राजाचे गुप्तहेरखाते कसे असले पाहिजे याबाबत कौटिल्याने सांगितलेले विविध मुद्दे आणि शिवाजी महाराजांनी आपल्या एकूणच राज्यकारभारात गुप्तहेरांना दिलेलं महत्त्व यांच्यात कमालीचं साम्य आहे.

‘एकदा का शत्रुत्व स्वीकारले की, तो शत्रू कोणते उपाय योजील याची पूर्णत: कल्पना करणे अशक्य असले तरी शत्रूकडील हालचालींची बातमी मिळविण्यात हयगय झाली, तर शत्रूला तोंड देणे जड जाते. युद्धविषयक राजकारणात शत्रूकडील बातमी काढणे कठीण असते. कारण शत्रू आपली उपाययोजना यशस्वी व्हावी म्हणून आपल्या विचारांचा गौप्यस्फोट होऊ न देण्याची पराकाष्ठेची खबरदारी घेण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु यावरही मात करणे जरूर असते,’ (बा. सी. बेंद्रे, श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, बा. सी. बेंद्रे, पृ. २६१)
कौटिल्याला केवळ शत्रूकडीलच नव्हे तर स्वत:च्या राज्यातील बातम्यासुद्धा राजाला लगेचच कळणे महत्त्वाचे वाटते. म्हणून राजाच्या वतीने गुप्तहेराची नियुक्ती करताना मंत्री म्हणतो, ‘राजानं मां च प्रमाणं कृत्वा यस्य यदकुशलं पश्यसि तत्तदानीमेव प्रत्यादिश’ ज्याचा जो दोष दिसेल तो आम्हाला ताबडतोब कळवत जा. गुप्तहेरांना ही पहिली सूचना दिल्यावर स्वराष्ट्रात व शत्रूराष्ट्रात सर्वत्र गुप्तहेरांची नियुक्ती कशी करावी याविषयी अगदी बारीकसारीक माहिती अर्थशास्त्रात दिली आहे. याशिवाय प्रत्यक्ष युद्धप्रसंगी त्यांनी कोणत्या प्रकारे कार्य करावे याचे असंख्य तपशील कौटिल्य देतो.
राजांच्या प्रत्येक मोहिमेत गुप्तहेरांचे कार्य हे फार मोठे आहे. शाहिस्तेखानाच्या संपूर्ण मोहिमेतील एक छोटा प्रसंग म्हणजे राजांनी कारतलबखानाचा उंबरखिंडीत गाठून केलेला समूळ पराभव!
कारतलबखानाचा प्रसंग बघण्यापूर्वी इतर राजकारण कसे घडत होते ते पाहणे उचित ठरेल.
अफजलखानाचा वध करून राजांनी आदिलशाहाच्या राज्यात चढाई केली. अफजलच्या वधाने आदिलशाही दु:खात बुडाली असली तरी खचली नव्हती. राजांचे वाढते सामथ्र्य आणि धाडस बघून संतप्त आदिलशाहाने सिद्दी जौहरला राजांविरुद्ध पाठवले. हा सिद्दी जौहर आदिलशाहीशी पूर्णपणे एकनिष्ठ नव्हता. त्याने पूर्वी काही वेळा आदिलशाहाविरुद्ध बंडखोरी केली होती. पण आदिलशाहा अडचणीत असताना जौहरने स्वत:हून आपल्या वाईट कृत्यांची माफी मागत एखाद्या कामगिरीवर आदिलशाहाने पाठवावे म्हणून पत्र लिहिले होते आणि आदिलशाहाकडे सध्या तरी दुसरा मातबर सरदार नसल्याने त्याने राजांविरुद्ध जौहरला पाठवले होते. तीस ते पस्तीस हजार सैन्य घेऊन जौहर निघाला. या वेळी राजे मिरजेला वेढा देऊन बसले होते. पण त्यांनी मिरजेचा वेढा उठवला व ते २ मार्च १६६० ला पन्हाळगडावर आले. राजांच्या मागोमाग सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा दिला. पन्हाळ्याच्या वेढय़ाला चार महिने होत आले तरी वेढा उठण्याचे कोणतेच लक्षण दिसत नव्हते. राजांनी आपली खेळी खेळायला सुरुवात केली.
‘अनेक राजांनी एकत्र येऊन हल्ला केला असता त्यांच्यात फूट कशी पाडावी याविषयी अनेक उपाय कौटिल्याने सांगितले आहेत. त्यात प्रधान राजाशी गुप्तपणे तह करून नंतर इतरांना त्यांची फसगत झाल्याचे हेरांकरवी दाखवून द्यावे. त्यांची मने दूषित झाली म्हणजे विजिगीषूने तहाचा भंग करावा. असा भंग झाला म्हणजे पुन्हा एकदा उभयवेतन हेरांनी आम्ही जे म्हणत होते त्याचा हा पुरावा असे म्हणून फसवले गेल्याच्या विचाराला बळकटी द्यावी’ (७.१४.५-८).
जौहरविषयी प्रथमपासूनच आदिलशाहाच्या मनात असलेल्या संशयाला अधिक बळकटी आणणाऱ्या बातम्या राजांच्या गुप्तहेरांमार्फत पसरण्यास सुरुवात झाली. राजे पन्हाळ्याच्या वेढय़ातून सुटले कारण जौहर राजांना फितुर होता, असाच प्रवाद त्या वेळी सगळीकडे पसरला होता.
त्याच्या तारीख-इ-अली नुसार अफझलखानाच्या बाबतीत खेळलेली खेळीच राजे पुन्हा खेळले. ‘मी अत्यंत घाबरलो आहे, अनेक गुन्हे केले आहेत. आपल्या कृपेच्या उपदेशाने माझे मन भरून टाकीन इत्यादी इत्यादी गाणे गायला राजांनी प्रारंभ केला. राजांच्या या पत्राने जौहर आनंदला. दुसऱ्या दिवशी दोघांची गुप्त भेट होऊन नवीन कपट करण्याचे ठरवून तो परतला. ही बंडखोरी मोडण्यासाठी बादशाह स्वत: चालून आला पण तरीसुद्धा शिवाजी पळून गेला’ (बा. सी. बेंद्रे, श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. २४५)
बुसातिन उस सलातीन या ग्रंथानुसार बदचालीनी वागणाऱ्या शिवाविरुद्ध जौहरला रवाना केले. पण शिवाजीच्या सख्य करण्याच्या पत्राला तो फसला. बुसातिन म्हणतो धन्याचा म्हणजे पातशाहाचा सर्व बोध विसरून गेला व त्याने शिवाजीस, ‘हर एक जिन्नस आपले जातीचे जिनसात मोळोन त्याप्रमाणे विचार करतो,’ असे वचन दिले (उपरोक्त, पृ. २४९).
राजे व सिद्दीच्या बातम्या अर्थातच गुप्तहेरांमार्फत त्यांना हव्या तशा आणि हव्या तिथे पोहोचवल्या जात होत्या. यात राजांनी दोन गोष्टी साधल्या. जौहरला बेसावध ठेवून पळून जाण्याचा मार्ग प्रशस्त केला आणि त्याच वेळी आदिलशाहा व जौहरमधे फूट पडली. या साऱ्या राजकारणाचा परिणाम म्हणजे पुढे आदिलशाहाने विषप्रयोगाने जौहरचा खून केला.
सिद्दीशी तहाची बोलणी सुरू असतानाच राजांनी गडावरून पळून जायची योजना आखली. राजांनी म्हसाईच्या पठाराच्या उत्तरेच्या अंगाने मलकापूरमार्गे विशाळगडाला जायचे ठरवले. राजे म्हसाईच्या पठाराच्या पायथ्याशी आले. कौटिल्याने कूटयुद्धात ‘राजव्यञ्ज्नो व्यूहाधिष्ठानमायोज्य:।’ राजासारख्याच दिसणाऱ्या मनुष्याची व्यूहाच्या मध्यभागी योजना करण्यास सांगितले आहे (१०.३.४२). राजांनीही हीच खेळी खेळली. राजांबरोबर त्यांच्यासारखाच दिसणारा शिवा काशिद होता. त्याला राजांसारखा पेहेराव चढवला होता. तो राजांच्या पालखीत बसला आणि पालखी निघाली. यांनी मलकापूरमार्गे जायचे व काही संकट न आल्यास राजांना गजापूरजवळ येऊन मिळायचे. पण नक्की काय झाले ते फार कोणाला कळलेच नाही. सगळ्या गोष्टी अत्यंत गुप्तपणे होत होत्या. राजनीतीत ही गुप्तता महत्त्वाची असते.
नोव्हेंबर १६५९ मध्ये अफझलखानाच्या वधानंतर रुस्तुमेजमान, सिद्दी जौहर यांसारख्या मातबर सरदाराचा राजांनी केलेला सपशेल पराभव आणि त्याच वेळी आदिलशाहीचा बराचसा प्रदेश जिंकत आदिलशाहीत मारलेली मुसंडी यामुळे आदिलशाह घायकुतीला आला. मोंगल हे आदिलशाहीचे शत्रू असूनसुद्धा त्याने औरंगजेबाला साहाय्य करण्याची विनंती केली. या संधीचा फायदा उठवत औरंगजेबाने औरंगाबादचा मोगली सुभेदार उमराव शाहिस्तेखानास शिवाजीविरुद्ध जाण्याचा हुकूम केला. त्याच वेळी जमेल तसा आदिलशाहाचाही मुलूख मारण्याचा आदेश देण्यास औरंगजेब विसरला नाही.
९ मे १६६० रोजी खान पुण्यास पोहोचला. पुण्यात आल्यावर त्याने इस्माइलखानला तीन हजार स्वारांसह तळकोकणावर पाठवले व स्वत: चाकणची गढी घेण्यास गेला. या वेळी राजे पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या वेढय़ात अडकले होते. २१ जून १६६० रोजी खान चाकणला पोहोचला. खान चालून येत आहे हे पाहून मराठय़ांनी चाकणच्या अवतीभवतीचा प्रदेश उजाड केला. खानाच्या सैन्याने चाकणच्या गढीवर एक चढाई करून पाहिली आणि मराठय़ांच्या कडव्या प्रतिकाराचा अनुभव घेतला. मग मात्र त्याने चाकणला वेढा दिला. १५ ऑगस्ट १६६० ला चाकणची गढी पडली. चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याच्या नेतृत्वाखाली ही छोटीशी गढी मराठय़ांनी तब्बल पंचावन्न दिवस लढवली. मधल्या काळात म्हणजे १३ जून १६६० ला राजे पन्हाळगडावरून निसटले. सिद्दी अजूनही पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता आणि राजे निघून गेल्यावरही त्र्यंबकपंत किल्ला लढवत होते. इकडे आदिलशाहीच्या सांगण्यावरून औरंगजेबाने राजांविरुद्ध मोहीम आखली असली तरी त्याला आदिलशाहीही संपवायची होती. त्यामुळे शाहिस्तेखानाने कारतलबखानाला आदिलशाहाचा पिरडा किल्ला घेण्यास पाठवले. किल्लेदार गालीब होता. कोणताही लढा न देताच त्याने किल्ला कारतलबच्या हाती दिला. आदिलशाहाला त्याची चूक लक्षात आली आणि राजांनी नेमका या संधीचा फायदा उठवला.
राजांनी दोन शत्रू एका वेळी अंगावर घेतले होते. आता यातील एका शत्रूला शांत करायचे राजांनी ठरवले. कौटिल्य म्हणतो, ‘ज्याच्याशी एकजूट केल्यामुळे शत्रू पिछाडीवर हल्ला करणार नाही, मी ज्याच्यावर स्वारी करणार आहे त्याच्या मदतीला जाणार नाही, मला धान्य व कुमक धाडेल पण ज्याच्यावर मी हल्ला करणार आहे. त्याला या गोष्टी मिळू देणार नाही, विजयानंतर त्याला लाभाचा उचित हिस्सा मिळाल्यामुळे माझ्या इतर शत्रूंत माझ्याविषयी विश्वास उत्पन्न करेल तर शेजारच्या अरीबरोबर संधी करून शेजारच्या राजावर चाल करावी.’ (७.७.२). मोंगलांशी लढून राजे आदिलशाहाला काही देणार नव्हते किंवा आदिलशाहा राजांविषयी इतर शत्रूंत चांगले मत वगैरे तयार करणार नव्हता याची जाणीव दोघांना होती. पण आधीच जर्जर झालेल्या आदिलशाहाला मोंगलांशी लढणे शक्य नव्हते आणि मोंगलांशी लढताना एक बाजू शांत राहण्याची गरज राजांना होती. यासाठी राजांनी आदिलशाहाबरोबर संधी करायचे ठरवले. शिवाय संधिनैकतो विग्रहेणकतश्चेत्कार्यंसिद्धिं पश्येज्ज्यायानपि द्वैधीभूतस्तिष्ठेत्। (७.३.२२) म्हणजे एका बाजूला संधी करून व दुसऱ्या बाजूला विग्रह करून कार्यसिद्धी होत असेल तर बलवत्तर राजानेसुद्धा द्वैधिभावाचा अवलंब करावा असे कौटिल्याचे मत आहे. राजांनी त्र्यंबकपंतांना गड जौहरच्या ताब्यात देण्यास सांगितले आणि अफजलखानानंतर रुस्तुमेजमानचा पराभव केला असला तरी त्याच्यामार्फत आदिलशाहीशी मैत्रीचा करार केला. या रुस्तुमेजमानचा व शहाजीराजांचा स्नेह होता. कदाचित त्याचा फायदा इथे राजांनी उठवला असू शकेल.
पिरडा जिंकल्यावर शाहिस्तेखानाने कारतलबला कोकणवर स्वारी करायला पाठवले. खानाने आपल्या स्वारीचा मार्ग अत्यंत गुप्त ठेवला होता. खानाने तो बोरघाट मार्गाने उतरणार अशी हूल उठवून दिली. पण राजांचे हेरखाते किती सक्षम आहे याचा अनुभव अजून खानाला यायचा होता.
राजांनी पेणच्या अवतीभवती आपले सैन्य जमवायला सुरुवात केल्याची बातमी खानाकडे आली. खानाचा प्रवास बोरघाटमार्गेच सुरू झाला, पण अचानक लोणावळ्याकडे न जाता तो थोडासा दक्षिणेकडे वळला. राजांपर्यत खानाचा बदललेला मार्ग पोहोचला. हा सारा दाट जंगलाचा प्रदेश. खान कुरवंडा घाटात एक फेब्रुवारीला पोहोचला. खरतर राजांचे सैन्यही एक तारखेलाच कुरवंडा घाटातील जंगलात शिरले होते. खानाच्या टेहळणीपथकाने मार्ग निर्धोक असल्याची ग्वाही दिली. राजांना खानाचा बदललेला मार्ग कळायच्या आत खानाने कुरवंडा घाटातून उतरून राजांच्या सैन्यावर हल्ला करण्याची योजना ठरली. खान कुरवंडा घाटातून उतरणार ही हल्ल्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट होती. कुरवंडा घाटातून अंदाजे दोन मैलावर चावनी नावाचे गाव आहे. इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा. म्हणजे एका वेळी एकच माणूस अशा प्रकारे ‘एककतार’मध्ये जावे लागेल असा मार्ग. ‘एकायने वा शैलस्तम्भवाटखञ्ज्नान्तरुदके वा स्वभूमिबलेनाभिहन्यु:।’ अर्थशास्त्रानुसार शत्रू एका माणसानेच जाण्यास योग्य असलेल्या वाटेवर, पर्वतावर, कुंपणाआड, दलदलीच्या प्रदेशात किंवा पाण्यात असता, स्वत: अनुकूल भूमीवर राहून त्याच्यावर हल्ला करावा. राजांनी या नैसर्गिक स्थितीचा फायदा उठवला. चावनीपुढे आल्यावर नदीच्या वळणापाशी चढाव चढून अर्धापाऊण मैलावर उंबरे गाव आहे. चावनी ते उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे म्हणून तिला उंबरखिंड म्हणतात. ‘वनगूढा वा प्रत्यन्तस्कन्धमुपनिष्कृष्याभिहन्यु: एकायने वीवधासारप्रसारान् वा।’ (१२.४.२०) अरण्यात दडून बसलेल्या सैनिकांनी सरहद्दीवरील शत्रूच्या सैन्याला पुढे यावयास लावून त्याचा नाश करावा किंवा एकच मनुष्य जाऊ शकेल अशा मार्गावर शत्रूची रसद, कुमक व खाद्यन्वेषण करणाऱ्या तुकडय़ा यांचा नाश करावा. एक फेब्रुवारीला राजांनी सायंकाळपर्यंत आपले सैन्य उंबरखिंडीत मोक्याच्या जागी पेरले. सैन्याकडे तलवारी, धनुष्यबाण, बंदुका व मुबलक दगड-गोटे होते. राजे स्वत: खिंडीच्या तोंडावर असणाऱ्या टेकडीवर सज्ज झाले. खानाच्या सैन्याने घाटमाथा सोडला. खान पुढे सरकला की मागून त्याच्या नकळत त्याची कोंडी करत यायचे, असा बेत ठरला. मोगली परंपरेनुसार खानाच्या सैन्याचा पसारा खूप मोठा होता. या चिंचोळ्या मार्गातून जाताना त्यांची पुरी दमछाक होत होती. साधारण अकरा वाजेपर्यंत सैन्य चावनीपाशी आले. थोडी विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरू झाला. आता सूर्य तळपत होता. वाटेत पाण्याचे दुर्भिक्ष आणि अचानक कर्णे वाजू लागले. खानाचे सैन्य व घोडे थबकले. काय झाले ते कळायच्या आत ‘हर हर महादेव’ची गर्जना खिंडीत घुमली आणि हल्ला झाला. मराठे कुठून मारा करताहेत तेच कळत नव्हते. खानाच्या सैन्याने मागे पळायचा प्रयत्न केला, पण मागची वाटही अडवली गेल्याचे आता लक्षात आले. मराठय़ांचा रणवेश भयंकर होता. सारी परिस्थिती पाहता कारतलबखानाबरोबर असलेल्या रायबागन या शूर महिला सरदाराने खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला. शेवटी कारतलबने आपला दूत राजांकडे पाठवला. ‘हीनश्चेत्सर्वत्रानुप्रणतस्तिष्ठेत् संधिमुपेयात्।’ (७.३.१०) हीनबल राजा जर सर्व बाबतीत नमून वागत असेल तर त्याच्याशी संधी करावा कौटिल्याच्या या सूत्रानुसार राजांनी युद्ध थांबवले. कारतलबला अभय दिले. आपली सारी साधन संपत्ती आहे तिथेच सोडून कारतलबने निघून जावे. त्याच्या सैन्यातील स्थानिक लोकांना राजांकडे यायचे असेल तर त्यांना तशी अनुकूलता दर्शवावी यांसारख्या अटी खानापुढे ठेवल्या गेल्या. सगळ्याच्या सगळ्या अटी मान्य करण्याशिवाय खानापुढे पर्याय नव्हता.
राजांनी युद्ध थांबवण्याचे आदेश दिले. कुरवंडय़ाला घाट चढून आल्यावर सैन्याकडे काही चीजवस्तू नाही ना याचा तपास करून साऱ्या सैन्याला जाऊ दिले. उरलेला सारा दिवस राजांचे सैन्य खानाच्या सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे-तंबू यांचे सामान, दागिने, घोडे, बैल इत्यादी प्राणी अशा गोष्टी शांतपणे गोळा करत होते.
या साऱ्या लढाईतून राजांचे हेरखाते किती सक्षम आहे, याचे पुन्हा एकदा प्रदर्शन झाले. वेगवान व सुनियोजित हालचालींनी अत्यंत कमी सैन्यबल असतानासुद्धा वीस हजार सैन्याचा संपूर्ण पराभव राजांनी केवळ हजारभर सैन्याच्या साहाय्याने केला. शिवाय प्रचंड संपत्ती व मनुष्यबळ प्राप्त केले. पुन्हा एकदा या विजिगीषू राजाने संपूर्ण जय प्राप्त केला.
(समाप्त)
आसावरी बापट

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
entry to Narendra Modis meeting venue will be denied if objectionable items are brought
…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत प्रवेशच मिळणार नाही!
maharashtra assembly poll 2024 rajendra raut and dilip sopal supporters clash barshi assembly elections
बार्शीत राजेंद्र राऊत – सोपल गटात गोंधळ; दोन्ही गटांचे आरोप-प्रत्यारोप, तणाव
Assembly Election 2024 Achalpur Constituency Bachu Kadu Mahavikas Aghadi and Mahayuti print politics news
लक्षवेधी लढत: अचलपूर : बच्चू कडूंसमोर चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान