या कृषीलक्ष्मीच्या आगमनाने शेतकरी आनंदलेला असतो. विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी आनंदाने साजरा केला जातो. विदर्भासह हा भुलाबाईचा सण मराठवाडय़ाच्या विदर्भालगतच्या काही जिल्ह्य़ांसह खान्देशातील जळगाव जिल्ह्य़ातपण साजरा होतो. मात्र भुलाबाईच्या उत्सवाची श्रीमंती ही विदर्भात फार जास्त पाहायला मिळते. विदर्भातल्या ग्रामीण भागात कोजागरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये दणक्यात साजरी केली जाते. माळी पौर्णिमेचा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून लहान मुली व महिला घरोघरी सामूहिकपणे साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून हा सण सुरू होतो. म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा होतो. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. एक महिन्याकरिता ती आपल्या माहेरी येते. तिचा हा सण, भुलाबाईसोबत भुलोजी आणि गणेश यांची महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात. माहेरवाशीण भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब असलेला शंकर आणि लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती. शेतकरी घरांमध्ये भुलाबाईचा हा उत्सव सखी पार्वतीचा उत्सव म्हणूनही लहान मुलींमध्ये ओळखला जातो. भुलाबाईचा हा उत्सव वैदर्भीय लोकसंस्कृतीचा, लोकपरंपरेचा अभ्यंग ठेवा आहे. भुलाबाईचा हा उत्सव विदर्भात पारंपरिक बालमहोत्सव म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. माळी पौर्णिमेपर्यंत (कोजागरी पौर्णिमा) शेतांमध्ये ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन ही पिके काढणीला, कापणीला आलेली असतात. या नवीन पिकांचं, नव्या धान्याचं, कृषीलक्ष्मीचं स्वागत म्हणजे भुलाबाईचा उत्सव. महिनाभर रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सगळ्या मुली एकत्र गोळा होऊन एकीमेकींच्या घरोघरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक लोकगीतं म्हणजेच भुलाबाईची गाणी म्हणतात. रोज संध्याकाळी भुलाबाईसमोर म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांनंतर भुलाबाईचा प्रसाद वाटला जातो त्याला खिरापत असे म्हणतात. पण हा प्रसाद सहजासहजी वाटला जात नाही. भुलाबाईला दिला जाणारा नैवेद्य म्हणजे खिरापत. या नैवेद्यामध्ये रोज नवा खाऊ असतो. हा प्रसाद बंद डब्यात असतो आणि हा प्रसाद काय आहे हे मुलींना ओळखावे लागते. त्यामुळे भुलाबाईची गाणी म्हटल्यावर खिरापत जिंकणे म्हणजे डब्यातील प्रसाद ओळखणे ही एक अनोखी स्पर्धा रंगते. त्यामुळे खिरापत ओळखून सांगायचं आकर्षण, कुतूहल म्हणजे अनोख्या बालमहोत्सवाची रंगत कुठल्याही स्पर्धेपेक्षा कमी नाही. ज्या मुलींच्या घरी गाणी म्हटली जातात ती गाणी म्हटल्यानंतर, डब्यातील खिरापत डबा हलवून, वाजवून डब्यात काय खिरापत आहे हे भुलाबाईचे गाणे म्हणणाऱ्या मुलींना सूचक एखादा सुगावा सांगते. मग डब्यातील पदार्थाच्या हलण्याच्या आवाजावरून मुली डब्यात काय खाऊ आहे याचा अंदाज बांधत एक एक पदार्थाचे नाव सांगतात. सरते शेवटी कुणालाही खिरापत जिंकता न आल्यास डब्यात खिरापत काय आहे हे सांगितले जाते. त्यावेळी आपली खिरापत कुणी जिंकलीच नाही याचा आनंद त्या मुलीला फार सुखावतो. तर एखाद्या मुलीने खिरापत जिंकून सांगितल्यास आपण एवढय़ा सर्व मुलींमध्ये जिंकल्याचा वेगळाच आनंद त्या मुलीला मिळतो. गाणे संपल्यानंतर खिरापत पण गाण्यातच मागितली जाते जसे –
बाणा बाई बाणा, सुरेख बाणा
गाणे संपले, खिरापत आणा।
आणा आणा लवकर,
वेळ होतो आम्हाला
जाऊ द्या आम्हाला,
भुलाबाईचे गाणे म्हणायला ॥
एका महिन्यानंतर भुलाबाईचा उत्सव संपतो आणि कोजागरी पौर्णिमेच्या म्हणजेच माळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं; मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागरीच्या संध्याकाळी भुलाबाईच्या उत्सवाची रंगत फार वेगळी असते. महिनाभर स्थापलेल्या भुलाबाईची कोजागरीच्या टिपूर चांदण्यात घराच्या अंगणात पूजा मांडली जाते. भुलाबाई-भुलोजी-गणेश यांची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहित ज्वारीच्या पाच धांडय़ांची खोपडी (निवारा) बनवून पूजा केली जाते. या खोपडीला माळी म्हणतात. जिराईत शेतकरी ज्वारीच्या कणसांची खोपडी करतात तर बागाईत शेतकरी ही उसाच्या पाच खोडांची खोपडी करतात. तिला पण माळीच म्हणतात. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या डोक्यावर ही माळी हिरवे छत म्हणून लावली जाते. नवीन आलेल्या ज्वारीच्या भरलेल्या कणसांची, कणसातील ज्वारीच्या दाण्यांची पूजा करून शेतकरी त्या धान्याचे स्वागत करतात. घरातील धनलक्ष्मीचे स्वागत म्हणजे माळी पौर्णिमा म्हणजेच भुलाबाईचा उत्सव. हा उत्सव भुलाबाई आणि भुलोजींच्या समोर विविध धान्याची आरास करून त्या धान्याची पूजा करून केला जातो. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या मातीच्या मूर्ती या लहान मुली-महिला स्वत: हाताने तयार करतात. त्यासोबत पाच मातीच्या माळ्या (मातीचे दिवे) बनवतात. अनेक ठिकाणी बदललेल्या काळामुळे भुलाबाई आणि भुलोजी या प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या असतात. तरीदेखील एखाद्या खोपडी (ज्वारीच्या भरलेल्या कणसांच्या पाच धांडय़ांची माळी) खाली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आणि हाताने मातीच्या बनवलेल्या भुलाबाई यांची सोबतच स्थापना केली जाते, पूजा केली जाते. पण विसर्जन करताना दरवर्षीपणे केलेल्या मातीच्या भुलाबाई विसर्जित केल्या जातात. तर प्लास्टरच्या मूर्ती ठेवून दिल्या जातात. मातीच्या भुलाबाई विसर्जित करताना कुठलेही जलस्रोत प्रदूषित होत नाहीत. त्यामुळेच वाढणाऱ्या प्रदूषणासारख्या समस्या या उत्सवाला स्पर्शतही नाहीत. त्यामुळेच ग्रामीण शेती जीवनात, निसर्गाचं निसर्गत्व अबाधित राहून वैदर्भीयांनी अनोखी कृषिसंस्कृती जपलेली आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागरीला तर मुलींना एका महिन्याचा खाऊ म्हणजे ३१ दिवसांचा खाऊ (खिरापत) एकाच दिवशी मिळतो. शेवटच्या दिवशी भुलाबाईंना ३२ प्रकारच्या खिरापतींचा (खाऊंचा) नैवेद्य दिला जातो. त्यामुळे लहान मुलींना, महिलांना आणि सगळ्यांनाच या दिवशी खाऊंची खिरापतीची मोठीच मेजवानी मिळते. शिवाय या घरगुती खिरापती पौष्टिक आणि सकसही असतात. या खिरापतींमध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ, बरबटीची उसळ, हरभऱ्याची उसळ, विविध पौष्टिक पक्वान्ने, फरसाण, चिवडा, चकली, लाडू, पेढा इत्यादी खिरापतींची खाऊंची अगदी चंगळ असते. याशिवाय या सर्वामध्ये वैदर्भीय खाऊंची, खिरापतींची अनोखी पौष्टिक भेळच चाखायला मिळते. मात्र काळाच्या ओघात शहरातील भागात महिन्याभराच्या माहेरी मुक्कामाला येणाऱ्या भुलाबाई या दसरा ते कोजागरी असे पाच दिवसच स्थापल्या जातात तर अनेक शहरांतल्या घरी या भुलाबाई फक्त शेवटच्या कोजागरीच्या दिवशीकरिताच स्थापल्या जातात, पण उत्सवाच्या स्वरूपात आणि जल्लोषात मात्र कुठेही तडजोड नसते. भुलाबाईची गाणी म्हणत असताना कुणाचं घर कुठल्या जातीचं आहे. कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ, कोण निम्नवर्गीय, कोण उच्चवर्णीय हे सगळे भेद गळून पडतात. त्यामुळेच भुलाबाईचा उत्सव हा सर्व जाती-धर्मातील लहान मुलींचा उत्सव म्हणून आवडीचा आहे. भुलाबाईची गाणी ही तर अमूल्य असा लोकगीतांचा ठेवाच आहे. भुलाबाईच्या गाण्यातून यथार्थ जीवन लोकजीवन रेखाटलेलं जाणवतं. पूर्वीच्या काळी असणारं सासरपण आणि माहेरपण हे भुलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होतं. भुलाबाईची गाणी ही मनोरंजन म्हणून नव्हे तर ती अर्थपूर्ण लोकशिक्षण देणारं साहित्य आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा गोडवा या गाण्यांमधून जाणवतो. पूर्वीच्या काळी सून म्हणून असणाऱ्या अतिरेकी जबाबदाऱ्या सांभाळताना सुनेची होणारी दमछाक भुलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होते. त्यामुळेच ती माहेरी एक महिन्याकरिता येते. कारण माहेरच्या माणसांची आपुलकी, प्रेम, स्नेह, ओलावा तिला सासरी मिळत नाही. म्हणूनच माहेरपणासाठी भुलाबाई एक महिना घरोघरी येतात. सासरी गेलेली किंवा जाणारी आपली मुलगी जणू भुलाबाईच आहे, या भावनेतून सासरी जाणाऱ्या मुलींना सासरचं सासरपण या भुलाबाईच्या गाण्यांतून कळतं तर भुलाबाई या आपली सखी आहे. त्यामुळे तिची आवड, तिचे बालपण, तिचे नातेवाईक, तिचे साजशृंगार, दागिने या सर्वावर भुलाबाईची विविध गाणी गायली जातात. यासोबतच भुलोजींना पण मान मिळतो. ते चांगला वर आपल्याला देतील म्हणून भुलाबाई आणि भुलोजींवर अनेक गाणी आहेत जसे-
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
गुलाबाचे फूल माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
मोगऱ्याची फुले माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
या गाण्यात आपल्या सखी भुलाबाईच्या प्रेमात तिला अर्पण केलेली विविध फुलांची आरास दिसून येते. धान्याचं नव्हे या काळात येणाऱ्या नवीन फुलांचे स्वागतसुद्धा भुलाबाई उत्सवाचं एक स्वरूप आहे.
तर भुलाबाईच्या लहानपणी भुलाबाईच्या आईच्या नातेवाइकांबद्दल असलेलं भुलाबाईचं प्रेम, कुतूहल, आदर पुढील भुलाबाईच्या गाण्यातून दिसतं.
आमच्या दारी भेंडीचं झाड, भेंडीचं झाड,
लव लव भेंडय़ा येतील गं येतील गं
भुलाबाईचे मामा येतील गं, येतील गं,
बुलबुल साडय़ा आणतील गं आणतील गं
बुलबुल साडय़ा नेसू या नेसू या,
लांब लांब पदर काढू या काढू या
लांब लांब पदर जरदारी,
भुलाबाईचे मामा व्यापारी व्यापारी
तोंडात चिकन सुपारी सुपारी,
सुपारी काही फुटेना फुटेना
मामा काही उठेना उठेना
सुपारी गेली गरबळत गरबळत,
मामा गेले बळबळत बळबळत
सुपारी गेली पोटात पोटात,
मामा गेला कोर्टात कोर्टात
सुपारी गेली फुटून फुटून
मामा गेला उठून उठून
या गाण्यात भुलाबाईच्या मामाची श्रीमंती ते भुलाबाईचा पुरवत असणारे लाड आदींचं वर्णन आहे. पण सोबतच एखादं संकट आलं तर त्याला न्यायालयीन मार्गाने, सरळ मार्गानं गेल्यास समस्या सुटते हे पण हे गाणं दर्शवते.
सासरी जाण्याचं लग्नांविषयीची थट्टामस्करी सासरी गोड स्वप्न असणारी एखादी स्वप्नाळू नववधूचं व्यक्तिमत्त्व भुलाबाईच्या या गाण्यात दिसतं. विदर्भाला मध्य प्रदेश लागून असल्याने भुलाबाईचे हे अनोखे गीत हिंदीत म्हटलं जातं. त्यामुळेच तर भुलाबाईच्या सणाला जातिभेद, भाषाभेद सर्व गळून पडताना दिसतात.
काजल टिकली लो भाई,
काजल टिकली लो,
लेनी है तो भुलाबाई की लो
भुलाबाई के पिया संजीवनी में,
गली गली के गलीयों मे ॥
काजल टिकली लो भाई,
काजल टिकली लो,
लेनी है तो शीतल की लो
शीतल के पिया सोलापूर में,
गली गली के गलीयों में ॥
काजल टिकली लो भाई,
काजल टिकली लो,
लेनी है तो सारिका की लो
भुलाबाई के पिया सांगली में,
गली गली के गलीयों में ॥
काजल टिकली लो भाई,
काजल टिकली लो,
लेनी है तो सागरिका की लो
सागरिका के पिया सरस्वती संकुल में,
गली गली के गलीयों में ॥
काजल टिकली लो भाई,
काजल टिकली लो,
लेनी है तो सपना की लो
सपना के पिया श्रीराम कॉलेज में,
गली गली के गलीयों में॥
मग असं करता करता भुलाबाईचं लग्न होतं, मग तिचं बालपण संपतं आणि ती सासरी जाते. मग पुढील गाण्यांतून भुलाबाईच्या सासरचं नणंद-भावजई यांचे खटके, सासू-सासऱ्यांचे टोमणे, सुख-दु:ख याचं वर्णन आहे ते पुढीलप्रमाणे –
आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,
लेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय
कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,
घरी नंदा जावा, करतील माझा हेवा
नंदाचा बैल येईल डोलत,
सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीरं
नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी
तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी,
आता माझे दादा येतील गं, येतील गं,
दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं,
दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव पाठी
घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥
अशी अनेक भुलाबाईची गाणी आहेत. सासरी होणाऱ्या छळामुळे भुलाबाईला माहेरी जायला पण मिळत नाही. जाता जाता पण तिला काम असतं. तिचा सांसारिक व्याप पुढील भुलाबाईच्या गाण्यात दिसतो.
कारल्याचं बी पेर गं सूनबाई,
मग जा आपल्या माहेरा माहेरा,
कारल्याचं बी पेरलं गं आत्याबाई,
आता तरी जाऊ द्या माहेरी माहेरी
कारल्याचं वेल निघाला की,
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याचं वेल निघाला गं सासूबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याला फूल येऊ दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याला फूल आलं हो सासूबाई
आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
कारल्याला कारले येऊ दे गं सुनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारले आलं हो सासूबाई
आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी कर गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई
आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खा हो सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई
आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजीचा गंज घास हो सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजीचा गंज घासला हो सासूबाई
आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा
मला काय पुसते बरीच दिसते,
पुस तुझ्या सासऱ्याला सासऱ्याला
सोन्याचा पलंग, चांदीची मच्छरदानी,
त्यात आमचे सासरेबुवा झोपत होते, झोपत होते
मामाजी मामांजी जाऊ काय जाऊ काय,
मला काय पुसते बरीच दिसते
पुस तुझ्या जेठाला जेठाला,
सोन्याचा टेबल चांदीची खुर्ची
तिथे आमचे जेठजी
पुस्तक वाचत होते, वाचत होते
भाऊजी भाऊजी भाऊजी जाऊ का जाऊ का
मला काय पुसते बरीच दिसते,
पुस तुझ्या जाऊला जाऊला..
असं करत करत जाऊ नंतर नणंद, दीर आणि नंतर सरतेशेवटी पतीराज एवढय़ा सर्वाना परवानगी मागून भुलाबाईला माहेरी यावं लागतं, तेव्हा कुठे भुलाबाईला माहेरी जायला मिळते.
अशा प्रकारे भुलाबाईच्या उत्सवात भुलाबाईच्या संपूर्ण जीवनाचे भुलाबाईच्या व्यक्तिरेखेचे, भुलाबाई भुलोजी यांच्यावर शेकडो लोकगीतं विदर्भाच्या विविध जिल्ह्य़ांत विविध भागांत म्हटली जातात. त्यामुळेच भुलाबाई उत्सव हा विदर्भाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक खजिना आहे. भुलाबाईवरती, भुलोजीवरती विदर्भात लोकभाषेत, विदर्भाच्या वऱ्हाडी बोलीभाषेत शेकडो लोकगीतं आहेत. भुलाबाईला माहेराचा वैद्य, भुलाबाईचे दागिने, भुलाबाईचे डोहाळे, भुलाबाईला वेडसर नवरा मिळाला तर तिची होणारी फजिती, शिवाय भुलोजी आणि भुलाबाई यांचं संसारस्वप्न ते संसारगाडा या सर्वावर विदर्भात वऱ्हाडी या बोलीभाषेत भुलाबाईची अनेक लोकगीतं ऐकायला मिळतात.
या उत्सवात भुलाबाईचा पाळणासुद्धा म्हटला जातो.
एक लिंबु झेलु बाई, दोन लिंबु झेलु,
दोन लिंबु झेलु बाई, तीन लिंबु झेलु,
तीन लिंबु झेलु बाई, चार लिंबु झेलु,
चार लिंबु झेलु बाई, पाच लिंबु झेलु,
पाचाचा पानोळा (पाळणा) हार घाली हनुमंता,
हनुमंताची लाडी गोडी
येता जाता कमळ मोळी,
कमळाच्या मागे लागली राणी,
अ गं अ गं राणी
येथे कोठे पाणी, चला जाऊ जन्मदारी,
जन्मदारीचे चिराळ बाळ,
चिराळ बाळाला भूक लागली,
बाळाला सोन्याच्या पाटावर निजवलं,
चांदीच्या चमच्यांनी दूध पाजलं
नीज रे नीज रे तान्ह्या बाळा,
झोके देते मी तुजला
पाळण्यात बाळ झोपी गेला
अशा प्रकारे भुलाबाईचा लेक गणपती जन्मला आणि भुलाबाईच्या उत्सवाची सांगता झाली. अशा अनेक गाण्यांनंतर खिरापत खाऊन मुली पुढल्या घरी परत भुलाबाईची गाणी म्हणायला जातात आणि हा लोकगीतांचा उत्सव, शेतकऱ्यांचा उत्सव, धान्याच्या स्वागताचा उत्सव वऱ्हाडात विदर्भात दिवाळीच्या उंबरठय़ावर सर्वत्र साजरा होतो.

Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Stones pelted at hawker removal teams vehicle in G ward of Dombivli
डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक
Abhay yojana for property tax and water bill exemption in Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी सवलतीची अभय योजना
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

भुलाबाईचा अनोखा संग्राहक
भुलाबाई उत्सव हा तसा लहान कुमारिका मुलींचा. पण लहानपणी बहीण-भावाचं नातं फार घट्ट असतं. आपल्या घरातील मोठय़ा बहिणींबरोबर रोज जाता-जाता भुलाबाई उत्सवाचा लळा मुलांनाही लागतो. रौंदळा या अकोट तालुक्यातील विजय डिक्कर हे त्यांच्यातला संग्राहक हा भुलाबाई उत्सवामुळेच घडल्याचं अभिमानाने सांगतात. त्यांचा परंपरागत व्यवसाय हा शेतीच. मोठय़ा बहिणींसोबत मी जबरदस्ती भुलाबाईचे गाणे म्हणायला जायचो. मुलींचा सण असल्यामुळे त्या मला सोबत येऊ द्यायच्या नाहीत. मात्र मी त्यांना चुकवून चूपचाप मागून जाऊन बसायचो. गाणेसुद्धा म्हणायचो. सर्व मुलं, मित्र मला चिडवायचे की मुलीत बसतो. पण मी लक्ष दिलं नाही. खिरापत जिंकण्याच्या वेळी मी खिरापत सांगायचो, तर बहिणी आणि त्यांच्या मैत्रिणी रागवायच्या. तू बोलू नकोस. तू आमच्या नियमात बसत नाहीस. मग मी बाजूच्या मुलीला सांगायचो. मग त्यांची काही तक्रार नसायची. अशा प्रकारे मी भुलाबाई उत्सवात त्या मुलींमधला एक्स्ट्रा फिल्डर होतो, असे विजय डिक्कर गमतीने सांगतात. मात्र भुलाबाईच्या उत्सवामुळे त्यांना लोकसाहित्याची गोडी लागली. विजय यांना ग्रामीण भागातील अस्सल वऱ्हाडी ओव्या, म्हणी, उखाणे, भारूड, शेतकरी गीतं, शेतात पेरणी करतेवेळची गीतं येतात. खडय़ा आवाजात लोकगीतं म्हणणाऱ्या या शेतकरी दादाला आजही भुलाबाईची दुर्मीळ सर्व गाणी ग्रामीण चालींसहित पाठ आहेत.

भुलाबाईच्या पूजेची सहा पिढय़ांची अविरत सेवा :-
अकोला जिल्हय़ातील अकोट शहरात भुलजा-भुलाई मंदिर महाराष्ट्रातील एकमेव आहे. या मंदिराची ख्याती सर्वदूर आहे. उत्तमआप्पा कुरवाडे हे ७५ वर्षांचे गृहस्थ या मंदिराची माहिती देताना सांगतात. आजोबा तुकारामआप्पा कुरवाडे यांच्यापासून ते वडील सीतारामआप्पा कुरवाडे यांच्या परंपरेतून आता मुलगा ज्ञानदेव उपाख्य नानाआप्पा कुरवाडे आणि नातू विश्वास कुरवाडे अशा सहा पिढय़ांची भुलाबाई पूजा हे कुटुंब करीत आलं आहे. हे मंदिर ३०० वर्षांपेक्षा अधिक पुरातन आहे. पूर्वी या मंदिरामध्ये पाच फुटांपेक्षा मोठमोठाल्या मातीच्या भुलजा भुलाई व गणेश यांच्या मूर्ती होत्या. मात्र मातीच्या असल्यामुळे त्या हळूहळू ढासळल्या. स्वातंत्र्यापूर्वी त्यांचे छायाचित्र काढले होते. मात्र मजुरीचे पैसे मिळाले नव्हते त्यामुळे जुन्या मूर्तीचे छायाचित्रसुद्धा आणू शकलो नसल्याची खंत आहे. पण मोठाल्या मूर्तीची पूजा, सेवा ही स्वस्थ बसू द्यायची नाही. शेवटी १९९६ च्या दरम्यान पुन्हा मंदिरात जुन्या मूर्तीसारख्या मूर्ती पुनप्र्रतिष्ठापित केल्या. त्यापूर्वी १९८५ ला मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. दररोजची पूजा आणि भाद्रपद महिन्यातील भुलाबाई उत्सवाच्या वेळी महिनाभर रोज भुलाबाईची गाणी म्हणणाऱ्या मुलींना कुरवाडे यांच्या घरातूनच खिरापतीचा प्रसाद दिला जातो. भाद्रपद महिन्यात रोज संध्याकाळी मुली भुलजा भुलाईच्या मंदिरात पारंपरिक जुनी वऱ्हाडी गाणी म्हणतात.

Story img Loader