‘समाजस्वास्थ्य’चा अखेरचा अंक र. धों. कर्वे यांच्या मृत्यूनंतर ठरलेल्या दिवशीच प्रसिद्ध झाला. त्याची संपूर्ण तयारी जाण्यापूर्वी त्यांनी केली होती. मात्र, तो प्रसिद्ध होताना ते हयात नव्हते. त्यांचे बंधू  भास्कर धोंडो कर्वे यांनी हे मासिक बंद होत असल्याचे जाहीर करणारा लेख  लिहिला. तो येथे देत आहोत.
‘समाजस्वास्थ्य’चा हा शेवटचा अंक वाचकांच्या हाती पडत आहे.
जुलै १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्या’चा पहिला अंक प्रसिद्ध  झाला. त्यात पुढील मजकूर पहिल्याच पानावर आढळतो :
‘व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषत: ज्या विषयासंबंधी लेख छापण्यास इतर पत्रकार लाजतात किंवा भितात, असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यांसंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अडचण पडते व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात केवळ तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल. ‘कामशास्त्र’ या शब्दाचा दुरुपयोग झालेला आहे, तरीही ‘कामवासनेचा शास्त्रीय विचार’ अशा अर्थाने हा शब्द वापरणे आम्हास भाग पडत आहे. याबद्दल कोणासही क्षुब्ध होण्याचं कारण नाही.’
हा पहिला अंक छापण्याचे एका मोठय़ा छापखान्याने एकाएकी नाकारल्यामुळे तो दुसऱ्या एका छापखान्यात छापावा लागून प्रसिद्ध होण्यास थोडा उशीर लागला. परंतु त्यानंतर मात्र नियमितपणे दर महिन्याच्या १५ तारखेला ‘समाजस्वास्थ्य’ वाचकांना मिळत आलेलं आहे. पहिल्या अंकात २४ पाने होती. ‘लोकाश्रय पुरेसा मिळाल्यास पृष्ठसंख्या वाढविता येईल’, असे आश्वासन संपादकांनी दिले होते; परंतु लोकाश्रय फारसा न वाढल्यामुळे ती ३२ च्या पलीकडे कधीच गेली नाहीत. अलीकडे तर ती विसावरच येऊन राहिली होती. तथापि, हे छोटेसे मासिकदेखील आतापर्यंत नियमितपणे २६ र्वष ४ महिने वर्गणीदारांना पोचवणे ही गोष्ट कौतुकास्पद नाही, असे कोण म्हणेल? गेल्या तीन-चार वर्षांत श्री. र. धों. कर्वे यांची प्रकृती नीटशी राहात नसून दोन वेळा ते मोठय़ा दुखण्यातून वाचले. परंतु योगायोग असा की, त्या दोन्ही वेळेला व त्यांच्या शेवटच्या आजारातही प्रत्येक वेळी अंकाच्या प्रती छापून व्यवस्थित घरी येऊन पडलेल्या होत्या. अंक रवाना करण्याची त्यांची सर्व व्यवस्था इतकी चोख होती, की कोणीही ‘समाजस्वास्थ्य’च्या व्यवस्थापकीय खुर्चीवर बसावे व त्याचे काम चालू ठेवावे. त्याप्रमाणे व्यवस्था होऊन प्रत्येक खेपेस अंक १५ तारखेला वर्गणीदारांच्या हाती पडले. ऑक्टोबरचा अंकही त्यांची प्रेतयात्रा स्मशानात पोचली, त्याचवेळी १४ तारखेला टपालात पडून १५ ऑक्टोबरला वर्तमानपत्रांतील मृत्युलेखांबरोबर वाचकांना वाचावयास मिळाला!
‘समाजस्वास्थ्य’ हा एकखांबी तंबू होता. त्याचे लेखन लिहून- टाइप करून- छापखान्याची प्रत तयार करणे, प्रूफे तपासणे, छापून गुंडाळलेले अंक घरी आल्यावर त्यांवर वर्गणीदारांच्या नावाच्या चिठ्ठय़ा व तिकिटे चिकटवणे, १४ तारखेला सर्व प्रती पोष्टात व विक्रेत्यांकडे रवाना करणे आणि कचेरीची सर्व कामे श्री. र. धों. कर्वे हे बहुतांशी एकटेच करीत होते. पुरेशा लोकाश्रयाच्या अभावी मासिक नेहमी तोटय़ातच चालले असल्याने मासिकाची कचेरी व नोकरवर्ग म्हणजे तेच. त्यांच्या मृत्युमुळे हा एकखांबी तंबू कोसळावा, हे क्रमप्राप्तच आहे.
या शेवटच्या अंकाचे सर्व साहित्य त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आगाऊ तयारच होते. ते त्यांच्या पश्चात वाचकांना सादर करीत आहोत. त्याचा स्वीकार करून वाचकांनी ‘समाजस्वाथ्या’ला निरोप द्यावा, अशी विनंती आहे. वर्गणीदारांची उरलेली वर्गणी ज्यांची त्यांना पोचती करून ऋणमुक्त होण्याची व्यवस्था आम्ही लवकरच करीत आहोत.
सारस्वत ब्राह्मण समाजाच्या श्री सरस्वती महोत्सवात शनिवारी तारीख १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्रश्नोत्तरांचा (ब्रेन्स ट्रस्ट) कार्यक्रम होता. त्याला श्री. र. धों. कर्वे हे गेले होते. तेथे उत्तरे देतानाच त्यांचे पाय लटपटू लागल्यासारखे वाटले. शेवटची काही उत्तरे त्यांनी बसूनच दिली. कार्यक्रमानंतर चहा घेण्यापूर्वी त्यांना मळमळून उलटी झाली. डॉक्टरांनी तपासल्यावर प्रकृती चिंताजनक असल्याचे आढळल्यावरून त्यांना अ‍ॅम्ब्युलन्समधून घरी पोचवण्यात आले. रात्री डॉ. भालेराव यांनी तपासल्यावर रक्तदाब २६० पर्यंत गेल्याचे आढळून आल्यावरून त्यांनी ताबडतोब भाटिया जनरल हॉस्पिटलमध्ये पोचविले. तेथे डॉ. गोखले, डॉ. पै, डॉ. साठे वगैरेंनी अतोनात परिश्रम घेऊन औषधोपचार केले; परंतु तेथे जाण्यापूर्वी जी बेशुद्धावस्था आली ती कायमचीच ठरली व बुधवार ता. १४ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास श्री. कर्वे यांचे प्राणोत्क्रमण झाले.
गेली अनेक वर्षे श्री. रघुनाथरावांस रक्तदाबाचा विकार होताच. मेंदूत रक्तस्राव होऊन अखेर त्यातच त्यांचा अंत झाला. त्यात समाधानी गोष्ट इतकीच, की अर्धाग जाऊन त्यांना दीर्घकाळ खितपत पडावे लागले नाही.
‘समाजस्वास्थ्या’च्या २६ व्या वर्षांच्या पहिल्या अंकात पुढील मजकूर होता-
‘‘या २५ वर्षांत ‘आम्ही काय केले?’ या मासिकाच्या नावावरूनच हे समजण्यासारखे आहे, की लैंगिक विषयांना वाहून घेण्याचा आमचा उद्देशच नव्हता. तरीदेखील पुष्कळ लोकांचा तसा गैरसमज आहे आणि आम्ही इतर विषयांवर ‘का लिहितो’, अशी पृच्छा आम्हांस अनेकांनी केली आहे. आमचा उद्देश प्रथमपासूनच असा होता की, ‘आगरकरांनी ज्या बुद्धिवादाचा पुरस्कार केला, त्या बुद्धिवादाचा प्रकाश शक्य तितक्या विषयांवर पाडून त्याचा प्रसार करावा. अर्थात, बुद्धिवाद आगरकरांनी आपल्या डोक्यातून काढलेला नाही; त्याचा त्यांनी पुरस्कार केला, इतकेच. परंतु कित्येक बुद्धिवादी म्हणवणारे लोक असे समजतात की, आगरकर म्हणजे बुद्धिवादाची कमाल मर्यादा झाली, त्यांच्यापुढे जाणे शक्य नाही. आमच्या मते, ते शक्य आहे आणि आम्ही तसा प्रयत्न केला आहे.’’
या बुद्धिवादाचा प्रचार करण्यात श्री. कर्वे यांनी हयात घालविली व त्याचे फळ आजच्या समाजात जे विचारस्वातंत्र्य आढळते, त्यात दिसून येत आहे. आता बुद्धिवादाचे मूळ समाजातील विचारवंतांमध्ये तरी पक्के रुजले आहे व बुद्धिवादाला व्यक्तिगत मर्यादा नाहीत, हे त्यांचे म्हणणे ग्राह्य़ धरल्यास बुद्धिवादाचे रोप पुढील काळात वाढतच राहणार असे दिसत आहे.
‘‘या मासिकात लैंगिक विषयांना प्राधान्य मिळाले आहे, याचे कारण असे की, स्वत:ला बुद्धिवादी म्हणवणारे लोकदेखील या एका विषयात मात्र बुद्धिवादाचा उपयोग करण्यास तयार नसतात. याबाबतीत मनुष्याने जुन्या चाकोरीतून चालले पाहिजे, अशी त्यांची नीतीची कल्पना असते; कारण अनीतीची व्याख्याच अशी झाली आहे की, स्त्री-पुरुष संबंधांतील चालू र्निबध न पाळणे म्हणजे अनीती. अर्थात बुद्धिवादी न म्हणवणारे लोकदेखील हे र्निबध पाळतात असे नाही; पण ते पाळले पाहिजेत असे म्हणतात आणि पाळल्याचे ढोंग करतात.’’
लैंगिक बाबतीतील कव्र्याची मते समाजाला बहुतांशी न रुचणारीच होती. परंतु कोणी सांगावे, पुढे २५-५० वर्षांनी त्यांतील काही अगर बरीच अनेकांना पटूही लागतील. आता समाजाने मान्य केलेली मते ५० वर्षांपूर्वी अशीच असंमत होती. आजच्या बुद्धिवादाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून आज जशी आगरकरांची समाजाला आठवण होते, तशीच कदाचित ५० वर्षांनंतर लैंगिक बुद्धिवादाच्या त्यावेळच्या कल्पनांचे प्रणेते म्हणून र. धों. कर्वे यांची आठवण समाज काढील.
संततिनियमनाचे महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील आद्य पुरस्कर्ते म्हणून आज त्यांचे नाव घेतले जात आहेच. आज संततिनियमनाची कल्पना केवळ लोकमान्यच नव्हे, तर राजमान्यही झाली असून काही मंत्र्यांचा विरोध असतानाही सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ते कार्य हाती घेतले आहे.
तेव्हा एकंदरीने पाहता ‘समाजस्वास्थ्या’चे अवतारकार्य बऱ्याच अंशी सफल झाले असे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे ‘समाजस्वास्थ्य’ बंद झाले तरी त्यामुळे विशेष वाईट वाटण्याचे कारण नाही. कव्र्याचा एखादा शिष्य अगर एखादी संस्था मासिकाचे व त्यांच्या ग्रंथांचे प्रकाशन करण्यास पुढे आली, तर ते स्वागतार्हच ठरेल. परंतु ‘समाजस्वास्थ्या’सारखी वैयक्तिक संस्था त्या व्यक्तीबरोबरच लयास जावी, हेही अस्वाभाविक नाही. मात्र, श्री. कर्वे यांनी पाजळलेली बुद्धिवादाची ज्योत उत्तरोत्तर जास्त प्रकाशमान होऊन समाजस्वास्थ्य वाढतच राहील, हे आता स्पष्ट दिसत आहे. हे मासिक आजपर्यंत चालविण्याच्या कामी ज्या ज्या व्यक्तींचे साहाय्य झाले आहे, त्या सर्वाचे व विशेषत: पॉप्युलर प्रेसचे मालक श्री. गंडभीर यांचे अत्यंत मन:पूर्वक आभार मानून ‘समाजस्वास्थ्य’ सर्वाचा निरोप घेत आहे.
( ‘समाजस्वास्थ्य’, नोव्हेंबर १९५३ )
‘र. धों. कर्वे : मत आणि मतांतरे’मधून साभार
हे लेख पद्यगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या अनंत देशमुख संपादित ‘समाजस्वास्थ्य’च्या निरनिराळ्या खंडांतून घेतले आहेत.

Story img Loader