भारताच्या खुल्या अर्थव्यवस्थेपर्यंतच्या प्रवासात परिस्थिती बरीच पालटली. आता मध्यमवर्गीय कुटुंब वर्षांतून एकदा तरी पर्यटनासाठी बाहेर पडतेच. गेल्या अनेक वर्षांत त्यांच्या ठिकाणांमध्येही बदल झाला असून पूर्वी राज्यातील ठिकाणांवर फिरणारे हे कुटुंब १० वर्षांपूर्वी भारतभ्रमण आणि आता तर विदेशभ्रमणापर्यंत पोहोचले आहे. साधारणपणे बँकॉक- सिंगापूरपासून सुरुवात होते आणि मग परिघ विस्तारत जातो. या संपूर्ण आलेखात एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे नानाविध प्रकारच्या खाद्यपदार्थाची चव घेण्याची सर्वाचीच आवड.
आता त्या बाबतीतील ट्रेंडही बदलला आहे, गेल्या अनेक वर्षांत अर्थव्यवस्थेची चांगली फळे मिळू लागल्यानंतर जिभेचे चोचले पुरविण्याची मूळ मानवी ऊर्मी जोरदार उफाळून वर आली आहे. जगभरात अनेक ठिकाणी तर ती आधीपासून होतीच. पण आता भारतातही या ऊर्मीने चांगले मूळ धरले असून त्यातूनच ‘फूड टुरिझम’ची मूहूर्तमेढ रोवली गेली आहे. आता पुण्या- मुंबईतच नव्हे तर हैद्राबाद, बंगळुरू, चेन्नई, नवी दिल्ली इथे तरुणांचे काही फूड क्लब्ज अस्तित्त्वात आले आहेत. अनेकदा वीकेण्ड्सना ही मंडळी थेट विमानप्रवासाने दुसरे शहर गाठतात, ते खाद्यंतीसाठी. दुसऱ्या शहरातील फूड क्लब मग शनिवार- रविवार या दोन दिवसांत त्यांच्या पोटोबाची खास काळजी घेतो आणि ते करता करता दोन खादाडींदरम्यान शहराची सैरही घडवतो. पण हे काय फक्त पैसे अधिक खुळखुळणाऱ्या आयटीवाल्यांसाठीच नाही तर या महाराष्ट्रात पूर्वीही असे अनेक खवय्ये होऊन गेले की, जे एसटीने प्रवास करायचे आणि केवळ खाद्यंती किंवा चवीसाठी फिरायचे, मनमुराद भटकायचे. गेल्या काही दशकांमध्ये त्याला फूड टुरिझम असे नाव मिळाले आहे इतकंच. जगभरात या फूड टुरिझमसाठी देशोदेशींची भटकंती करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, असे लक्षात आल्यानंतर वर्ल्ड फूड ट्रॅव्हल असोसिएशन आणि वर्ल्ड फूड टुरिझम ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. एवढेच नव्हे तर आता फूड टुरिझमला एवढे महत्त्व आहे की, युनेस्कोचे लक्षही त्याकडे गेले असून २०१० साली प्रथमच स्पेन, ग्रीस, इटली आणि मोरक्को या देशांमधील चवीला ‘भूमध्यसागरीय चव’ असा जागतिक वारशाचा दर्जा बहाल करण्यात आला. चवीलाही जागतिक वारशाचा दर्जा असा हा अनोखा प्रकार होता.
मग प्रश्न असा पडतो की, हजारो वर्षांची खाद्यपरंपरा असलेल्या भारतीय खाद्यपदार्थाना किंवा चवीला हा दर्जा का नाही? खरेतर जेव्हा फूड एन्सायक्लोपीडिया म्हणजेच अन्नाचा ज्ञानकोश तयार करण्यासाठी घेतला तेव्हा तो करणाऱ्यांना असे लक्षात आले की, एकटय़ा भारतासाठी एका वेगळ्याच खंडाची रचना करावी लागणार आहे. कारण एकच एक भारतीय खाद्य असा प्रकार अस्तित्त्वात नाही. इथे महाराष्ट्रीय, पंजाबी, केरळी, मद्रासी, उडिया अशा राज्यांनुसार वेगवेगळ्या खाद्यपरंपरा अस्तित्वात आहेत. त्या एकमेकांपासून भिन्नही आहेत. त्यातही महाराष्ट्रीयमध्ये वैदर्भीय, मराठवाडय़ाचे, मालवणी, घाटावरचे, कोल्हापुरी असे अनेक प्रकार आहेत. जे महाराष्ट्राच्या बाबतीत तेच कमी- अधिक फरकाने इतर राज्यांमध्येही.. अखेरीस भारतीय खाद्यपरंपरेचा एक वेगळाच खंड प्रकाशित करावा लागला..
एवढी आपली खाद्यपरंपरा समृद्ध असेल आणि खवय्यांची संख्याही कमी नसेल तर मग तीच केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पर्यटनाची आखणी करता येणार नाही का? पण अद्याप सरकारी पातळीवर तसा विचारच झालेला दिसत नाही. भारत सरकारचे सोडा, महाराष्ट्र सरकारलाही हे सहज शक्य आहे. पण त्यासाठी पर्यटन विभागाने नेहमीच्या सरकारी कल्पनाविश्वाच्या बाहेर पडले पाहिजे. मग कदाचित ‘कोल्हापुरी’ हा जिओटॅिगगमधला परवलीचा शब्द ठरेल. जे कोल्हापुरीच्या बाबतीत तेच ‘मालवणी’ आणि वैदर्भीय खाद्य परंपरेच्या बाबतीतही तेवढेच शक्य आहे. याच मुद्दय़ाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकप्रभा’ने या खेपेस फूड टुरिझम हा विषय निवडला, वाचकांना निश्चितच रूचेल!
विनायक परब

Story img Loader