मराठीतला पहिला ‘शिल्पकार चरित्रकोश’ चित्रकार सुहास बहुळकर व कलासमीक्षक दीपक घारे यांनी संपादित केला असून तो साप्ताहिक विवेकतर्फे शनिवार, ४ मे रोजी प्रकाशित होत आहे. या कोशाला बहुळकर व घारे यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली असून त्यातील हा संपादित अंश..

युरोपियन कलावंतांना पाचारण करून त्यांच्यापासून चित्रे व शिल्पे बनवून घेतली जाऊ लागली. पूर्वीपासूनच येथील इंग्रज अधिकारी त्यांच्या कारकिर्दीतील, त्यांना अभिमानास्पद वाटणाऱ्या महत्त्वाच्या प्रसंगांची चित्रे परदेशी कलावंतांकडून काढून घेत असत. याशिवाय अनेक इंग्रज चित्रकार आपल्या देशात फिरून येथील विलक्षण वेगळे जीवन, निसर्ग येथील वास्तूंची चित्रे काढून इंग्लंडमध्ये पाठवीत असत. सवाई माधवरावांच्या काळातील पुण्यातील रेसिडेन्ट मॅलेट यानेही जेम्स वेल्स या चित्रकाराला आमंत्रित करून एक भव्य चित्र रंगवण्यास सांगितले होते. हे चित्र इंग्रज, मराठे व टिपू सुलतान यांच्यात ६ ऑगस्ट १७९० रोजी झालेल्या त्रिवर्ग तहाचे, अर्थात पेशवे दरबाराचे चित्र होते. या चित्राच्या तयारीची अभ्यासचित्रे २४ ऑगस्ट १७९१मध्ये गणपती उत्सवाच्या वेळी दरबारात हजर राहून जेम्स वेल्स व त्याचे साहाय्यक व विद्यार्थी यांनी तयार केली होती. १७९२च्या दरम्यान वेल्सने सवाई माधवराव, नाना फडणवीस, महादजी शिंदे यांचीही व्यक्तिचित्रे काढली होती, पण विशेष म्हणजे १७९१च्या दरम्यान याच इंग्रज चित्रकार जेम्स वेल्सच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या शनिवारवाडय़ात एका कलाशाळेत शिकून तयार झालेले गंगाराम चिंतामण नवगिरे-तांबट हे एतद्देशीय कलावंत पेशवे दरबाराचा ‘त्रिवर्ग तह’ या चित्राची अभ्यासचित्रे करण्यात सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या अभ्यासचित्रांचा दर्जा उत्तम होता व आजही ही चित्रे इंग्लंडमध्ये आणि मॅलेटच्या वंशजांच्या संग्रहांत आहेत. या कोशात चिंतामण नवगिरे-तांबट यांच्यावर विस्तृत नोंद प्रथमच प्रकाशित होत आहे.

महाराष्ट्रातील आधुनिक कलाप्रवाह

१९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेक कलावंतांनी कलाभिव्यक्तीच्या विविध शक्यता शोधत शैलीविषयीचे अनेक प्रयोग करीत वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या. यथार्थदर्शी वास्तववादी शैलीत माध्यमावरील प्रभुत्वाचे व कारागिरीचे अत्यंत दर्जेदार दर्शन घडविणाऱ्या पूर्वसुरींपेक्षा या नवीन प्रकारच्या, कधी भारतीयत्व जपणाऱ्या तर कधी विरूपीकरणातून साकार होणाऱ्या कलाकृतींनी, चांगलीच खळबळ उडाली. १९३७-३८च्या दरम्यान ‘यंग टर्कस्’ असे नाव घेऊन चित्रकारांचा एक गट उत्तर दृकप्रत्ययवाद  (ढ२३ केस्र्१ी२२२्रल्ल्र२े) व अभिव्यक्तिवाद (ए७-स्र्१ी२२२्रल्ल्र२े) स्फूर्ती घेऊन चित्रनिर्मिती करू लागला. पी.टी. रेड्डी, क्लेमन्ट बाप्टिस्टा, भोपळे व मजिद हे या गटाचे प्रमुख चित्रकार होते. १९४१मध्ये ‘द बॉम्बे ग्रूप कन्टेम्पररी इंडियन आर्टिस्ट’ या नावाने पाच चित्रकारांनी एकत्र येऊन हा गट स्थापन केला. पी.टी. रेड्डी, एम.टी.भोपळे, अे. अे. मजिद, एम.वाय. कुलकर्णी व बाप्टिस्टा हे या गटाचे सभासद होते.

यानंतरच्या काळातील प्रमुख घटना म्हणजे ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ या संस्थेची १९४८मध्ये झालेली स्थापना. हुसेन, आरा, रझा, सूझा, बाकरे व गाडे हे या संस्थेचे प्रमुख चित्रकार होते. पुढील काळातील कलानिर्मितीत या घटनेचा मोठा प्रभाव पडला. कलावंतांमध्ये जुने व नवे असे दोन तट निर्माण झाले. प्रसंगी पराकोटीचे मतभेदही झाले. पाश्चिमात्य प्रभावाखालील वास्तववादी शैली व पारंपरिक भारतीय चित्रांपासून स्फूर्ती घेऊन कलानिर्मिती करणारे कलावंत एका बाजूला तर शास्त्राचे व कलेतील कारागिरीचे बंधन झुगारून, सामथ्र्यपूर्ण अभिव्यक्तीला महत्त्व देऊन मुक्तपणे चित्रे काढणारे कलावंत दुसऱ्या बाजूला; असे कलावंतांमध्ये दोन गट निर्माण झाले. आजही हे दोन गट महाराष्ट्रात अस्तित्वात असून त्यांच्यातील मतभेदांची दरी आजही कायम आहे.

नवीन विचारांनी भारलेल्या या प्रयोगशील कलावंतांना आर्टिस्ट सेन्टर (स्थापना १९५०), जहांगीर आर्ट गॅलरी (स्थापना १९५२) व तत्कालीन कलासमीक्षक श्लेशिंजर, लायडन अशांचा आधार व प्रोत्साहन मिळाले. काही कलावंत परदेशात जाऊन तेथील कलाचळवळी अनुभवून परत आले. तर काही जण परदेशातच स्थायिक झाले. १९५७च्या दरम्यान ‘बॉम्बे ग्रूप’ नावाने एक नवीन गट उदयास आला. यात हेब्बर, चावडा, मोहन सामंत, जी.जी. कुलकर्णी, लक्ष्मण पै, बाबूराव सडवेलकर व हरकिशनलाल असे चित्रकार होते. १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी आपली सहा प्रदर्शने भरवली. बेंद्रे, हुसेन, हेब्बर, रझा, आरा, बाकरे, गाडे, सूझा, गायतोंडे, अकबर पदमसी, तय्यब मेहता, रायबा, बाबूराव सडवेलकर अशा अनेक चित्रकारांनी विविध प्रकारे कलानिर्मिती करून तेथील कलाविश्व संपन्न केले.

वर उल्लेखिलेल्या कलावंतांच्या पिढीपासून प्रेरणा घेऊन पुढील काळात मोहन सामंत, प्रभाकर बरवे, गोपाळ आडिवरेकर, प्रफुल्ला डहाणूकर, बी. प्रभा, बी. विट्ठल अशा अनेक चित्रकार-शिल्पकारांनी महाराष्ट्राचे कलाजगत घडविण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. आकाराचे विरूपीकरण करण्यापासून सुरू झालेले प्रयोग आज अमूर्त चित्रांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. अंबादास, गायतोंडे, लक्ष्मण श्रेष्ठ व प्रभाकर कोलते यांसारख्या चित्रकारांनी अमूर्त शैलीतील चित्रे या कलाप्रकारांत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. गेल्या काही दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या अनेक कलामहाविद्यालयांतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी विविध शैलीत कार्यरत असून स्वत:ची ओळख विशिष्ट शैलीद्वारे करून देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. साहजिकच यात प्रचंड विविधता असून वास्तववादी शैलीपासून ते विरूपीकरण (ऊ्र२३१३्रल्ल), सुलभीकरण (र्रेस्र्’्र्रू३८), अलंकरण (ऊीू१ं३्र५ी), केवलाकारी (अु२३१ूं३) अशा अनेक प्रकारे कलानिर्मिती होताना आढळते. यापुढे जाऊन काही तरुण कलावंत मांडणशिल्प (कल्ल२३ं’’ं३्रल्ल) या कलाप्रकारात प्रत्यक्ष वस्तूच नव्हे तर दूरदर्शन, व्हिडीओ, संगणक अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपली कलानिर्मिती करीत आहेत.

दृश्यकलेच्या या बदलत्या स्वरूपामुळे प्रतिमा, अवकाश, प्रतिभा, कौशल्य या संकल्पनांच्या कक्षा विस्तारण्याची वेळ आलेली आहे. कलावंत कोणते, माध्यम कसे वापरतो याबरोबर संकल्पनात्मक मांडणीतून तो कोणते नवे संदर्भ निर्माण करतो, याला आज अधिक महत्त्व आलेले आहे. यातूनच सुनील गावडे, सुदर्शन शेट्टी किंवा तुषार जोग यांच्यासारखे कलावंत आपल्या नवीन संकल्पनांमुळे राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी आमंत्रित केले जात आहेत.

आजच्या कलेचे नवे सौंदर्यशास्त्र

आजच्या दृश्यकलेचा विस्तार एवढा मोठा आहे आणि इतर कलाशाखांशी असलेले तिचे नाते इतक्या विविध प्रकारचे आहे की, दृश्यकलेच्या सीमा निश्चित करणे खूपच कठीण झाले आहे. आजच्या दृकश्राव्य प्रसारमाध्यमांच्या युगात दृश्यप्रतिमांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. दृश्यकलेच्या बाबतीत काही कलाविषयक प्रश्न पुन:पुन्हा निर्माण होताना दिसतात. कलेचे अलौकिकत्व आणि तिचे उपयुक्तता मूल्य यांचे द्वंद कला इतिहासात पुनरावृत्त होताना दिसते. आर्ट आणि क्राफ्ट, कला आणि कौशल्य यांच्यातल्या सीमारेषा प्रत्येक काळात नव्याने स्पष्ट होत आलेल्या आहेत. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेपासून आर्ट आणि क्राफ्टचे साहचर्य होते. त्यातून वास्तूंचे अलंकरण, उपयोजित कलेचा स्वतंत्र विभाग, मूलभूत अभ्यासक्रमातला बाहाऊस आणि डिझाइन संकल्पनेचा प्रभाव अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर कला व कौशल्य यांच्यामधले, तसेच अलौकिकता व उपयुक्तता यांच्यातले नाते नव्याने प्रस्थापित होताना दिसते. काळाच्या ओघात कलामाध्यमांच्या व कलाप्रकारांच्या संकल्पना बदलल्या. संवेदनशीलतेत मोठे बदल झाले.

आजच्या दृश्य कलाजगताचा विचार करता त्याची व्याप्ती खूपच विस्तारली असून कलानिर्मितीचे स्वरूपही बहुकेंद्री झाले आहे. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या कलेतही इतक्या विविध प्रकारे अभिव्यक्ती होत आहे की, ते बघताना मन गोंधळून जाते. परिणामी या सर्वाना कवेत घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे कठीण होऊ लागले आहे. आज तर अशी परिस्थिती आहे की कलाविष्कारामागे कोणतेही समान सूत्र नाही. परिणामी आस्वादाच्या बाबतीत कोणतेही संकेत नाहीत. कलावंताला निर्मितीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व प्रेक्षकाला आस्वाद घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे! परंतु या परिस्थितीमुळे सर्वसामान्य माणूस गोंधळून गेल्याचे दिसते. हा दृश्यकला खंड वाचताना हा समग्र अनुभव येईल, असा विश्वास वाटतो.

Story img Loader